Friday, April 24, 2020

सचिन तेंडुलकर - क्रिकेटमधला द्रोणाचार्य



आज देवाचा वाढदिवस. जरी क्रिकेटमधला असला तरी तो देवच आहे ना. जसा एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांच्या  मूर्तीला गुरु मानून धनुर्धारी झाला, तसेच माझ्यासारखे असंख्य लोक आमच्या या क्रिकेटमधल्या देवाच्या फोटोला जवळ ठेऊन किंवा टीव्ही वर त्याला पाहून बॅट धरू लागलो, क्रिकेट खेळायला शिकलो. असे कितीतरी क्रिकेटर्स या देवाने नकळत घडविले आहेत. तो मैदानावर असायचा तेव्हा साक्षात वेळ हि थांबलेली असायची. मी स्वतःला नशीबवान मानतो की मी हा आमचा देव खेळत असलेल्या कालखंडात जन्माला आलो.

सचिन आज ४८ व्या वर्षात पदार्पण करतोय. पण वय हा केवळ त्याच्यासाठी आकडा आहे. खरंतर काही गोष्टींना वय नसतंच. रामायण-महाभारताला नाही, बुद्धाच्या मानवतेला नाही, मीरेच्या कृष्णवरच्या प्रेमाला नाही, रामाच्या संयमाला नाही, शिवाजी महाराजांच्या शौर्याला नाही, बाजीप्रभू-तानाजी यांच्या त्यागाला नाही, लतादीदींच्या गाण्याला नाही, रहमानच्या संगीताला नाही. या गोष्टी वयात नाही मोजू शकत, त्या अजरामर असतात, पिढ्यानपिढ्या पुढे त्या चालत असतात, प्रत्येक पिढीवर संस्कार करत असतात. सचिनची फलंदाजी ही अशी अजरामर आहे.

सचिनच्या फलंदाजीबद्दल लिहायचं झालं तर, त्याचा अर्जुनाच्या बाणाप्रमाणे सरळ जाणारा स्ट्रेट ड्राइव्ह. एखादा सर्जन ऑपरेशन करताना ज्या सफाईने शरीरावर ब्लेड चालवतो तेवढ्याच सफाईने मारलेला ऑन ड्राईव्ह, बॅकफूट वर मारलेला कव्हर ड्राइव्ह, एखाद्या मुर्तीकाराने कोरून काढावा असा लेट कट. लहानपणी कागदी विमान हवेत उडवायचो तसा किपर च्या डोक्यावरून उडवलेला अप्पर कट. त्याने आपल्या दोन्ही हातांनी मैदानात चौफेर उधळलेल्या फुलांसारखे त्याचे फटके. अजून काय लिहिणार त्याच्या फलंदाजीबद्दल.

सचिनच्या कारकिर्दीबद्दल लिहायचं झालं तर वेळ, जागा, वय, अनुभव सगळंच कमी पडेल. त्यामुळे त्याच्या ज्या खास इंनिग्स आहेत किंवा जे आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण आहेत. त्याबद्दलच सांगतो.

विश्वचषक २००३. हा मी पाहिलेला पहिला वर्ल्ड कप. त्यातलं जर आजही काही लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे पाकिस्तान विरुद्धची त्याची तडाखेबंद इनिंग. १ मार्च २००३ चा साक्षात महाशिवरात्रीचा दिवस. गणपती बाप्पांचे पप्पा सचिनला आशीर्वाद देऊन गेलेले. त्याने त्यादिवशी मैदानावर भोलेच्या भक्ताला शोभेल असे तांडवच केले. समोर साक्षात वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर हे त्यावेळेच जगातल सर्वोत्कृष्ट गोलंदाजीतलं त्रिकुट. त्यांच्यासमोर "Attack is Best Defence" ही उक्ती प्रत्यक्षात आणून त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला होता. त्या मॅच मधली त्याची सेन्चुरी जरी हुकली असली तरी ७५ चेंडूतल्या ९८ धावा हि कदाचित त्याची वन ऑफ द बेस्ट इंनिग आहे. याच सामन्यात अख्तरला पॉइंटवरून मारलेला "तो" अजरामर षटकार विसरणं शक्यच नाही आणि या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात समोर साडेसहा फुटी अँड्रू कॅडिकच्या तशी १४५ किमी च्या चेंडूला सचिनने  पूल चा शॉट मारून थेट मैदानाबाहेर फेकले होते. हे सगळे अगदीचं फ्रिक्शन ऑफ सेकेंड्स मध्ये झालं होत. ह्या शॉट ची क्लिप मी आज ही यूट्यूब ला बघतो.

२००४ ऑस्ट्रेलिया टूर. सचिनचा खराब फॉर्म सुरु होता. ठरवून ऑफ साईडला बॉल टाकून त्याला ऑस्ट्रेलियन बॉलर्स त्याला बाद करत होते. या सगळ्या विरुद्ध शेवटी तिसऱ्या कसोटीत ऑफ साईडला एकही फटका न मारता त्याने केलेल्या तब्बल नाबाद २४१ धावा. हे त्याच श्रेष्ठत्व सिद्ध करतं.

२००५ ते २००७ ही तीन वर्ष तशी त्याच्यासाठी खास नव्हती. कारण टेनिस एल्बोची कदाचित क्रिकेट कारकीर्द संपवणारी दुखापत याच काळात झाली. त्यावर त्याने ज्या प्रकारे मात केलीय. ती प्रेरणादायी आहे. २००७ च्या वर्ल्ड कप मध्ये ग्रुप स्टेज मधूनच भारत बाद झाल्यामुळे त्याच्यासहित सर्व देशाला नैराश्य आलं होत. 

२०१० ग्वाल्हेर. समोर साऊथ आफ्रिका. सचिनचे जगातले पाहिलेवाहिले एकदिवसीय द्विशतक. गेली कित्येक वर्ष पाक च्या सईद अनवरच्या १९४ रन्स चा रेकॉर्ड खरतर खुपत होता. सचिनने वयाच्या ३७ व्या वर्षी नाबाद २०० ठोकून तिथं आपला झेंडा रोवला. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम!

विश्वचषक २०११. सचिन गेली कित्येक वर्ष जे स्वप्न जगत होता ते सत्यात उतरणार होतं. त्याचा हा सहावा वर्ल्ड कप होता. संघातला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून त्याने दोन शतकांसह ४८२ धावा करून निभावलेली मार्गदर्शकाची भूमिका. आणि विश्वचषक विजय, गेली कित्येक वर्ष हुलकावणी देत हातात आलेला विश्वचषक!

आणि २०१३. वानखेडे स्टेडियम. सचिनची कसोटी सामन्यातून निवृत्ती. त्याचा तो खेळपट्टीचा केलेला नमस्कार आणि नंतर त्याच भावुक स्पीच. आजही हा क्षण आठवला की अंगावर काटा येतो. त्याने निवृत्ती घेतलीस आणि तो आऊट झाल्यावर जसे देशातले टीव्ही बंद व्हायचे तसं माझं क्रिकेट बंद झालं. आता रोहित साठी बघतो, पण बघण्यात सातत्य नाही.

सचिनने एकूण १०० शतकं ठोकलीय. आता फक्त एक इच्छा आहे, अजुन त्याचं एक वयाचं शतक शिल्लक आहे. वयाची शंभर वर्षे पूर्ण करून त्याने त्याच्या आयुष्यातलं १०१वं शतक ठोकावं असं मनापासून वाटतं. वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा देवा...!!!

शुभम शांताराम विसपुते

सचिनचे काही रेकॉर्डस्

1             Man
24           Years
664         Matches
782         Innings
74           Not Outs
34357     Runs
48.52      Average
50816     Ball Faced
67.58      Strike Rate
248*        High Score
164         50s
28           90s
3             99s
100         100s
25           150s
1             200s
76           Man of the Match
20           Man of the Series
4076       4s
264         6s
201         Wickts
6300       Balls Bowled
107         Maidens
2             5wckt Haul


No comments:

Post a Comment