Wednesday, April 29, 2020

पद्मश्री साहबजादे इरफान अली खान - युगांत...!!!


फार कमी असे लोक असतात, जे आपल्या मनात खास घर करून असतात. त्यात मग मित्र असेल, शिक्षक असेल, खेळाडू असेल पण जर गोष्ट अभिनयाची असेल तर इरफान खान चे नाव त्यासोबत जोडलं जात नसेल तर मला वाटत हे ह्या जगात तरी शक्य नाही. ही गोष्ट खरी आहे की, आयुष्य चालतं राहत लोकं येतात, जातात. पण आपल्या मनात एक खास जागा नेहमी रिकामी राहून जाते त्या जागेला भरून काढणं कधीही शक्य नाही होत. इरफान च्या जाण्याने ती जागा आजपासून कायमची रिक्त झाली आहे. सालं, आपल्या आतील काहीतरी संपून गेलंय हे फिलिंग फार वाईट असतं. नेमकं हेच फिलिंग आज येतंय.

मी गेल्यावर्षीपासून ब्लॉग लिहायला लागलो. मला पहिलाच ब्लॉग माझ्या अत्यंत आवडीच्या इरफान किंवा के के मेनन वर लिहायचा होता. मी के के वर लिहिला, म्हटलं इरफान वर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लिहू कारण माझ्यासारखाच तोही जानेवारीतला असल्याने (७ जानेवारी) थोडा जास्त जवळचा आहे. पण काही कारणास्तव ते राहून गेलं. पण कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं इरफान गेल्यावर त्याच्यावर ब्लॉग लिहावा लागेल. जे स्वप्नात वाटलं नव्हतं दुर्दैवाने ते आज प्रत्यक्षात घडलय. मन अजूनही मानायला तयार नाहीये. इरफान गेला. खरं म्हणजे तो जाणार होताच, हे त्याला आणि त्याच्यावर जीव असणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक होतं. काही गोष्टी निश्चित असतात. आपल्यालाही त्या ठाऊक असतात. फक्त आपण त्या मान्य करत नसतो. फरक असतो तो हाच. इरफानला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा त्याने जे पत्र लिहिलं होतं त्यावरून ठाऊक होत शेवट काय होणार आहे पण तरीही दरवेळी जसा युवराज सिंग, मनीषा कोईराला बरे झाले तसा तो बरा होईल आणि दमदार पुनरागमन करेल हा विश्वास वाटत होता. अंग्रेजी मिडीयमच्या ट्रेलरच्या शेवटी "वेट फॉर मी" असं बोलून स्वतः कधीही परत येऊ शकणार नाही अश्या ठिकाणी निघून गेलाय.   

"साहबजादे इरफान अली खान" असं भारदस्त नाव घेऊन जयपूरच्या राजघराण्यात जन्माला आलेला हा मुलगा. पण राजघराणे फक्त नावाचे राजघराणे होते. घरात गरिबी होती. त्याच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. त्याची लहानपणापासून क्रिकेटर व्हायची जबरदस्त इच्छा होती. फक्त इच्छाच नाही तर तशी त्याची मेहनत देखील होती. प्रतिष्ठेच्या सी के नायडू स्पर्धेत त्याची निवड झाली होती. पण काही आर्थिक कारणांमुळे तो भाग घेऊ शकला नाही. काहीवेळा वाईटातून चांगलं होतं असं म्हणतात ते खरंही होत. क्रिकेटर न झाल्यामुळे तो अभिनयाकडे वळला आणि पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊकच आहे. इरफान स्वतः इतका डाउन टू अर्थ माणूस होता की राजघराण्याची निशाणी दाखवणारं नावातील "साहबजादे" काढून तो आपला साधा इरफान खान झाला. आणि नंतर नावापुढे धर्माचं लेबल नको म्हणून खान काढून फक्त "इरफान" म्हणून राहिला. शेवटपर्यंत.

मी इरफान ला सर्वात अगोदर पाहिलं होत ते "आन - मॅन ऍट वर्क" सिनेमात पठाणवाडीत राहणारा युसूफ पठाण हा व्हिलन त्याने जबरी रंगवला होता. त्या सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी दोघी ऍक्शन करत असताना हा मात्र वेगळ्याच स्टाईल मध्ये फक्त डायलॉग बोलतोय आणि आपले मोठे डोळे गरगर फिरवतोय. तेव्हापासून कायमचा लक्षात राहिलाय. त्यानंतर स्टार टीव्ही ला "मानो या ना मानो" नावाचा अफलातून शो लागायचा, त्याच अँकरिंग तो करायचा. बस या दोन गोष्टी लहानपणापासून त्याच्यासोबत जोडल्या गेल्या. यासोबतच त्याची हच ची "छोटा रिचार्ज" वाली जबरी जाहिरात. खुर्ची वर बसून तीस-चाळीस सेकेंड्सचा त्याचा डायलॉग आज पण लक्ख आठवणीत आहे.   

इरफान हा एकच खान असा होता की ज्याच्या अभिनयाच्या दर्जाबद्दल कोणालाही शंका नव्हती, इतकी वर्ष काम करूनही तो कोणत्याही वादात नव्हता, फिल्म कशीही असली, तरी जो कायमच संस्मरणीय काम करुन दाखवायचा. पडद्यावर आणि पडद्यामागे लोकांना तेवढाच प्रिय असलेला अभिनेता. सिनेमाने कायम लोकांना जोडण्याचं काम केलेलं आहे आणि "इरफान" म्हणजे सिनेमांमुळे लोकांशी जोडलं जाण्याचं उत्तम उदाहरण आहे. आज त्याच्या जाण्याने त्याच्या असंख्य चाहत्यांप्रमाणे ज्यांना सिनेमाची इतकी आवड नाहीये त्यांनीही त्याच्यासाठी श्रद्धांजली चे स्टेटस ठेवलेय, पोस्ट लिहिल्या आहे. आज त्याच्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक पोस्ट मध्ये, मेसेज मध्ये जी आत्मीयता आहे ती या आधी कुणा अभिनेत्यासाठी किंवा नेत्यांसाठी दिसली नाही. भविष्यात दिसेल की नाही माहित नाही पण आज तरी ती वेगळी आहे, मनापासून आलेली आहे आणि इरफान ने आयुष्यात कमावलेली सगळ्यात मोठी गोष्ट कुठली तर हीच.

इरफान ने काम केलेले बहुतांश सिनेमे मी पाहिलेय. प्रत्येक सिनेमातल्या फक्त त्याच्या रोल बद्दल जरी लिहायचं झालं तर कित्येक ब्लॉग लिहावे लागतील. इतकं उत्तुंग काम त्याने करून ठेवलय. अभिनय आवडणाऱ्या आणि अभिनय शिकण्याची इच्छा असणाऱ्यासाठी तो अमूल्य असा ठेवा ठेऊन गेलाय. त्याने काम केलेल्या सगळ्या सिनेमाचं कलेक्शन करून ठेवायचं आहे. या अस्सल सुपरस्टारच्या काळात आम्ही जन्मलो, त्याच काम आम्ही पाहिलं हे येणाऱ्या पिढीला दाखवायचं आहे.

इरफान ने केलेल्या ज्या कामामुळे मी त्याचा आयुष्यभरासाठी फॅन झालो. ते थोडक्यात सांगतो.

हासील मधला कॉलेजमधील युवादलित नेता "रणविजय सिंग" समोर आशुतोष राणा सारखा मुरलेला ऍक्टर असताना त्याच्यासोबतची इरफानची जुगलबंदी अविस्मरणीय अशी होती. कॉलेज पॉलिटिक्स वर असणारी हि क्लासिक फिल्म होती.

मकबूल मधला स्वतः "मकबूल उर्फ मियाँ". इरफान काय चीझ आहे हे बॉलीवूड ला या सिनेमातून कळलं. अतिशय पॉवरफुल परफॉर्मन्स होता त्याचा या सिनेमात. पंकज कपूर, नासिरुद्दीन, ओम पुरी, पियुष मिश्रा आणि साक्षात तब्बू इतकी कसलेली कास्ट असताना देखील इरफान चा अभिनय या सर्वांवर कडी करणारा होता. शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ' च मकबूल हे हिंदी रूपांतरण होत. दोन प्रसंग यातले लक्षात आहे,  पहिला पंकज कपूरच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी 
इरफान स्वतः बिर्याणी बनवत असतो, तेव्हा पंकज कपूर त्याला जवळ घेऊन पाठीवर हात ठेवून म्हणतो, "यारा, कितनी मोहब्बत से पका रहा हे, दिल कर रहा हे मेरा भी गोश्त पकवालू" बस्स हीच तर त्याची आपल्या कामाप्रती असणारी मोहब्बत होती. आणि दुसरा होता, प्रेयसी तब्बू गरोदर असताना त्याचा हात आपल्या पोटावर ठेवते आणि म्हणते "तुम्हाराही हें, मियाँ" पण इरफान च्या मनात संशय असल्याने तो तिच्याशी नजर देखील भिडवत नाही. हा सिन फक्त डोळ्यांनी त्याने असा काही केलाय की शब्दात वर्णन नाही करता यायचं. 

लाईफ इन या मेट्रो या मल्टिस्टारर सिनेमातला त्याचा "मॉन्टी" एक हरहुन्नरी अस पात्र आहे. जो प्रत्येक गोष्ट गमतीत करतोय, पण गमतीगमतीत जगण्याचं खूप मोठं सार तो यात सांगून गेलाय. कोंकणा सेन ला समजवताना तो शहराबद्दल खूप छान बोलला आहे. "ये शहर जितना हमे देता है, बडलेमे उससे कई ज्यादा हमसे ले लेता है" कुठल्याही मेट्रो सिटीची वर्णन या एका ओळीत त्याने चपखलरित्या केलं आहे.

बिल्लू मधला त्याचा सिनेस्टार साहिर खान आपला मित्र आहे असं गावात सांगणारा आणि शेवटी आपल्या मित्राला प्रेमानं मिठी मारणारा गरीब बिल्लू मस्तच आहे. 

रोग सिनेमातला त्याचा अंडररेटेड परफॉर्मन्स असलेला त्याचा इन्स्पेक्टर जबरदस्त आहे. खासकरून "मै आत्महत्या करणे वाला था" हा सीन जमून आलेला आहे. या सीन मधील इरफानचा पॉझ घेत आवाज वरखाली करत असलेला डायलॉग अविस्मरणीय आहे. के के च काळजाला हात घालणारं "मैने दिल से कहा" हे गाणं याच सिनेमाचं. 

पान सिंग तोमर इरफानचा सर्वश्रेष्ठ अविष्कार ज्यासाठी त्याला बेस्ट ऍक्टर च नॅशनल अवॉर्ड मिळालं. भूमिका जगणं म्हणजे काय असत हे बघायचं असेल तर या सिनेमातील इरफान ला बघा. एक जागतिक स्तरावरचा धावपटू ते चंबळ मधला अव्वल डाकू हा प्रवास त्याने जबरदस्त दाखवला आहे. "जब देश के लिये दौडे तो किसीने ना पुछीयो, अब बागी बन गये तो सब पूछ रहे है"  आणि "बिहाड मै बागी होते है, डकैत मिलते है पार्लमेंट मै" असे क्लासिक डायलॉग त्याला या सिनेमात होते. सिनेमात गरमागरम गुलाबजामून मध्ये त्याच वॅनिला आइसक्रीम टाकून खाणं लक्षात राहून जात.

मुंबई मेरी जान यामध्ये तो रात्री रस्त्यावर कॉफी विकणारा "थॉमस" म्हणून आपल्याला भेटतो. अत्यंत गरीब असूनही समाधानी असणारा, आणि शेवटी गमतीत मॉल मध्ये बॉम्ब असल्याची अफवा ठोकून देणारा इरफान मॉल मध्ये जेव्हा पळापळ सुरु होते, आणि एक म्हातारे बाबा धडपडताना त्याला दिसतात. तेव्हा त्याला होणार पच्छाताप त्याने खूप सुंदर दाखवलाय.

लाईफ ऑफ पाय या ऑस्कर विजेत्या हॉलिवूड पटात तो मोठेपणाच्या "पाय पटेल" मध्ये दिसतो. जो पूर्ण कथा सांगत असतो. आज माझ्यासहित बऱ्याच जणांनी जो स्टेटसला विडिओ ठेवलाय, The whole of life becomes an act of letting go. But what always hurts the most is not taking a moment to say goodbye. हा डायलॉग याच सिनेमातला आहे.

साहेब बीवी और गँगस्टर मध्ये "हमारी तो गाली पे भी ताली पडती है" म्हणत एन्ट्री घेणारा इंद्रजीत सिंग. इरफान या सिनेमात खूप राजबिंडा दिसलाय. यातला माझा आवडता अजून एक डायलॉग, "चांद पर बाद मै जाना जमानेवालो, पहले धरती पर तो रेहना सिख लो"

द लंचबॉक्स मधला रिटायमेन्टला आलेला "साजन फर्नांडिस" इरफानच्या संयत अभिनयाचं उदाहरण आहे. बायको, मुलं नसल्याने आलेलं एकटेपण, प्रेमासाठी आतुर असलेला साजन जेव्हा अचानक भेटलेल्या (फक्त पत्रा मार्फत) इला मध्ये गुंतत जातो. पण एका महत्वाच्या क्षणी आपल्या वयाच भान ठेऊन बाजूला होतो. इला ला तो जे शेवटचं पत्र पाठवतो ते इरफान च्या आवाजात ऐकणं म्हणजे सोहळा आहे.

पिकू मधला "राणा चौधरी" अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सारखे सुपरस्टार असताना आपल नाणं चोख वाजवतो. बाप-मुलीला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावतो.

हैदर मधला काळा चष्मा लावून लंगडत चालणारा "रुहदार" कोण विसरेल. 

तलवार या क्राईम थ्रिलर मधला सिबीआय ऑफिसर "अश्विन कुमार" हा इरफान चा माझा आवडता वन ऑफ बेस्ट रोल आहे.

जज्बा हा सिनेमा खरंतर ऐश्वर्या रॉय ला समोर ठेऊन बनवला गेलेला सिनेमा पण यात भाव खाऊन जातो तो इरफानचा इंस्टपेक्टर "योहान". एक से एक भारी डायलॉग त्याला या सिनेमात दिले आहे. आणि ते फक्त त्याच्याच आवाजात सूट झाले असते. "मोहब्बत थी इसलिये जाणे दिया, जिद होती तो बाहोमे होती" बस्स हा एकच डायलॉग सगळी गोष्ट सांगायला पुरा आहे.

बाजीराव मस्तानी मधल्या आपल्या खर्जातल्या आवाजातल त्याच नॅरेशन लक्षात राहतं. क्लायमॅक्स ला दोघी गेल्यावर "उसदिन अपनी बेहरहमी पे सबसे ज्यादा वक्त रोया था" हे इरफान च्या आवाजात एकूण अंगावर काटा येतो.

मदारी हा स्वतः इरफान ने प्रोड्युस केलेला सिनेमा. आपल्या मुलावर नितांत प्रेम करणारा "निर्मल कुमार" इरफान ताकदीने उभा करतो. त्याची गुन्हा करण्याची पद्धत जरी चुकीची असली तरी सहानभूती मात्र तो मिळवून जातो.

जंगल बुक या मोगलीच्या सिनेमात पंजाबी मध्ये बोलणाऱ्या "बल्लू" या अस्वलाला त्याने झकास आवाज दिला आहे.

हिंदी मेडीयम मध्ये आपल्या मुलीची इंग्रजी शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करणारा साडी दुकानदार "राज बत्रा" आपल्या अफलातून कॉमिक टाईमिंग ने खूप हसवतो. दीपक डोब्रियाल सोबतची त्याची जुगलबंदी धमाल आहे. यातलं क्लायमॅक्सच शाळेच्या स्टेज वरचं त्याचं भाषण कमाल आहे.

कारवा हा इरफान चा माझा खूप आवडीचा पिक्चर. दोन नवीन कलाकारांना सांभाळून घेत त्याच्या "शौकत" ने या सिनेमात जी बॅटिंग केलीय. ती जबरदस्त आहे. खासकरून सिनेमात असलेले त्याचे "वन लायनर" इरफान किती एफर्टलेस कॉमेडी करू शकतो याचे उदाहरण आहे.

करीब करीब सिंगल यातला त्याचा फुल्ल ऑन "योगी" भारी आहे. साऊथची अभिनेत्री पार्वती आणि इरफान हे दोनच कलाकारांचा हा सिनेमा. अजिबात सिरिअस नसणारा आणि अतिशय पांचट जोक्स करणारा योगी धमाल आणतो. यात पार्वती जेव्हा त्याला विचारते तुमने कभी इश्क किया है, त्यावर इरफान म्हणतो, "जी तीन बार किया है और तिनो हि बार एकदम घनघोर, जाणलेवा मतलब हद पार इश्क" इरफान तुझ्यावर आमचं असच इश्क आहे.

ब्लॅकमेल मधला पत्नीकडून फसवला गेलेला भोळा पती "देव" नंतर सिनेमात काय धुमाकूळ घालतो हे बघण्यासारखं आहे.

अंग्रेजी मेडीयम खूप इच्छा होती हा सिनेमा थिएटर ला बघण्याची तसं सर्वाना सांगूनही ठेवलं होत. कारण दोन वर्षांनंतर तुझा सिनेमा येत होता. आणि तो थिएटरलाच बघायचा होता. पण लोकडॉउन मुले थिएटर बंद झाली, आणि बघायचा राहून गेला. हे शल्य आयुष्यभर कायम राहील. अर्थात नंतर तो मी बघितला, खर सांगायचं तर थकलेला इरफान बघवत नव्हता. हा आमचा इरफान नव्हताच, आमचा इरफान असा एनर्जी ने भरलेला तुफान काम करणारा होता. याच ट्रेलर मधलं तुझा आमच्याशी साधलेला संवाद रडवून गेला होता.       

आजवर मला कोणीही विचारलं तुझा आवडता हिरो कुठला, तर मी प्रत्येक वेळेला तुझंच नाव घेतलय, यापुढेही घेत राहिलंच. माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांनी तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम केलंय आणि तू हा असा डाव अर्ध्यावर टाकून निघून गेलास. आम्हाला तू हवाहवासा वाटत होतास आणि म्हणूनच आम्हाला वाटत की तू जायला नको होतास. मनोज बाजपेयी, के के मेनन आणि इरफान या त्रिमूर्ती मधली तुझ्या जाण्याने एक मूर्ती कायमची देवघरात विसावली आहे. तुझ्या जाण्याने आज एका युगाचा अंत झालाय. युगांत...!!!

"कहाणी खत्म हुई और ऐसी खत्म हुई कि लोग रोने लगे तालिया बजाते हुए...!!!"

शुभम शांताराम विसपुते 

Tuesday, April 28, 2020

बाजीराव पेशवे



एकही लढाई न हारता मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकवणारा जिगरबाज रणमर्द बाजीराव बाळाजी भट म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे. 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) हिंदवी स्वराज्याचे कोल्हापूर आणि सातारा असे दोन भाग झाले. कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी हक्क प्रस्थापित केला तर साताऱ्याच्या गादीवर संभाजी महाराज यांचे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आलेले सुपुत्र "शाहू महाराज" यांनी मांड ठोकली. शाहू महाराजांनी स्वतः मैदानात उतारण्यापेक्षा आपल्या अष्ठप्रधानातील पंतप्रधान (पेशवा) याला राज्याचे सर्वाधिकार दिले. म्हणजेच आताच्या लोकशाही मध्ये जसे राष्ट्रपती हे नामधारी असतात आणि सर्व कार्य पंतप्रधानांच्या मार्फत चालते अगदी हेच शाहू महाराजांनी ४५० वर्षांपूर्वी यशस्वी करून दाखवले. शाहू महाराजांनी "बाळाजी विश्वनाथ भट" यांना आपले पेशवे म्हणून संधी दिली. १७२० मध्ये बाळाजींच्या मृत्यूनंतर अनेक जेष्ठ मंत्री आणि सरदार यांना डावलून महाराजांनी बाळाजींचे थोरले सुपुत्र "बाजीराव" यांना पेशवे पदी नेमले. बाजीराव तेव्हा अगदीच तरुण म्हणजे अवघे २० वर्षाचे होते.

बाजीराव यांचा जन्म कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात वडील बाळाजी विशवनाथ आणि आई राधाबाई यांच्या पोटी २७ ऑगस्ट १७०० मध्ये झाला. त्यांना लहान भाऊ देखील होता. जो पुढे आयुष्यभर अगदी सावली सारखा त्यांच्या सोबत राहिला त्याच नाव होतं "चिमाजी आप्पा". बाजीराव वडिलांसोबत लहानपणापासूनच युद्ध मोहिमेवर जात. युद्धाचे बाळकडू त्यांना प्रत्यक्ष रणांगणावर मिळाले होते.  बाजीराव आणि चिमाजी आप्पा ही जोडी अगदी राम-लक्ष्मणसारखी होती. 

१७२० मध्ये पेशवेपदी आल्यावर बाजीरावांनी आपले एकच ध्येय ठेवले. ते म्हणजे दिल्लीसह पूर्ण भारतभर आपल्या मराठी साम्राज्याचा विस्तार करायचा. यासाठी शाहू महाराजांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. तर भाऊ चिमाजी आप्पाची अखंड साथ होती. बाजीरावांना उत्तरेत कूच करायचे असल्यास दक्षिणेत शांतता हवी होती. आणि दक्षिणेत मराठ्यांचा एकच शत्रू होता "निझाम". त्याला शांत करण्यासाठी बाजीरावांनी निझामाचा मुलुख असलेला खान्देश, बुऱ्हाणपूर, जालना हे प्रांत उध्वस्त केले, त्यामुळे चिडून निझाम बाजीरावांवर चालून आला. पालखेड येथे दोघी सैन्य आमनेसामने आले. निझामाचा पराभव करून बाजीरावांनी त्याच्यासोबत शांततेचा करार केला, सोबतच मराठ्यांना दक्षिणेत कर वसूल करण्याचा हक्क देखील मिळाला.

बाजीराव आपला कारभार पुण्याजवळील सासवड या गावी राहून करत होते. पण जसा कार्यभार वाढला तशी जागेची कमतरता भासू लागली. त्यामुळे त्यांनी पुणे शहरात आपले बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला. वाडा बांधण्यासाठी जागेचा शोध सुरु असताना एके दिवशी एक विलक्षण घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडली. मुठा नदीच्या काठावर त्यांना एका जागेवर एक कुत्रा घाबरून पळताना दिसला आणि त्या कुत्र्याचा पाठलाग चक्क एक ससा करत होता. बाजीरावांना याच मोठं आश्चर्य वाटलं, त्यांनी तेव्हाच ठरवलं कि आपला वाडा याच जागेवर बांधला जाईल कारण ही जागा पराक्रमाची साक्ष देतेय. आणि अश्याप्रकारे पुण्याचं वैभव असलेला बाजीरावांचा जगप्रसिद्ध असा "शनिवार वाडा" त्या जागेवर बांधला गेला. येणाऱ्या काळात हाच शनिवार वाडा हिंदुस्तानातील सर्वात मोठे राजकीय केंद्र ठरला.   

बाजीराव माळवा (आताच ग्वाल्हेर) वरील मोहीम यशस्वी करून परतत असतानाच त्यांना राजस्थानातून राजा छत्रसाल बुंदेला याचा मदतीसाठी खलिता मिळाला. मोघलांनी बुंदेलखंडच्या किल्ल्याला वेढा घातला होता आणि लवकरच ते किल्ल्यावर चढाई करणार होते. त्यामुळे राजा छत्रसालने बाजीरावांना लवकरात लवकर मदतीसाठी येण्याचे आवाहन केले. बाजीरावांनीही विलंब न करता चढ्या घोड्यानिशी बुंदेलखंडाकडे धाव घेतली. दिवसरात्र प्रवास करून अवघ्या दोन दिवसात ते बुंदेलखंडात दाखल झाले, आणि त्यांनी मोघलांचा वेढा मोडीत काढून राजा छत्रसालाची सुटका केली. याबद्दल खुश होऊन राजा छत्रसालाने बाजीरावांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतानाच  मोठी वतनदारी बाजीरावांच्या नावावर केली. तसेच आपली दासीकन्या "मस्तानी" सोबत बाजीरावांचा विवाह लावून दिला.     

राऊंचे पहिले लग्न काशीबाई यांच्यासोबत झाले. काशीबाईंपासून त्यांना तीन मुले झाली. बाळाजी (नानासाहेब), रघुनाथराव आणि जनार्दनराव. आणि मस्तानी पासून त्यांना "समशेरबहाद्दर" नावाचा मुलगा झाला. मस्तानी यांच्या मृत्युच्यावेळी समशेर अवघा सहा वर्षांचा होता. त्यानंतर आपल्या तिन्ही मुलांबरोबर काशीबाईंनी त्याला वाढवले. पुढे पानिपतच्या लढाईत १७६१ मध्ये समशेरचा मृत्यू झाला.

माळवा आणि बुंदेलखंड यांच्यानंतर बाजीरावांनी आपले लक्ष गुजरात कडे वळवले. चिमाजी आप्पा ना गुजरातेत पाठवून त्यांनी तिथला कर वसुलीचा अधिकार मिळवला. चिमाजी अप्पानी पुढे वसई चा किल्ला देखील जिंकून त्याला स्वराज्यात सामील करून घेतले. महापराक्रमी चिमाजी आप्पा यांचा मुलगा देखील त्यांच्यासारखाच होता. "सदाशिवराव भाऊ". मराठ्यांचा अस्तित्वासाठी ज्याने पानिपतचे महायुद्ध लढले. आणि इतिहासात अजरामर झाला.

बाजीराव पेशवे पदी २० वर्षे होते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार हे एकमेव ध्येय ठेऊन त्यांनी वीस वर्ष अहोरात मेहनत घेतली. याकाळात झालेल्या एकही लढाईत त्यांनी पराभवाचे तोंड पहिले नाही. फक्त मिळविला तो विजय आणि विजयच. दक्षिणेपासून ते पार गुजरात, राजस्थान, पंजाब मध्ये माळवा, बुंदेलखंड, ओरिसा पर्यंत त्यांनी मराठा साम्राज्य वाढवलं. दिल्लीवरही जरब बसवला.

सगळीकडे विजय मिळत असताना देखील राऊंचं वैयक्तिक जीवन हे इतके सुखावह नव्हते. खासकरून मस्तानीशी विवाहानंतर. कारण पुण्यातील सनातनी ब्राह्मणांना एका मुस्लिम महिलेचा शनिवार वाड्यातील प्रवेश आणि तो ही पेशव्यांची पत्नी म्हणून पटणारा नव्हताच. त्यामुळे त्यांचा मस्तानीचा स्वीकार मान्य नव्हता. राउंना याची पर्वा नव्हती पण राऊंच्या दुर्दैवाने राऊंच्या मातोश्रींचा देखील मस्तानी ला विरोध होता. आणि राऊंच्या पाठीशी सावली बनून राहणारा चिमाजी अप्पा देखील याबाबतीत त्यांच्या विरोधात होता. आपल्या पतीवरील प्रेमापोटी काशीबाईंचा मस्तानीला इतका विरोध नव्हता, अर्थात त्यांना वाईट मात्र वाटतच होत. सगळीकडून राउंना विरोधाचा सामना करावा लागत होता. रणांगनावर अजिंक्य असलेला हा योद्धा घरातल्या आपल्या माणसांसोबतच्या लढाईत मात्र पराभूत झाला होता. याच विरोधातून राऊंनी मस्तानी साठी पाषाण गावी एक महाल बांधून दिला, मस्तानी समशेरबहाद्दर सोबत तिथे राहू लागली. काशीबाईंप्रमाणे मस्तानी वर राऊंचे नितांत प्रेम होते. युद्धावरून आल्यावर राऊ देखील आपला जास्तीत जास्त वेळ मस्तानी बरोबर घालवू लागले. कारण मस्तानीला विरोध करणाऱ्या शनिवार वाड्यातल्या आपल्या माणसांसोबत त्यांचे मन रमत नव्हते.

घरातील अडचणींना तोंड देत बाजीरावांच्या मोहीम जोरदार सुरु होत्या. मराठ्यांचा सगळीकडे मुक्त संचार सुरु होता. अवघ्या भारतभरातून मराठ्यांना कर वसूली करायला मिळत होती. अश्यातच एकदा मोहिमेवर असताना बाजीरावांना विषमज्वराचा त्रास व्हायला लागला. तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. वैद्य, औषधांचा गुण लागत नव्हता. कारण यावेळी त्यांना आपल्या प्राणप्रिय काशीबाई आणि मस्तानीची सोबत हवी होती. पण मोहिमेवर असल्याने त्या दोघीही त्यांच्यासोबत नव्हत्या. अखेरीस आजच्याच दिवशी दि २८ एप्रिल १७४० रोजी या महान योध्याने बुर्हाणपूरजवळील नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी या गावी कायमची झोप घेतली.

प्रत्येक क्षत्रियाची इच्छा असते की रणांगणात लढताना आपल्याला मृत्यू यायला हवा. पण इथे मृत्यू ही बाजीरावांना रणांगणात गाठायला घाबरला कारण या अजिंक्य योध्याने रणांगणात मृत्युवरही विजय मिळविला असता.

जय भवानी! जयोस्तु मराठा!

शुभम शांताराम विसपुते


   

Friday, April 24, 2020

सचिन तेंडुलकर - क्रिकेटमधला द्रोणाचार्य



आज देवाचा वाढदिवस. जरी क्रिकेटमधला असला तरी तो देवच आहे ना. जसा एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांच्या  मूर्तीला गुरु मानून धनुर्धारी झाला, तसेच माझ्यासारखे असंख्य लोक आमच्या या क्रिकेटमधल्या देवाच्या फोटोला जवळ ठेऊन किंवा टीव्ही वर त्याला पाहून बॅट धरू लागलो, क्रिकेट खेळायला शिकलो. असे कितीतरी क्रिकेटर्स या देवाने नकळत घडविले आहेत. तो मैदानावर असायचा तेव्हा साक्षात वेळ हि थांबलेली असायची. मी स्वतःला नशीबवान मानतो की मी हा आमचा देव खेळत असलेल्या कालखंडात जन्माला आलो.

सचिन आज ४८ व्या वर्षात पदार्पण करतोय. पण वय हा केवळ त्याच्यासाठी आकडा आहे. खरंतर काही गोष्टींना वय नसतंच. रामायण-महाभारताला नाही, बुद्धाच्या मानवतेला नाही, मीरेच्या कृष्णवरच्या प्रेमाला नाही, रामाच्या संयमाला नाही, शिवाजी महाराजांच्या शौर्याला नाही, बाजीप्रभू-तानाजी यांच्या त्यागाला नाही, लतादीदींच्या गाण्याला नाही, रहमानच्या संगीताला नाही. या गोष्टी वयात नाही मोजू शकत, त्या अजरामर असतात, पिढ्यानपिढ्या पुढे त्या चालत असतात, प्रत्येक पिढीवर संस्कार करत असतात. सचिनची फलंदाजी ही अशी अजरामर आहे.

सचिनच्या फलंदाजीबद्दल लिहायचं झालं तर, त्याचा अर्जुनाच्या बाणाप्रमाणे सरळ जाणारा स्ट्रेट ड्राइव्ह. एखादा सर्जन ऑपरेशन करताना ज्या सफाईने शरीरावर ब्लेड चालवतो तेवढ्याच सफाईने मारलेला ऑन ड्राईव्ह, बॅकफूट वर मारलेला कव्हर ड्राइव्ह, एखाद्या मुर्तीकाराने कोरून काढावा असा लेट कट. लहानपणी कागदी विमान हवेत उडवायचो तसा किपर च्या डोक्यावरून उडवलेला अप्पर कट. त्याने आपल्या दोन्ही हातांनी मैदानात चौफेर उधळलेल्या फुलांसारखे त्याचे फटके. अजून काय लिहिणार त्याच्या फलंदाजीबद्दल.

सचिनच्या कारकिर्दीबद्दल लिहायचं झालं तर वेळ, जागा, वय, अनुभव सगळंच कमी पडेल. त्यामुळे त्याच्या ज्या खास इंनिग्स आहेत किंवा जे आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण आहेत. त्याबद्दलच सांगतो.

विश्वचषक २००३. हा मी पाहिलेला पहिला वर्ल्ड कप. त्यातलं जर आजही काही लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे पाकिस्तान विरुद्धची त्याची तडाखेबंद इनिंग. १ मार्च २००३ चा साक्षात महाशिवरात्रीचा दिवस. गणपती बाप्पांचे पप्पा सचिनला आशीर्वाद देऊन गेलेले. त्याने त्यादिवशी मैदानावर भोलेच्या भक्ताला शोभेल असे तांडवच केले. समोर साक्षात वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर हे त्यावेळेच जगातल सर्वोत्कृष्ट गोलंदाजीतलं त्रिकुट. त्यांच्यासमोर "Attack is Best Defence" ही उक्ती प्रत्यक्षात आणून त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला होता. त्या मॅच मधली त्याची सेन्चुरी जरी हुकली असली तरी ७५ चेंडूतल्या ९८ धावा हि कदाचित त्याची वन ऑफ द बेस्ट इंनिग आहे. याच सामन्यात अख्तरला पॉइंटवरून मारलेला "तो" अजरामर षटकार विसरणं शक्यच नाही आणि या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात समोर साडेसहा फुटी अँड्रू कॅडिकच्या तशी १४५ किमी च्या चेंडूला सचिनने  पूल चा शॉट मारून थेट मैदानाबाहेर फेकले होते. हे सगळे अगदीचं फ्रिक्शन ऑफ सेकेंड्स मध्ये झालं होत. ह्या शॉट ची क्लिप मी आज ही यूट्यूब ला बघतो.

२००४ ऑस्ट्रेलिया टूर. सचिनचा खराब फॉर्म सुरु होता. ठरवून ऑफ साईडला बॉल टाकून त्याला ऑस्ट्रेलियन बॉलर्स त्याला बाद करत होते. या सगळ्या विरुद्ध शेवटी तिसऱ्या कसोटीत ऑफ साईडला एकही फटका न मारता त्याने केलेल्या तब्बल नाबाद २४१ धावा. हे त्याच श्रेष्ठत्व सिद्ध करतं.

२००५ ते २००७ ही तीन वर्ष तशी त्याच्यासाठी खास नव्हती. कारण टेनिस एल्बोची कदाचित क्रिकेट कारकीर्द संपवणारी दुखापत याच काळात झाली. त्यावर त्याने ज्या प्रकारे मात केलीय. ती प्रेरणादायी आहे. २००७ च्या वर्ल्ड कप मध्ये ग्रुप स्टेज मधूनच भारत बाद झाल्यामुळे त्याच्यासहित सर्व देशाला नैराश्य आलं होत. 

२०१० ग्वाल्हेर. समोर साऊथ आफ्रिका. सचिनचे जगातले पाहिलेवाहिले एकदिवसीय द्विशतक. गेली कित्येक वर्ष पाक च्या सईद अनवरच्या १९४ रन्स चा रेकॉर्ड खरतर खुपत होता. सचिनने वयाच्या ३७ व्या वर्षी नाबाद २०० ठोकून तिथं आपला झेंडा रोवला. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम!

विश्वचषक २०११. सचिन गेली कित्येक वर्ष जे स्वप्न जगत होता ते सत्यात उतरणार होतं. त्याचा हा सहावा वर्ल्ड कप होता. संघातला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून त्याने दोन शतकांसह ४८२ धावा करून निभावलेली मार्गदर्शकाची भूमिका. आणि विश्वचषक विजय, गेली कित्येक वर्ष हुलकावणी देत हातात आलेला विश्वचषक!

आणि २०१३. वानखेडे स्टेडियम. सचिनची कसोटी सामन्यातून निवृत्ती. त्याचा तो खेळपट्टीचा केलेला नमस्कार आणि नंतर त्याच भावुक स्पीच. आजही हा क्षण आठवला की अंगावर काटा येतो. त्याने निवृत्ती घेतलीस आणि तो आऊट झाल्यावर जसे देशातले टीव्ही बंद व्हायचे तसं माझं क्रिकेट बंद झालं. आता रोहित साठी बघतो, पण बघण्यात सातत्य नाही.

सचिनने एकूण १०० शतकं ठोकलीय. आता फक्त एक इच्छा आहे, अजुन त्याचं एक वयाचं शतक शिल्लक आहे. वयाची शंभर वर्षे पूर्ण करून त्याने त्याच्या आयुष्यातलं १०१वं शतक ठोकावं असं मनापासून वाटतं. वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा देवा...!!!

शुभम शांताराम विसपुते

सचिनचे काही रेकॉर्डस्

1             Man
24           Years
664         Matches
782         Innings
74           Not Outs
34357     Runs
48.52      Average
50816     Ball Faced
67.58      Strike Rate
248*        High Score
164         50s
28           90s
3             99s
100         100s
25           150s
1             200s
76           Man of the Match
20           Man of the Series
4076       4s
264         6s
201         Wickts
6300       Balls Bowled
107         Maidens
2             5wckt Haul


Tuesday, April 14, 2020

तू ही तो मेरी दोस्त है....!!!



प्रिय काजोल,

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात निदान एक तरी मैत्रीण असतेच. ज्यांच्या कडे नाहीये, त्यांनी लवकरात लवकर एक मैत्रीण बनवायला हवी. अन्यथा, असे पुरुष खूप मोठ्या सुखापासून स्वतःला वंचित ठेवत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. सुदैवाने माझ्या आजवरच्या आयुष्यात मला मैत्रिणींची कमी कधीच भासली नाही. शाळेत असतानाच मैत्रीण या नात्याशी ओळख झाली. पुढे कॉलेजला गेल्यावर तर मैत्रिणींची संख्या वाढणे हे तर स्पष्टच होत. मी तीन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकलोय त्यामुळे तिघी कॉलेजमध्ये मैत्रिणी या होत्याच. कॉलेज नंतर जॉब केला, तेव्हा ऑफिस ला अजून नव्या मैत्रिणी मिळाल्या. पण वरीलपैकी कुठेही न भेटलेली अशी फेव्हरेट मैत्रीण म्हणजे "काजोल" (तुझं खरं नाव जरी काजल असलं तरी मी तुला काजोलचं म्हणतो, फोन मध्ये हि तसंच नाव सेव केलय) 

आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? हे तुझ्या बाबतीत मात्र तंतोतंत लागू पडतं. म्हणजे बघ ना तू जवळपास चार वर्षे माझ्या घराच्या अगदीच जवळ राहत असताना देखील तुझ्याबाबत मला काहीच माहित नव्हतं. तू आमच्या कॉलेजच्या शेजारीच असलेल्या कॉलेजला होती तेव्हा देखील काही माहित नाही. अर्थात तू जुनिअर असल्यामुळे तुझ्याशी ओळख असण्याचं काही कारण नव्हतं. पण वर म्हटल्याप्रमाणे जर ओळख होणार हे जर निश्चित असेल तर ती कधीनाकधी होणार असतेच. आपलंही असच झालं, ध्यानीमनी नसताना मी ग्रुप मध्ये जॉईन झालो आणि फायनली  इतक्या वर्षांपासून राहून गेलेली आपली ओळख शेवटी झालीच. 

कुठल्यातरी पुस्तकाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तुला पाहिलं. त्या अगोदर मला फक्त माहित होत कि काजल नावाची एक मुलगी आहे, आणि ती गणेश ची बहीण आहे. हे मला राकेश ने सांगितलं असल्यामुळे तुला बघण्याची उत्सुकता होतीच. त्या कार्यक्रमात तुला पाहिलं. ती भेट तशी अगदीच फॉर्मल अशी होती. त्यामुळे त्याबद्दल आवर्जून लक्षात ठेवण्यासारखं असं काही नाहीय. पुढे रोझ गार्डन ला आपला सगळा ग्रुप जेव्हा नियमित भेटायचा. तेव्हा हळूहळू तुझ्याबद्दल कळायला लागलं. तेव्हा गार्डन मधल्या दोन गोष्टी होत्या की ज्या लक्षात राहिल्या, त्यात पहिली म्हणजे तुझा लॅपटॉप. मला खरच नवल वाटायचं कि पोरगी एमपीएससी करतेय आणि डायरेक्ट लॅपटॉप घेऊन येते. असंही नाही की, इंजिनीरिंग वैगेरे ला आहे. पण तो लॅपटॉप भारी होता म्हणजे आहेच. आणि दुसरी गोष्ट होती तुझी नॉनस्टॉप चालणारी बडबड. म्हटलं यार ही पोरगी कित्ती बोलतेय, थांबत पण नाही बोलताना. पेट्रोल भरायला गाड्या थांबतात तशी फक्त पाणी प्यायला थांबते बस्स.

पुढे आपली खऱ्या अर्थाने ओळख झाली ती मेहरूण ट्रॅक वर वाढदिवस सेलिब्रेट करताना. पण आपल्यातला डायलॉग हा नेहाच्या बर्थडे पासून सुरु झाला. या गोष्टीला साधारणतः ७-८ महिने झाले असतील. तेव्हाच बोलताना तू बोलली होतीस की अजयने मला तू "दामिनी" सिनेमा बद्दल लिहिलेली पोस्ट दाखवली. तू खूप छान लिहितोस. मग मी तुला म्हटलं की, मी रेग्युलरली नाही लिहीत असंच कधीतरी लिहितो. तेव्हा तूच सल्ला दिला होता की, जे काय लिहिशील ते ब्लॉग वर पोस्ट करत जा. मस्त ब्लॉग वैगेरे लिही. तुझा तोच सल्ल्ला मनावर घेऊन मी शिस्तीत ब्लॉग लिहायला लागलो, आणि तेव्हापासूनचा आज हा माझा ४२ वा ब्लॉग आहे. जो की तुझ्याबद्दलच आहे. मला वाटत हे एक प्रकारचं सर्कलच पूर्ण होतंय. 

ओळखीचं रूपांतर खऱ्या अर्थाने मैत्रीत तेव्हा झालं, जेव्हा सरदार सरोवर ला ट्रिप ला जायचं आपलं ठरलं. तेव्हापासून आपला डिजिटली कॉन्टॅक्ट पण वाढला. ट्रिप ची तयारी करतानाचा तुझा उत्साह म्हणजे हाईट होती. त्या काळात तुझा रोज दिवसभर एकच मॅसेज किंवा कॉल असायचा तो म्हणजे तयारी कशी चाल्लीय, काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय ते सांगण्यासाठी आणि सर्वात महत्वाच म्हणजे तिथलं राहण्याचं बुकिंग झाल का? रेल्वे स्टेशन वर पोहचेपर्यंत आपलं हेच बोलणं होत होत. पण ट्रिप यशस्वी होण्यात जर सगळ्यात महत्वाचं क्रेडिट कोणाचं असेल तर ते तुझंच आहे. हे मी उगाच तुझ्याबद्दल लिहितोय म्हणून असं म्हणतोय असं नाही. आपले बाकीचे मेम्बर्स मलापण क्रेडिट देतात, पण माझं काम फक्त सरदार सरोवरचे तिकीट बुक करणं आणि तिथं आपल्या मुक्कामाची चांगली व्यवस्था करणं इतकंच होत. त्यामुळे या व्यतिरिक्त ट्रिप मध्ये तू, तुझ्या ममी-पपांना (एकदम गोडं माणसं) सोबत घेऊन जी काही सर्व व्यवस्था केली होतीस. मग त्यात तुझ्या घरचा मुक्काम असो, आयुष्यभर चव लक्षात राहील असं तुझ्याघरच जेवण आणि नाश्ता असो, की गाडीची बुकिंग करणे असो. प्रत्येक गोष्ट तू एकदम परफेक्ट केली. त्यातलं एक काम जे की अजूनही सुरूय आणि यापुढेही सुरु राहील ते म्हणजे, सर्वाना अगोदर जेवायला वाढणं, आग्रह करू करू खाऊ घालणं. हे तुझ्या स्वभाव आणि संस्कारातच असल्याने ते कधी बदलणारही नाही. ट्रिप मध्ये प्रत्येकाला काय हवं नको ते बघताना स्वतः कडे दुर्लक्ष करत होतीस. सगळे ट्रिप चा आनंद लुटत असताना स्वतः मात्र डोळे लाल करून फिरत होतीस. पण असो ते बोलण्याची आता ही जागा नाही. पण ट्रिप मेमोरेबल होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस त्याबद्दल मनापासून सलाम...!

ट्रिप नंतर तर बॉण्डिंग खूप स्ट्रॉन्ग झालं. तुझ्यासारख्या दांडिया क्वीन सोबत दांडिया खेळण्याचा गोल्डन चान्स पण याच काळात मिळाला. प्रॉपर खेळता येत नसताना देखील त्यादिवशी तो चान्स गमवायला नको म्हणून मस्त दांडिया खेळला गेला. बाकी नंतर तर मग भेटणं, बोलणं हे तर नेहमीच व्हायला लागलं. डिसेंबरच्या काळात अजय आणि मी आमच्या जगप्रसिद्ध "मॉर्निंग वॉल्क" ला जायचो. त्यात ज्या प्रकारे तू मला "ए आयटम पलट" असं बोलून आमच्या मॉर्निंग वॉल्क ला जॉईन झालीस, ते मी विसरलो नाहीये. त्याचा बदला योग्य वेळ आली कि नक्कीच घेतला जाईल. नंतर नवीन वर्षात जानेवारी च्या पहिलीच आठवड्यात तुझा बर्थडे आला. अर्थात तो सेलिब्रेट पण मस्त झाला. "लिजंड्स बॉर्न इन जानेवारी" या क्लब मध्ये एका खऱ्या लिजंड्स चा समावेश झाला. 

काजोल, मला कायम असं वाटत की, तू तुझ्या वक्तृत्व, लेखन या गोष्टींकडे दुर्लक्ष नको करायला. या दोघी गोष्टींसाठी लागणारं, म्हणजे वक्तृत्व साठीचा एकदम स्पष्ट असा आवाज आणि लेखनासाठीचा असणारा सेन्स तुझ्याकडे उपजतच आहे. मान्य आहे की, तुला एमपीएससी मध्ये करिअर करायचं आहे. ते महत्वाचं आहेच. फक्त या दोघी गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस हे सांगणं आहे. अरे तु आमच्याच कॉलेज ला येऊन आमच्याच नाकाखालून अकरा हजाराचं बक्षिस घेऊन गेलीय, साधी पोरगी आहे का तू. आता लॉकडाऊन च्या काळातली तुझी चित्रकला पण बघायला मिळतेय. जी उत्तमच आहे. तुझ्या एकंदरीत पर्सनॅलिटीला सूट होणारा जॉब हा माझ्या मते तरी "रेडिओ जॉकी" हा आहे. जिथं तुझी नॉनस्टॉप चालणारी बडबड पण ऐकली जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचे तुला पैसे पण मिळतील. यापेक्षा अजून काय हवं.

आमच्या पेक्षा लहान असूनही तू खूपच समजूतदार आहेस. हे आपल्या गृप मधलं कोणीही मान्य करेल. प्रत्येक गोष्टीतला तुझा विचार, ती गोष्ट पूर्ण करण्याचा तुझा उत्साह हा नक्कीच शिकण्यासारखा आहे. सर्वांना समजून घेतेस. जरा कोणी ऑफ वाटलं कि त्याला "तुला काय झालय?", "कसला राग आलाय?" "नॉर्मल का बोलत नाहीये?" असं विचारू विचारू त्याला परत ऑन करतेस. तुझ्यात असणारी पॉसिटीव्हिटी अशीच कायम राहू दे. आताच्या आपल्या संघर्षाच्या काळात फक्त हीच पॉसिटीव्हिटी आपल्याला तरुन नेऊ शकते. हे लक्षात असू दे.

अजूनही अनेक अश्या गोष्टी आहेत कि ज्या बोलायच्या आहेत. मी नेहमी तुला म्हणतो की, आपलं लॉन्ग डिस्कशन बाकीय, ते आपण लवकरच करू. बाकी, तुला इर्रिटेट करणारे माझे पीजे असेच सुरु राहतील कदाचित तू जोवर माझे हक्काचे पन्नास रुपये मला देत नाही तोवर तर ते थांबणार नाही. खरं सांगायचं तर, फक्त तू असतानाच मला असे जोक्स करायची लहर येते. टोमॅटो सूप सारखे जे फोटो आहेत, जे फक्त तुला पाठ्वण्यासाठीच मी डाउनलोड करून ठेवतो. 

बाकी, तुझा रथ चौकात राहणारा शुभम नावाचा मित्र आहे. जो तुझ्यासाठी २४*७ उपलब्ध आहे. कधीही काही लागलं तर मी नेहमीच आहे. अजून खूप लिहावंसं वाटतंय, पण सिरीअसली आता मला सुचत नाहीये काय लिहू ते त्यामुळे मी इथं थांबतो. फक्त जाता जाता महत्वाचं असं एकच सांगतो.

आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू असतात आपली जवळची माणसं. काजोल तु अशीच माझ्यासाठी माझ्या जवळच्या माणसांपैकी एक आहेस. यापेक्षा वेगळं काय सांगणार. आता लॉकडाऊन संपलं की सगळे मिळून मस्त मोठठी पार्टी करू. तोवर काळजी घे, आणि लिस्ट बनवून ठेव की काय काय करायचं आहे ते. बाय.

तुझाच,
सोना चांदी चवनप्राश (असली)   

बाबासाहेब - The Revolutionist



बाबासाहेबांवर लिहिणे हे फार कठीण आहे. याच मुख्य कारण म्हणजे, त्यांच्यावर आपण काही लिहिणे इतकी आपली लायकी नाही आणि तितकासा अभ्यास देखील नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या महान कार्यांबद्दल काही लिहिणार नाही. कारण ते जवळपास सगळ्यांना माहितीच आहे किंवा लिहिलेही तरी ते डॉक्यूमेन्ट्री टाईप वाटेल. त्यामुळे डॉक्टरांबद्दल मला काय वाटतं तेच लिहिणं जास्त योग्य राहील. एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल असं धगधगतं असणार त्यांचं जीवन हा खरंच अभ्यासाचा विषय आहे. येत्या काळात बाबासाहेबांबद्दलचा अभ्यास वाढवून ज्ञानात भर टाकायची आहे.

बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला. एक हिंदू म्हणून माझ्यासाठी ही शरमेची गोष्ट आहे. पण ज्या परिस्थितीत त्यांनी धर्म सोडला, ती परिस्थिती त्यांच्यावर आणायला माझ्याच धर्मातले काही लोक कारणीभूत होते. हे नाकारून चालणार नाही. त्यांनी मी हिंदू आहे त्यामुळे मला हिंदू म्हणून माझे असणारे अधिकार, हक्क मला मिळालेच पाहिजे, इतकी साधी मागणी केली होती पण ती सुद्धा नाकारली गेली. त्यामुळे त्यांच्या समोर धर्म सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे याबाबतीत त्यांना अजिबात दोष दिला जाऊ शकत नाही, उलट जो काय दोष असेल तो आपल्याच धर्मातल्या बाबासाहेबांना त्यांचं धार्मिक स्वातंत्र आणि अधिकार नाकारणाऱ्या वर्गाचा आहे. 

मी एक हिंदू आहे. फक्त हिंदूच नाही तर हिंदुत्वादी देखील आहे. पण मी जात वैगेरे मानत नाही. शिवाशिव, उच-नीच तर दूरची गोष्ट आहे. पण हा संस्कार, हा विचार माझ्यामध्ये आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांमध्ये रुजवण्याचं श्रेय निःसंशय बाबासाहेबांना जात. कारण, त्यांनी तेव्हा दलितांच्या हक्कासाठी उठाव केला नसता तर आजही आमच्यामध्ये शिवाशिव, उच-नीच असले फालतू प्रकार सुरूच राहिले असते. 

बाबासाहेबाना केवळ दलितांचे नेते असं म्हणून आपण त्यांच कार्य, प्रतिमा मर्यादित स्वरूपाची करून ठेवलीय. अर्थात आपल्या देशात हे नवीन नाही, शिवाजी महाराज मराठ्यांचे, टिळक-सावरकर ब्राह्मणांचे अशी जातीय विभागणी आपण अगोदरच करून ठेवलीय. हे सर्व महापुरुष जेव्हा त्यांच्या काळात कार्यरत असतील तेव्हा असा जातीय विचार त्यांच्या स्वप्नात देखील आला नसेल.

स्वतंत्र भारतात किंवा त्याही अगोदर पासून बाबासाहेबांना "राजकीयदृष्ट्या" दुर्लक्षित करण्याचं काम तत्कालीन नेतेमंडळींकडून झालं. याला सर्वात मोठं कारण त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये सर्वात जास्त निष्ठावान अनुयायी हे बाबासाहेबांच्या मागे होते. इतके निष्ठावान की त्या अनुयायांसाठी बाबासाहेब हे कुठल्याही धार्मिक प्रतिकापेक्षा मोठे होते. आज बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतरही त्यांच्या अनुयायांची त्यांच्या बद्दलची ही भावना तसूभरही बदलली नाहीये. बाबासाहेबांची हीच खरी जादू आहे.

डॉ. आंबेडकर हा माणूस फार फार मोठा आहे. त्यांनी खरी क्रांती घडवलीय. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरून द्वेषाने नाही पण डोकं थंड ठेवून कोणताही पूर्वग्रह न ठेवता (दोन्ही बाजूच्या वर्गांनी) खऱ्या समानतेकडे जाणं हे आपल्या हातात आहे. तसेच, आंबेडकरांना एका विशिष्ट समाजात किंवा वर्गात बंदिस्त ठेवणं चूकच आहे. खऱ्या अर्थाने समस्त भारतीयांचा विचार कुणी केला असेल तर तो आंबेडकरानीच. राष्ट्रपिता ह्या पदवीचे खरे मानकरी बाबासाहेबच आहेत. काँग्रेसने आणि इतर दलित पक्षांनी त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या उत्तुंग नावाचं फक्त राजकारण केल. हीच खेदाची बाब आहे. आजही दलित समाजासाठी त्यांचा हक्काचा असा पूर्ण भारतभर विस्तारलेला असा पक्ष नाहीये. निवडणुकीच्या वेळी एखादा स्थानिक पक्ष, गट हे मोठ्या राष्ट्रीय पक्षांसोबत डील करून निवडणूक लढवून स्वतः मोठे होतात. पण समाज आहे तिथेच आहे. समाजाने जी काही प्रगती केलीय ती स्वतःच्या जीवावर कारण दलित पक्षांनी समाजासाठी काही तळमळीने काम केल्याचं त्यांच्या कृतीमधून कधी दिसत नाही.   

आपल्यासाठी बाबासाहेब हे एक घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, एक महान माणूस एवढेच असतील. पण या दलित/बहुजन समाजासाठी तर ते एक ईश्वरी अवतारच होते, आहेत आणि राहतील. साहजिकच आहे, आपल्या देवाची जयंती जर साजरी करता नाही आली तर दु:ख वाटणारच. मी अगदी चांगल्या प्रकारे हे समजू शकतो, जसं मी  यंदा रामनवमीच्या मिरवणुकीला मिस केलं तसंच आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीलाही मिस केलं. यंदा जयंती जरी रस्त्यावर मिरवणूक काढून साजरी नाही करता आली तरी हरकत नाही, पुढच्या वर्षी दणक्यात साजरी करणार. जय भीम...

शुभम शांताराम विसपुते

Monday, April 13, 2020

लक्ष्य - आयुष्याला दिशा देणारा सिनेमा


ही कथा करण (हृतिक रोशन) ची आहे जो खूप हुशार आहे पण आपल्या भविष्याबद्दल पूर्णपणे गोंधळलेला आहे. त्याची गर्लफ्रेंड रोमिला (प्रीती झिंटा) पहिल्यापासूनच न्यूज चॅनेलचा बातमीदार होण्याची महत्वाकांक्षा बाळगून असते आणि ती करण ला सतत आयुष्यात कसलं तरी लक्ष्य बाळगण्याचा सल्ला देत असते. करणच्या वडिलांचा (बोमन इराणी) बिझनेस असतो व आपल्या मुलाने आपला बिझनेस पुढे वाढवावा ही त्यांची इच्छा असते. पण करण च्या आयुष्यातील अनिश्चितते मुळे त्यांच्यातील अंतर आणखी वाढले जाते. घरच्यांच्या विरोधात जाऊन तो इंडियन मिलिटरी अकॅडमी ची परीक्षा देतो आणि तिथे सैन्य शिक्षणासाठी त्याची निवड होते. परंतु आळशीपणा, निष्काळजीपणामुळे त्याला शिक्षा होते आणि वैतागून तो घरी पळून येतो.आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा स्वतः घेतलेला निर्णय असल्याने रोमिला त्याला निघून आल्याबद्दल कठोर शब्दात बोलते आणि  त्याचे रोमिला सोबत ब्रेकअप होते. यामुळे करणचे आयुष्य बदलते आणि तो सैन्यात भरती होण्याचा पुन्हा निश्चय करतो आणि आयएमए मधून अत्यंत चांगल्या मार्कांसोबत तो बाहेर पडतो.  त्याच वेळी रोमिला देखील एक यशस्वी न्यूज चॅनेलची बातमीदार बनते.

सुट्टीत घरी आल्यावर रोमिला ची एंगेजमेंट झाल्याचं करण ला कळतं. पण त्यामुळे त्याच्या ध्येयापासून तो विचलित होत नाही.कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्यावर करणला तेथे सैन्य अधिकारी म्हणून नेमण्यात येतं आणि पाकिस्तानी सैन्याकडून पीक क्रमांक ५१७९ परत मिळवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येते. हेच आपल्या आयुष्यातील "लक्ष्य" आहे ह्याची जाणीव करण ला होते आणि अत्युच्च शौर्य पराक्रम दाखवून तो पाकिस्तानी सैन्याकडून पीक ५१७९ पुन्हा मिळवतो. कारगिलचे युद्ध कव्हर करायला आलेली रोमिला त्याला भेटते, तो युद्ध जिंकून येइपर्यंत वाट बघते आणि शेवटी दोघे पुन्हा एकत्र येतात.

चित्रपटात काही सिन जबरदस्त आहेत. करण आय एम ए मध्ये आल्यावर खेतरपाल च्या प्रांगणातलं भाषण, आयएमए मध्ये पुन्हा आल्यावर "लक्ष्य को हर हाल में पाना है" गाण्यात त्याचं होणारं ट्रान्सफॉर्मेशन, जवान शहीद झाल्यावर रोमिलाच्या "क्यो होती है जंग" ह्या वाक्यावर चिडणारा एक जवान. करण घरी फोन करतो तेव्हा त्याचे वडील म्हणतात तुझी आई घरी नाहीये तेव्हा करण त्यांना म्हणतो की."ये फोन मैने आपको किया हे डॅड" याच्या नंतरच करण आणि त्याच्या वडिलांचं फोनवरील निव्वळ अप्रतिम म्हणता येईल असं संभाषण, तसेच प्रीतमसिंग (ओम पुरी) चा करण ला दिलेला "मुझे पाकिस्तानियो का तजुर्बा है। पाकिस्तानी हारे तो एक बार पलटके फिर आते है।जीत जाओ तो लापरवाह मत हो जाना।" सल्ला शेवटी उपयोगी पडतो. हे सगळे सीन चित्रपटावर आपली छाप सोडून जातात.

"दिल चाहता है" च्या जबरदस्त यशानंतर हा दिग्दर्शक फरहान अख्तरचा "लक्ष" हा आणखी एक उत्कृष्ट नमुना होता. जावेद अख्तर यांनी हा सिनेमा खूप उत्तम प्रकारे लिहिलाय. गाणी आणि डायलॉग्स उत्कृष्ट आहेत. शिवाय नृत्यदिग्दर्शन (प्रभु देवा) ला "मै ऐसा क्यू हू" या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड देखील मिळालंय.

अभिनयाच्या बाबतीत हृतिक रोशनने कमाल करताना एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना दाखवला आहे. कॉलेज लाईफमधील गोंधळलेला आणि लक्ष निश्चित झाल्यावर गंभीर झालेला करन त्याने कमालीचा रंगवलेला आहे. ह्रितिक चा करिअर मधील बेस्ट परफॉर्मन्स मधला एक आहे. कर्नल सुनील दामले (अमिताभ बच्चन) हे आणखी एक आकर्षण आहे. अमिताभ बच्चन च्या भारी आवाजातील डायलॉग्स ऐकायची मजा आहे. प्रीती झिंटाची भूमिका मस्त आहे. ह्रितिक आणि प्रीती त्याच्या नव्या हेअरस्टाईल मध्ये मस्तच दिसतात. बोमन इराणी, ओम पुरी, आदित्य श्रीवास्तव तिघांचही काम उत्तम झालय. 

शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत आहे. एक कम्प्लिट अलबम त्यांनी दिलाय. उदित-अलका या एव्हरग्रीन जोडीचं "अगर मै कहू", शान च्या आवाजातील "मै ऐसा क्यू हू", स्वतः शंकर महादेवनच "लक्ष" चा टायटल ट्रॅक आणि माझ सर्वात आवडत "कंधो से मिलते हें कंधे" सारखं पॉसिटीव्हिटी तयार करणार एनर्जेटिक गाणं. सर्वच गाणी टॉप क्लास. 

हा चित्रपट म्हणजे आपल्या जीवनात काहीतरी "लक्ष्य" असणे होय. या चित्रपटाने एक प्रकारे आजच्या तरुणांकडे लक्ष वेधले आहे जे आपल्या जीवनात काय करणार आहेत याविषयी त्यांना काहीच माहिती नाही आणि फोकस सतत बदलणे हा आहे. त्यांनी एकदा तरी हा सिनेमा नक्की पाहावा.

शुभम शांताराम विसपुते

इंडिपॉप (90s) - पॉप गाण्यांचा गोल्डन इरा



इंडिपॉप साधारण ९०च्या दशकात सुरु झालं. इंडिपॉपच मी ऐकलेलं पहिलं गाणं ते हसन जहांगीर चं "हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे". लहानपणी त्या गाण्याने भुरळ घातली होती. तेव्हा ते गाणं पाकिस्तानी गायकाने गायलंय हेही माहिती नव्हतं. त्यावेळच्या "M tv" आणि चॅनेल "V" वर हे सगळे अल्बम लागायचे. चित्रपटांपेक्षा वेगळी गाणी आणि ती सगळी गाणी शूट सुद्धा खूप भारी केलेली असायची. त्यावेळेस त्या अल्बमच्या व्हिडीओ ला कथानक असायचं किंवा कथानक नसलं तरी ती गाणी फार सुंदर चित्रित केलेली असायची.

त्यावेळेच्या बॉलीवूड फिल्मी संगीताला टक्कर देत तब्बल एक दशकाहूनही अधिककाळ इंडिपॉप टिकले. वेगवेगळ्या चाली,गाणी मुख्य प्रवाहात आली. रॉक,पॉप,फ्युजन असे निरनिराळे प्रकार  लोकांसमोर आले. संगीत क्षेत्रातल्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळाला. त्यांना त्यांच्या मनासारखं संगीत देता आले. निरनिराळे प्रयोग करता आले. जे चित्रपटात करता आले नसते.

इंडिपॉपच्या गायकांमध्ये लकी अली, सोनू निगम, आलिशा चिनॉय, शान, केके, हरिहरन, लेस्ले लेविस, बाबा सैगल, पंकज उधास, शंकर महादेवन, सुनीता राव, आशा भोसले, नीरज श्रीधर, मोहित चौहान, कैलास खेर, अदनान सामी, अल्ताफ राजा, दलेर मेहंदी, शुभा मुद्गल, फाल्गुनी पाठक या सारखे नावाजलेले गायक तर आर्यन्स बँड, युफोरिया बँड यासारखे बँड्स होते. 

इंडिपॉप च अजून एक वैशिट्य म्हणजे या गाण्यांच्या व्हिडियो मधे पहिल्यांदाच काम केलेले कलाकार नंतर पुढे बॉलीवूडमधे मोठे स्टारही झाले. जॉन अब्राहम (यु मेरे खत का-पंकज उधास), विद्या बालन (कभी आना तू मेरी गली-युफोरिआ), शाहिद कपूर (आँखों में तेरा ही चेहरा-आर्यन्स), 
बिपाशा बासु (मुझे मेरे यार से मतलब). साऊथ ची सुपरस्टार तमन्नाही पहिल्यांदा अल्बम मधेच झळकली होती, ती अभिजीत सावंत बरोबर.
"लफ्जों में कह ना सकू.. बिन तेरे रह ना सकूं" या गाण्यात.

इंडिपॉप अलबम हा माझा अत्यंत आवडता विषय आहे. खूप क्लासिक गाणी त्या काळात तयार झालीत. जी आज ही तितकीच फ्रेश वाटतात. आत्ताच्या काळातील हनी सिंग, नेहा कक्कर, अरमान मलिक, बादशाह यांचे अल्बम ऐकवत नाही. जरी कधी चुकून ऐकले गेलेच, तर परत नाईंटीझ मध्ये जाऊन इंडिपॉप अलबम ऐकून स्वतःच समाधान करता येत.

पुढे गाजलेल्या इंडिपॉप गाणी आणि अलबम ची यादी देतोय, जे सर्व आज युट्युब वर उपलब्ध आहेत.एकदा जरूर ऐका.

ए.आर.रहमानचा "वंदे मातरम्" हा देशभक्ती ने पुरेपूर अलबम.
लकी अली चा "सुनोह" अल्बम. त्यात "ओ सनम मोहब्बत की कसम" हे पिरॅमिड जवळ शूट झालेलं गाणं.
आशा भोसलें चा "जानम समझा करो" हा मस्त अल्बम होता.
अलिशा चिनॉयच "मेड इन इंडिया". यात मिलिंद सोमण होता. एकदम कडक गाणं आणि विडिओची थिम पण भारी. 
अल्ताफ राजा च्या "तुम तो ठहरे परदेसी ने" अक्षरशः कहर केलेला. त्या एका गाण्याने अल्ताफ राजा घराघरात पोहोचला.
पलाश सेन चा 'धूम' अल्बम रिलीज झाला. "धूम पिचक धूम" हे गाणं सगळ्यात जास्त हिट झालं.
सोनू निगम चा "दिवाना". सोनू चा आवाज आणि साजिद वाजीद चं संगीत हे उच्च दर्जाचं होतं. त्यामुळे हा अल्बम एकच नंबर आहे
दलेर मेहंदी ची पंजाबी गाणी तर तुफान लोकप्रिय होती. "बोलो ता रा रा रा" आणि "तुनकतुनकतून" वर अजूनही पाय थिरकतात.
शान चं "तनहा दिल तनहा सफर" हे गाणं म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच आहे असं वाटतं.
डुबा डुबा रहता हूँ- मोहित चौहान (सिल्क रुट)
जवाब नही गोरी उसका- हंस राज हंस आणि त्याचा चोरनी अल्बम.
सोनू निगम चा दिवाना नंतरचा अलबम "जान".
ले जा ले जा - श्रेया आणि उस्ताद सुल्तान खान (उस्ताद एन्ड दिवाज)
सुनीता राव च "परी हूँ मैं" आज ही दांडिया या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. 
फाल्गुनी पाठक तर दांडिया क्वीन झाली. "मैने पायल है छानकायी" "ओ पिया" ही तिची गाणी दांडियात आजही वाजवली जातात.
गझल किंग पंकज उधास यांची "आहिस्ता", "चांदी जैसा रंग", "चुपके चुपके" 
शंकर महादेवनचं वर्ल्ड रेकॉर्ड गाणं "ब्रेथलेस"
बॉम्बे विकलिंगच माझं आवडतं रिमिक्स "क्या सुरत है.. क्या सुरत है.."
के के च "यारो दोस्ती" आणि "पल" हा अप्रतिम अलबम 
अदनान सामी चे..." मुझको भी तू लिफ्ट करा दे "
कैलाश खेर चे..." दिवानी... तेरी दिवानी..."
शुभा मुदगल यांचे.."अब के सावन..ऐसे बरसे" आणि "रंगिलो मारो ढोलना"
वैशाली सामंत व अवधुत गुप्ते यांचा अल्बम "ऐका दाजिबा" हा हिट झाला.
आर्यन्स, कलोनियल कझीन्स ह्या बँड्स ची जवळपास सर्वच गाणी
मराठीत मिलिंद इंगळे ने गारवा प्रत्येक घरात पोहोचवला. आजही पाऊस आला की गारवा ची गाणी ऐकावीशीच वाटतात.

शुभम शांताराम विसपुते 

Saturday, April 11, 2020

रामाधीर सिंग - शांत डोक्याचा व्हिलन



अगणित वेळा "गँग्स ऑफ वासेपूर" बघून झालाय. ही कथा जरी बदल्याची वाटत असली तरी यात बदल्यापेक्षाही महत्वाचं आहे ते "वास्सेपूर" वर वर्चस्व. आणि हेच वर्चस्व राखण्यात शेवटपर्यंत यशस्वी होतो तो "रामाधीर सिंग"(तिगमांशू धुलिया). तस या सिनेमात सगळ्याच व्यक्तिरेखा या ग्रे शेड च्या आहेत. पण  सिनेमा सरदार खान (मनोज बाजपेयी) आणि त्याच्या कुटुंबियांच्या POV ने दिसत असल्यामुळे यातील रामाधीर सिंग हा व्हिलन वाटू शकतो.

रामाधीर सिंग हे माझं या सिनेमातलं सर्वात आवडीचं पात्र. कारण पूर्ण सिनेमात तोच एक व्यवहारी, विचार करून काम करणारा, शांत, संयमी असा आहे. याउलट सरदार खान असो की फैझल (नवाझुद्दीन) ह्यांच्या डोक्यात सदासर्वकाळ खूनखराबा, बदला हेच सुरु असतं. वर्चस्वाच्या या लढाईत रामाधीर शांत डोक्याने यांच्या कुटुंबातील एकेका व्यक्तीला संपवतो. रामाधीर च्या तरुणपणात त्याला त्याच्या कोळश्याच्या खाणीतल्या मजुरांवर त्याचा वचक राहावा म्हणून तो सरदार खानच्या वडिलांना म्हणजेच शाहिद खान (जयदीप अहलावत)  ला पैलवान म्हणून नेमतो. शाहिद खान ची पुढची खाण ताब्यात घेण्याची महत्वकांक्षा पाहून तो अगोदर त्याला संपवतो. नंतर वडिलांच्या हत्येचा बदला म्हणून सरदार खान रामाधीर च्या मुलाच्या एका चुकीमुळे एकदम त्याच्या बरोबरीने उभा ठाकतो. इथं आपल्या मुलाला रामधीर एकदम कॅव्हेन्शिअली म्हणतो, "बेटा, तुमसे ना हो पायेगा" या मुळातच डायलॉग नसलेल्या वाक्याला अजरामर करून टाकलंय ते फक्त रामाधीरनेच. पुढे सरदार खान च वाढलेलं प्रस्थ कमी करण्यासाठी रामाधीर पठाण-कुरेशी यांच्यातील जातीय वादाचा फायदा उचलून पठाण असलेल्या सरदार खान च्या विरोधात सुलतान कुरेशी (पंकज त्रिपाठी) ला ताकत देऊन. रामाधीर पद्धतशीर पणे सरदार ला आपल्या मार्गातून बाजूला करतो. सरदारच्या मोठ्या मुलाला देखील संपवतो. सरदार नंतर त्याचा मुलगा फैझल परत रामाधीर विरुद्ध बदला आपल्या बापका, दादाका, भाईका बदला घेण्यासाठी उभा राहतो. शेवटी रामाधीर ला मारून तो यशस्वी देखील होतो. पण फैझल ला ते सुख जास्त काळ नाही मिळत. कारण चतुर रामाधीर ने फैझल आणि त्याच्या सावत्र भावात फूट पाडून, स्वतः मेल्यानंतरही तो फैझलला देखील संपवतो.

तिगमांशु धुलिया खूप चांगला दिग्दर्शक असला तरी रामाधीर सिंग ची भूमीका ही त्याच्यातल्या अभिनेत्याचं पडद्यावरच पदार्पण होत. आपल्या पहिल्याच सिनेमात समोर मनोज बाजपेयी, नवाझ सारखे कसलेले अभिनेते असताना देखील तो आपली छाप सोडून जातो. एक मुरब्बी राजकारणी तसेच कोल्ड ब्लडेड बाहुबली चा रोल तिगमांशूच बरोबर करू शकतो असा विश्वास ठेवल्याबद्दल अनुराग कश्यपचे पण कौतुक करावेसे वाटते.   

गँग्स ऑफ वासेपूर एकदा रामाधीर च्या POV बघितल्यास त्याची प्रत्येक कृती आपल्याला पटायला लागते आणि शेवटी रामाधीरच या वर्चस्वाच्या लढाईत जिंकायला हवा हे देखील मनोमन वाटते. असा हा आपल्या दुष्मनाच्या तीन पिढ्या संपवून स्वतः ही संपणारा माझा आवडता खलनायक कम नायक रामाधीर सिंग..... 

शुभम शांताराम विसपुते    

Friday, April 10, 2020

सोनू निगम - आवाजातून एक्सप्रेशन्स देणारा गायक



सोनू निगम म्हणजे अफाट रेंज असलेला गायक. अगदी कुठल्याही प्रकारचं गाणं तितक्याच कॅव्हेन्शिअली गाणारा. हाय पीच मध्ये गाण्याच्या बाबतीत त्याच्या समवयस्क असलेला कोणताही गायक त्याच्या जवळपासही येऊ शकत नाही. इतका तो एफर्टलेस हाय पीच मध्ये गातो. ऐकताना आपल्याला वाटत कि किती सहज हा इतक्या वरच्या आवाजात गातोय, अर्थात हे त्याच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीमुळे शक्य झालय. गेल्या २४-२५ वर्षांपासून तो सातत्याने गातोय, पण त्याचा आवाज आजही तितकाच गोड आहे. रोमँटिक, क्लासिकल, क्लब सॉंग्स, डान्स नंबर, दर्दभरे, देशभक्तीपर, सुफी, भजन, गज़ल गाण्यातला असा एक हि फॉर्म नाहीए ज्यात सोनू गेला नसेल. अजून एक खास गोष्ट म्हणजे, भजन आणि सुफी गाण्यांबरोबरच "बुद्ध हि बुद्ध है" या अल्बम मध्ये बुद्धासाठी सुद्धा गाणं गायलंय. कदाचित बॉलीवूड मधला एकमेव कि ज्याने बुद्धिस्ट गाणं गायलंय. 

३० जुलै १९७३ ला फरिदाबाद मध्ये त्याचा जन्म झाला. वडील ऑर्केस्ट्रा सिंगर असल्याने त्याच्या घरातच गाणं होत. अश्यातच ४ वर्षांचा असताना एकदा हौस म्हणून वडिलांच्या ऑर्केस्ट्रा मध्ये मोहम्मद रफी यांचं "क्या हुआ तेरा वादा" हे गाणं त्याने सादर केलेलं. हा त्याचा पहिला स्टेज परफॉर्मन्स. त्याच्यावर रफी यांचा जो प्रभाव आहे त्याच मूळ हे आहे. लहानपणीच मुलाची गाण्यातील आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे शिकायला ठेवलं. पुढे वयाच्या १८ व्या वर्षी तो गाण्यात करिअर करण्यासाठी मुंबईत आला.

९० च्या दशकातील "बेवफा-सनम" या सिनेमापासून तो नावारूपाला आला. यातलं 'अच्छा सिला दिया तुने' हे प्रेमात धोका खाल्लेल्यांचं राष्ट्रीय गाणं सोनू निगमच्या नावावर आहे. नंतरच्या काळात बऱ्याच वेळी सिनेमात उदित च्या आवाजातल गाण्याचं हॅपी व्हर्जन तर सोनू च्या आवाजातल सॅड व्हर्जन असायचं.  उदा. बेवफा मधील "एक दिलरुबा है" उदित च्या आवाजात तर "एक बेवफा है" सोनू च्या आवाजात आहे. आता तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" हे कुमार सानूचं सिग्नेचर गाणं अगोदर सोनू  गाणार होता पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. सोनू च्या आवाजातील हे गाणं इमॅजिन करूनच गूसबम्प येतो. त्याच काळात त्याने  झी टीव्हीवर "सा रे ग म पा" च सुत्रसंचलन केलं. ज्याची विजेती "श्रेया घोषाल" होती. सोनू निगम ने नंतर स्वतःचे पॉप अल्बम पण केले. त्यात दिवाना, याद, परियो सी, चंदा कि डोली अशे बरेच अल्बम आहेत. या सगळ्यात "दिवाना" बेस्ट. मोहम्मद रफी याना ट्रीबुट म्हणून त्यांच्याच गाण्यांचा "रफी कि यादे" नावाचा अलबम पण त्याने केला.

१९९७ साल हे सोनू निगम साठी आयुष्यभर लक्षात राहील असं होत. या वर्षी त्याच्या करिअर मधील दोन माईलस्टोन गाणी त्याला मिळाली. पाहिलं होत "बॉर्डर" मधील अनु मलिक ने संगीत दिलेलं "संदेसे आते हे". रूप कुमार राठोड सोबतच त्याच हे डुएट गाणं अजरामर आहे. जवळपास १० मिनिटांचं हे गाणं आहे. यात रूप कुमार जरी असला तरी लक्षात राहतो तो सोनूचं. यातील 'ए गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या' हे सोनू ने ज्या फीलिंग्स ने म्हटलंय, ते एकूण वाटतं की त्या हवेने त्याच काम खरंच अगदी आवडीने केलं असेल.अनु मलिकचे या गण्यासाठी खरंच आभार मानायला हवे. म्हणूनच असेल कदाचित पुढच्या काळात या दोघांनी मिळून खूप उत्तम गाणी दिलीत. अनु मलिक ने नंतर सगळी खास गाणी सोनू ला दिली. दुसरं गाणं होत, "परदेस" मधील "ये दिल दिवाना". माझं ऑल टाइम फेव्हरेट. शाहरुख-सोनू ची जोडी या गाण्यापासूनच जमली. "दिल पे मेरा जोर नही है, में क्या करू" हे ज्या वेदनेने तो गातो. कदाचित स्क्रीनवर तितकी वेदना शाहरुखला ही झाली नसेल. अगोदर म्हटल्याप्रमाणे जबरदस्त कॅव्हेन्शिअली गाणारा.

सोनू निगम हा अस्सल हिरा रहमान सारख्या अव्वल जोहरी च्या नजरेत आला. रहमान ने त्याला दिल से मधलं "सतरंगी रे" हे जबरदस्त गाणं दिलं. रहमान ने नंतर सोनू सोबत खूप छान छान गाणी दिलीत. त्यात "साथिया" सारखं प्युअर रोमँटिक गाणं आहे. पुकार मधील अनुराधा सोबतच "किस्मत से तुम" सारखं क्लासिकल टच असलेलं गाणं, जोधा अकबर मधलं रोमँटिक सुफी गाणं "इन लहमो के दामन में". ताल मधील "इश्क बिना" या गाण्यातील सोनूची "तुमने इश्क का नाम सुना है, हमने इश्क किया है" ही ओळ म्हणजे हृदयावरून फिरवलेलं मोराचं पीस आहे. रहमान-सोनू जोडीचं माझं पर्सनल फेव्हरेट द लिजंड ऑफ भगतसिंग मधील क्लायमॅक्स ला असलेलं "मेरा रंग दे बसंती चोला". भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तिघेही फाशीवर चढण्यासाठी एकदम ख़ुशी ख़ुशी निघालेय, सोबत हे गाणं म्हणत ते त्यांचं शेवटचं मार्गक्रमण करताय. "महकेंगे तेरी फिज़ा में हम बन के हवा का झोंका, किस्मत वालों को मिलता ऐसे मरने का मौका" सोनू च्या आवाजातल्या या ओळी ऐकताना आजही एक सरसरून काटा जरूर येतो.

संघर्ष सिनेमातील "मुझे रात दिन" सारखं तरल गाणं, रिफ्युजीची सोनूची सर्वच गाणी, वास्तव सारख्या हार्ड हीटिंग सिनेमातलं कविता सोबतच "मेरी दुनिया है" सारखं सिनेमातील रक्तपातापासून जरा वेळ रिलीफ देणार गाणं, इस्माईल दरबार सारख्या गुणी म्युझिक डायरेक्टर ने दिलेले अतिशय हाय पीच मधलं "तेरा जादू चल गया" हे फुल्ल आवाज करून ऐकण्यासारखं गाणं आहे. RHTDM चा टायटल ट्रॅक, सलमानच्या लकी सिनेमातील "चोरी चोरी" आणि "सुन जरा" हि कल्ट गाणी,  ओम शांती ओम मधील "तुमको पाया तो जेसे  खोया हूं" आणि स्ट्राईकर नावाच्या सिनेमातील "चम चम" सारखी छान हळुवार रोमँटिक गाणी, अशी कितीतरी सुंदर गाणी त्याची आहे. 

काही गाण्यांमधला सोनू चा गेस्ट अपिअरन्स पण भारी आहे. गजनीच्या "गुझारिश" गाण्यातला त्याचा हुमिंग साऊंड मधला आलाप असो की, जगजीत साहेबांच्या "कोई फरियाद" मधला आलाप, दोघी गाण्यात त्याचा आवाज उठून दिसतो. सोनूचे काही अंडररेटेड गाणी आहे. जी फारशी गाजली नाहीत, पण खूप भारी होती. तो बात पक्की या सिनेमातील "फिर से" नावाचं खूप मस्त गाणं होत. तसंच तनु वेड्स मनू च्या अल्बम मध्ये असलेलं पण सिनेमात नसलेलं "ओ साथी मेरे" हे गाणं. सिनेमात नसल्यामुळे इतक्या सुंदर गाण्याला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. 

सोनू कुठल्याही मूडच गाणं तितक्याच कॅव्हेन्शिअली गातो. पण जेव्हा तो विरह गीत गातो, तेव्हा मात्र तो आपल्याला त्या वेदनेसोबत जोडतो. कल हो ना हो मधील "हर घडी बदल रही है" सारखं वेदनेच गाणं, आता हळूहळू सगळं संपणार आहे, त्यामुळे जितका वेळ शिल्लक आहे तोवर पुरेपूर जगून घ्या. हे सांगायला स्क्रीनवरच्या कॅन्सर पेशंट शाहरुखला सोनू चा आवाज परफेक्ट मॅच होतो. तसच दुसरं गाणं हे अग्निपथ मधलं "अभि मुझ में कही" सारखं  ओतप्रोत दुःख भरलेलं गाणं. सोनू ने इतकं आतून गायलंय की, हे गाणं ह्रितिक च न राहता सोनू च होऊन जातं.

सोनू निगम च्या गाण्यांबद्दल लिहायला जागा आणि शब्द कमी पडतील इतकं मोठं काम त्याने केलंय. आता मात्र तो फार सिलेक्टिव्ह काम करतो. त्यामुळे जास्त गाणी त्याची येत नाही. सोनू ने ज्या वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरुवात केली तशीच सुरुवात त्याचा मुलानेही केलीय. "कोलावेरी डी" गाणं त्याने गायलंय. आपल्या जनरेशन ला सोनू ने खूप दिलंय, अगदी तसंच त्याच्या मुलाने येणाऱ्या जनरेशनसाठी असच छान छान काम करावं इतकीच इच्छा...

शुभम शांताराम विसपुते 

Wednesday, April 8, 2020

जळगाव - फूड सफारी (भाग - २)



कालच्या भागात आपण शहरातील मध्यवर्ती एरियात आणि शॉपिंग मार्केट्स च्या परिसरात असलेल्या खाण्यासाठीच्या गाड्यांची माहिती घेतली. आज या भागात  उर्वरित शहरातील वेगवेगळ्या खाण्याच्या स्पॉट्स बद्दल सांगणार आहे. "खवैयेगिरी" हा माणसामध्ये असलेला एक सर्वोच्च गुण आहे आणि तो आत्मसात करण्यासाठी काही खास वयाची, शिक्षणाची अट नाही. फक्त खिशात थोडे पैसे आणि बरोबर बराचसा वेळ असला कि तुम्ही हवी तशी खवैयेगिरी करू शकतात. अर्थातच तुम्हाला खाण्याचा तितका इंटरेस्ट देखील असायला हवा. 

१७ मजली कडून रेल्वे स्टेशनच्या रोड वर दोन महत्वाचे स्पॉट आहे. पहिला भुसावळच्या प्रसिद्ध "घाशीलाल" वडे यांचा. ही जळगाव मध्ये असलेली त्यांची दुसरी शाखा, पहिली शाखा बाजार समिती मध्ये आहे. टोकन घेऊन इथं वडा घ्यावा लागतो. एक गरम वडा सोबत दोन पाव आणि हवी तितकी मिरची कटोरीमधून घेऊन इथं वडापाव खाता येतो. वडा तयार करतानाचा मसाला हि यांची 'सिक्रेट रेसिपी' आहे. त्यामुळे इथला वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. शक्यतो, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या चवीसाठी इतक्या प्रसिद्ध नसतात. कारण इथला ग्राहक हा नेहमी बदलता असतो म्हणून हे दोन्ही स्पॉट याला अपवाद आहे.  स्टेशन परिसरातला दुसरा स्पॉट आहे, "रवी" अंडाभुर्जी ची गाडी. इथे संध्याकाळ पासून ते रात्री पर्यंत कायम गर्दी असते. डबल बॉईल भुर्जी, हिरव्या मिर्चीतलं आम्लेट हे इथलं खास. ऑर्डर दिल्यानंतर डिश समोर यायला वेळ लागतो. पण आपण दिलेला वेळ वसूल मात्र पूर्ण होतो. गोविंदा रिक्षा स्टॉप कडून रेल्वे गेट कडे जाताना "काळूबाई" म्हणून एक भारी नाष्ट्यासाठीच ठिकाण आहे. इथे पोहे, भजी, कचोरी, समोसा सगळंच मिळत. अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांचा हा खास स्पॉट आहे. 

नूतन मराठा कॉलेज च्या परिसरात गेल्यास, खूप लहानमोठे स्टॉल्स आहेत. या भागात बाहेरून येऊन राहणारे विद्यार्थी राहतात. तसेच जिल्हा न्यायालय पण असल्याने गर्दी हि नेहमीच असते. कोर्टच्या समोरच "गोली" वडापाव च आउटलेट होत. आता तिथे बरेच वेगवेगळ्या ब्रँड चे आउटलेट येऊन गेलेत, पण पाहिलं गोली च असल्याने कुठल्याही आउटलेट ला गोली वडापावच म्हटलं जात. तिथेच बाजूला अंडा रोल्स च नवीन आउटलेट आलेलं आहे. अंडा रोल किंवा इतर व्हेज रोल हा प्रकार जळगाव मध्ये तसा नवीनच आहे. पण त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय. नूतन कॉलेज कडून शाहू मार्केटकडे जाताना, राजूभाऊ यांची अंडाभुर्जीची गाडी आहे. विद्यार्थी मंडळींची संख्या जास्त असल्याने इथे "बेंजो" हा प्रकार खूप चालतो. पुढे गणेश कॉलनी कडे जाताना, ट्रॅफिक गार्डन च्या मोकळ्या जागेवर शहरातील दुसरी "खाऊगल्ली" आहे. नॉनव्हेज आणि चायनीज खाण्यासाठीचे विविध स्टॉल इथे आहे. चिकन बिर्याणी, अंडा भुर्जी, कबाब, मन्चुरिअन, सोयाबीन चिल्ली असे सगळेच प्रकार इथं मुबलक उपलब्ध असतात. पण ते फक्त संध्यकाळ नंतर.

कोर्ट चौक ते स्वातंत्र्य चौक या रस्त्यावर खाण्यासाठीचे खूप सारे ऑप्शन आहेत. जीएस ग्राउंड ला लागून संध्याकाळी खूप साऱ्या चायनीजच्या गाड्या असतात. "शेळके" म्हणून एक पावभाजी ची गाडी पण त्या गर्दीत असते. पुढे बेंडाळे कॉलेज च्या समोरच्या "मधुरम" मधला कोकोनट समोसा टेस्ट करावा असा आहे. आम्ही नूतन कॉलेज ला होतो तेव्हा आवर्जून जायचो खाण्यासाठी. बेंडाळे कॉलेज हे मुलींचं असल्याने तिथं पाणीपुरी वाला असणं स्वाभाविकच आहे. कॉलेज च्या बाजूला स्टेडियम जवळ एक छोटी पाणीपुरी ची गाडी लागते. जी नेहमी मुलींनी घेरलेली असते. स्टेडियमच्याच बाजूने बस स्टॅन्ड कडे जाताना पोलीस हॉल च्या बाहेर संध्यकाळी शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी ची एक गाडी लागते. इथली शेवपुरी हा एक जबरी असा प्रकार आहे. याच्या बाजूलाच बर्फ गोळ्याची गाडी आहे. सिजनल नाही तर वर्षभर ती असते. इथून रोड क्रॉस केला कि समोर, महाराष्ट्र बँकेच्या अंगणात महिला मंडळाच "पराठा हाऊस" आहे. पालक पराठा, आलू पराठा यांच्या सोबतच वरण भात, शेवभाजी, पोळी असं पार्सल पण मिळतं. तिथे बसूनही खाऊ शकतो. या परिसरातील अनेकांसाठी दुपारच्या जेवणाचं हे हक्काचं ठिकाण आहे. याच्या बाजूलाच नवीन उघडलेला साऊथ इंडियन पदार्थांचा स्टॉल आहे. पुढे बस स्टॅन्डच्या बाहेर आणि बाजूच्या भजेगल्लीत खूप खाण्याचे स्टॉल्स आहेत. पण चवीच्या बाबतीत ते ओके टाईप चे आहेत. पुढच्या स्वातंत्र्य चौकात गांधी उद्यान असल्याने उद्यानाबाहेर खाण्याच्या गाड्यांची अजिबातच कमी नाहीये. आमचा मित्रांचा ग्रुप गेला कि मी सोडून बाकीचे तिथला ब्रेडवडा आणि पाणीपुरी नेहमी खातात.   

पांडे चौकात पोस्ट ऑफिस च्या बाहेर सकाळी नानांची पोह्याची गाडी लागते. पोहे, त्यावर मटकी च्या रस्सा, झणझणीत तर्री, शेव, कांदा, लिंबू असं सगळं व्यवस्थित एका प्लेट मध्ये दिल जात. अर्थात रस्सा हा अनलिमिटेड असतो. कॉलेज ला असतानाच आमचा मित्रांचा हा फेव्हरेट स्पॉट होता. या गाडीच्या समोरच सिविल हॉस्पिटलच्या रस्त्यावर "गुप्ताजी" म्हणून फक्त चणे मिळणारी गाडी आहे. कदाचित शहरातील एकमेव. एका प्लेट मध्ये चणे, त्यावर बटाटा, चण्याचा रस्सा, खटाई, कांदा लिंबू मारून मस्त खाता येते. सकाळच्या वेळात ही गाडी असते. याच गाडीच्या बाजूला एका लहान गाडीवर "मठ्ठा" मिळतो, उन्हाळ्यात जर मठ्ठा प्यायचा असेल तर हा बेस्ट चॉईस आहे.

बहिणाबाई उद्यानाच्या मागे असणाऱ्या गाड्यांपैकी "गोल्डन" आम्लेट हि अंडा भुर्जीसाठीची मस्त गाडी आहे. "राजा" कोल्ड्रिंक्स ही बर्फ गोळ्याची गाडी आहे. बाकीच्या चायनीज, भेळ, पाणीपुरी च्या गाड्या आहेत. या सगळ्या मध्ये प्रसिद्ध कोणती गाडी असेल तर ती, "फेमस" नावाची गाडी. या गाडीवर त्यांचा स्पेशल फेमस रगडा मिळतो. सोबतच भेळ, शेवपुरी वैगेरे पण मिळतात. पण रगडा सगळ्यात बेस्ट.

