माझा अत्यंत आवडता अभिनेता! प्रचंड अभिनय क्षमता पण त्यामानाने दुर्लक्षित असलेला असा नट. के के चा जन्म जरी केरळ चा असला तरी त्याच्या लहानपणापासूनच तो महाराष्ट्रात आहे. नुकताच त्याचा "एक सांगायचंय" हा पहिला मराठी सिनेमा येऊन गेला. के के ला मी सर्वप्रथम बघितला तो अनुराग कश्यप च्या "ब्लॅक फ्रायडे" या सिनेमात, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित या सिनेमात के के ने मुख्यतापासाधिकारी राकेश मारिया यांची भूमिका केली. अतिशय शांत, संयत असा टिपिकल बॉलीवूडपटातील पोलिसांपेक्षा वेगळा असा पोलीस अधिकारी त्याने अप्रतिम उभा केलाय. यानंतर मी के के चे जवळपास सर्वच सिनेमे बघितले. अनुराग सोबत के के मध्यवर्ती भूमिका असलेले तीन सिनेमे केले. "पांच", "ब्लॅक फ्रायडे" आणि "गुलाल". या तिन्ही सिनेमात त्याने जे काम केलय ते बघून स्तिमित व्हायला होत. "पांच" हा जोशी-अभ्यंकर या खून खाटल्यावर प्रेरित आहे, ज्यात के के मुख्य भूमिका साकारलीय. "गुलाल" मध्ये तो आपल्याला भेटतो तो अस्सल राजपूत असल्याचा गर्व असलेल्या आणि राजपुताना स्थापन करणाऱ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या "डुकी बन्ना" च्या भूमिकेत. सिनेमाच्या सुरवातीच्या प्रसंगात जेव्हा तो राजपुतांच्या वेगळ्या राजपुतानासाठी सर्वांसमोर जे भाषण करतो त्या प्रसंगात त्याची भेदक आणि आत्मविश्वासपूर्वक नजर कायमची लक्षात राहते. यानंतर के के ला असाच तडाखेबंद रोल मिळाला तो "शौर्य" सिनेमात, ब्रिगेडियर रुद्रप्रताप सिंग च्या रूपात. यात राहुल बोस सोबतची त्याची जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणीच आहे. क्लायमॅक्स च्या कोर्टरूम सिन मध्ये के के ने जी जबरदस्त संवादफेक केलीय त्याला तोड नाही. जवळपास १६ मिनिटांच्या या सिन मध्ये अभिनयाच्या सर्व छटा तो दाखवतो. "हनिमून ट्रॅव्हल्स प्रा.लि." मधला त्याचा पार्थो हा साधा भोळा बंगाली बाबू पण दारू पिल्यानंतर "सजनादि वारी वारी" या गाण्यात तुफान धुमाकूळ घालतो, या गाण्यातील के के ची एनर्जी पाहून रणवीर सिंग सुद्धा त्याच्यासमोर फिका वाटतो. "सरकार" आणि "दिवार" मध्ये साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली, तिथेही त्याने आपले नाणे चोख वाजवले. "मुंबई मेरी जान" मधला हिंदुत्ववादीची सुरेश, "हैदर" मधला खुर्रम मीर, "लाईफ इन अ मेट्रो" मधला बॉस रणजित या के के च्या इतर भूमिका. प्रत्येक वेळी शांतपणे पडद्यावर येऊन आपलं काम चोख करणारा, प्रसिद्धी आणि पैश्यासाठी हपापलेल्या इंडस्ट्री मध्ये प्रसिद्धीपराङ्मुख राहून आपल्या इमानाशी प्रामाणिक राहून काम करणारा. प्रत्यक्ष आयुष्यही अगदी साधेपणाने जगणारा, आमच्या सारख्या त्याच्या कट्टर फॅनने त्याच्या ट्विटर व फेसबुक अकाउंट वर केलेल्या कंमेन्ट्सला लाईक आणि रिप्लाय देणारा हा, खऱ्या जीवनातला सेलिब्रिटी.
-शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment