Thursday, April 2, 2020

वर्ल्डकप (२०११) - स्वप्नांचा यशस्वी पाठलाग


१९८३ मध्ये भारताने कपिल देव च्या नेतृत्वात एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल २८ वर्षे आणि ६ विश्वचषक स्पर्धा इतकी वाट बघावी लागली. २००३ च्या स्पर्धेत गांगुलीच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात जाऊन भारत फक्त त्याला स्पर्श करून आला होता. पण त्यावर कब्जा मिळविण्यासाठी शेवटी आजच्याच दिवशी बरोबर ९ वर्षांपूर्वी २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला. आज पूर्ण स्पर्धेत भारताने काय केलं ते न सांगता, मी फक्त फायनल मॅच बद्दल सांगनाराय. कारण ती मॅच अजूनही लक्षात आहे, आणि अर्थातच कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे.

दिनांक २ एप्रिल २०११ ला मुंबईच्या खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडीयम मध्ये रणरणत्या दुपारी भारत आणि श्रीलंका समोरासमोर उभे ठाकले होते. टॉस साठी महेंद्र सिंग धोनी आणि लंकेच्या कुमार संगकारा समोर उभा होता. त्या दिवसाच्या हाय होल्टेज ड्रामा ला टॉस पासूनच सुरुवात झाली. कारण, टॉस फेकल्यावर रेफ्री ला संगकारा काय बोलला ते नेमकं ऐकू आलं नाही. त्यामुळे त्या दिवशी टॉस दोन वेळा करावा लागला. याचा उलट परिणाम म्हणजे भारत टॉस हरला. सांगकाराने नंतर संध्याकाळी फ्लड लाईट मध्ये फलदांजी करायला नको म्हणून लगेचच फलंदाजी निवडली. थोडं चुकल्यासारखं वाटलं होत. पण शांत संयमी असा धोनी असल्यामुळे त्याने याच दडपण घेतलं नाही. 

लंकेकडून ओपनर म्हणून थरांगा आणि त्या स्पर्धेत भन्नाट फॉर्म मध्ये असलेला दिलशान उतरला. समोर गोलंदाजी साठी झहीर खान होता. जी चूक २००३ च्या फायनल मध्ये त्याच्याकडून झाली होती. त्या फायनल मध्ये पहिलाच चेंडू इतका वाईड टाकला होता कि त्यावर ऑस्ट्रेलियाला चौकार मिळाला होता, आणि पुढे जहीर ची जी लाईन चुकली ती सुधारलीच नाही. आज त्याची परतफेड करण्याची पुरेपूर संधी त्याच्याकडे होती. ती त्याने पुरेपूर घेतली, सुरुवातीच्या सलग तीन ओव्हर्स त्याने मेडन टाकल्या. थरंगा पुरता गोंधळून गेला होता. शेवटी दबावात येऊन २० बॉल खाऊन त्याने स्लीप मध्ये सेहवाग कडे सोपा झेल दिला. नंतर कप्तान संगकारा आणि दिलशान ने थोडा खेळ सावरला. दिलशान गेल्यानंतर अनुभवी जयवर्धने आला. आपला पूर्ण अनुभव त्याने त्यादिवशीचा खेळीत ओतला होता. प्रचंड दबाव असताना त्याने शेवटपर्यंत टिकून राहत. आपले शतक साजरे केले. समोर असलेल्या प्रत्येक फलंदाजांसोबत ५०-६० रन्स ची पार्टनरशिप करत टीम ला चांगल्या स्थितीत घेऊन आला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये जयवर्धने आणि परेरा ने गोलंदाजांवर हल्ला चढवत संघाला २७४ असा चांगला स्कोर उभा करून दिला.

शेवटच्या काही ओव्हर्स चा अपवाद वगळता भारताकडून त्यादिवशी सर्वानीच चांगली गोलंदाजी केली होती. झहीर सोबत नेहरा च्या जागेवर खेळत असलेला श्रीशांत असो कि माझा आवडता मुनाफ पटेल या तेज गोलंदाजांनी लंकेवर चांगला दबाव ठेवला होता. जरी त्यांना विकेट मिळाल्या नसल्या, पण त्या दबावामुळेच आपल्या स्पिनर्सना हरभजन आणि युवराज विकेट्स मिळाल्या. तेंडुलकरने पण आपल्या घरच्या मैदानावर दोन ओव्हर्स टाकून घेतल्या.

संध्याकाळी भारतीय संघाकडून फलंदाजीसाठी सचिन आणि सेहवाग हि हिट जोडी उतरली. समोर यॉर्कर किंग मलिंगा होता. सेहवाग ला दुसऱ्याच बॉल वर एकदम सटीक गुड लेन्थ बॉल टाकून त्याने पायचीत केलं. आता मदार सचिन आणि गंभीर वर होती. सचिनही दबाव मध्ये आलेला होता. याचाच फायदा घेत मलिंगा ने त्याला ही बाद केलं. नंतर आलेल्या नवख्या कोहली सोबत गंभीर ने संघाला शंभर च्या पुढे नेले. तेव्हा दिलशाने स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा अफलातून झेल पकडला. आता स्थिती नाजुक होती. कारण ३ विकेट्स गेल्या होत्या आणि अजूनही १६० रन्स हवे होते. याच वेळेला कप्तान धोनी ने सगळ्यांना एक धक्का दिला. कारण पूर्ण स्पर्धेत नंबर पाच वर युवराज फलंदाजी ला येत होता आणि धोनी सहा वर, तेव्हा कोहली नंतर युवराज ने यायला हवे होते. पण इथं स्वतः धोनी पॅड घालून मैदानात आला. "लिडिंग फ्रॉम फ्रंट" च ते उत्कृष्ट असं उदाहरण होत.  समोर गंभीर त्यादिवशी कमालीचा गंभीर होऊन खेळात होता. अगदी नेटाने त्याची फलंदाजी सुरु होती. धोनी आल्यामुळे त्याचा वरचा दबाव कमी झाला होता. आता दबाव लंकेवर होता. धोनी आणि गंभीर ने १०९ रन्स ची पार्टनरशिप करून विजय टप्प्यात आणला होता. गंभीर आपल्या शतकापासून अवघ्या तीन रन्स ने दूर होता. अश्यातच कुलसेखराचा चेंडू स्टंप सोडून खेळायला गेला आणि बोल्ड झाला. खरच त्या दिवशी त्याच शतक हुकल्याचं दुःख आजही होत. गंभीर नंतर स्पर्धेचा हिरो युवराज आला तेव्हा ५२ चेंडूत ५२ रन्स आवश्यक होते. धोनी आणि युवराज ने अजिबात घाई न करता आरामात फलदांजी केली. आणि तो अजरामर क्षण आला. जेव्हा भारताला विजयासाठी ११ चेंडूत फक्त चार रन्स हवे होते. धोनीच्या समोर कुलसेखरा बॉलिंग ला होता. त्याने फुल्ल लेन्थ बॉल टाकला आणि धोनी अगदी शांतपणे मिड ऑन च्या डोक्यावरून जो कधीही विसरला जाणार नाही तो सिक्स मारला.   

भारताने वर्ल्डकप जिंकला होता. तब्बल २८ वर्षे वाट पहिल्या नंतर. फक्त वर्ल्ड कप जिंकायचाच हे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल सहा वर्ल्डकप खेळलेल्या सचिन साठी पूर्ण टीम कडून त्याला वर्ल्डकप ची ट्रॉफी ही भेट होती. युवराज सिंग ने आजारी असतानाही पूर्ण स्पर्धा गाजवली होती. त्यासाठी त्याला "मालिकावीर" चा बहुमान देखील मिळाला. टीम मधल्या प्रत्येकाने आपलं १०० टक्के योगदान त्यासाठी दिल होत.

या वर्ल्डकप बद्दल तीच भावना आहे जी महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांची आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मरण्याच्या अगोदर कुठला आयुष्यातला कुठला क्षण बघायला आवडेल असं जेव्हा त्यांना विचारलं गेलं होत तेव्हा त्यांनी सांगितलेलं की, धोनी ने मारलेला तो विजयी सिक्स मला बघायला आवडेल. बस्स, आमच्यासारख्या कट्टर फॅन्स ची यापेक्षा वेगळी भावना ती काय असेल. लाइफटाइम मोमेन्ट दिल्याबद्दल धोनी आणि पूर्ण टीम ला मनापासून कडक सॅल्यूट...!!!

शुभम शांताराम विसपुते     

No comments:

Post a Comment