Tuesday, April 28, 2020

बाजीराव पेशवे



एकही लढाई न हारता मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकवणारा जिगरबाज रणमर्द बाजीराव बाळाजी भट म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे. 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) हिंदवी स्वराज्याचे कोल्हापूर आणि सातारा असे दोन भाग झाले. कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी हक्क प्रस्थापित केला तर साताऱ्याच्या गादीवर संभाजी महाराज यांचे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आलेले सुपुत्र "शाहू महाराज" यांनी मांड ठोकली. शाहू महाराजांनी स्वतः मैदानात उतारण्यापेक्षा आपल्या अष्ठप्रधानातील पंतप्रधान (पेशवा) याला राज्याचे सर्वाधिकार दिले. म्हणजेच आताच्या लोकशाही मध्ये जसे राष्ट्रपती हे नामधारी असतात आणि सर्व कार्य पंतप्रधानांच्या मार्फत चालते अगदी हेच शाहू महाराजांनी ४५० वर्षांपूर्वी यशस्वी करून दाखवले. शाहू महाराजांनी "बाळाजी विश्वनाथ भट" यांना आपले पेशवे म्हणून संधी दिली. १७२० मध्ये बाळाजींच्या मृत्यूनंतर अनेक जेष्ठ मंत्री आणि सरदार यांना डावलून महाराजांनी बाळाजींचे थोरले सुपुत्र "बाजीराव" यांना पेशवे पदी नेमले. बाजीराव तेव्हा अगदीच तरुण म्हणजे अवघे २० वर्षाचे होते.

बाजीराव यांचा जन्म कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात वडील बाळाजी विशवनाथ आणि आई राधाबाई यांच्या पोटी २७ ऑगस्ट १७०० मध्ये झाला. त्यांना लहान भाऊ देखील होता. जो पुढे आयुष्यभर अगदी सावली सारखा त्यांच्या सोबत राहिला त्याच नाव होतं "चिमाजी आप्पा". बाजीराव वडिलांसोबत लहानपणापासूनच युद्ध मोहिमेवर जात. युद्धाचे बाळकडू त्यांना प्रत्यक्ष रणांगणावर मिळाले होते.  बाजीराव आणि चिमाजी आप्पा ही जोडी अगदी राम-लक्ष्मणसारखी होती. 

१७२० मध्ये पेशवेपदी आल्यावर बाजीरावांनी आपले एकच ध्येय ठेवले. ते म्हणजे दिल्लीसह पूर्ण भारतभर आपल्या मराठी साम्राज्याचा विस्तार करायचा. यासाठी शाहू महाराजांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. तर भाऊ चिमाजी आप्पाची अखंड साथ होती. बाजीरावांना उत्तरेत कूच करायचे असल्यास दक्षिणेत शांतता हवी होती. आणि दक्षिणेत मराठ्यांचा एकच शत्रू होता "निझाम". त्याला शांत करण्यासाठी बाजीरावांनी निझामाचा मुलुख असलेला खान्देश, बुऱ्हाणपूर, जालना हे प्रांत उध्वस्त केले, त्यामुळे चिडून निझाम बाजीरावांवर चालून आला. पालखेड येथे दोघी सैन्य आमनेसामने आले. निझामाचा पराभव करून बाजीरावांनी त्याच्यासोबत शांततेचा करार केला, सोबतच मराठ्यांना दक्षिणेत कर वसूल करण्याचा हक्क देखील मिळाला.

बाजीराव आपला कारभार पुण्याजवळील सासवड या गावी राहून करत होते. पण जसा कार्यभार वाढला तशी जागेची कमतरता भासू लागली. त्यामुळे त्यांनी पुणे शहरात आपले बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला. वाडा बांधण्यासाठी जागेचा शोध सुरु असताना एके दिवशी एक विलक्षण घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडली. मुठा नदीच्या काठावर त्यांना एका जागेवर एक कुत्रा घाबरून पळताना दिसला आणि त्या कुत्र्याचा पाठलाग चक्क एक ससा करत होता. बाजीरावांना याच मोठं आश्चर्य वाटलं, त्यांनी तेव्हाच ठरवलं कि आपला वाडा याच जागेवर बांधला जाईल कारण ही जागा पराक्रमाची साक्ष देतेय. आणि अश्याप्रकारे पुण्याचं वैभव असलेला बाजीरावांचा जगप्रसिद्ध असा "शनिवार वाडा" त्या जागेवर बांधला गेला. येणाऱ्या काळात हाच शनिवार वाडा हिंदुस्तानातील सर्वात मोठे राजकीय केंद्र ठरला.   

बाजीराव माळवा (आताच ग्वाल्हेर) वरील मोहीम यशस्वी करून परतत असतानाच त्यांना राजस्थानातून राजा छत्रसाल बुंदेला याचा मदतीसाठी खलिता मिळाला. मोघलांनी बुंदेलखंडच्या किल्ल्याला वेढा घातला होता आणि लवकरच ते किल्ल्यावर चढाई करणार होते. त्यामुळे राजा छत्रसालने बाजीरावांना लवकरात लवकर मदतीसाठी येण्याचे आवाहन केले. बाजीरावांनीही विलंब न करता चढ्या घोड्यानिशी बुंदेलखंडाकडे धाव घेतली. दिवसरात्र प्रवास करून अवघ्या दोन दिवसात ते बुंदेलखंडात दाखल झाले, आणि त्यांनी मोघलांचा वेढा मोडीत काढून राजा छत्रसालाची सुटका केली. याबद्दल खुश होऊन राजा छत्रसालाने बाजीरावांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतानाच  मोठी वतनदारी बाजीरावांच्या नावावर केली. तसेच आपली दासीकन्या "मस्तानी" सोबत बाजीरावांचा विवाह लावून दिला.     

राऊंचे पहिले लग्न काशीबाई यांच्यासोबत झाले. काशीबाईंपासून त्यांना तीन मुले झाली. बाळाजी (नानासाहेब), रघुनाथराव आणि जनार्दनराव. आणि मस्तानी पासून त्यांना "समशेरबहाद्दर" नावाचा मुलगा झाला. मस्तानी यांच्या मृत्युच्यावेळी समशेर अवघा सहा वर्षांचा होता. त्यानंतर आपल्या तिन्ही मुलांबरोबर काशीबाईंनी त्याला वाढवले. पुढे पानिपतच्या लढाईत १७६१ मध्ये समशेरचा मृत्यू झाला.

माळवा आणि बुंदेलखंड यांच्यानंतर बाजीरावांनी आपले लक्ष गुजरात कडे वळवले. चिमाजी आप्पा ना गुजरातेत पाठवून त्यांनी तिथला कर वसुलीचा अधिकार मिळवला. चिमाजी अप्पानी पुढे वसई चा किल्ला देखील जिंकून त्याला स्वराज्यात सामील करून घेतले. महापराक्रमी चिमाजी आप्पा यांचा मुलगा देखील त्यांच्यासारखाच होता. "सदाशिवराव भाऊ". मराठ्यांचा अस्तित्वासाठी ज्याने पानिपतचे महायुद्ध लढले. आणि इतिहासात अजरामर झाला.

बाजीराव पेशवे पदी २० वर्षे होते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार हे एकमेव ध्येय ठेऊन त्यांनी वीस वर्ष अहोरात मेहनत घेतली. याकाळात झालेल्या एकही लढाईत त्यांनी पराभवाचे तोंड पहिले नाही. फक्त मिळविला तो विजय आणि विजयच. दक्षिणेपासून ते पार गुजरात, राजस्थान, पंजाब मध्ये माळवा, बुंदेलखंड, ओरिसा पर्यंत त्यांनी मराठा साम्राज्य वाढवलं. दिल्लीवरही जरब बसवला.

सगळीकडे विजय मिळत असताना देखील राऊंचं वैयक्तिक जीवन हे इतके सुखावह नव्हते. खासकरून मस्तानीशी विवाहानंतर. कारण पुण्यातील सनातनी ब्राह्मणांना एका मुस्लिम महिलेचा शनिवार वाड्यातील प्रवेश आणि तो ही पेशव्यांची पत्नी म्हणून पटणारा नव्हताच. त्यामुळे त्यांचा मस्तानीचा स्वीकार मान्य नव्हता. राउंना याची पर्वा नव्हती पण राऊंच्या दुर्दैवाने राऊंच्या मातोश्रींचा देखील मस्तानी ला विरोध होता. आणि राऊंच्या पाठीशी सावली बनून राहणारा चिमाजी अप्पा देखील याबाबतीत त्यांच्या विरोधात होता. आपल्या पतीवरील प्रेमापोटी काशीबाईंचा मस्तानीला इतका विरोध नव्हता, अर्थात त्यांना वाईट मात्र वाटतच होत. सगळीकडून राउंना विरोधाचा सामना करावा लागत होता. रणांगनावर अजिंक्य असलेला हा योद्धा घरातल्या आपल्या माणसांसोबतच्या लढाईत मात्र पराभूत झाला होता. याच विरोधातून राऊंनी मस्तानी साठी पाषाण गावी एक महाल बांधून दिला, मस्तानी समशेरबहाद्दर सोबत तिथे राहू लागली. काशीबाईंप्रमाणे मस्तानी वर राऊंचे नितांत प्रेम होते. युद्धावरून आल्यावर राऊ देखील आपला जास्तीत जास्त वेळ मस्तानी बरोबर घालवू लागले. कारण मस्तानीला विरोध करणाऱ्या शनिवार वाड्यातल्या आपल्या माणसांसोबत त्यांचे मन रमत नव्हते.

घरातील अडचणींना तोंड देत बाजीरावांच्या मोहीम जोरदार सुरु होत्या. मराठ्यांचा सगळीकडे मुक्त संचार सुरु होता. अवघ्या भारतभरातून मराठ्यांना कर वसूली करायला मिळत होती. अश्यातच एकदा मोहिमेवर असताना बाजीरावांना विषमज्वराचा त्रास व्हायला लागला. तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. वैद्य, औषधांचा गुण लागत नव्हता. कारण यावेळी त्यांना आपल्या प्राणप्रिय काशीबाई आणि मस्तानीची सोबत हवी होती. पण मोहिमेवर असल्याने त्या दोघीही त्यांच्यासोबत नव्हत्या. अखेरीस आजच्याच दिवशी दि २८ एप्रिल १७४० रोजी या महान योध्याने बुर्हाणपूरजवळील नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी या गावी कायमची झोप घेतली.

प्रत्येक क्षत्रियाची इच्छा असते की रणांगणात लढताना आपल्याला मृत्यू यायला हवा. पण इथे मृत्यू ही बाजीरावांना रणांगणात गाठायला घाबरला कारण या अजिंक्य योध्याने रणांगणात मृत्युवरही विजय मिळविला असता.

जय भवानी! जयोस्तु मराठा!

शुभम शांताराम विसपुते


   

No comments:

Post a Comment