सध्या लॉकडाऊन असल्याने बाहेर पडणं टोटल बंद आहे. त्यामुळे रोज बाहेर जाऊन आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन मनसोक्त खाण्याची खूप इच्छा होते. पण लॉकडाऊन असल्याने ती तशीच दाबून ठेऊन घरातचं काहीतरी खाऊन वेळ मारून न्यावी लागते. खाण्यावर माझं नितांत प्रेम आहे. माझ्यासोबतच्या असणाऱ्या मित्रपरिवाराला हे चांगलच ठाऊक आहे. रेगुलर हॉटेल मध्ये जेवणासाठी जाणं होत नसलं, तरी नाष्टा मात्र बाहेर नेहमीच होतो. असंही कुठल्या शहरात जाण्याचं काम पडलंच तर मी आधीच माहिती घेऊन जातो कि तिथली खाण्याची स्पेशॅलिटी काय आहे. बऱ्याचदा पदार्थ एकच असतो पण नावे वेगळी असतात. हे तिथल्या स्थानिक भाषेमुळे होतं. जसे की जळगाव मधल्या बटाटेवड्याला अमरावती मध्ये "आलू-बोन्डा" असं वड्याला शोभेल असं मस्त नाव आहे. बहुतांश काळ जळगाव मध्ये काढला असल्याने आणि इथला स्थानिक असल्यामुळे मला जळगाव मधलीच जेवणाची आणि नाष्ट्याची हॉटेल्स, गाड्या आवडतात. जिथे मी नेहमीच भेट देत असतो, अश्या सगळ्यांची माहिती थोडक्यात देतो.
जळगाव शहरात मी रथ चौकात राहतो. जिथं सकाळी नाश्ता करण्यासाठीच विविध प्रकार अगदी सहज उपलब्ध आहे. त्यात पंडित कडचा झणझणीत असा आलूवडा जो अगदीच तिखटजाळ असल्याने त्याच्याचकडे वाफेवर तयार होणाऱ्या पोह्यांसोबत खावा लागतो. इथले पोहे हा एक निव्वळ अप्रतिम असा प्रकार आहे. कारण ते कन्टीन्यु वाफेवर ठेवले असल्याने गरमच असतात आणि तितकेच मऊ देखील. इथे फक्त पोहे मिळतात, म्हणजे बाहेर मिळतात तशे प्लेट मध्ये कांदा, शेव, रस्सा टाकून नाही तर केवळ कागदावर पोहे मिळतात आणि सोबत तळलेली मिरची बस्स. इथला पाववडा (ब्रेडवडा) देखील तितकाच भारी आहे. याच गाडीच्या पाठीमागे, मधूभाऊंची भज्यांची प्रसिद्ध गाडी आहे. पालक भजी जी इथं मिळतात ती मला नाही वाटत कि जळगाव मध्ये कुठं मिळत असतील. उकळत्या तेलात तळलेली कडक पालक भजी इथली खासियत आहे. सोबतच कांदा भजी पण बेस्टच. सुरुवातीला इथं फक्त भजी मिळायची, पण आता भज्यांसोबतच कचोरी, ब्रेडवडा, खमण, रस्सा-पोहे इतकं सगळं मिळत. खूप गर्दी असून देखील जास्त वाट बघावी लागत नाही. कारण स्टाफ तितका तत्पर आहे.
रथ चौकातून पुढे गेलं कि सुभाष चौक लागतो. दिवसभर वर्दळीचा असा चौक. वर्दळ खूप असल्याने खाण्यासाठी पर्याय देखील खूप आहेत. दिवसभरात खाण्यासाठी कधीही आलात तरी तुम्हाला रिकाम्या हाती जाण्याची वेळ येणार नाही. चौकातच जिलेबी सेन्टर आहे. जिथं नेहमीच्या साखरेच्या जिलेबीसोबतच स्पेशल अशी मावा जिलेबी मिळते. तुपात तळलेली सावळ्या रंगाची ही जिलेबी म्हणजे स्वर्ग आहे. त्याच सेन्टर वर दहीवडा मिळतो. कदाचित दहीवडा मिळण्याचं हे शहरातील एकमेव ठिकाण आहे. उडदाच्या डाळीच्या वड्याला एका कटोरी मध्ये चुरून त्यावर भरगोस पातळ दही, त्यावर शेव, चटणी आणि चाटमसाल्या सोबत दिलं जात. या सेण्टरच्या बाजूलाच पाणीपुरी वाला देखील आहे. तो पण दिवसभर असतो. तिथली पाणीपुरी देखील छानच आहे. बाजूला "स्वदेशी" म्हणून एका छोटया मालवाहतुकीच्या गाडीवरचा स्टॉल बनवला आहे. प्लास्टिकच्या छोट्या बाटलीमध्ये इथं बदाम शेक, लस्सी, फ्रुट सलार्ड मिळत. थोडं पुढे भाजी बाजाराकडे गेलं कि उजव्या बाजूला सकाळी गोपीची पोह्यांची गाडी लागते. तिथल्या गर्दीत जरा वेळ वाट बघितल्यानंतर आपल्यासमोर एका प्लेट मध्ये पोहे, त्यावर मटकी, रस्सा, लिंबू-कांदा, आणि इथली जी स्पेशल आहे ती खास इंदोरी शेव टाकून स्वतः गोपीशेठ च्या हस्ते आपल्या हातात ती प्लेट दिली जाते. याच्याच पाठीमागे असलेली चेतन ची गाडी, जिथे शुद्ध शेंगदाणा तेलातील कचोरी आणि ब्रेडवडा मिळतो. महागाई असून देखील दर्जा सोबत इथं तडजोड केली जात नाही. पुढे ब्रिजविलासच्या गल्लीत सकाळी फाफडा खाण्यासाठीची गाडी आहे. इथे खूप वाट बघण्याची तयारी असेल तरच फाफडा खाता येतो. घाई केली तर फाफडा मिळणार नाही असं डायरेक्ट सांगितलं जातं. पण इथला फाफडाच इतका क्लासिक असतो कि त्यासाठी वाट बघण्याची प्रसंगी अपमान झेलण्याची पण तयारी असते.
सुभाष चौकापासून पुढे फुले मार्केटच्या एल पट्ट्यात सिंधी कडे दाल पकवान हा अस्सल सिंधी पदार्थ खायला मिळतो. तळहाताएवढ्या पापडीवर घट्ट दाल टाकून त्यावर खाताय, मसाला, तिखट, शेव, कांदा टाकून दिली जाते. अप्रतिम असा पदार्थ आहे. मार्केटमधून या स्टॉल च्या बाजूने बाहेर मेन रोड वर आले कि, बाजूलाच पाहिला गाळा हा "सायंतारा" नावाचा आहे. महिला बचत गट तो चालवतो. साबुदाणा वडे आणि साबुदाणा खिचडी हि इथली स्पेशालिटी, रोज जरी गर्दी असली तरी उपवासाच्या दिवशी मात्र वेळेच्या अगोदर हा स्टॉल बंद होतो. इथूनच मेन रोडने थोडं मागे गांधी मार्केट च्या दिशेने आलं कि बळीराम पेठेच्या चौकात छान दाबेली मिळते. दाबेलीच्या गाडीपासून समोर रॉड क्रॉस केला कि, कॉर्नरलाच सावता माळी म्हणून प्रसिद्ध गाडी आहे. कचोरी, सामोसा, भाजी, ब्रेडवडा असं सगळंच इथं मिळतं. याच्या अगदी समोर प्रकाश मेडिकल च्या बाजूला "बाबा वडापाव" आहे. तो पण चांगलाच आहे पण तितकासा झणझणीत नसतो. त्यासाठी इथूनच पुढं टॉवर चौकाच्या दिशेने गेले कि बाजूलाच ओपन स्पेस च्या बाहेर "मुंबईचा प्रसिद्ध वडापाव" नावाची गाडी आहे. नावाप्रमाणेच मुंबईचा वडापाव जळगाव मध्ये खायचा असेल तर हे बेस्ट चॉईस आहे. गरमागरम वड्यासोबत ताजे पाव, त्यात ओली आणि सुक्की अश्या दोन्ही चटण्या लावलेल्या असतात आणि सोबत तळलेली मिरची. सगळं कस एकच नंबर असतं. याच्याच पाठीमागच्या केळकर मार्केट परिसरात मग पाणीपुरी, दहीपुरी चे खूप स्टॉल्स आहेत. पुढच्या टॉवर चौकात मग खूप जुनं असं खास फक्त कचोरी-समोस्यासाठीच "जोगळेकर" आहे. अगोदर खूप प्रसिद्ध होत, पण आता त्याच इतकं नाव नाहीये.
नेहरू चौकाच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला आर्यनिवास च्या शेजारी "प्रभात" सोडा फाउंटन आहे. लहानपणापासून इथं येणंजाणं आहे. इथला बदाम शेक खासचं आहे. बाकी पण खूप व्हरायटी आहे. बदाम शेक सोबतच इथला लेमन सोडा भारी आहे. बाहेर सोड्याचा गाडीवर मिळणाऱ्या गोड लिंबू सोड्यासारखा बकवास प्रकारापेक्षा इथला प्युअर स्ट्रॉंग लिंबू सोडा मस्त आहे. अगदीच डोक्यात पार झिणझिण्या आणेल असा. सरळ जाऊन मद्रास बेकरी कडून डावीकडे वळून नवी पेठेत आले कि, समोरच "गणेश दर्शन" म्हणून अस्सल साऊथ इंडियन पदार्थ मिळणारी हातगाडी आहे. जी संध्याकाळच्या वेळेत असते. अव्वल दर्जाचा डोसा आणि इडली इथे मिळते. रात्री दुकान बंद झाली कि तिथेच ओट्यावर बसून इथल्या दक्षिणी पदार्थांचा मस्त आस्वाद घेता येतो. पुढच्या नवीपेठेच्या मधल्या मुख्य चौकात दाना बाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरुवातीलाच "भैरवनाथ" म्हणून सकाळी गाडी लागते. जिथे खास राजस्थानी पद्धतीचे चना-पोहे मिळतात. सोबतच खमण देखील असतात. पण इथले चना पोहे बेस्ट आहेत. याच ठिकाणी रात्री शहरातील प्रसिद्ध "कृष्णा" पावभाजीची गाडी लागते. बसण्यासाठी मस्त रस्त्यावर टेबल खुर्ची टाकलेली असते. पूर्ण फॅमिली सोबत येऊन पावभाजी खाण्याची हि एक उत्तम जागा आहे. इथला तवा पुलाव पण छान असतो. खूप बटर घातलेली आणि आपल्याला हवी तशी भाजी लगेच बनवली जाते. इथली हि गोष्ट खूप चांगली आहे. पावभाजीच्या पार्सल साठीचा माझ्यासाठी हा एकमेव चॉईस आहे.
नवीपेठेच्या याच चौकातून इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे गेले की, मंदिराच्या बाजूलाच "ओपन हाऊस" आहे. जळगाव मध्ये कांदाकचोरी मिळण्याची सुरुवातच इथून झालीय. इथली फक्त कांदा कचोरी छान आहे. याच्या समोरच "महावीर आईस्क्रिम" आहे. जिथं खूप साऱ्या फ्लेवर चे आईस्क्रिम मिळतात. पण मला तिथली मलाई कुल्फी खूप आवडते. थोडं पुढं गेलं की येत जळगाव मधलं सगळ्यात जुनं आणि प्रसिद्ध "लोकप्रिय" हॉटेल. छोटेसेच हॉटेल आहे. बाहेरून बघितल्यावर कळत कि सगळ्यात जून का आहे आणि आत गेल्यावर कळत कि इतकं जून असूनही लोकप्रिय का आहे ते. अगदी बसायला सुद्धा मोकळी जागा नसते, व्यवस्थित स्वछता नसते. पण अस्सल खवैय्या ला या गोष्टींनी फरक नाही पडत. इथं मध्ये जाऊन मिळेल त्या जागी बसून फक्त एक झणझणीत मिसळ आणि जिलेबी ची ऑर्डर करायची आणि बाकी सर्व विसरून त्याचा आस्वाद घायचा. इथल्या मिसळीमध्ये भजी टाकलेली असतात. जी इथली खासियत म्हणायला हवी.
लोकप्रिय पासून पुढे जाऊन हनुमान मंदिराच्या बाजूने गोलाणी मार्केट च्या बाजूने थेट १७ मजली कडे पोहचलो की, समोरच व वा च्या गल्लीत सुरुवातीला गोलाणीचा प्रसिद्ध रगडा "अमर रगडा" च दुकान आहे. नावाप्रमाणे गोलाणी मध्ये ही त्यांचा जुना स्टॉल आहे. जळगाव मध्ये शोधला गेलेला हा रगडा जळगाव ची ओळख बनलेला आहे. प्लेट मध्ये सामोसा कुस्करून त्यावर गरमागरम रगडा टाकला जातो. सोबतच रस्सा मिळतो, जो की कितीही वेळा घेऊ शकतो. आता यातपण अनेक प्रकार आहे. चीझ रगडा, पनीर रगडा, दही रगडा असे पर्याय असले तरी आपला नेहमीचाच रेगुलर रगडा बेस्ट लागतो. याच्याच बाहेरच्या मेन रोड वर एक छोटीशी लस्सी ची गाडी लागते. त्या गाडीवर साधी लस्सी, बदाम लस्सी आणि मँगो लस्सी मिळते. गाडी लहान असली तरी लस्सी मात्र खूप मस्त मिळते. या गाडीच्या समोरच १७ मजली शेजारीच "खाऊ गल्ली" आहे. नावच खाऊ गल्ली असल्याने पाणीपुरी पासून ते भल्ला पर्यंत सगळे पर्याय इथे उपलब्ध असतात.
क्रमश:
शुभम शांताराम विसपुते
No comments:
Post a Comment