आज भारतीय जनता पक्षाचा ४० वा वर्धापन दिन. १९५२ साली स्थापन झालेल्या जनसंघातून पुढे १९८० साली आजच्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. जन्माला येऊन धुळीस मिळालेला आणि धुळीतून उठून पुन्हा आकाशात गगनभरारी घेतलेला हा पक्ष आहे. पक्षाची विचारधारा राष्ट्र विकास व राष्ट्रप्रेमी हिंदुत्वाभोवती फिरत राहिली असली तरी पक्षातील शिस्त ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,बजरंग दल आणि अशा अनेक संघटनांचे संपूर्ण सहकार्य आणि कसलीही भिड न बाळगता घेतलेले निर्णय राबवायच्या वृत्ती मुळे भाजप वाढत चालेलला पक्ष आहे. राजकारणात व राजकीय पक्षांच्या मध्ये विचार धारांचे काम फक्त नावा पुरते असते. तुम्ही जनते पर्यंत कोणता चेहरा आणि कोणते उद्देश्य घेऊन पोहोचता ह्यावर तुमचे यशापयश ठरत असते. शिस्तबद्ध संघटन व जोडीला नेतृत्व करायला जर एखादा लोकनेता असेल तर यश निश्चित असते.
आजचा भाजप घडवण्यात सर्वात मोठे योगदान असलेले दोन महानेते लालकृष्ण अडवाणी आणि स्वर्गीय अटलबिहारी वाजपेई होय. दोघांनी ही आपल्या आपल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला उभारी दिली. लालकृष्ण अडवाणी पक्षाचे पडद्यामागचे हिरो होते आणि अटलबिहारी वाजपेयी सर्वाना घेऊन चालणारा देशव्यापी चेहरा. ९० च्या दशकातील अयोध्या प्रकरणानंतर १९९८ साली केंद्रात या दोघींमुळेच पक्षाची सत्ता आली. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झालेत, तर अडवाणीजी गृहमंत्री. २००४ पर्यंत पक्ष सत्तेत होता. नंतरच्या दोघी निवडणुकीत (२००४ आणि २००९) फक्त आदर्श आणि शिस्तीवर लढून पराभव स्वीकारावा लागला.
पक्षाने नंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपला चेहरा म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करायला सुरुवात केली (२०१३) आणि आपल्या आक्रमक अंदाजात नरेंद्र मोदी वर्ष सहा महिन्यात देशभर पोहचले, घरा घरात पोहचले. पक्षाच्या अध्यक्ष पदी अमित शाह ह्यांच्या सारख्या संघटन कौशल्य असलेल्या धुरीण नेत्याला नेमून आपल्या टिम मध्ये निर्मला सितरामन ,किरण रिजिजू सारखे नवीन चेहरे तसेच स्वर्गीय सुषमा स्वराज ,राजनाथ सिंह ,नितीन गडकरी सरांच्या सारखे अनुभवी चेहरे ही घेतले. पक्षातील वय झालेल्या अडवाणी, मुरली मनोहर जोशी सारख्या नेत्यांना विनंती करून व प्रसंगी त्यांची इच्छा नसताना ही घरी बसवले. काहींनी थोडी कुरबुर केली पण भारतीय जनता पक्ष हे शिस्तीवर चालणारे संघटन असल्याने तिथं नाराजीचे रूपांतर विद्रोहात झाले नाही.
नरेंद्र मोदी आता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून आपली दुसरी टर्म सांभाळत आहेत. एका विचारधारेचा पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोदींनी राष्ट्रप्रेम व राष्ट्र प्रथम चा विचार प्रखरतेने देऊन भाजप ला अगदी घरा घरात नेऊन अलगद पोचवले आहे.जिथं मोदी पोचले नाहीत तिथं मोदींच्या विरोधकांनी मोदींना न्यायचे काम स्वहस्ते कळत नकळत रित्या केलेले आहे. नरेंद्र मोदींच्या कृतींना अनुकूल असणाऱ्या सर्व लोकांना विरोधक सरळ सरळ भाजपप्रेमी किंवा भक्त असा शिक्का मारून दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाचे समर्थक स्वतःहून वाढवत चालले आहेत.
घराणेशाही. हि एक अशी गोष्ट कि जी जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये आढळते. पण भाजप त्याला लख्ख अपवाद आहे. तुरळक एक-दोन ठिकाण सोडली तर आज हि कोणत्याही मोठ्या पदावर घराणेशाहीतून आलेली व्यक्ती आरूढ झालेली नाही. गडकरी नेहमी सांगतात तसं पक्षात मुखमंत्राच्या पोटी मुख्यमंत्री, किंवा मंत्राच्या पोटी मंत्री नाही चालत. तुमचं कर्तृत्व हीच तुमची पक्षात पुढे जाण्यासाठीची पायरी आहे. आज एक साधा स्वयंसेवक, कार्यकर्ता ज्याच्या ७ पिढ्यांमध्ये कोणी राजकारणात नव्हतं तो माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे. हीच पक्षाची खरी ताकत आहे.
जर तुम्हाला राजकारणात करिअर करायचे असेल किंवा एका शिस्तबद्ध संघटन मध्ये काम करायचे असेल तर कुणाचे ही भारतीय जनता पक्षात स्वागत आहे. इथं फक्त तुमचे कर्तृत्व बोलेल. तुमच्यात ती क्षमता असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनायचे व्यासपीठ ह्या देशात फक्त नि फक्त भारतीय जनता पक्ष देईल.
भाजप आज तळागाळात किती खोलवर पोचला आहे त्याच उदाहरण नुकतंच मिळालं. सध्या सुरु असलेल्या लोकडाउन मध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळीनाद आणि लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय ते बघून निश्चित झालं कि २०२४ ची निवडून देखील पक्ष आरामात जिंकेल.
देशावर आलेलं कोरोना च संकट लवकरात लवकर निपटून. देश पुन्हा प्रगतीच्या मार्गावर सुसाट पळो हीच आज माझ्या पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रभू रामराया चरणी प्रार्थना. जय श्रीराम...!!!
शुभम शांताराम विसपुते.
No comments:
Post a Comment