अगणित वेळा "गँग्स ऑफ वासेपूर" बघून झालाय. ही कथा जरी बदल्याची वाटत असली तरी यात बदल्यापेक्षाही महत्वाचं आहे ते "वास्सेपूर" वर वर्चस्व. आणि हेच वर्चस्व राखण्यात शेवटपर्यंत यशस्वी होतो तो "रामाधीर सिंग"(तिगमांशू धुलिया). तस या सिनेमात सगळ्याच व्यक्तिरेखा या ग्रे शेड च्या आहेत. पण सिनेमा सरदार खान (मनोज बाजपेयी) आणि त्याच्या कुटुंबियांच्या POV ने दिसत असल्यामुळे यातील रामाधीर सिंग हा व्हिलन वाटू शकतो.
रामाधीर सिंग हे माझं या सिनेमातलं सर्वात आवडीचं पात्र. कारण पूर्ण सिनेमात तोच एक व्यवहारी, विचार करून काम करणारा, शांत, संयमी असा आहे. याउलट सरदार खान असो की फैझल (नवाझुद्दीन) ह्यांच्या डोक्यात सदासर्वकाळ खूनखराबा, बदला हेच सुरु असतं. वर्चस्वाच्या या लढाईत रामाधीर शांत डोक्याने यांच्या कुटुंबातील एकेका व्यक्तीला संपवतो. रामाधीर च्या तरुणपणात त्याला त्याच्या कोळश्याच्या खाणीतल्या मजुरांवर त्याचा वचक राहावा म्हणून तो सरदार खानच्या वडिलांना म्हणजेच शाहिद खान (जयदीप अहलावत) ला पैलवान म्हणून नेमतो. शाहिद खान ची पुढची खाण ताब्यात घेण्याची महत्वकांक्षा पाहून तो अगोदर त्याला संपवतो. नंतर वडिलांच्या हत्येचा बदला म्हणून सरदार खान रामाधीर च्या मुलाच्या एका चुकीमुळे एकदम त्याच्या बरोबरीने उभा ठाकतो. इथं आपल्या मुलाला रामधीर एकदम कॅव्हेन्शिअली म्हणतो, "बेटा, तुमसे ना हो पायेगा" या मुळातच डायलॉग नसलेल्या वाक्याला अजरामर करून टाकलंय ते फक्त रामाधीरनेच. पुढे सरदार खान च वाढलेलं प्रस्थ कमी करण्यासाठी रामाधीर पठाण-कुरेशी यांच्यातील जातीय वादाचा फायदा उचलून पठाण असलेल्या सरदार खान च्या विरोधात सुलतान कुरेशी (पंकज त्रिपाठी) ला ताकत देऊन. रामाधीर पद्धतशीर पणे सरदार ला आपल्या मार्गातून बाजूला करतो. सरदारच्या मोठ्या मुलाला देखील संपवतो. सरदार नंतर त्याचा मुलगा फैझल परत रामाधीर विरुद्ध बदला आपल्या बापका, दादाका, भाईका बदला घेण्यासाठी उभा राहतो. शेवटी रामाधीर ला मारून तो यशस्वी देखील होतो. पण फैझल ला ते सुख जास्त काळ नाही मिळत. कारण चतुर रामाधीर ने फैझल आणि त्याच्या सावत्र भावात फूट पाडून, स्वतः मेल्यानंतरही तो फैझलला देखील संपवतो.
तिगमांशु धुलिया खूप चांगला दिग्दर्शक असला तरी रामाधीर सिंग ची भूमीका ही त्याच्यातल्या अभिनेत्याचं पडद्यावरच पदार्पण होत. आपल्या पहिल्याच सिनेमात समोर मनोज बाजपेयी, नवाझ सारखे कसलेले अभिनेते असताना देखील तो आपली छाप सोडून जातो. एक मुरब्बी राजकारणी तसेच कोल्ड ब्लडेड बाहुबली चा रोल तिगमांशूच बरोबर करू शकतो असा विश्वास ठेवल्याबद्दल अनुराग कश्यपचे पण कौतुक करावेसे वाटते.
गँग्स ऑफ वासेपूर एकदा रामाधीर च्या POV बघितल्यास त्याची प्रत्येक कृती आपल्याला पटायला लागते आणि शेवटी रामाधीरच या वर्चस्वाच्या लढाईत जिंकायला हवा हे देखील मनोमन वाटते. असा हा आपल्या दुष्मनाच्या तीन पिढ्या संपवून स्वतः ही संपणारा माझा आवडता खलनायक कम नायक रामाधीर सिंग.....
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment