Monday, October 19, 2020

सनी देओल - आमच्या पिढीचा अँग्री यंग मॅन

 



जवळपास अर्धा सिनेमा झालेला आहे. हतबल झालेली नायिका, तिची लढाई, तिला दिला गेलेला त्रास, खलनायकाचं काम करणारी "सिस्टीम". प्रेक्षक म्हणून आपण हे पाहत असतो. कोणीतरी येऊन नायिकेला या सगळ्यातून वाचवायला हवं असं मनोमन वाटत असतं. पण नायिकेवरचा अत्याचार हा वाढत जातो. इतका कि ती वेडी झालीय हे न्यायालयात सिद्ध करून तिला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले जाते. अशातच, दुर्गोत्सवाची मिरवणूक सुरु असताना नायिका इस्पितळातून पळ काढते. तिच्या मागे गुंड लागलेत. जिवाच्या आकांताने ती पळतेय आणि एका बेसावध क्षणी ती एका दारुड्याला धडकते आणि..... 

विस्कटलेले केस, अस्त्याव्यस्त झालेले कपडे, लाल झालेले तारवटलेले डोळे, हातात पकडलेला ओल्ड मंक चा खंबा आणि एका हातात असलेली सिगारेट. बस्स, आता तो आलेला असतो. त्याला बघून आपल्याला वाटतं कि अरे फेक ती बाटली आणि वाचव तिला, पण तो बाजूला होतो. गुंडाना तिला घेऊन जायचा इशारा करतो. दोन जण तिच्या दिशेने यायला लागतात पण हा ढिम्म काही हालत नाही. त्याचा कमालीचा थंडपणा बघत इकडे तिच्या बरोबरच आपणही बैचेन झालेलो असतो. ते दोघे जण जसे तिच्या अंगावर हात टाकायला येतात तेव्हा एका क्षणात तो एक पंच पहिल्याला आणि एक बॅकहॅन्ड दुसऱ्याला ताकदीने लगवतो इतका कि दोघे उठतच नाही. त्या दोघींची हालत बघून इतर तिघे जागेवरच गार झालेले असतात. तो सिगारेट पेटवायला जातो तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या पंजावर लागलेल्या रक्ताकडे जातं. तेव्हाच आसमंतात वीज कडाडते आणि "दामिनी" सिनेमात सनीबाबाची दमदार एंट्री होते. जवळपास १ तास ४० मिनिटांनंतर सनीबाबा आपलं रूप सिनेमात दाखवतो आणि उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर करून सिनेमासहित प्रेक्षकांना तिथेच खिशात टाकतो. 

खरतर आज सनी देओल चा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याच्याबद्दल खूप काही लिहायची इच्छा होती. माझ्यावर असलेला त्याचा "इम्पॅक्ट" मी कधीच विसरू शकत नाही आणि त्यातही दामिनी मधला सनिबाबाने साकारलेला "गोविंद"चा प्रभाव हा आयुष्यभर कायम राहील. त्यामुळे फक्त त्याच्या दामिनीतल्या एंट्री सिन बद्दल लिहिलंय कारण सनी देओल बद्दल लिहायचं म्हणजे काळ, वेळ, लांबी, शब्द या सगळ्या गोष्टी खुज्या पडतात त्यामुळे तूर्तास इतकंच... 

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सनीबाबा....

शुभम शांताराम विसपुते     


No comments:

Post a Comment