सागर पार्कच्या बाहेर च्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या या हायवेला आय टी आय च्या बाहेर शिफ्ट केल्या आहे. हीच जळगाव मधली तिसरी खाऊगल्ली. ज्या चायनीज साठी सागर पार्क प्रसिद्ध होत. ते आता या ठिकाणी मिळत. थोडं आऊटसाईड ला झाल्यामुळे सागर पार्क ला व्हायची तितकी गर्दी आता इथे होत नाही. पण ज्यांना खास चायनीज खायचं असत, ते आवर्जून इथं येत असतात. या सारखंच भुसावळ हायवेला कालिकामाता स्टॉप जवळ पण आता खाऊ गल्ली तयार झालीय, संध्याकाळी इथं तुफान गर्दी होत असते.

या सगळ्या व्यतिरिक ही अनेक ठिकाणं शहरात आहे. त्यात महाबळ स्टॉप जवळ सकाळी मिळणारे रस्सा पोहे, मिसळ आहे. आकाशवाणी चौकात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर झाडाखाली पोहे, खमण, ब्रेडवाडा, रस्सावडा असं सगळंच ए वन क्वालिटीच मिळत. सराफ बाजार मध्ये भवानी मंदिरासमोर अस्सल गावरानी तुपात शिकलेली दाबेली मिळते. मेहरूण भागात अक्सा नगर मध्ये चिकन बिर्याणी साठीची खास गाडी आहे. एम आय डी सी परिसरात बाजार समितीच्या बाहेर अव्वल दर्जाची पाणीपुरी मिळते. गणेश कॉलनी चौकात "हिंदवी स्वराज" कडे उत्कृष्ठ पोहे, मिसळ मिळतात. ख्वाजामिया दर्गा समोर एक लहानसा कॅफे आहे. त्याच्याकडे पिझ्झा, ग्रिल सँडविच, बन मस्का अशे नेहमीपेक्षा वेगळे पण छान क्वालिटी चे पदार्थ मिळतात.

मुळात जळगाव शहरामधील खाण्याचा गाड्या, स्टॉल, हॉटेल्स हा काही दोन ब्लॉग मध्ये पूर्ण होणार विषय नाहीये. पण हे दोन ब्लॉग फक्त स्ट्रीट फूड साठी लिहिलेय. लॉकडाऊन संपल्यावर या सर्व ठिकाणांना आवर्जून भेट द्या. आता पुढच्या ब्लॉग मध्ये शहरातील व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील जेवणाच्या हॉटेल्स बद्दल माहिती देईन.

क्रमश:

शुभम शांताराम विसपुते 

Tuesday, April 7, 2020

जळगाव - फूड सफारी (भाग - १)



सध्या लॉकडाऊन असल्याने बाहेर पडणं टोटल बंद आहे. त्यामुळे रोज बाहेर जाऊन आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन मनसोक्त खाण्याची खूप इच्छा होते. पण लॉकडाऊन असल्याने ती तशीच दाबून ठेऊन घरातचं काहीतरी खाऊन वेळ मारून न्यावी लागते. खाण्यावर माझं नितांत प्रेम आहे. माझ्यासोबतच्या असणाऱ्या मित्रपरिवाराला हे चांगलच ठाऊक आहे. रेगुलर हॉटेल मध्ये जेवणासाठी जाणं होत नसलं, तरी नाष्टा मात्र बाहेर नेहमीच होतो. असंही कुठल्या शहरात जाण्याचं काम पडलंच तर मी आधीच माहिती घेऊन जातो कि तिथली खाण्याची स्पेशॅलिटी काय आहे. बऱ्याचदा पदार्थ एकच असतो पण नावे वेगळी असतात. हे तिथल्या स्थानिक भाषेमुळे होतं. जसे की जळगाव मधल्या बटाटेवड्याला अमरावती मध्ये "आलू-बोन्डा" असं वड्याला शोभेल असं मस्त नाव आहे. बहुतांश काळ जळगाव मध्ये काढला असल्याने आणि इथला स्थानिक असल्यामुळे मला जळगाव मधलीच जेवणाची आणि नाष्ट्याची हॉटेल्स, गाड्या आवडतात. जिथे मी नेहमीच भेट देत असतो, अश्या सगळ्यांची माहिती थोडक्यात देतो.

जळगाव शहरात मी रथ चौकात राहतो. जिथं सकाळी नाश्ता करण्यासाठीच विविध प्रकार अगदी सहज उपलब्ध आहे. त्यात पंडित कडचा झणझणीत असा आलूवडा जो अगदीच तिखटजाळ असल्याने त्याच्याचकडे वाफेवर तयार होणाऱ्या पोह्यांसोबत खावा लागतो. इथले पोहे हा एक निव्वळ अप्रतिम असा प्रकार आहे. कारण ते कन्टीन्यु वाफेवर ठेवले असल्याने गरमच असतात आणि तितकेच मऊ देखील. इथे फक्त पोहे मिळतात, म्हणजे बाहेर मिळतात तशे प्लेट मध्ये कांदा, शेव, रस्सा टाकून नाही तर केवळ कागदावर पोहे मिळतात आणि सोबत तळलेली मिरची बस्स. इथला पाववडा (ब्रेडवडा) देखील तितकाच भारी आहे. याच गाडीच्या पाठीमागे, मधूभाऊंची भज्यांची प्रसिद्ध गाडी आहे. पालक भजी जी इथं मिळतात ती मला नाही वाटत कि जळगाव मध्ये कुठं मिळत असतील. उकळत्या तेलात तळलेली कडक पालक भजी इथली खासियत आहे. सोबतच कांदा भजी पण बेस्टच. सुरुवातीला इथं फक्त भजी मिळायची, पण आता भज्यांसोबतच कचोरी, ब्रेडवडा, खमण, रस्सा-पोहे इतकं सगळं मिळत. खूप गर्दी असून देखील जास्त वाट बघावी लागत नाही. कारण स्टाफ तितका तत्पर आहे.

रथ चौकातून पुढे गेलं कि सुभाष चौक लागतो. दिवसभर वर्दळीचा असा चौक. वर्दळ खूप असल्याने खाण्यासाठी पर्याय देखील खूप आहेत. दिवसभरात खाण्यासाठी कधीही आलात तरी तुम्हाला रिकाम्या हाती जाण्याची वेळ येणार नाही. चौकातच जिलेबी सेन्टर आहे. जिथं नेहमीच्या साखरेच्या जिलेबीसोबतच स्पेशल अशी मावा जिलेबी मिळते. तुपात तळलेली सावळ्या रंगाची ही जिलेबी म्हणजे स्वर्ग आहे. त्याच सेन्टर वर दहीवडा मिळतो. कदाचित दहीवडा मिळण्याचं हे शहरातील एकमेव ठिकाण आहे. उडदाच्या डाळीच्या वड्याला एका कटोरी मध्ये चुरून त्यावर भरगोस पातळ दही, त्यावर शेव, चटणी आणि चाटमसाल्या सोबत दिलं जात. या सेण्टरच्या बाजूलाच पाणीपुरी वाला देखील आहे. तो पण दिवसभर असतो. तिथली पाणीपुरी देखील छानच आहे. बाजूला "स्वदेशी" म्हणून एका छोटया मालवाहतुकीच्या गाडीवरचा स्टॉल बनवला आहे. प्लास्टिकच्या छोट्या बाटलीमध्ये इथं बदाम शेक, लस्सी, फ्रुट सलार्ड मिळत. थोडं पुढे भाजी बाजाराकडे गेलं कि उजव्या बाजूला सकाळी गोपीची पोह्यांची गाडी लागते. तिथल्या गर्दीत जरा वेळ वाट बघितल्यानंतर आपल्यासमोर एका प्लेट मध्ये पोहे, त्यावर मटकी, रस्सा, लिंबू-कांदा, आणि इथली जी स्पेशल आहे ती खास इंदोरी शेव टाकून स्वतः गोपीशेठ च्या हस्ते आपल्या हातात ती प्लेट दिली जाते. याच्याच पाठीमागे असलेली चेतन ची गाडी, जिथे शुद्ध शेंगदाणा तेलातील कचोरी आणि ब्रेडवडा मिळतो. महागाई असून देखील दर्जा सोबत इथं तडजोड केली जात नाही. पुढे ब्रिजविलासच्या गल्लीत सकाळी फाफडा खाण्यासाठीची गाडी आहे. इथे खूप वाट बघण्याची तयारी असेल तरच फाफडा खाता येतो. घाई केली तर फाफडा मिळणार नाही असं डायरेक्ट सांगितलं जातं. पण इथला फाफडाच इतका क्लासिक असतो कि त्यासाठी वाट बघण्याची प्रसंगी अपमान झेलण्याची पण तयारी असते. 

सुभाष चौकापासून पुढे फुले मार्केटच्या एल पट्ट्यात सिंधी कडे दाल पकवान हा अस्सल सिंधी पदार्थ खायला मिळतो. तळहाताएवढ्या पापडीवर घट्ट दाल टाकून त्यावर खाताय, मसाला, तिखट, शेव, कांदा टाकून दिली जाते. अप्रतिम असा पदार्थ आहे. मार्केटमधून या स्टॉल च्या बाजूने बाहेर मेन रोड वर आले कि, बाजूलाच पाहिला गाळा हा "सायंतारा" नावाचा आहे. महिला बचत गट तो चालवतो. साबुदाणा वडे आणि साबुदाणा खिचडी हि इथली स्पेशालिटी, रोज जरी गर्दी असली तरी उपवासाच्या दिवशी मात्र वेळेच्या अगोदर हा स्टॉल बंद होतो. इथूनच मेन रोडने थोडं मागे गांधी मार्केट च्या दिशेने आलं कि बळीराम पेठेच्या चौकात छान दाबेली मिळते. दाबेलीच्या गाडीपासून समोर रॉड क्रॉस केला कि, कॉर्नरलाच सावता माळी म्हणून प्रसिद्ध गाडी आहे. कचोरी, सामोसा, भाजी, ब्रेडवडा असं सगळंच इथं मिळतं. याच्या अगदी समोर प्रकाश मेडिकल च्या बाजूला "बाबा वडापाव" आहे. तो पण चांगलाच आहे पण तितकासा झणझणीत नसतो. त्यासाठी इथूनच पुढं टॉवर चौकाच्या दिशेने गेले कि बाजूलाच ओपन स्पेस च्या बाहेर "मुंबईचा प्रसिद्ध वडापाव" नावाची गाडी आहे. नावाप्रमाणेच मुंबईचा वडापाव जळगाव मध्ये खायचा असेल तर हे बेस्ट चॉईस आहे. गरमागरम वड्यासोबत ताजे पाव, त्यात ओली आणि सुक्की अश्या दोन्ही चटण्या लावलेल्या असतात आणि सोबत तळलेली मिरची. सगळं कस एकच नंबर असतं. याच्याच पाठीमागच्या केळकर मार्केट परिसरात मग पाणीपुरी, दहीपुरी चे खूप स्टॉल्स आहेत. पुढच्या टॉवर चौकात मग खूप जुनं असं खास फक्त कचोरी-समोस्यासाठीच "जोगळेकर" आहे. अगोदर खूप प्रसिद्ध होत, पण आता त्याच इतकं नाव नाहीये.

नेहरू चौकाच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला आर्यनिवास च्या शेजारी "प्रभात" सोडा फाउंटन आहे. लहानपणापासून इथं येणंजाणं आहे. इथला बदाम शेक खासचं आहे. बाकी पण खूप व्हरायटी आहे. बदाम शेक सोबतच इथला लेमन सोडा भारी आहे. बाहेर सोड्याचा गाडीवर मिळणाऱ्या गोड लिंबू सोड्यासारखा बकवास प्रकारापेक्षा इथला प्युअर स्ट्रॉंग लिंबू सोडा मस्त आहे. अगदीच डोक्यात पार झिणझिण्या आणेल असा. सरळ जाऊन मद्रास बेकरी कडून डावीकडे वळून नवी पेठेत आले कि, समोरच "गणेश दर्शन" म्हणून अस्सल साऊथ इंडियन पदार्थ मिळणारी हातगाडी आहे. जी संध्याकाळच्या वेळेत असते. अव्वल दर्जाचा डोसा आणि इडली इथे मिळते. रात्री दुकान बंद झाली कि तिथेच ओट्यावर बसून इथल्या दक्षिणी पदार्थांचा मस्त आस्वाद घेता येतो. पुढच्या नवीपेठेच्या मधल्या मुख्य चौकात दाना बाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरुवातीलाच "भैरवनाथ" म्हणून सकाळी गाडी लागते. जिथे खास राजस्थानी पद्धतीचे चना-पोहे मिळतात. सोबतच खमण देखील असतात. पण इथले चना पोहे बेस्ट आहेत. याच ठिकाणी रात्री शहरातील प्रसिद्ध "कृष्णा" पावभाजीची गाडी लागते. बसण्यासाठी मस्त रस्त्यावर टेबल खुर्ची टाकलेली असते. पूर्ण फॅमिली सोबत येऊन पावभाजी खाण्याची हि एक उत्तम जागा आहे. इथला तवा  पुलाव पण छान असतो. खूप बटर घातलेली आणि आपल्याला हवी तशी भाजी लगेच बनवली जाते. इथली हि गोष्ट खूप चांगली आहे. पावभाजीच्या पार्सल साठीचा माझ्यासाठी हा एकमेव चॉईस आहे.

नवीपेठेच्या याच चौकातून इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे गेले की, मंदिराच्या बाजूलाच "ओपन हाऊस" आहे. जळगाव मध्ये कांदाकचोरी मिळण्याची सुरुवातच इथून झालीय. इथली फक्त कांदा कचोरी छान आहे. याच्या समोरच "महावीर आईस्क्रिम" आहे. जिथं खूप साऱ्या फ्लेवर चे आईस्क्रिम मिळतात. पण मला तिथली मलाई कुल्फी खूप आवडते. थोडं पुढं गेलं की येत जळगाव मधलं सगळ्यात जुनं आणि प्रसिद्ध "लोकप्रिय" हॉटेल. छोटेसेच हॉटेल आहे. बाहेरून बघितल्यावर कळत कि सगळ्यात जून का आहे आणि आत गेल्यावर कळत कि इतकं जून असूनही लोकप्रिय का आहे ते. अगदी बसायला सुद्धा मोकळी  जागा नसते, व्यवस्थित स्वछता नसते. पण अस्सल खवैय्या ला या गोष्टींनी फरक नाही पडत. इथं मध्ये जाऊन मिळेल त्या जागी बसून फक्त एक झणझणीत मिसळ आणि जिलेबी ची ऑर्डर करायची आणि बाकी सर्व विसरून त्याचा आस्वाद घायचा. इथल्या मिसळीमध्ये भजी टाकलेली असतात. जी इथली खासियत म्हणायला हवी.

लोकप्रिय पासून पुढे जाऊन हनुमान मंदिराच्या बाजूने गोलाणी मार्केट च्या बाजूने थेट १७ मजली कडे पोहचलो की, समोरच व वा च्या गल्लीत सुरुवातीला गोलाणीचा प्रसिद्ध रगडा "अमर रगडा" च दुकान आहे. नावाप्रमाणे गोलाणी मध्ये ही त्यांचा जुना स्टॉल आहे. जळगाव मध्ये शोधला गेलेला हा रगडा जळगाव ची ओळख बनलेला आहे. प्लेट मध्ये सामोसा कुस्करून त्यावर गरमागरम रगडा टाकला जातो. सोबतच रस्सा मिळतो, जो की कितीही वेळा घेऊ शकतो. आता यातपण अनेक प्रकार आहे. चीझ रगडा, पनीर रगडा, दही रगडा असे पर्याय असले तरी आपला नेहमीचाच रेगुलर रगडा बेस्ट लागतो. याच्याच बाहेरच्या मेन रोड वर एक छोटीशी लस्सी ची गाडी लागते. त्या गाडीवर साधी लस्सी, बदाम लस्सी आणि मँगो लस्सी मिळते. गाडी लहान असली तरी लस्सी मात्र खूप मस्त मिळते. या गाडीच्या समोरच १७ मजली शेजारीच "खाऊ गल्ली" आहे. नावच खाऊ गल्ली असल्याने पाणीपुरी पासून ते भल्ला पर्यंत सगळे पर्याय इथे उपलब्ध असतात.

क्रमश:

शुभम शांताराम विसपुते    

Monday, April 6, 2020

भाजप - ४० वा वर्धापन दिन



आज भारतीय जनता पक्षाचा ४० वा वर्धापन दिन. १९५२ साली स्थापन झालेल्या जनसंघातून पुढे १९८० साली आजच्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. जन्माला येऊन धुळीस मिळालेला आणि धुळीतून उठून पुन्हा आकाशात गगनभरारी घेतलेला हा पक्ष आहे. पक्षाची विचारधारा राष्ट्र विकास व राष्ट्रप्रेमी हिंदुत्वाभोवती फिरत राहिली असली तरी पक्षातील शिस्त ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,बजरंग दल आणि अशा अनेक संघटनांचे संपूर्ण सहकार्य आणि कसलीही भिड न बाळगता घेतलेले निर्णय राबवायच्या वृत्ती मुळे भाजप वाढत चालेलला पक्ष आहे. राजकारणात व राजकीय पक्षांच्या मध्ये विचार धारांचे काम फक्त नावा पुरते असते. तुम्ही जनते पर्यंत कोणता चेहरा आणि कोणते उद्देश्य घेऊन पोहोचता ह्यावर तुमचे यशापयश ठरत असते. शिस्तबद्ध संघटन व जोडीला नेतृत्व करायला जर एखादा लोकनेता असेल तर यश निश्चित असते.

आजचा भाजप घडवण्यात सर्वात मोठे योगदान असलेले दोन महानेते लालकृष्ण अडवाणी आणि स्वर्गीय अटलबिहारी वाजपेई होय.  दोघांनी ही आपल्या आपल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला उभारी दिली. लालकृष्ण अडवाणी पक्षाचे पडद्यामागचे हिरो होते  आणि अटलबिहारी वाजपेयी सर्वाना घेऊन चालणारा देशव्यापी चेहरा. ९० च्या दशकातील अयोध्या प्रकरणानंतर १९९८ साली केंद्रात या दोघींमुळेच पक्षाची सत्ता आली. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झालेत, तर अडवाणीजी गृहमंत्री. २००४ पर्यंत पक्ष सत्तेत होता. नंतरच्या दोघी निवडणुकीत (२००४ आणि २००९) फक्त आदर्श आणि शिस्तीवर लढून पराभव स्वीकारावा लागला. 

पक्षाने नंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपला चेहरा म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करायला सुरुवात केली (२०१३) आणि आपल्या आक्रमक अंदाजात नरेंद्र मोदी वर्ष सहा महिन्यात देशभर पोहचले, घरा घरात पोहचले. पक्षाच्या अध्यक्ष पदी अमित शाह ह्यांच्या सारख्या संघटन कौशल्य असलेल्या धुरीण नेत्याला नेमून आपल्या टिम मध्ये निर्मला सितरामन ,किरण रिजिजू सारखे नवीन चेहरे तसेच स्वर्गीय सुषमा स्वराज ,राजनाथ सिंह ,नितीन गडकरी सरांच्या सारखे अनुभवी चेहरे ही घेतले. पक्षातील वय झालेल्या अडवाणी, मुरली मनोहर जोशी सारख्या नेत्यांना विनंती करून व प्रसंगी त्यांची इच्छा नसताना ही घरी बसवले. काहींनी थोडी कुरबुर केली पण भारतीय जनता पक्ष हे शिस्तीवर चालणारे संघटन असल्याने तिथं नाराजीचे रूपांतर विद्रोहात झाले नाही.

नरेंद्र मोदी आता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून आपली दुसरी टर्म सांभाळत आहेत. एका विचारधारेचा पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोदींनी राष्ट्रप्रेम व राष्ट्र प्रथम चा विचार प्रखरतेने देऊन भाजप ला अगदी घरा घरात नेऊन अलगद पोचवले आहे.जिथं मोदी पोचले नाहीत तिथं मोदींच्या विरोधकांनी मोदींना न्यायचे काम स्वहस्ते  कळत नकळत रित्या केलेले आहे.  नरेंद्र मोदींच्या कृतींना अनुकूल असणाऱ्या सर्व लोकांना विरोधक सरळ सरळ भाजपप्रेमी किंवा भक्त असा शिक्का मारून दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाचे समर्थक स्वतःहून वाढवत चालले आहेत.

घराणेशाही. हि एक अशी गोष्ट कि जी जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये आढळते. पण भाजप त्याला लख्ख अपवाद आहे. तुरळक एक-दोन ठिकाण सोडली तर आज हि कोणत्याही मोठ्या पदावर घराणेशाहीतून आलेली व्यक्ती आरूढ झालेली नाही. गडकरी नेहमी सांगतात तसं पक्षात मुखमंत्राच्या पोटी मुख्यमंत्री, किंवा मंत्राच्या पोटी मंत्री नाही चालत. तुमचं कर्तृत्व हीच तुमची पक्षात पुढे जाण्यासाठीची पायरी आहे. आज एक साधा स्वयंसेवक, कार्यकर्ता ज्याच्या ७ पिढ्यांमध्ये कोणी राजकारणात नव्हतं तो माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे. हीच पक्षाची खरी ताकत आहे.

जर तुम्हाला राजकारणात करिअर करायचे असेल किंवा एका शिस्तबद्ध संघटन मध्ये काम करायचे असेल तर कुणाचे ही भारतीय जनता पक्षात स्वागत आहे. इथं फक्त तुमचे कर्तृत्व बोलेल. तुमच्यात ती क्षमता असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनायचे व्यासपीठ ह्या देशात फक्त नि फक्त भारतीय जनता पक्ष देईल.

भाजप आज तळागाळात किती खोलवर पोचला आहे त्याच उदाहरण नुकतंच मिळालं. सध्या सुरु असलेल्या लोकडाउन मध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळीनाद आणि लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय ते बघून निश्चित झालं कि २०२४ ची निवडून देखील पक्ष आरामात जिंकेल.

देशावर आलेलं कोरोना च संकट लवकरात लवकर निपटून. देश पुन्हा प्रगतीच्या मार्गावर सुसाट पळो हीच आज माझ्या पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रभू रामराया चरणी प्रार्थना. जय श्रीराम...!!!

शुभम शांताराम विसपुते.  

९६ - क्लासिक प्रेमकहाणी



साऊथ चे ऍक्शन सिनेमे आपण नेहमीच टीव्ही वर किंवा युट्युब ला बघत असतो. तिकडचे ऍक्शन सिनेमे आपल्याकडे बघण्याचं प्रमाण जास्त असल्याने तेच सिनेमे हिंदीमध्ये जास्त डब होतात. त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच लोकांना असं वाटत कि तिकडे असेच मारधाड चे सिनेमे तयार होत असतील. पण काही अपवाद देखील आहे. त्याचा "९६" हा सिनेमा अस्सल पुरावा आहे.

सिनेमाच्या सुरुवातीला आपला पस्तिशीतला नायक फोटोग्राफीच वर्कशॉप घेतोय. नवीन तरुण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी चे धडे देतोय. त्यांच्यातलीच एक तरुणी त्याच्यावर भाळलीय. पण आपल्या नायकाला त्याबद्दल अजिबात इंटरेस्ट नाही. तो स्वतःमध्येच हरवलेला आहे. काही कामानिमित तो त्या तरुणी सोबत त्याच्या मूळ गावावरून (तंजावूर) दुसरीकडे जात असतो. अचानक त्याला त्याची शाळा दिसते. तो थांबतो. वॉचमन ला सांगून शाळेत एक चक्कर टाकून येतो. त्याच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. २० वर्षांपूर्वीच त्याला सगळं आठवायला लागत. तो तडक बाहेर येऊन शाळेतल्या आपल्या मित्राला फोन करून सान्तो कि मी शाळेत आलोय. मित्रालाही ते आवडत. त्यांचं ठरत कि आपण आपल्या बॅच च गेट टुगेदर घेऊ. ठरल्याप्रमाणे सगळे जमतात. फक्त एका मुलीची कमी असते. जरावेळाने ती हि तेथे येते. आपला नायक कुठे आहे म्हणून चौकशी करते. नायकाची नायिकेशी भेट बरोबर होते ती थेट बावीस वर्षांनी. लग्न करुन सिंगापूरला राहणारी नायिका  नायकाच्या बाबतीत अजूनही हळवी आहे. तो तिच्या समोर जायला नको म्हणून कोपऱ्यात जाऊन बसलाय. आणि ती त्याच्यासमोर थेट उभी राहते. बस्स्स. नेहमीप्रमाणे तो एकदम ब्लँक होतो. आणि सिनेमा थेट फ्लशबॅक मध्ये २० वर्ष मागे जातो.

अतिशय साधीसरळ गोष्ट आहे. १९९६ सालमधील शाळेतील ९ वी ची बॅच. "के. रामचंद्रन" (विजय सेतुपती) आणि एस. जानकीदेवी (त्रिशा) अशी भारदस्त नाव असणारी एकाच वर्गातील विद्यार्थी. राम आणि जानू हे त्यांच शॉर्ट नेम. राम हा अतिशय स्वभावाने लाजराबुजरा आणि रूपाने काळासावळा असा तर जानू याच्या एकदम विरुद्ध अशी अतिशय रूपवान आणि बडबडी, तसेच खूप गोड गळ्याची गायिका. असं परस्पर टोकं असतानाही ते प्रेमात पडतात. अर्थातच राम तिच्या प्रेमात पडतो, आणि नंतर जानू सुध्दा त्याला होकार देत त्याच्या प्रेमात पार वेडी होते. शाळेत त्यांचं प्रेम बहारात असताना नववी नंतर रामच्या 
वडिलांना आचानक गाव सोडावं लागल्याने तो तंजावूर वरुन थेट चेन्नईला फेकला जातो. हे इतकं अचानक होत कि जानू ला किंवा त्याच्या कोणत्याच मित्राला तो गाव सोडून जातोय हे त्याला सांगायला जमत नाही.

हे झाल्यावर सिनेमा परत आजच्या तारखेत येतो. राम ला बघून जानू ला अतिशय आनंद झालाय. अर्थात त्यालाही झालाय पण स्वभावामुळे तो दाखवत नाहीये. जानू थेट सिंगापूर वरून या कार्यक्रमाला आलेली असते. तिला दुस-या दिवशी पहाटेचं विमान असल्याने तिला रि-युनीयन नंतर चा जास्तीत जास्त वेळ राम बरोबर घालवायचा आहे. रामची अवस्था विचीत्र झालेली असते. जिच्यावर जीवापाड प्रेम आहे ती त्याच्या बरोबर असते. ती त्याच्याशी प्रचंड  बोलतेय. त्याची विचारपुस करतेय पण याच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. पण तरीही जानू सांगेल तेच तो करतो. तिला रात्री त्याच्यासोबत भटकायचय असतं. तो तिला घेउन भटकतो.रस्त्यावर..मेट्रोमधे..चालत..कारमधे. ती त्या रात्री चालू असलेल्या पार्लरमधे नेउन त्याची हजामत करुन त्याला माणसात आणते तेंव्हा स्वतःच्या दाढी मिशा नसलेल्या, केस कापलेल्या चेह-याकडे बघून तो तोंड लपवतो.

राम आणि जानू  नंतर एका हॉटेलमधे कॉफी प्यायला गेलेत तिथे रात्री उशीरा एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला नेमक तिथेच आलेल्या त्याच्या इन्स्टिट्यूटच्या मुली जेंव्हा त्यांच्या सरांचा नवीन लुक आणि सोबत मुलगी पाहून त्यांच्यात जबरदस्ती घुसतात व त्यांना नवरा बायको समजून जानूला विचारतात की त्यांच्यात आधी प्रपोज कोणी केले? प्रसांगावधान दाखवून जानू त्यांना त्यांच्या कॉलेजमधे भेट न झालेल्या त्या दुर्दैवी  प्रसंगालाच बदलून जानू त्यांची कॉलेजमधे तिथेच शाळेनंतर परत भेट झाल्याचा एक काल्पनीक प्रसंग सांगते, तेंव्हा जे घडू शकले असते ते ती सांगते पण जे प्रत्यक्षात  घडले, याची वेदना फक्त एक दोन सेकंदासाठी चेह-यावर आणून दुर्दैवी राम जानूकडे फक्त बघत असतो. जानू आग्रह करते म्हणून तिला आपल्या घरी घेउन जातो. त्याने शाळेत पब्लीकली अनेकवेळी आग्रह केलेले पण तिने न गायलेले 'जमुना तट' हे गाणे ती त्याच्यासमोर त्याच्या एकट्यासाठी गाते तेंव्हा तो देहभान हरपून बसलेला असतो. त्या रात्री एकांतात, जानूचे त्याच्या एवढ्या जवळ असण्याचा, तिच्या vulnerable अवस्थेचा फायदा तो घेउ शकत असतो पण... मनात असलेल्या इतक्या वर्षांच्या तिच्या प्रेमळ आठवणींचं ठिणगी पडून तिचे आगीत रुपांतर होणार नाही याची काळजी घेणारा राम इथे सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरतो.

शेवटी तिला सोडायला जात असताना कार मध्ये दोघींची अवस्था केविलवाणी झालेली असते. त्यांना माहितीय कि आजच्या नंतर आपण कदाचित भेटू कि नाही ते त्यामुळे दोघीही काहीच बोलत नाहीत. अन शेवटच्या एअरपोर्टवरच्या प्रसंगात जेंव्हा जानू उन्मळून पडते तेंव्हाही स्वतःला व पर्यायाने तिला राम सावरतो. अलिंगन नाही, चुंबन नाही, साधा हँडशेकही नाही. मागे उरते ते फक्त दोघांचे एकमेकांवर असलेले निस्सीम प्रेम.

बस्स.. आणखी काय लिहू. ते हॉटेल मध्ये जानू च्या रूम मध्ये गप्पा मारत असतात ते मुद्दाम लिहिलं नाहीय. स्पॉइलेर अलर्ट म्हणून. बाकी एक प्युअर क्लासिक टच असलेली प्रेमकहाणी बघायची असेल तर "९६" हा बेस्ट चॉईस आहे.

शुभम शांताराम विसपुते


Sunday, April 5, 2020

हेरा फेरी - एंटरटेनमेंटची २० वर्षे

२००० साली प्रदर्शित झालेल्या या कल्ट सिनेमाला नुकतंच  २० वर्षे पूर्ण झाली. तेव्हा संपूर्ण जगाने एकविसाव्या शतकात पदार्पण केले होते, तरीही भारतीय इतिहासात खूप कमी अश्या कॉमेडी- कल्ट सिनेमे बनत होते. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला काहींना काही तरी अपवाद असतात तसेच या सिनेमाला पण होते. एक प्युअर कॉमेडी ची असलेली कमी या सिनेमाने भरून काढली होती. ३१ मार्च, २००० हा दिवस भारतीय सिनेसृष्टीमध्ये लिहून ठेवायला हवा असा दिवस, याच दिवशी बरोबर २० वर्षा पूर्वी नीरज व्होरा लिखित आणि प्रियदर्शन  दिग्दर्शित "हेरा फेरी" प्रदर्शित झाला होता आणि एक नव्या कॉमेडी पर्वास दिशा मिळाली होती.

जेव्हा स्क्रिप्ट फायनल झाली तेव्हा संजय दत्त ला "श्याम" च्या सुनील शेट्टी च्या जागी घ्यायचं ठरलं होत. पण तारखांच्या प्रॉब्लेम मुले ते शक्य झालं नाही. नंतर त्याच्या ऐवजी अजय देवगण ला विचारलं गेलं, पण अजय ला अक्षय करत असलेला "राजू" चा रोल करायचा होता. पण लेखक नीरज व्होरा ला राजू म्हणून अक्षयच हवा होता. सुनील शेट्टी ने त्या अगोदर कॉमेडी केली नव्हती त्यामुळे त्याला घेणं हि रिस्कच होती. पण शेवटी त्याचीच वर्णी लागली. तसेच तब्बू च्या "अनुराधा" साठी अगोदर करिष्मा कपूर ला घेण्याचे ठरले होते. काही कारणामुळे ते शक्य झालं नाही त्यामुळे शेवटी त्या भूमिकेसाठी तब्बू ची एन्ट्री झाली. राजू प्रमाणेच एक रोल होता जो लिहितानाच फायनल झालं होत कि कोण करेल तो रोल म्हणजे परेश रावल यांनी अजरामर केलेला "बाबुराव गणपतराव आपटे"

९० च्या दशकात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी आपल्या ऍक्शन सिनेमांनी धुमाकूळ घालत होते. दोघांचेही अनेक सिनेमे या काळात हिट झाले. पण दशकाच्या शेवटी दोघांचे जवळपास सगळेच सिनेमे दणकून आपटले होते. दोघींचाही बॅड पॅच सुरु होता. अश्यातच हेरा फेरी आला. आणि पुढे इतिहास घडला.  अक्षयच्या करिअर मधला माईलस्टोन सिनेमा आहे हा, या नंतर अक्षय कुमार थेट सुपरस्टार हेरोंच्या लाईन मध्ये जाऊन बसला. 

ठरवूनन केलेले विनोद आणि सहजरित्या आलेले विनोद यात खूप फरक आहे आणि तो हेरा फेरी बघताना जाणवतो. श्यामच निरागस असणं, काहीही कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणार राजू, दयाळू पण तेव्हडाच विनोदी बाबूराव आपटे, श्याम सारखीच नोकरी वर हक्क मागणारी करारी पण तेव्हडीच प्रेमळ अनुराधा या सर्व कलाकृती आपल्याला आपल्यातल्याच वाटतात. चित्रपाटाच्या सुरवातीपासूनच जी करमणूक व्हायला सुरवात होते ती शेवटपर्यंत टिकून राहते या वरूनच कळते कि स्क्रिप्टची बांधणी किती मजबूत होती ते. आज हि हा चित्रपट कधीही दूरचित्रवाहिनी वर लागला कि पाहिल्याशिवाय राहवत नाही.

कल्ट क्लासिक असलेल्या या सिनेमाचा पुढचा भाग देखील "फिर हेरा फेरी" या नावाने येऊन गेला. पहिल्या भागाची सर नसली तरी सिनेमा छानच होता. पहिल्या भागाचा लेखक नीरज व्होरा ने हा भाग दिग्दर्शित केला होता. आता असं ऐकण्यात आलय की याचा तिसरा भाग देखील येणार आहे. पण त्यात राजू च्या भूमिकेत अक्षय नसेल अशी चर्चा आहे. अक्षय नसला तर तो फक्त नावाला हेरा फेरी राहील. कारण अक्षय-सुनील शेट्टी-परेश रावल या त्रिकुटाने जे काम करून ठेवलाय तिथपर्यंत कोणी पोहचेल असं सध्या तरी वाटत नाही. अक्षय ला घायच नसेल तर त्या पेक्षा सिनेमा बनवायलाच नको. कारण त्याच भविष्य काय असेल हे आताच दिसतंय.

आमचं बालपण समृद्ध करणाऱ्या या सिनेमाला, याच्या लेखक-दिग्दर्शकाला, यातल्या प्रत्येक कलाकाराला सर्व टीम ला सिनेमाच्या २० व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!!!

शुभम शांताराम विसपुते  

Friday, April 3, 2020

चायना गेट - आजच्या नव्या रुपातला

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा मल्टीस्टारर सिनेमा. एका अर्थाने त्यावेळेच्या चरित्र अभिनेत्यांना ट्रीबुट होता. मला वाटत "चायना गेट" चा रिमेक करून, आजच्या काळातील सर्व चरित्र अभिनेत्यांना आपल्याकडून ट्रीबुट द्यावा. अर्थात कथेमध्ये थोडा बदल करावा लागेल. कारण अगोदरच्या सिनेमात सगळे अभिनेते बुजुर्ग होते, त्यामुळे त्यांना रिटायर्ड फौजी म्हणून दाखविता आले. नव्या सिनेमात बहुतांशी कलाकार हे तरुण व मध्यमवयीन असल्याने त्यांना रिटायर्ड न दाखवता, फक्त इतकाच बदल करता येईल. की सर्व कलाकार वेगवेगळ्या सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये आहेत आणि सुट्टी काढून सर्व एका निसर्गरम्य गावात आपली सुट्टी एन्जॉय करायला आले आहेत. बाकी पुढची कथा चायना गेट मध्ये सर्व फौजी गावात आल्यानंतर जी कथा घडते, तशीच राहील. माझ्यासाठी सिनेमाची कास्टिंग अशी राहील.  

ओम पुरी = अभय देओल - कर्नल पुरी यांच्या भूमिकेत मला अभय देओलला बघायला आवडेल. ओम पुरी यांच्यासारखा दमदार आवाज जरी नसला, तरी तो भूमिका मात्र दमदारपणे साकारेल 

डॅनी डोंझेप्पा = इरफान खान - मेजर गुरंग च्या साठी इरफान हवा. उंचपुरा, डोक्यावर हॅट घातलेल्या लुक मध्ये इरफान मस्त दिसेल.  खासकरून हॉस्पिटल मधला ब्लड कॅन्सर वाला सीन इरफान मुळे छान जमून येईल. 

अमरीश पुरी = बोमन इराणी - या सगळ्या टीम मधील सिनिअर असलेलं पात्र. अमरीश पुरी यांनी साकारलेली भूमिका बोमन इराणी यांना करायला नक्कीच आवडेल. खासकरून अमरीश पुरीचं सिनेमातील कायम त्रासलेलं, वैतागलेलं पात्र ते छान उभं करतील. 

नासिरुद्दीन शाह = के के मेनन - सर्फराजचा महत्वाचा रोल मी माझ्या आवडत्या के के मेनन ला देईल. लाली मध्ये आपल्या मुलीला बघणारा, तिच्यासाठी हळवा होणारा सर्फराजसाठी के के उत्तम राहील. त्याच सिनेमात बोमन इराणी सोबत असलेलं शाब्दिक युद्ध बघायला पण रंगत येईल.    

या मेन कॅरेक्टर सोबत यांच्या टीम मधले बाकी सदस्य पुढील प्रमाणे राहतील.  
अंजन श्रीवास्तव -  विनय पाठक
कुलभूषण खरबंदा - पंकज त्रिपाठी 
जगदीप - संजय मिश्रा 
विजू खोटे - राजेश शर्मा 
टिनू आनंद - रणवीर शौरी 
के डी चंद्रन - सुशांत सिंग

मुकेश तिवारी = नवाझुद्दीन - खलनायक जगिरा साठी नवाझुद्दीन बेस्ट राहील. त्याचा लुक ही तसाच आहे. वेगळ्या शैलीत डायलॉग बोलणं हि त्याची खासियतच आहे. त्यामुळे जगिरा च्या भूमिकेत तो आपल्याकडील रंग भरून, ती अजून उठावदार करेल. 

परेश रावल = मनोज बाजपेयी - बेरकी इन्स्पेक्टर च्या रूपात मनोज बाजपेयी छान राहील. तो त्या भूमिकेचं बेरिंग पण उत्तम घेईल. 

समीर सोनी = राजकुमार राव - या सगळ्यात जुनिअर असलेला, तसेच इंडस्ट्री मध्ये पण यांना जुनिअरच आहे. त्यामुळे तो या भूमिकेत योग्य वाटतो. 
ममता कुलकर्णी = राधिका आपटे - राजकुमार राव ची राधिका सोबत जोडी बघायला आवडेल 

रझाक खान = विजयराज - लाली च्या खडूस काकाच्या भूमिकेत विजयराज शोभून दिसेल, स्क्रीन टाइम कमी असला तरी. 
हितेश पटेल = सौरभ शुक्ला - गावाच्या सरपंचाची फक्त २-३ सीन असलेल्या भूमिकेत सौरभ शुक्ला असतील. कारण ते दिसतात पण अगोदरच्या सिनेमात सरपंच असलेले हितेश पटेल यांच्यासारखे.   
शिवाजी साटम आणि इला अरुण = जयदीप अहलावत आणि दिव्या दत्ता 
गिरीश कर्नाड = रजत कपूर

टीप = सिनेमात फक्त एकच गाणं राहील ते म्हणजे "छम्मा छम्मा" यासाठी सनि लिओनीलाचं घ्यायचंय. ती असली कि गाणं अजून कडक होईल. 

( हा लेख मी फेसबुक वर एका सिनेमाच्या पेजसाठी लिहिला आहे)

शुभम शांताराम विसपुते

Thursday, April 2, 2020

रामलीला - मन से जो रावण निकाल, राम उसके मन में है...



आज रामनवमी चा पवित्र दिवस. गेल्या कित्येक वर्षात जे घडलं नाही ते आज घडलं, ते म्हणजे बंद देवळात प्रभू रामरायाचा जन्म आज साजरा करावा लागला. असो, देशावर संकटच असं आलंय त्यामुळे अशी समजदारीची भूमिका घ्यावी लागते. मला गर्व आहे कि "समजूतदार" अश्या हिंदू धर्मात माझा जन्म झालाय याचा.

रामनवमी निमित्त नेहमी आठवतं ते आशुतोष गोवारीकरच्या "स्वदेस" मधील रामलीला च्या वेळेचं गाणं. निव्वळ अप्रतिम या दोनच शबद त्याच वर्णन करता येईल असं ते गाणं आहे. एरवी मी ते ऐकतोच, पण रामनवमीच्या दिवशी ते युट्युब ला बघायची मजा आहे. जी मी तर नेहमीच लुटतो. गोवारीकरने खूप सुंदर रित्या या गाण्याचं पिक्चरायझेशन केलय. आपल्या महाराष्ट्रात रामलीला चा कार्यक्रम होत नाही. उत्तर भारतात तर तो तिथल्या संस्कृतीचा ठेवा आहे. खास रामलीला बघण्यासाठी उत्तर भारतात जाण्याऐवजी गोवारीकरने आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून खूप छान अशी रामलीला दाखवली आहे.
सिनेमाची नायिका "गायत्री जोशी" ही यात सीतेच्या भूमिकेत आहे. सीतेच्या रूपात तीच नावचं गायत्री असल्याने ती खूप सुंदर दिसलीय. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, धार्मिक नजरेतून बघायचं झालंच तर याचा संगीतकार द ग्रेट ए आर रहमान आहे, लिहिलंय जावेद अखतर यांनी आणि स्क्रीनवर आहे शाहरुख खान. हा खरा भारत आहे. ज्याने सगळ्यांना आपल्यात सामावून घेतलय. 

आज मी त्याच रामलीला च्या गाण्याच्या वेळेची पडद्यामागची कहाणी सांगणार आहे. जी जावेद अखतर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.

एके दिवशी त्यांना सकाळीच आशुतोष गोवारीकरचा फोन आला.  "सर,  तुम्हाला आजच निघावे लागेल. एका प्रसंगावर एक गीत हवे आहे. माथेरानला शुटींग चालू आहे. तुम्हाला तिकडे यावे लागेल.." संध्याकाळ पर्यंत ते तिथे पोहचले. पोहचल्यावर कळले की रहमानने धुन बनवून पाठवली आहे. त्यानुसार गीत लिहायचे आहे. पण ज्या प्रसंगावर गीत लिहायचे होते तो प्रसंग वाचून त्यांना खुप टेंशन आले. प्रसंग होता, सिनेमात 'रामलीला' चालू आहे आणि रावणाने  सीतेचे हरण केले आहे.  त्यावेळी सीता रामाची आर्ततेने विनवणी करत आहे आणी रावण सीतेला राम येणार नाही हे सांगत आहे . त्यावर आधारीत गीत लिहायचे होते.

त्यांनी आशुतोषला सांगितले की  "मला तुम्ही आधी तरी सांगायचे मी रामायण किंवा रामचरीत मानस आणले असते. यावर माझा फारसा अभ्यास नाही. रामलीला ऐकली आहे पण ती लहानपणी ..आता ते आठवणे अवघड आहे. एक तर मी मुस्लिम आहे. थोड काही चुकल तरी मोठा वाद होवू शकतो."

आशुतोष त्यांना म्हणाला "सर तुम्हाला हे करावच लागेल. उद्या सकाळी याची रेकॉर्डिंग करायची आहे. तुम्ही रात्री विचार करा. मला माहीती आहे तुम्ही हे करू शकता... " नंतर त्यांना रात्र भर झोप लागली नाही पण सकाळी उठल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात गाणं लिहून तयार झाले. आशुतोषच्या टीम मधे लगान पासून 'अवधी' भाषेचे अभ्यासक असणारे एक पंडीत होते. गीत वाचल्यावर ते अवाकच झाले. ते बोलले की  " हे कसे शक्य आहे. यातल्या बऱ्याचशा ओळी रामचरितमानस मधल्या जशाच्या तशा आहेत." जावेद साहेबाना देखील नवल वाटले की अस कस काय होवू शकते. कदाचित लहानपणी पाहीलेली रामलीला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असावी किंवा काही चमत्कार घडला असेल त्यांना काही कळलेच नाही
       
बऱ्याचदा अगदी घाईमध्ये केलेली गोष्ट खूप उत्कृष्ट होते, हे गाणं त्याच उत्तम उदाहरण आहे. कारण हे लिहिलंही ऐन वेळेवर. रहमान ने हि खूप गडबडीत याची धून बनविली होती. यात मुख्य गायक मधुश्री आणि विजयप्रकाश हे आहेत. पण रावणासाठी जो गायक होता तो ऐनवेळी पोहचू न शकल्यामुळे खुद्द आशुतोष गोवारीकरने रावणाला यात आवाज दिलाय. अश्या सगळ्या गडबडीत हे मास्टरपीस असलेलं गाणं तयार झालय.

माझी विनंती आहे कि, सगळ्यांनी एकदा तरी हे गाणं जरूर बघावं. गाण्याच्या पूर्ण ओळी या पुढीलप्रमाणे आहेत. 

सीता : आ आ आ आ आ
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम जी

कोरस: बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ,
सुन भी लो अब मेरी दुहाई
पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई

रावण: राम को भूलो, ये देखो रावन आया है
फैली सारी सृषटी पर जिसकी छाया है
क्यों जपती हो राम-राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम-राम का रटन जो ये तुमने है लगाया
सीता, सीता तुमने राम में ऐसा क्या गुन पाया?

सीता: गिन पायेगा उनके गुण कोई क्या, इतने शब्द ही कहाँ हैं
पहुंचेगा उस शिखर पे कौन भला, मेरे राम जी जहाँ हैं
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम हैं
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
पर उनके संयम की अब आने को है सीमा
रावण समय है माँग ले क्षमा

कोरस : बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
आये राजा राम, करें हम प्रणाम
संग आये लक्षमन जैसे भाई

सीता : पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई

रावण : राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आये अभी तक वो तुम्हारी रक्षा को?
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
ये बताओ वो तुम्हारे राम हैं इस पल कहाँ??

सीता : राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं
राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

मोहन (शाहरुख) : हो
राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं -२
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं -२
को : हो

सीता : पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई

कोरस  :  सुनो राम जी आये, मोरे राम जी आये
राजा रामचंद्र आये, श्री रामचंद्र आये
राम जी आये, मोरे राम जी आये
श्री रामचंद्र आये

शुभम शांताराम विसपुते

वर्ल्डकप (२०११) - स्वप्नांचा यशस्वी पाठलाग


१९८३ मध्ये भारताने कपिल देव च्या नेतृत्वात एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल २८ वर्षे आणि ६ विश्वचषक स्पर्धा इतकी वाट बघावी लागली. २००३ च्या स्पर्धेत गांगुलीच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात जाऊन भारत फक्त त्याला स्पर्श करून आला होता. पण त्यावर कब्जा मिळविण्यासाठी शेवटी आजच्याच दिवशी बरोबर ९ वर्षांपूर्वी २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला. आज पूर्ण स्पर्धेत भारताने काय केलं ते न सांगता, मी फक्त फायनल मॅच बद्दल सांगनाराय. कारण ती मॅच अजूनही लक्षात आहे, आणि अर्थातच कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे.

दिनांक २ एप्रिल २०११ ला मुंबईच्या खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडीयम मध्ये रणरणत्या दुपारी भारत आणि श्रीलंका समोरासमोर उभे ठाकले होते. टॉस साठी महेंद्र सिंग धोनी आणि लंकेच्या कुमार संगकारा समोर उभा होता. त्या दिवसाच्या हाय होल्टेज ड्रामा ला टॉस पासूनच सुरुवात झाली. कारण, टॉस फेकल्यावर रेफ्री ला संगकारा काय बोलला ते नेमकं ऐकू आलं नाही. त्यामुळे त्या दिवशी टॉस दोन वेळा करावा लागला. याचा उलट परिणाम म्हणजे भारत टॉस हरला. सांगकाराने नंतर संध्याकाळी फ्लड लाईट मध्ये फलदांजी करायला नको म्हणून लगेचच फलंदाजी निवडली. थोडं चुकल्यासारखं वाटलं होत. पण शांत संयमी असा धोनी असल्यामुळे त्याने याच दडपण घेतलं नाही. 

लंकेकडून ओपनर म्हणून थरांगा आणि त्या स्पर्धेत भन्नाट फॉर्म मध्ये असलेला दिलशान उतरला. समोर गोलंदाजी साठी झहीर खान होता. जी चूक २००३ च्या फायनल मध्ये त्याच्याकडून झाली होती. त्या फायनल मध्ये पहिलाच चेंडू इतका वाईड टाकला होता कि त्यावर ऑस्ट्रेलियाला चौकार मिळाला होता, आणि पुढे जहीर ची जी लाईन चुकली ती सुधारलीच नाही. आज त्याची परतफेड करण्याची पुरेपूर संधी त्याच्याकडे होती. ती त्याने पुरेपूर घेतली, सुरुवातीच्या सलग तीन ओव्हर्स त्याने मेडन टाकल्या. थरंगा पुरता गोंधळून गेला होता. शेवटी दबावात येऊन २० बॉल खाऊन त्याने स्लीप मध्ये सेहवाग कडे सोपा झेल दिला. नंतर कप्तान संगकारा आणि दिलशान ने थोडा खेळ सावरला. दिलशान गेल्यानंतर अनुभवी जयवर्धने आला. आपला पूर्ण अनुभव त्याने त्यादिवशीचा खेळीत ओतला होता. प्रचंड दबाव असताना त्याने शेवटपर्यंत टिकून राहत. आपले शतक साजरे केले. समोर असलेल्या प्रत्येक फलंदाजांसोबत ५०-६० रन्स ची पार्टनरशिप करत टीम ला चांगल्या स्थितीत घेऊन आला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये जयवर्धने आणि परेरा ने गोलंदाजांवर हल्ला चढवत संघाला २७४ असा चांगला स्कोर उभा करून दिला.

शेवटच्या काही ओव्हर्स चा अपवाद वगळता भारताकडून त्यादिवशी सर्वानीच चांगली गोलंदाजी केली होती. झहीर सोबत नेहरा च्या जागेवर खेळत असलेला श्रीशांत असो कि माझा आवडता मुनाफ पटेल या तेज गोलंदाजांनी लंकेवर चांगला दबाव ठेवला होता. जरी त्यांना विकेट मिळाल्या नसल्या, पण त्या दबावामुळेच आपल्या स्पिनर्सना हरभजन आणि युवराज विकेट्स मिळाल्या. तेंडुलकरने पण आपल्या घरच्या मैदानावर दोन ओव्हर्स टाकून घेतल्या.

संध्याकाळी भारतीय संघाकडून फलंदाजीसाठी सचिन आणि सेहवाग हि हिट जोडी उतरली. समोर यॉर्कर किंग मलिंगा होता. सेहवाग ला दुसऱ्याच बॉल वर एकदम सटीक गुड लेन्थ बॉल टाकून त्याने पायचीत केलं. आता मदार सचिन आणि गंभीर वर होती. सचिनही दबाव मध्ये आलेला होता. याचाच फायदा घेत मलिंगा ने त्याला ही बाद केलं. नंतर आलेल्या नवख्या कोहली सोबत गंभीर ने संघाला शंभर च्या पुढे नेले. तेव्हा दिलशाने स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा अफलातून झेल पकडला. आता स्थिती नाजुक होती. कारण ३ विकेट्स गेल्या होत्या आणि अजूनही १६० रन्स हवे होते. याच वेळेला कप्तान धोनी ने सगळ्यांना एक धक्का दिला. कारण पूर्ण स्पर्धेत नंबर पाच वर युवराज फलंदाजी ला येत होता आणि धोनी सहा वर, तेव्हा कोहली नंतर युवराज ने यायला हवे होते. पण इथं स्वतः धोनी पॅड घालून मैदानात आला. "लिडिंग फ्रॉम फ्रंट" च ते उत्कृष्ट असं उदाहरण होत.  समोर गंभीर त्यादिवशी कमालीचा गंभीर होऊन खेळात होता. अगदी नेटाने त्याची फलंदाजी सुरु होती. धोनी आल्यामुळे त्याचा वरचा दबाव कमी झाला होता. आता दबाव लंकेवर होता. धोनी आणि गंभीर ने १०९ रन्स ची पार्टनरशिप करून विजय टप्प्यात आणला होता. गंभीर आपल्या शतकापासून अवघ्या तीन रन्स ने दूर होता. अश्यातच कुलसेखराचा चेंडू स्टंप सोडून खेळायला गेला आणि बोल्ड झाला. खरच त्या दिवशी त्याच शतक हुकल्याचं दुःख आजही होत. गंभीर नंतर स्पर्धेचा हिरो युवराज आला तेव्हा ५२ चेंडूत ५२ रन्स आवश्यक होते. धोनी आणि युवराज ने अजिबात घाई न करता आरामात फलदांजी केली. आणि तो अजरामर क्षण आला. जेव्हा भारताला विजयासाठी ११ चेंडूत फक्त चार रन्स हवे होते. धोनीच्या समोर कुलसेखरा बॉलिंग ला होता. त्याने फुल्ल लेन्थ बॉल टाकला आणि धोनी अगदी शांतपणे मिड ऑन च्या डोक्यावरून जो कधीही विसरला जाणार नाही तो सिक्स मारला.   

भारताने वर्ल्डकप जिंकला होता. तब्बल २८ वर्षे वाट पहिल्या नंतर. फक्त वर्ल्ड कप जिंकायचाच हे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल सहा वर्ल्डकप खेळलेल्या सचिन साठी पूर्ण टीम कडून त्याला वर्ल्डकप ची ट्रॉफी ही भेट होती. युवराज सिंग ने आजारी असतानाही पूर्ण स्पर्धा गाजवली होती. त्यासाठी त्याला "मालिकावीर" चा बहुमान देखील मिळाला. टीम मधल्या प्रत्येकाने आपलं १०० टक्के योगदान त्यासाठी दिल होत.

या वर्ल्डकप बद्दल तीच भावना आहे जी महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांची आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मरण्याच्या अगोदर कुठला आयुष्यातला कुठला क्षण बघायला आवडेल असं जेव्हा त्यांना विचारलं गेलं होत तेव्हा त्यांनी सांगितलेलं की, धोनी ने मारलेला तो विजयी सिक्स मला बघायला आवडेल. बस्स, आमच्यासारख्या कट्टर फॅन्स ची यापेक्षा वेगळी भावना ती काय असेल. लाइफटाइम मोमेन्ट दिल्याबद्दल धोनी आणि पूर्ण टीम ला मनापासून कडक सॅल्यूट...!!!

शुभम शांताराम विसपुते