Tuesday, April 14, 2020

बाबासाहेब - The Revolutionist



बाबासाहेबांवर लिहिणे हे फार कठीण आहे. याच मुख्य कारण म्हणजे, त्यांच्यावर आपण काही लिहिणे इतकी आपली लायकी नाही आणि तितकासा अभ्यास देखील नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या महान कार्यांबद्दल काही लिहिणार नाही. कारण ते जवळपास सगळ्यांना माहितीच आहे किंवा लिहिलेही तरी ते डॉक्यूमेन्ट्री टाईप वाटेल. त्यामुळे डॉक्टरांबद्दल मला काय वाटतं तेच लिहिणं जास्त योग्य राहील. एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल असं धगधगतं असणार त्यांचं जीवन हा खरंच अभ्यासाचा विषय आहे. येत्या काळात बाबासाहेबांबद्दलचा अभ्यास वाढवून ज्ञानात भर टाकायची आहे.

बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला. एक हिंदू म्हणून माझ्यासाठी ही शरमेची गोष्ट आहे. पण ज्या परिस्थितीत त्यांनी धर्म सोडला, ती परिस्थिती त्यांच्यावर आणायला माझ्याच धर्मातले काही लोक कारणीभूत होते. हे नाकारून चालणार नाही. त्यांनी मी हिंदू आहे त्यामुळे मला हिंदू म्हणून माझे असणारे अधिकार, हक्क मला मिळालेच पाहिजे, इतकी साधी मागणी केली होती पण ती सुद्धा नाकारली गेली. त्यामुळे त्यांच्या समोर धर्म सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे याबाबतीत त्यांना अजिबात दोष दिला जाऊ शकत नाही, उलट जो काय दोष असेल तो आपल्याच धर्मातल्या बाबासाहेबांना त्यांचं धार्मिक स्वातंत्र आणि अधिकार नाकारणाऱ्या वर्गाचा आहे. 

मी एक हिंदू आहे. फक्त हिंदूच नाही तर हिंदुत्वादी देखील आहे. पण मी जात वैगेरे मानत नाही. शिवाशिव, उच-नीच तर दूरची गोष्ट आहे. पण हा संस्कार, हा विचार माझ्यामध्ये आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांमध्ये रुजवण्याचं श्रेय निःसंशय बाबासाहेबांना जात. कारण, त्यांनी तेव्हा दलितांच्या हक्कासाठी उठाव केला नसता तर आजही आमच्यामध्ये शिवाशिव, उच-नीच असले फालतू प्रकार सुरूच राहिले असते. 

बाबासाहेबाना केवळ दलितांचे नेते असं म्हणून आपण त्यांच कार्य, प्रतिमा मर्यादित स्वरूपाची करून ठेवलीय. अर्थात आपल्या देशात हे नवीन नाही, शिवाजी महाराज मराठ्यांचे, टिळक-सावरकर ब्राह्मणांचे अशी जातीय विभागणी आपण अगोदरच करून ठेवलीय. हे सर्व महापुरुष जेव्हा त्यांच्या काळात कार्यरत असतील तेव्हा असा जातीय विचार त्यांच्या स्वप्नात देखील आला नसेल.

स्वतंत्र भारतात किंवा त्याही अगोदर पासून बाबासाहेबांना "राजकीयदृष्ट्या" दुर्लक्षित करण्याचं काम तत्कालीन नेतेमंडळींकडून झालं. याला सर्वात मोठं कारण त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये सर्वात जास्त निष्ठावान अनुयायी हे बाबासाहेबांच्या मागे होते. इतके निष्ठावान की त्या अनुयायांसाठी बाबासाहेब हे कुठल्याही धार्मिक प्रतिकापेक्षा मोठे होते. आज बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतरही त्यांच्या अनुयायांची त्यांच्या बद्दलची ही भावना तसूभरही बदलली नाहीये. बाबासाहेबांची हीच खरी जादू आहे.

डॉ. आंबेडकर हा माणूस फार फार मोठा आहे. त्यांनी खरी क्रांती घडवलीय. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरून द्वेषाने नाही पण डोकं थंड ठेवून कोणताही पूर्वग्रह न ठेवता (दोन्ही बाजूच्या वर्गांनी) खऱ्या समानतेकडे जाणं हे आपल्या हातात आहे. तसेच, आंबेडकरांना एका विशिष्ट समाजात किंवा वर्गात बंदिस्त ठेवणं चूकच आहे. खऱ्या अर्थाने समस्त भारतीयांचा विचार कुणी केला असेल तर तो आंबेडकरानीच. राष्ट्रपिता ह्या पदवीचे खरे मानकरी बाबासाहेबच आहेत. काँग्रेसने आणि इतर दलित पक्षांनी त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या उत्तुंग नावाचं फक्त राजकारण केल. हीच खेदाची बाब आहे. आजही दलित समाजासाठी त्यांचा हक्काचा असा पूर्ण भारतभर विस्तारलेला असा पक्ष नाहीये. निवडणुकीच्या वेळी एखादा स्थानिक पक्ष, गट हे मोठ्या राष्ट्रीय पक्षांसोबत डील करून निवडणूक लढवून स्वतः मोठे होतात. पण समाज आहे तिथेच आहे. समाजाने जी काही प्रगती केलीय ती स्वतःच्या जीवावर कारण दलित पक्षांनी समाजासाठी काही तळमळीने काम केल्याचं त्यांच्या कृतीमधून कधी दिसत नाही.   

आपल्यासाठी बाबासाहेब हे एक घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, एक महान माणूस एवढेच असतील. पण या दलित/बहुजन समाजासाठी तर ते एक ईश्वरी अवतारच होते, आहेत आणि राहतील. साहजिकच आहे, आपल्या देवाची जयंती जर साजरी करता नाही आली तर दु:ख वाटणारच. मी अगदी चांगल्या प्रकारे हे समजू शकतो, जसं मी  यंदा रामनवमीच्या मिरवणुकीला मिस केलं तसंच आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीलाही मिस केलं. यंदा जयंती जरी रस्त्यावर मिरवणूक काढून साजरी नाही करता आली तरी हरकत नाही, पुढच्या वर्षी दणक्यात साजरी करणार. जय भीम...

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment