Monday, April 13, 2020

लक्ष्य - आयुष्याला दिशा देणारा सिनेमा


ही कथा करण (हृतिक रोशन) ची आहे जो खूप हुशार आहे पण आपल्या भविष्याबद्दल पूर्णपणे गोंधळलेला आहे. त्याची गर्लफ्रेंड रोमिला (प्रीती झिंटा) पहिल्यापासूनच न्यूज चॅनेलचा बातमीदार होण्याची महत्वाकांक्षा बाळगून असते आणि ती करण ला सतत आयुष्यात कसलं तरी लक्ष्य बाळगण्याचा सल्ला देत असते. करणच्या वडिलांचा (बोमन इराणी) बिझनेस असतो व आपल्या मुलाने आपला बिझनेस पुढे वाढवावा ही त्यांची इच्छा असते. पण करण च्या आयुष्यातील अनिश्चितते मुळे त्यांच्यातील अंतर आणखी वाढले जाते. घरच्यांच्या विरोधात जाऊन तो इंडियन मिलिटरी अकॅडमी ची परीक्षा देतो आणि तिथे सैन्य शिक्षणासाठी त्याची निवड होते. परंतु आळशीपणा, निष्काळजीपणामुळे त्याला शिक्षा होते आणि वैतागून तो घरी पळून येतो.आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा स्वतः घेतलेला निर्णय असल्याने रोमिला त्याला निघून आल्याबद्दल कठोर शब्दात बोलते आणि  त्याचे रोमिला सोबत ब्रेकअप होते. यामुळे करणचे आयुष्य बदलते आणि तो सैन्यात भरती होण्याचा पुन्हा निश्चय करतो आणि आयएमए मधून अत्यंत चांगल्या मार्कांसोबत तो बाहेर पडतो.  त्याच वेळी रोमिला देखील एक यशस्वी न्यूज चॅनेलची बातमीदार बनते.

सुट्टीत घरी आल्यावर रोमिला ची एंगेजमेंट झाल्याचं करण ला कळतं. पण त्यामुळे त्याच्या ध्येयापासून तो विचलित होत नाही.कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्यावर करणला तेथे सैन्य अधिकारी म्हणून नेमण्यात येतं आणि पाकिस्तानी सैन्याकडून पीक क्रमांक ५१७९ परत मिळवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येते. हेच आपल्या आयुष्यातील "लक्ष्य" आहे ह्याची जाणीव करण ला होते आणि अत्युच्च शौर्य पराक्रम दाखवून तो पाकिस्तानी सैन्याकडून पीक ५१७९ पुन्हा मिळवतो. कारगिलचे युद्ध कव्हर करायला आलेली रोमिला त्याला भेटते, तो युद्ध जिंकून येइपर्यंत वाट बघते आणि शेवटी दोघे पुन्हा एकत्र येतात.

चित्रपटात काही सिन जबरदस्त आहेत. करण आय एम ए मध्ये आल्यावर खेतरपाल च्या प्रांगणातलं भाषण, आयएमए मध्ये पुन्हा आल्यावर "लक्ष्य को हर हाल में पाना है" गाण्यात त्याचं होणारं ट्रान्सफॉर्मेशन, जवान शहीद झाल्यावर रोमिलाच्या "क्यो होती है जंग" ह्या वाक्यावर चिडणारा एक जवान. करण घरी फोन करतो तेव्हा त्याचे वडील म्हणतात तुझी आई घरी नाहीये तेव्हा करण त्यांना म्हणतो की."ये फोन मैने आपको किया हे डॅड" याच्या नंतरच करण आणि त्याच्या वडिलांचं फोनवरील निव्वळ अप्रतिम म्हणता येईल असं संभाषण, तसेच प्रीतमसिंग (ओम पुरी) चा करण ला दिलेला "मुझे पाकिस्तानियो का तजुर्बा है। पाकिस्तानी हारे तो एक बार पलटके फिर आते है।जीत जाओ तो लापरवाह मत हो जाना।" सल्ला शेवटी उपयोगी पडतो. हे सगळे सीन चित्रपटावर आपली छाप सोडून जातात.

"दिल चाहता है" च्या जबरदस्त यशानंतर हा दिग्दर्शक फरहान अख्तरचा "लक्ष" हा आणखी एक उत्कृष्ट नमुना होता. जावेद अख्तर यांनी हा सिनेमा खूप उत्तम प्रकारे लिहिलाय. गाणी आणि डायलॉग्स उत्कृष्ट आहेत. शिवाय नृत्यदिग्दर्शन (प्रभु देवा) ला "मै ऐसा क्यू हू" या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड देखील मिळालंय.

अभिनयाच्या बाबतीत हृतिक रोशनने कमाल करताना एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना दाखवला आहे. कॉलेज लाईफमधील गोंधळलेला आणि लक्ष निश्चित झाल्यावर गंभीर झालेला करन त्याने कमालीचा रंगवलेला आहे. ह्रितिक चा करिअर मधील बेस्ट परफॉर्मन्स मधला एक आहे. कर्नल सुनील दामले (अमिताभ बच्चन) हे आणखी एक आकर्षण आहे. अमिताभ बच्चन च्या भारी आवाजातील डायलॉग्स ऐकायची मजा आहे. प्रीती झिंटाची भूमिका मस्त आहे. ह्रितिक आणि प्रीती त्याच्या नव्या हेअरस्टाईल मध्ये मस्तच दिसतात. बोमन इराणी, ओम पुरी, आदित्य श्रीवास्तव तिघांचही काम उत्तम झालय. 

शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत आहे. एक कम्प्लिट अलबम त्यांनी दिलाय. उदित-अलका या एव्हरग्रीन जोडीचं "अगर मै कहू", शान च्या आवाजातील "मै ऐसा क्यू हू", स्वतः शंकर महादेवनच "लक्ष" चा टायटल ट्रॅक आणि माझ सर्वात आवडत "कंधो से मिलते हें कंधे" सारखं पॉसिटीव्हिटी तयार करणार एनर्जेटिक गाणं. सर्वच गाणी टॉप क्लास. 

हा चित्रपट म्हणजे आपल्या जीवनात काहीतरी "लक्ष्य" असणे होय. या चित्रपटाने एक प्रकारे आजच्या तरुणांकडे लक्ष वेधले आहे जे आपल्या जीवनात काय करणार आहेत याविषयी त्यांना काहीच माहिती नाही आणि फोकस सतत बदलणे हा आहे. त्यांनी एकदा तरी हा सिनेमा नक्की पाहावा.

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment