Tuesday, March 31, 2020

नंबर २ ची माणसं - झाकोळलं गेलेलं कर्तृत्व



कधी कधी दोन अतिशय कर्तबगार माणसं एकाच कालखंडात आणि एकाच क्षेत्रात कार्यरत असल्यावर दोघांपैकी एकाला जरा झुकत माप मिळत आणि त्यामुळे दुसऱ्या कर्तबगार माणसावर किंचित अन्याय होण्याची शक्यता बळावते. दोघींची महानता सारखी असूनही पहिल्याच्या तुलनेत दुसऱ्याला हवा तितका सन्मान मिळत नाही. हे सर्वच क्षेत्रात असतं. लौकिकाने श्रेष्ठ पण तरीही नंबर २ वर असणारी माझी आवडती माणसं पुढीलप्रमाणे.

अभिनेते : जेव्हा शाहरुख, सलमान, आमिर, अक्षय, अजय हे बॉलीवूड गाजवत होते, तशे ते आताही गाजवतात तेव्हा एका नवख्या अभिनेत्याने या सगळयांना टक्कर देत तुफानी पदार्पण केलं होत. तो म्हणजे ह्रितिक रोशन. बॉलीवूड चा शेवटचा सुपरस्टार. वरील सर्वांच्या तुलनेत मला ह्रितिक आवडतो.
या सगळयांना पुरून उरात त्याने आपलं साम्राज्य उभं केलय. आजही तो ते सांभाळून आहे. वरील सर्व आणि ह्रितिक या आघाडीच्या अभिनेत्यांचा तुलनेत मला मग इरफान खान, के के मेनन हे पण खूप आवडतात. फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठी झालेली हि दोन नावं, त्यासाठीच खास आहे.

अभिनेत्री : माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी , काजोल या जेव्हा सुपरस्टार होत्या तेव्हा हि मला यांच्या तुलनेत तब्बू आणि प्रीती झिंटा आवडायच्या, आजही आवडताच. आताच्या जनरेशन मधील आलीया भट आणि श्रद्धा कपूर जरी तुलनेने जास्त यशस्वी असल्या तरी मला या दोघींपेक्षा जास्त आवडते ती परिणीती चोप्रा. 

संगीत : कुमार सानू आणि अलका याग्निक हि दोघेही ९०च्या दशकातील गाण्यांमधली अढळपद मिळालेली जोडी आहे. सर्वात जास्त गाणी हि यांनीच गायलीय, तसेच सर्वात जास्त अवॉर्ड हि यांनाच मिळाले आहे. तरीही यांच्या नंतर ज्या जोडीचा नंबर येतो ती माझी जास्त आवडती आहे. ती जोडी म्हणजे उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती. तुलनेने सानू-अलका पेक्षा कमी गाणी, पण माझी नेहमीच फेव्हरेट असलेली जोडी.

क्रिकेट : गेल्या दोन दशकांपासून क्रिकेट बघतोय, यात खेळाडूंच्या दोन जनरेशन होऊन गेल्या. पहिल्या जेनरेशन मधली क्लासिक केस हि सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड ची आहे. सचिन हा ऑल टाइम महान खेळाडू आहे. सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. पण द्रविड हि तितकीच गुणवत्ता असलेला. पण दुर्दैवाने सचिन असताना पदार्पण करायला मिळालेला असा खेळाडू. सचिन च्या महान कर्तृत्वापुढे द्रविड च मोठेपण खरंच झाकोळल गेलं. द्रविड ने प्रत्येक वेळी संघासाठी दिलेलं योगदान, बिकट परिस्थिती आधार, वर्ल्डकप मध्ये केलेली विकेटकिपिंग या सर्व गोष्टी त्याची महानता दाखवायला पुरेशा आहेत. द्रविड जर दुसऱ्या देशाकडून खेळाला असता, तर त्याला त्या देशातील क्रिकेटमधील सर्वोच सन्मानाने सन्मान केला गेला असता. दुसऱ्या जनरेशनमधली केस हि विराट कोहली आणि रोहित शर्मा ची. सध्याचा काळातील विराट हा क्रमवारीत एक नंबर आहे आणि रोहित दोन नंबर, बस याहून अधिक काय सांगणार. तरीही माझा ऑल टाइम फेव्हरेट रोहित शर्माच. 

फुटबॉल आणि टेनिस : ब्राझील च्या टीम चा मी अगोदरपासूनच चाहता राहिलोय. रोनाल्डिन्हो, रोनाल्डो जेव्हा पूर्ण जग गाजवत होते. तेव्हा मला त्यांच्या टीम मधला त्यांचा जुनिअर पण त्यांच्याइतकाच प्रतिभावान असा काका आवडायचा. आताच्या काळातील फुटबॉल मधेही मेस्सी, रोनाल्डो, नेयमार यांच्याइतकाच नेदरलँड चा रॉबिन पार्से, सुआरेज, एम्बापे हे आवडतात. टेनिस चा राजा जरी रॉजर फेडरर असला तरी माझा नेहमीच आवडता राफेल नदाल राहिला आहे. 

अशी माझी नंबर २ वर असणाऱ्या आवडत्या लोकांची यादी आहे. नंबर २ वर असणाऱ्या माणसांबद्दल नितांत आदर, तितकंच मनापासून प्रेम आहे. आणि पहिल्याच्या तुलनेत तीच मला जरा जास्त आवडतात. माझ्या नजरेत ते नेहमीच विजेते आहे.

शुभम शांताराम विसपुते   

Monday, March 30, 2020

मोहम्मद कैफ - मैदानावरचा रॉकेट सिंग


१ डिसेंबर १९८०ला उत्तरप्रदेशमधील अलाहबाद येथे एका सर्वसामान्य कुटुंबात मोहम्मद कैफचा जन्म झाला. त्याचे वडील मोहम्मद तारिफ आणि मोठा भाऊ मोहम्मद सैफ हे क्रिकेट खेळायचे. हे दोघेही रणजी ट्रॉफीमध्ये खेळले आहेत. कैफचे वडील क्रिकेटपटू असल्याने त्याला आणि त्याच्या भावाला क्रिकेटचे धडे घरातच लहानपणापासून मिळत होते. त्यामुळे कैफ आणि त्याचे भाऊ लहानपणी क्रिकेटकडे आकर्षित झाले. घरी क्रिकेटला पोषक वातावरण असल्याने तो वडील आणि भावंडांबरोबर क्रिकेट सामनेही टीव्हीवर पहायचा. पुढे त्याची कानपूरमधील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये १२ व्या वर्षी निवड झाली. तिथे त्याचा क्रिकेट सराव सुरु झाला. त्या हॉस्टेलमध्ये स्लाईड ग्राऊंड असल्याने कैफला निडर क्षेत्ररक्षण करण्याची सवय तिथेच लागली. पुढे त्याची १५ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड झाली. तो १९९६ ला १५ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभव करत तो विश्वचषक जिंकला होता.

१५ वर्षांखालील विश्वचषकानंतर कैफने १९ वर्षांखालील विश्वचषकातही स्थान मिळवले. १९९८ ला १९ वर्षांखालील पहिला विश्वचषक खेळला. त्यावेळी संघात विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग हे खेळाडू देखील होते. त्यानंतर कैफने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही उत्तरप्रदेशकडून पदार्पण केले. यानंतर त्याची २००० चा १९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या विश्वचषकात कैफच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते आणि पहिल्यांदाच १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. त्या विश्वचषकात कैफ बरोबरच युवराज सिंग, वेणूगोपाल राव, अजय रात्रा असे खेळाडू होते. विषवचषक जिंकलेला कर्णधार असल्यामुळे कैफ त्यावेळी खूप चर्चेत होता.

२००० साली मार्चमध्ये बंगळुरु येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण या सामन्यात त्याला खास काही करता आले नाही. पुढे त्याला संघातून वगळण्यात आले. या एका सामन्यानंतर तो जवळ जवळ दीडवर्ष भारताकडून खेळला नाही. नंतर २००२ मध्ये कानपूर येथे २८ जानेवारीला कैफचे इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण झाले. खरंतर फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण हीच कैफसाठी त्याची जमेची बाजू होती.

कैफच्या कारकिर्दीत महत्त्वाचा दिवस ठरला तो १३ जूलै २००२ ला झालेला नेटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना. या सामन्यात इंग्लंडने ३२६ धावांचे भलेमोठे आव्हान भारताला दिले होते. तेव्हा भारताने १५० धावा करायच्या आतच ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यात सेहवाग, गांगुली, सचिन, द्रविड आणि मोंगिया यांचा समावेश होता. पण कैफने युवराज सिंगबरोबर ६ व्या विकेटसाठी केलेल्या १२१ धावांची भागिदारी करत या सामन्याला रोमांचक वळण दिले होते. युवी बाद झाल्यावर कैफने हरभजन सिंग आणि झहीर खान यांना हाताशी घेत सामना शेवटपर्यंत नेला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात अखेर कैफ आणि झहीरने विजयी धाव घेत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्या सामन्यात कैफने सर्वाधिक नाबाद ८७ धावांची खेळी केली होती. तसेच युवराजने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यावेळी विजयानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले होते. गांगुलीच हे सेलिब्रेशन जगभर गाजलं होत.

कैफ या विजयानंतर टीम चा रेगुलर मेम्बर झाला.  त्याला कर्णधार गांगुलीकडून मोठा पाठिंबा मिळत होता. गांगुली त्याला म्हणायचा फलंदाजीत तू जरी ३० धावा केल्या आणि क्षेत्ररक्षणात तू जर २० धावा वाचवणार असशील तर तू नक्कीच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कैफही गांगुलीचा हा विश्वास खरा करत अनेकदा भन्नाट झेल घेत कधी चांगला थ्रो करत धावा वाचवत होता. २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये केवळ कैफ ला खेळता यावं म्हणून विकेटकीपर ची जागा द्रविड ने घेतली, त्यामुळे भारताला एक कैफ च्या रूपात एक एक्सट्रा बॅट्समन खेळवता  आला. कैफ चा एक कॅच माझ्या आजन्म लक्षात राहील तो म्हणजे  पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानला शेवटी विजयासाठी ८ चेंडूत १० धावांची गरज असताना समोर शोएब मलिक सारखा बॅट्समन बॅटिंग करतोय, बॉलिंग ला झहीर खान आहे. झहीर च्या फुल्ल लेन्थ चेंडूवर मलिकने समोरच्या बाजूला उंच शॉट मारला. त्यावेळी मिडऑफ वरून बादानी आणि मिडॉन वरून कैफ हे दोघी कॅच घेण्यासाठी पळत आले. दोघांचं लक्ष फक्त बॉलवर होत. आणि दोघांची धाडकन टक्कर झाली, यात बादानी च्या चेहऱ्यावर कैफ चा गुडघा लागला, पण कैफ ने कॅच नाही सोडला. पुढे अर्थातच हा सामना भारताने जिंकला. "कॅचेस विन द मॅचेस" ही महान कैफ ने तेव्हा खरी करून दाखवली होती. नंतर  वनडेत तो शेवटच नोव्हेंबर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याचा खराब फॉर्म आणि नंतर संघात आलेल्या युवा क्रिकेटपटूंमुळे पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणे त्याला कठीण गेले. त्यामुळे त्याला वगळण्यात आले.

कैफने भारतीय संघातून वगळल्यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेणे सुरु ठेवले होते. त्याने आयपीएलमध्ये सुरुवातीचे काही सिझन खेळले. पहिल्या सिझनला तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात महागडा खेळाडू होता. त्यानंतर त्याने किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून खेळला. पण तो आयपीएलमध्ये खूप यशस्वी होऊ शकला नाही.  २०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही तो उभा राहिला होता. पण त्याचा पराभव झाला.

कैफने २०१८ मध्ये १३ जूलैला म्हणजेच २००२ ला झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या विजेतेपदाला १६ वर्ष पूर्ण झाली त्यादिवशी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एकवेळी गांगुली नंतर कर्णधारपदाचा दावेदार समजला जाणारा कैफ खराब फॉर्ममुळे चांगला फिटनेस असतानाही भारतीय संघात टीकू शकला नाही.

जरी कैफ खूप यशस्वी खेळाडू नसला, म्हणजेच त्याच्या कारकिर्दीतील त्याचे एकूण रन्स, शतके मोजायचे तर, पण  त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने त्याने चाहत्यांच्या मनात कायमचे आदराचे स्थान मिळवले. जे आजही कायम आहे.

शुभम शांताराम विसपुते 

Sunday, March 29, 2020

बुद्ध - ज्ञानाचा प्रकाश


इसपू काळात एका राज्यात राजाच्या घरी एका राजपुत्राचा जन्म होतो. अतिशय सुंदर, लोभस असं ते बाळ बघून पूर्ण नगरीला आनंद होतो. राजपुत्र कमालीचा हळवा असल्याने, बाहेरच्या जगातील दुःख पाहून त्याने स्वतःला त्रास करून घेऊ नये म्हणून राजा त्याला राजमहालातील बाहेरच्या जगाशी संपर्क करू न देणाऱ्या भिंतीच्या आत वाढवतो. तिथेच त्याच शिक्षण, बालपण वैगेरे सगळं होत. हा मुलगा मोठा होऊन जग जिंकेल असं भविष्य त्या राजपुत्राबद्दल ज्योतिषाने वर्तवलं असत. राजा साठी ज्योतिषाचे बोल हे दिलासा देणारे असतात. पुढे वयात आल्यावर राजा आपल्या लाडक्या पुत्राचं एका सुंदर राजकन्येशी लग्न लावून देतो. राजकुमारलाही सुंदर अपत्य होते. सगळं व्यवस्थित चाललेलं असत. एके दिवशी राजवाड्यातील सेवक रथाची काही दुरुस्ती करत असतो. त्यानंतर रथाची चाचणी घेण्यासाठी तो सेवक जाणार असतो, तिथं नेमका आपला राजपुत्र उभा असतो आणि योगायोगाने राजा सुद्धा तेव्हा नगरीत नसतो. राजपुत्र त्या सेवकासोबत नगरीत फेरफटका मारण्यासाठी निघतो.

जन्मापासूनच जवळपास २० वर्षे राजवाड्यात घालविल्यानंतर राजपुत्र आज पहिल्यांदा मोकळ्या हवेत आलेला असतो. सेवक रथ चालवतोय आणि राजपुत्र मागे बसून नागरी न्याहाळतोय. असं एकंदरीत चित्र असत. पुढे राजपुत्राला एक अतिशय जख्ख म्हातारी दिसते. तिला तिच्या वाढलेल्या वयामुळे नीट उभं देखील राहता येत नव्हतं. राजपुत्र सेवकाला विचारतो कि हि कोण आहे, सेवक सांगतो कि हि एक गरीब म्हातारी आहे, वय वाढल्यामुळे तिला हा त्रास होतोय. राजपुत्र सेवकाला विचारतो कि मी देखील असाच म्हातारा होईल का, सेवक हसून उत्तर देतो कि म्हातारपण कोणालाच चुकलं नाहीय. राजपुत्राच्या मनात चलबिचल होते. पण ते पुढे निघतात तेव्हा राजपुत्राला एक तरुण रक्ताची उलटी करताना दिसतो. राजपुत्र सेवकाला विचारतो याला काय झालय. सेवक सांगतो कि हा खूप आजारी दिसतोय आणि कदाचित थोड्या दिवसात त्याचा मृत्यू देखील होईल. राजपुत्र परत विचारतो, मी पण असा आजारी पडू शकतो का, सेवक लगेचच सांगतो म्हातारपण तसे आजारपण दोघीही येतातच. हे पाहून राजपुत्र सुन्न होतो. ते परत येतात.

परत आल्यावर राजपुत्र अक्षरशः तळमळतो. तो खूप विचार करतो की, राजवाड्यात अतिशय चांगलं विलासी जीवन जगून देखील जर या वेदना आपल्याला होणारच असतील, त्या कोणालाच टाळल्या नाहीत. तर मग आपलं हे ऐषोरामाचं जीवन जगून उपयोग काय आहे. नंतर मनाशी निश्चय करून एका रात्री तो आपली पत्नी, अवघ दीड वर्षाचं बाळ, आपला परिवार, आपला महाल हे सगळं सोडून नगरीबाहेर निघतो. नक्की कुठे जायचं हे ठाऊक नसताना देखील तो निघतो, त्याच ध्येय निश्चित झालेलं असत. त्याला ज्ञान प्राप्ती करून या जगण्याचं कोड सोडवायचं असत. जगण्यातील अडचणीचं मूळ त्याला जाणून घ्यायचं असत. धर्माचे, प्रार्थना करणारे विविध गट तेव्हा होते, या सगळयांची भेट घेत, त्यांच्याकडून जमेल तस ज्ञान घेत राजपुत्र आपल्या मार्गावर निघालेला असतो. एक कुशाग्र असा तरुण योगी ला पाहून अनेक लोक त्याच्यासोबत जोडले जात असतात. ज्ञानसाधनेचे काही प्रकार हि त्याने शोधलेले असतात. पण तरीही त्याच अजून समाधान झालेलं नसत. वर्षांमागून वर्षे निघून जात असल्याने त्याचे सहकारी हि आता कमी होत गेलेले असतात. आता केवळ पाच अनुयायी त्याचा सोबत मार्गक्रमण करीत असतात.

केवळ ध्यान आणि साधना यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि प्रवासात खाण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते सगळे खूप अशक्त झालेले असतात. पुढे प्रवासात "निरंजना" नदी ओलांडत असताना तोल जाऊन राजपुत्र नदीत पडतो प्रवाहासोबत वाहून जात असलेला राजपुत्राला एका ओंडक्याचा सहारा मिळतो. इतर अनुयायांच्या मदतीने तो किनाऱ्यावर येतो. तेव्हा तो आपल्या ज्ञानसिद्धीच्या त्याने निवडलेल्या मार्गाबद्दल परत विचार करतो, त्याला या निवडलेल्या मार्गात कष्ट फार दिसतात शिवाय मरणाची त्याची गाठ झालेलीच असते. तेव्हा तो ठरवतो कि बस्स आता फक्त "ध्यान" करायचं. कारण शरीराकडे दुर्लक्ष झालेले चालणार नव्हते. तो रोज थोडे-थोडे अन्न सेवन करून ध्यान करीत असे. त्याच्या अनुयायांना वाटलं की राजपुत्र आपल्या मार्गातून भरकटलाय, म्हून त्याचे पाच ही अनुयायी त्याला सोडून निघून जातात.

आता अनुयायी जरी नसले तरी त्याचा मात्र निर्धार पक्का झालेला असतो. तो मजल दरमजल करत प्रवास करत असतो. एके दिवशी अचानक त्याला पिंपळाचे झाड दिसते. आता त्या झाडाखालीच बसून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळाल्याशिवाय न उठण्याचा निश्चय करून तो ध्यानाला बसतो. तब्बल ४९ दिवसांच्या अविरत ध्यान साधनेनंतर त्याला वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी ज्ञानप्राप्ती होते. ज्या झाडाखाली बसून राजपुत्राला ज्ञानप्राप्ती होते ते झाड म्हणजे "बोधिवृक्ष", बोधिवृक्ष ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे "बोधगया".

आपला राजपुत्र पण साधासुधा नव्हता तो म्हणजे "राजा शुद्धोधन" व "महाराणी महामाया" यांच्या पोटी जन्माला आलेला "राजपुत्र सिद्धार्थ गौतम" होता. पुढे त्याने ज्ञानप्राप्तीनंतर आपली बुद्धी आपल्या नियंत्रणात आणून स्वतःला "बुद्ध" बनवले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे, तर ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य.

आज आपल्याच देशातील काही बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी शिवाजी महाराज,आंबेडकर, सावरकर, टिळक ह्यांच्या प्रमाणे बुद्धा ना ही केवळ एका जाती, पंथापुरते संकुचित बनवले आहे, आणि सगळ्यात दुःखद जर काही असेल तर ते हेच आहे.

शुभम शांताराम विसपुते

Saturday, March 28, 2020

रांझना - धर्माच्या पलीकडली लव्हस्टोरी



दिग्दर्शक आनंद एल राय चा २०१३ साली आलेला हा सिनेमा. फक्त रहमान च संगीत आहे म्हणून थिएटर ला बघायला गेलेलो. नंतर मात्र एकाच आठवड्यात माझा मित्र हरीश आणि मी ३ वेळा हा सिनेमा पाहिला. माझ्यासारख्या थ्रिलर जॉनर च्या सिनेमांची आवड असणाऱ्या मुलाने एक लव्ह स्टोरी असलेला सिनेमा थिएटर ला ३ वेळा आणि नंतर असंख्य वेळा बघण्याचे खरं कारण म्हणजे एक सिम्पल लव्ह स्टोरी ला दिग्दर्शकाने थोड्याश्या ट्विस्ट अँड टर्न ने दिलेली ट्रीटमेंट आणि अर्थातच धनुष चा अभिनय.

बनारस मध्ये राहणारा एक तमिळी ब्राह्मण मुलगा कुंदन (धनुष) एक कडव्या मुस्लिम घरी जन्मलेल्या झोया (सोनम कपूर) मुलीची ही कथा. लहान असताना अगदी पहिल्यांदा झोया ला नमाज पढताना बघितल्यावर कुंदन तिच्या प्रेमात पडतो. या वेळी बॅकग्राऊंडला असलेला धनुष च्या आवाजातील डायलॉग पण खास आहे. "नमाज मी वो थी पर लगता हें दुआ मेरी कुबुल हुई हे". नंतर शाळेत दोघांची भेट होते. सुरुवातीला ती त्याला इग्नोर करत असते. पण तो ही हीच पाहिजे यासाठी अडलेला असतो. शेवटी तिच्याकडून १७ वेळा थप्पड खाल्ल्यावर ती त्याला हो म्हणते आणि मग बॅकग्राऊंड ला वाजत असलेल्या "हमका इशक हुआ हे यारो" या जुन्या गाण्यावर कुंदन जबरी नाचतो एकदम. पुढे झोया च्या घरी याबदल माहित पडतं आणि अर्थातच तिच्या घरच्याना हे मान्य नसत. त्यामुळे तिला दिल्ली ला शिकायला पाठवले जाते. नंतर ती जेव्हा परत येते. तेव्हा कुंदन ला वाटत त्याच प्रेम परत आलाय. पण झोया ने कुंदन सोबतच प्रेम हे केवळ लहानपणीच अल्लड वयातलं प्रेम असं समजून ती कुंदन ला साफ विसरून गेलेली असते. कुंदन आज ही तिच्यावर तितकंच प्रेम करत असतो. ती त्याला सांगते लहानपणीच्या गोष्टी लहानपणीच विसरलेल्या बऱ्या, कुंदन ला मान्य होणं शक्यच नसत. त्याच दरम्यान तीच दिल्लीतल्या तिच्या सोबत शिकणाऱ्या अक्रम (अभय देओल) सोबत बनारस मधेच लग्न होणार असत. कुंदन ही इरेला पेटून शपथ घेतो कि ज्या दिवशी झोया च लग्न होईल त्याच दिवशी मी पण लग्न करेल म्हणून त्याच्या जिवलग मित्र मुरारी (झिशान अयुब) च्या बहिणीसोबत जी कुंदन वर जीवापाड प्रेम करत असते पण कुंदन च तिच्यावर अजिबात प्रेम नसत अश्या बिंदिया (स्वर भास्कर) शी लग्न करायचं ठरवतो. झोया च्या लग्नात कुंदन काय "ट्विस्ट" आणतो आणि तिथून सगळा सिनेमा कसा "टर्न" हे पाहण्याची मज्जा आहे.

पहिल्यांदा बघितल्यावर हा चित्रपट ओके ओके वाटतो पण नंतर जेवढ्या वेळा आपण बघू तेवढ्या वेळा हा चित्रपट आणि आपला हिरो कुंदन च्या नव्याने प्रेमात पडत जातो.उनाडक्या करणारा, फारसे शिक्षण नसणारा पण प्रेमात मात्र शंभर टक्के पाडणारा कुंदन अभिनेता धनुष ने अफलातून रित्या रंगवलाय.तो 15 वर्षांचा दाखवलाय तेव्हा ही तो 15 वर्षांचा वाटतो आणि 25 वर्षांचा दाखवलाय तेव्हा तो 25 वर्षांचा वाटतो! सोनम कपूर सारख्या अभिनेत्री कडून ते बरे काम करून घेतले आहे आनंद राय ने. अभय देओल नेहमी प्रमाणे भारी. खरी गमंत आणतात ते कुंदन चे मित्र झालेले मुरारी आणि बिंदिया, झिशान आणि स्वर ने चाबूक काम केलय एकदम.

चित्रपटाचे  संवाद ही अतिशय भिडणारे आहेत.कोणत्याही प्रेमात असणाऱ्या,नसणाऱ्या मुलांना व मुलांच्या मित्रांना ही पटकन अपील करणारे आहेत.मी पहिल्या सीन पासून जुडला गेलेलो ह्या चित्रपटासोबत आणि त्याचे कारण फक्त नी फक्त धनुष होते.त्याचे ते एकतर्फी प्रेम इतके मनाला भिडते कारण तसे प्रेम आयुष्यात कुणा न कुणावर आपण सर्वांनी केलेले आहे ,ज्यांनी केले नाही त्यांना पुढं जाऊन कधी न कधी होईल एकतर्फी प्रेम ! चित्रपटाची पहिली फ्रेम असो की शेवटची ,कुंदन च्या डोळ्यात झोया ला घेऊन असलेले प्रेम अतिशय सुस्पष्ट दिसते हेच ह्या चित्रपटाचे खरे यश होते.

ह्या चित्रपटातील संवाद आज ही अनेकांच्या व्हाट्स अप स्टेटस ला मी बघतो .ते संवाद काही खूप काही फिलॉसॉफी मांडणारे वगैरे नाहीत पण कुठंतरी आपल्या मनातल्या भावना मांडतात ते. सगळेच प्रसिद्ध असलेले संवाद काही मी इथं लिहीत बसणार नाही पण माझ्या मनातून अजून न गेलेला क्लायमॅक्स ला असलेला धनुष तो डायलॉग तो आज हि तितकाच भावतो. खूप मोठा डायलॉग आहे. लेखाच्या शेवटी तो दिलाय.

चित्रपटाला संगीत आहे लिजंडरी संगीतकार ए आर रहमान च. अस्सल भारतीय टच असलेली सगळीच गाणी खणखणीत आहे. संगीतासोबतच बॅकग्राऊंड पण रहमाननेच केलय. पूर्ण अलबम निव्वळ अप्रतिम असा आहे. श्रेया च "बनारसीया" प्रेमात पाडत. "तुम तक" पण खासच आहे. सुखविंदर च्या आवाजतील "पिया मिलेंगे" सारखं पॉवरफुल गाणं आहे. लग्नातली धमाल दाखवणार "ऐ सखी" सारखं गाणं आहे. "तू मन शुधी" थोडं रॉकिंग कॉलेज सॉन्ग आहे. तर  "नजर लाये" सारखं प्युअर रोमँटिक गाणं देखील अलबम मध्ये आहे आणि सर्वात शेवटी स्वतः रेहमानच्या आवाजातलं "ऐसे ना देखो" सारखं शांत संयत गाणं आहे, त्यातले शब्द हे काळजाचा ठाव घेणारे आहे.

रांझना कुणाला आवडो न आवडो. ज्याला तेव्हा बघताना आवडला नसेल तर आता बघा, हा चित्रपट आणि कुंदन हे न विसरले जाणारेच आहेत !

शुभम शांताराम विसपुते


(धनुष चा क्लायमॅक्स चा डायलॉग)

‘बस इतनी हि कहानी थी मेरी..
एक लडकी थी जो बगल मे बैठी थी, एक कुछ डॉक्टर जो अभी भी इस उम्मीद मे थे कि शायद ये मुर्दा फिर जाग पडे..
एक दोस्त था, जो पागल था.. एक और लडकी थी जिसने अपना सब कुछ हार दिया था मुझपे..
मेरी मा थी, बाप था, बनारस कि गलिया थी, और ये एक हमारा शरीर था जो हमे छोड चुका था.

ये मेरा सीना जिसमे अभीभी आग बाकी थी..
हम उठ सकते थे, पर किसके लिये? म चीख सकते थे, पर किसके लिये?
मेरा प्यार झोया, बनारस कि गलिया, बिंदिया, मुरारी, सब मुझसे छूट रहा था.

मेरे सीने कि आग या तो मुझे जिंदा कर सकती थी या मुझे मार सकती थी.
पर साला अब उठे कौन? कौन फिरसे मेहनत करे दिल लगाने को.. दिल तुडवाने को..
अबे कोई तो आवाज दे के रोक लो!
ये जो लडकी मुर्दा सी आखे लिये बैठी ही बगल मे, आज भी हा बोल दे तो महादेव कि कसम वापस आ जाए!
पर नही, अब साला मूड नही. आखे मुंद लेने मे हि सुख है, सो जाने मे हि भलाई है.

पर उठेंगे किसी दिन.. उसी गंगा किनारे डमरू बाजाने को.. उन्ही बनारस के गलियो मे दौड जाने को, किसी झोया के इश्क मे फिर से पड जाने को..!’

Friday, March 27, 2020

आणि काय हवं ?... - तरल नात्याची सरळ गोष्ट...



MX प्लेअर ची गेल्यावर्षी प्रदर्शित झालेली वेब सिरीज. नुकताच या सिरीज चा दुसरा सीजन देखील येऊन गेला. अतिशय साधी सोपी अशी हि सिरीज आहे. नवरा बायको च्या रोजच्याच आयुष्यावर बेतलेली. सिरीज ची कथा एकदम साधी सिम्पल आहे, एका एपिसोड मध्ये संपणारी. प्रत्येक एपिसोड ला नवीन कथा असल्याने कुठलाही एपिसोड कधीही बघू शकतो. दोन्ही सीजन मध्ये प्रत्येकी ६ एपिसोड्स आहेत. तेही फक्त १८ ते २० मिनिटांचे. एका बैठकीत पूर्ण सीजन पाहून होतो. दोन्ही सीजन MX प्लेअर वर पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध आहेत.

साकेत (उमेश कामत) आणि जुई (प्रिया बापट) या रिअल लाईफ कपल ची प्रत्यक्ष आयुष्यातील जी उत्तम केमिस्ट्री आहे ती स्क्रीन वर देखील दिसते. दोघीनी एकदम छान काम केलंय. प्रिया मस्तच काम करते पण इथं उमेश थोडा तिला वरचढ झालाय. इतकं सहज सुंदर त्याने काम केलय. त्याच्या क दर्जाच्या फालतू जोक्स वर तीच इरीटेट होणं हे बघायला छान वाटतं. उमेश आणि प्रिया व्यतिरिक्त तिसरं कुठलंही मुख्य पात्र यात नाहीये, आणि जी हि पात्र आलीत ती अगदीच थोड्या वेळासाठी असल्याने सिरीज चा पूर्ण फोकस हा या दोघींवरच आहे.

सिझन १ : पहिला एपिसोड आहे "नवं घर" यात दोघीही पुण्यात आय टी सेक्टर मध्ये काम करणारी आहेत. त्यांचा नवीन घरातला प्रवेश यावर हा एपिसोड आहे. पूर्ण एपिसोड नवीन घर कसं लावायचं, सजवायचं यावरच आहे. शेवटी साकेत जुई ला जो सरप्राईझ म्हणून बॉक्स देतो त्या हैप्पी नोट वर एपिसोड वर संपतो, अर्थात सिरीज चे सगळेच एपिसोड हे हैप्पी नोटवरच संपतात. पुढच्या एपिसोड मध्ये दोघी "नवी कार" घेतात. त्या कार घेताना शो-रूम मधल्या सेल्समन सोबतच सीन धमाल आहे. नंतर कार वर पडलेल्या ओरखडा मिटवण्यासाठी केलेले विविध प्रयोग मजा आणतात. तिसऱ्या एपिसोड मध्ये साकेत ला त्याची आई बनवते तशी "पुरणपोळी" खायची असते. जुई ला तो नेहमी हिणवतो कि तुला माझी आई बनवते तशी पुरणपोळी कधी जमणारच नाही. शेवटी ती पहिल्यांदा खूप कष्टाने पुरणपोळी बनवते आणि साकेत ला सरप्राईझ देते. पुरणपोळी खाताना साकेत आई ला फोन करतो आणि नंतर जो धक्का दोघीना बसतो तो बघण्यासारखा आहे. चौथ्या एपिसोड मध्ये दोघीना आपल्या रोजच्या ऑफिस वर्क मधुन "छोटी सुट्टी" हवी असते. ती ते कशी मिळवतात आणि कुठे जाण्याचा प्लॅन करतात ते या एपिसोड मध्ये आहे. थोडासा संथ आहे पण एकंदरीत हा एपिसोड चांगला आहे. पाचव्या एपिसोड मध्ये जुई ला अचानक साक्षात्कार होतो कि तीच वजन वाढलंय. आता "कमी वजन" करण्यासाठी दोघी बिचारे खासकरून साकेत किती कष्ट घेतो ते या एपिसोड मध्ये आहे. शेवटच्या आणि सहाव्या एपिसोड मध्ये एका रात्री अचानक उठून जुई ला साकेत शी तिच्या पास्ट बद्दल "मोकळं मन" करायचं असत. मग विषय निघालाच असतो तर दोघी ठरवतात कि दोघीनी आपल्या पास्ट बद्दल सांगावं. एकच नंबर असलेला हा एपिसोड या लेखाच्या शेवटी दिलेल्या शायरी वर संपतो.

सिझन २ : पहिल्या सिझन सारखाच हा सिझन आहे. दोघींच्या लग्नाला आता ३ वर्षे झालीत. पहिला एपिसोड दोघी त्यांच्या मित्र आणि त्याच्या बायको बरोबर रेस्तराँत जेवण करताना अचानक मित्राने त्याच्या घरी पाळलेल्या 'चिनू' या कुत्र्याचा विषय निघतो. मग नंतर हे दोघी ठरवतात कि "कुत्रा कि मांजर" यातलं काय पाळायचं. ते नेमकं काय पाळतात कुत्रा कि मांजर त्यांना कसे मिळतात हे या एपिसोड मध्ये आहे. पुढल्या एपिसोड मध्ये साकेत चा मित्र असलेल्या धनंजय माने (प्रियदर्शन जाधव) कडे असलेल्या  तबल्याच्या गाद्या (तुंबळ) घेण्यासाठी दोघी जातात. तिघांचा त्याच्या घरातला सीन अगदी तुफान झालाय. प्रियदर्शने केवळ त्याच्या जबरी एक्स्प्रेशन वर अक्खा सीन खाल्लाय. तुंबळ घरी आणल्यावर साकेत ला तबला शिकायची हुक्की येते आणि नंतर तो कसं "धा धिं धा" करतो हि बघायची मजा आहे. तिसऱ्या एपिसोड मध्ये साकेत च "छोटं आजारपण" उदभवत म्हणजे त्याला फक्त सर्दी होते. पण त्या आजारपणाचा तो किती बाऊ करतो. जुई ला किती त्रास देतो आणि तीपण त्याची किती काळजी घेते हे सगळं या एपिसोड मध्ये आहे. चौथ्या एपिसोड मध्ये जुई च्या गावाकडून तिची मावशी आजी आणि नारळ आजोबा आलेले असतात. आजोबाना "भुताच्या गोष्टी" सांगायची जाम हौस असते. रात्री जेवणाला बसताना लाईट जाते, तेव्हा मेणबत्तीच्या प्रकाशात ते गोष्ट सांगतात. त्या पूर्ण सीन मध्ये ते ज्या प्रकारे गोष्ट सांगतात ते आणि त्यावर घाबरट साकेतची प्रतिक्रिया बघणं म्हणजे निव्वळ धमाल आहे. पाचव्या एपिसोड मध्ये जुई ला तीन दिवसांसाठी बेंगळूर ला बिसनेस मिटिंग साठी जावं लागत त्यामुळे त्यांच्यात जो "थोडा दुरावा" निर्माण होतो. त्यासोबत ते दोघी कशी डील करतात हे या एपिसोड मध्ये आहे. शेवटच्या एपिसोड मध्ये लग्नाची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असताना अचानक "बेबी प्लॅनिंग" चा विषय निघतो. जुई ची  मनापासून इच्छा आणि तयारी असते बाळ जन्माला घालण्याची पण साकेत अजून तयार नसतो. दोघींचं या विषयावर एकमत होत नसत, त्यामुळे रात्री घराच्या गच्चीवर आणि नंतर एका पुलावर दोघी बोलतात. जुई कश्याप्रकारे साकेत ला पटवून देते हे या एपिसोड मध्ये आहे. थोडासा इमोशनल टच त्या शेवटच्या दोघींच्या संभाषणात आहे. जुई च कन्टिन्यू बोलणं आणि साकेत च फक्त आश्वासक नजरेने तिच्याकडे बघणं हे त्या शेवटच्या सीन ला अजूनच डीप बनवत.

वेब सिरीज बघताना प्रत्येक वेळेला हाणामारी, शिव्या, इंटिमेट सीन हे सगळं बघायला मिळेल याची आपल्याला कल्पना असते किंवा थ्रिलर असेल तर डोकं जागेवर ठेऊन एकेक पैलू लक्षपूर्वक बघावा लागतो. पण काही अपवाद असतात "आणि काय हवं...?" सारखे जी जिथं समोर घडत असलेली गोष्ट तुम्हाला डोक्याने नाही तर मनाने बघावी लागते. डोक्याला शॉट लावनाऱ्या या वातावरणात अश्या हलक्याफुलक्या सिरीजमुळे तेवढाच रिलीफ मिळतो.

दोनच शब्दात या सिरीज च वर्णन करायचं झालं तर ते म्हणजे  "कमाल.... बहार..." बस्स इतकंच करता येईल.

दिल की बातो को आज केहना है तुमको...
धडकन बन के तेरे दिल में रहना है हमको...
कही रुक ना जाये मेरी सांसे...
इसलिये हर पल तेरे साथ जीना है हमको.... !


शुभम शांताराम विसपुते 

Thursday, March 26, 2020

कविता कृष्णमूर्ती - दुर्लक्षित राहिलेला स्वर्गीय आवाज



कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम माझी सर्वात आवडती गायिका.२५ जानेवारी १९५८ रोजी दिल्लीत जन्मलेली पण अस्सल दक्षिण भारतीय गायिका. तिच्याबद्दल कुणी फार लिहत नाही, पण तिचा आवाज फार भिडतो. एकच वेळेला रुहानी आनंद ते भळभळणारी वेदना असलेला दुर्मिळ आणि तितकाच दुर्लक्षित असलेला आवाज. गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं अस्तिव टिकवून आहे. १६ विविध भाषांमध्ये २५००० पेक्षा जास्त गाणी गाऊन देखील म्हणावी तशी प्रसिद्धी तिच्या वाटेल आली नाही, याच शल्य आहेच.

कविता ८०च्या दशकापासून गातेय. तिला खऱ्या अर्थाने ब्रेक किंवा ओळख मिळाली ती 'मिस्टर इंडिया ' मधलं 'कहते है मुझको हवाहवाई या गाण्यामुळे, यानंतर कविता एकदम पहिल्या रांगेत आली. श्रीदेवी चा पडद्यावरचा आवाज असं जरी तिला म्हटलं तरी चालेल श्री साठी इतकी गाणी ती गायली आहे.
त्यात मिस्टर इंडिया बरोबरच, नगिना, चालबाज, शेरनी, खुदा गवाह यासारख्या श्री च्या अनेक सिनेमात ती तिचा आवाज झालीय.

कविताला १९९५, ९६ आणि ९७ या सलग तीन वर्षात उत्कृष्ठ गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार अनुक्रमे प्यार हुआ चुपके से (१९४२ लव्ह स्टोरी), मेरा पिया घर आया (याराना) आणि आज मे उपर (खामोशी) या गाण्यांसाठी मिळाला. पुढे २००३ मध्ये डोला रे डोला (देवदास) साठी श्रेया घोषाल सोबत विभागून फिल्मफेअर तिला मिळाला. २००५ च्या  भारत सरकारच्या "पदमश्री" या नागरी पुरस्काराने तिचा सन्मान झालेला आहे.

इच्छा नसतानाही जर सौंदर्याचे परिमाण लावायचे झालेच तर कविता रूढार्थाने सुंदर नाही पण "खूबसूरत" मधील "मेरा एक सपना है" गाणारी कविता स्क्रीन वरच्या उर्मिला मातोंडकर पेक्षा हि सुंदर दिसते. 'मिस्टर इंडिया ' मधलं 'कहते है मुझको हवाहवाई ' आणि हम मधलं 'जुम्मा चुम्मा दे दे' ही गाणी म्हणजे कविता कुठल्याही मूडच गाणं म्हणू शकते याचा अस्सल पुरावा. संजय लीला भन्साळीच्या 'खामोशी - द म्युझिकल  मधलं 'ये दिल सून रहा है ' म्हणजे व्याकुळ झालेली पण हवीहवीशी वाटणारी आठवण आहे. 'झुबेदा ' मधलं 'धीमे धीमे गाऊ ' , 'क्या केहना' मधलं 'ए दिल लाया हे बहार' , 'देवदास' मधलं 'मार डाला ', 'पुकार ' मधलं 'के सेरा सेरा ' अशी किती गाणी सांगायची ज्यातून कविताने निर्भेळ आनंद दिलाय. ९०च्या दशकातील पॉप अल्बम स्टार लकी अली त्याच्या अल्बम मध्ये फक्त सोलो गाणी गायचा पण त्याला देखील कविता सोबत गाण्याचा मोह आवरता आला नाही आणि 'गोरी तेरी आँखे कहे' सारखं अस्सल सोन्यासारखं गाणं त्याने दिलं

मला अत्यंत आवडणारी तिची तीन गाणी जी एकदमच खास आहे. पाहिलं म्हणजे 'बॉम्बे' मधलं 'तू हि रे' हे गाणं जितकं रहमान च्या स्वर्गीय संगीताचं आहे तितकंच कविताच्या दैवी आवाजाचं पण आहे. यात तिचा आवाज जो काही लागला आहे, त्याला शब्दांत नाही सांगू शकत. हे गाणं ऐकताना आपल्या नसांमधून रक्ताऐवजी आनंद वाहत आहे असं वाटत राहत, भोवतालचं सगळं जग सुंदर दिसायला लागत इतकी ताकत या गाण्यात आहे. दुसरं आहे हम दिल दे चुके सनमचं टायटल सॉंग, एका जुन्या चिघळत जाणाऱ्या जखमेची काय वेदना असेल ती वेदना या गाण्यात पुरेपूर भरलीय. एक एक शब्द कविताचा इथं थेट काळीज चिरत जातो. यातील तेरे हो गए हैं हम....हे कविता जेव्हा गाते तेव्हा एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. आणि तिसरं आहे 'रॉकस्टार' मधलं 'तुम को' हे मास्टरपीस गाणं. रहमान ने हा पूर्ण अल्बम मोहित चौहान कडून गाऊन घेतलाय नायिकेसाठी यातील जी दोन गाणी आहे त्यातलं एक रहमान ने खास कविता साठी राखून ठेवलय. इर्शाद कामिलच्या परिसासारख्या शब्दांना कवितांच्या सुरांचा स्पर्श झाला आणि परिसाचाच सोनं झालं.

कविताच वय आता ६० च्या पुढे आहे. पण आवाजाला वय नसतं या न्यायाने तिचा आवाज आजही तितकाच खणखणीत आहे. तिची सध्या सिनेमात गाणी येत नाही अर्थात सध्याच्या ऑटो ट्यून वर गाणाऱ्या गायकांच्या गर्दीत ती गात नाही याच देखील समाधान आहेच. पण नाही सिनेमात तर निदान तिने सोलो अलबम तरी नक्कीच करावा. हीच एक मनापासूनची इच्छा...

शुभम शांताराम विसपुते

Wednesday, March 25, 2020

नदीम-श्रवण - ९० च्या दशकातील जबरदस्त संगीतकार जोडी



आजच्या नवतरुण पिढीला कदाचित यांचं नाव माहित नसेल पण आमच्या वयाच्या तरुणांसाठी जे आता वय वर्ष २५ च्या पुढे आहे आणि १९९० ते २००५ या दीड दशकातील संगीत हे ज्यांच्यासाठी जीव कि प्राण आहे अश्यांसाठी नदीम-श्रवण हे काळजाच्या जवळच नाव आहे.   

नदीम अख्तर सैफीचा जन्म ६ ऑगस्ट १९५४ रोजी मुंबई  येथे संपन्न कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच नदीमला संगीताची आवड होती. नदीम ड्रम, बोंगो आणि कॉन्गो अशी परिपूर्ण वाद्य वाजवत असे. शाळेच्या काळात, त्याने मित्रांसह स्वत:चे बॅन्ड बनविले आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपली कला दाखवायला सुरुवात केली.

श्रावणकुमार राठोड यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५४ रोजी सिरोही राजस्थान येथे झाला. त्यांचे वडील चतुर्भुज राठोड हे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्याने आपल्या मुलांना श्रवण, रूपकुमार राठोड आणि विनोद राठोड यांना प्रशिक्षण देणे सुरू केले. श्रावणने सितार, हार्मोनियम आणि तबला वाजवायला सुरुवात केली. इतर दोघी भाऊ गायक झाले पण श्रवणची ओढ संगीतकार बनण्याकडे होती. 

नदीम आणि श्रावणची पहिली भेट अपघाती ठरली. श्रवणच्या एका मित्राने त्याला महाविद्यालयीन कार्यक्रमात आमंत्रित केले होते जेथे तो गायला जाणार होता. जेव्हा श्रावण हॉलमध्ये गेला तेव्हा त्याने नदीमला स्टेजवर ड्रम वाजवत पाहिले. मध्यांतर दरम्यान त्यांचा परिचय त्यांचा एका कॉमन मित्राने करून दिला. तो त्यांना म्हणाला, "तुम्हाला दोघीना जर संगीतकार व्हायचे आहे, तर तुम्ही दोघी मिळून संगीतकार का नाही होत".  अशा प्रकारे बॉलीवूडच्या पटलावर एक नवीन संगीतकार जोडी उदयास आली. त्यांनी नदीम-श्रावण या नावाने संगीत देणे सुरू केले.

१९७५ सालापासून त्यांनी चित्रपटात संगीत देण्याला सुरुवात केली. सुरुवातीचा काळ मोठा कठीण होता. कारण त्यावेळी बॉलीवूड मध्ये नावाजलेले संगीतकार असल्यामुळे नवख्याना तशी कमीच संधी मिळायची. १९९० साली "आशिकी" आला आणि इतिहास घडला. हा सिनेमा नदीम-श्रवण यांच्याबरोबरच कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि गीतकार समीर यांच्यासाठी त्यांना मिळालेली सर्वात मोठी संधी होती आणि तीच या सर्वानी अक्षरशः सोनं केलं. कारण तोवर हे सर्वच स्ट्रगल करत होते. खरतर आशिकी हा नदीम-श्रवण बनवलेला ऑडिओ कॅसेट अल्बम होता. पण तो रिलीज होण्या अगोदर महेश भट्ट यांनी ऐकला. तो अल्बम त्यांना इतका आवडला की त्यांनी टी-सिरीज चे गुलशन कुमार यांना सांगितले की आपण एक चित्रपट बनवू आणि त्यात ह्या अल्बम ची सर्व गाणी वापरू. महेश भट्ट यांनी कथा लिहिली आणि आशिकीला अनु आगरवाल, राहुल रॉय आणि दीपक तिजोरी हे नवीन कलाकार आले. आशिकीने एक इतिहास रचला आणि तो १९९० चा संगीतमय हिट ठरला. हे सर्व पाचही जण (नदीम-श्रवण, कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि गीतकार समीर) चार्ट बस्टर होते. नदीम श्रावणला आशिकीसाठी पहिली फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आशिकी नंतर नदीम-श्रवण कडे चित्रपट निर्मात्यांची रांगच लागली. इतकी कि कदाचित सिनेमाच्या इतिहासात कोणाकडे नसेल. पण अधिक संख्येने चित्रपट करण्याऐवजी दर्जेदार संगीतावर लक्ष केंद्रित करावे, असा निर्णय दोघांनी घेतला. त्यांनी त्या काळात तब्बल २५० चित्रपट नाकारून एक विक्रमच केला.

पुढची सात वर्षे त्यांनी राज्य केले. या वर्षांत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. आशिकीचा अल्बम ज्या मेलोडी साठी ओळखला गेला तेच लक्षात ठेऊन त्यांनी पुढे संगीत दिले. त्या काळातील साजन, सडक, दिल है की मानता नाही, राजा, दिलवाले, फूल और कांटे, परदेस, राजा हिंदुस्थानी आणि दिवाना ह्या सिनेमांची गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. नदीम-श्रवणच हेच खूप मोठं यश आहे.

१ ऑगस्ट १९९७ मध्ये नदीम-श्रवणला मोठा धक्का बसला. त्यावर्षी गुलशन कुमारचा खून झाला. त्यावेळी देशात नसतानाही नदीम वर या गुन्ह्याबद्दल संशय घेतला गेला. नदीम-श्रवणच्या कारकिर्दीला हा मोठा धक्का होता. ते काही काळ व्यवसायाबाहेर गेले होते. नंतर नदीमने लंडनमध्ये दीर्घ कायदेशीर लढा दिला आणि शेवटी तो निर्दोष मुक्त झाला. नदीमने ब्रिटिश नागरिकत्व घेतले होते. लंडनमध्ये बसून तो श्रवणबरोबर संगीत देत राहिला. २००० साली आलेल्या ‘धडकन’ या चित्रपटाबरोबर नदीम-श्रवणने मोठ्या ब्रेक नंतर जोरदार पदार्पण केले. धडकन ने इतिहास रचला आणि पुन्हा एकदा आशिकी प्रमाणे सर्व गाणी चार्टबस्टर बनली. त्यांनी दोघांनी मिळून २००५ पर्यंत एकत्र संगीत दिले. नदीम श्रावण हे चार वेळा फिल्म फेअर अवॉर्ड्सचे विजेते होते. त्यांनी आशिकी (1991), साजन (1992) आणि दिवाना (1993) साठी सलग पुरस्कार जिंकले. त्यांनी राजा हिंदुस्थानी बद्दल रसिकांची मने ही जिंकली. संगीत उद्योगात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी दोनदा स्टार स्क्रीन पुरस्कार आणि एकदा झी सिने पुरस्कार जिंकला. त्यांनी संगीत दिलेला शेवटचा सिनेमा "दोस्ती" हा होता.

१९७५ साली सुरुवात केल्यानंतर त्यांनी पंधरा वर्षे खूप कठीण संघर्ष केला. आशिकी नंतरच्या म्हणजेच १९९० ते २००५ या  पुढच्या १५ वर्षांत त्यांनी ७५ चित्रपटांमध्ये संगीत दिले आणि त्यातले ५० हिट चित्रपट बनले.९० चे दशक हे नदीम-श्रावणचे होते. १९९६ साली आलेला "राजा हिंदुस्थानी" ने एक वेगळाच इतिहास घडवला. त्याकाळी १ कोटी पेक्षा जास्त ऑडिओ कॅसेट या अल्बम च्या विकल्या गेल्या. त्या दशकातील सर्वात लोकप्रिय अल्बम मध्ये "आशिकी" आणि "दिल तो पागल है" नंतर राजा हिंदुस्थानी चा नंबर होता. नंतर आलेला "परदेस" मध्ये  त्यांच संगीत हे अव्वल दर्जाचं होत. ये दिल दीवाना (सोनू निगम), ये मेरा इंडिया (कविता कृष्णमूर्ती / हरिहरन / आदित्य नारायण / शंकर महादेवन) आणि दो दिल मिले हैं (कुमार सानू). "धडकन" मध्ये  त्यांनी तुम दिल की धडकन में रहते हो (अभिजीत / अलका याज्ञिक) च्या दोन आवृत्त्या तयार केल्या त्यातील एक कुमार सानूच्या आवाजातल एक सॅड व्हर्जन होत. दिल ने ये कहा है दिल से से (उदित नारायण / अलका याज्ञिक / कुमार सानू) आणि अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांची एक दुसरी आवृत्ती, आणि ना ना कारते प्यार (अलका / उदित नारायण). नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या 'दुल्हे का सेहरा' हे धडकनचे मुख्य आकर्षण होते.

नदीम-श्रवण जोडीचा माझा सर्वात आवडता सिनेमा म्हणजे २००२ मध्ये आलेला "राज" हा सिनेमा. नदीम-श्रवणचा हा म्युझिकल मास्टरपीस होता. नदीम-श्रवण आणि गीतकार समीर या तिघांनी मिळून एक वेगळीच दुनिया उभी केली होती. आपके प्यार में (अलका याज्ञीक), जो भी कस्मे (उदित आणि अलका), मे अगर सामने (अभिजीत आणि अलका)  इतना मी चाहु तुझें  आणि मुझे तेरे जेसी लडकी (उदित-अलका) हि सर्वच गाणी म्हणजे त्याकाळातला अमूल्य असा ठेवा आहे. त्याकाळी वॉकमन मध्ये ए साईड आणि बी साईड मध्ये सर्वात जास्त मी राजचीच गाणी ऐकलीय.

अश्या या ९० च्या दशकावर आपल्या संगीताच्या जोरावर निःसंशय पणे राज्य करण्याऱ्या माझ्या आवडत्या संगीतकार जोडी पैकी एक असलेल्या नदीम-श्रवणला माझा मनापासून सलाम...!!!

शुभम शांताराम विसपुते.

Wednesday, March 4, 2020

ब्लॅक फ्रायडे - खराखुरा वास्तववादी सिनेमा




तारीख : ०९ मार्च १९९३
ठिकाण : नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई    
            गुल मोहंमद नावाच्या गुंडाला पोलिसांनी दंगली मध्ये सहभाग असल्याने अटक केली. पोलीस चौकशीत गुल सांगतो की, मुंबईत थोड्या दिवसांनी बॉम्ब फुटणार आहेत. शिवसेनाभवन, मंत्रालय, stock exchange उडवणार आहे. पण हे ऐकून पोलीस त्याला वेड्यात काढतात. त्यानंतर तीन दिवसांनंतर मुंबईच्या इतिहासातील तो भयानक, काळाकुट्ट दिवस उगवतो - १२ मार्च! मुंबईत एक पाठोपाठ एक असे १३ साखळी स्फोट होतात आणि मुंबई हादरते. या प्रसंगापासून अनुराग कश्यपच्या "ब्लॅक फ्रायडे" सिनेमाची सुरुवात होते.
           हुसैन झैदी यांच्या "ब्लॅक फ्रायडे" कादंबरीवर आधारित अनुरागच कश्यप चा सिनेमा. भारतात सर्वप्रथम झालेल्या या भीषण आतंकवादी हल्ल्याचा इतका नेमका आणि अचूक चित्रण करणारा सिनेमा अजूनतरी माझ्या पाहण्यात नाही. टायगर मेमन (पवन मल्होत्रा), राकेश मारिया (के के मेनन) आणि बादशाह खान (आदित्य श्रीवास्तव) या सिनेमातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा.
           सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखा टायगर मेनन  चा माहीम मध्ये उद्योग असतो , १९९२/९३ च्या दंगलीत त्याच्या धंद्याला मोठा फटका बसला आणि त्याने याचा सुड घ्यायचं ठरवलं. त्याने दंगलीत होरपळलेले मुस्लिम तरुण शोधले. त्यांना प्रशिक्षण दिलं आणि स्फोट घडवून आणले. स्फोट घडवतांना झालेल्या एका चुकीमुळे हे सगळे दहशतवादी एका पाठोपाठ पकडले गेले हि या सिनेमाची मुख्य कथा. पुष्कळशा व्यक्तिरेखा आणि भिन्न घटनांचे संदर्भ असलेल्या या सिनेमाची कथा/पटकथा विणणे अतिशय जोखमीचे काम. ९२च्या दंगली, टायगरच प्लँनिंग, दाऊद आणि ISI चा सहभाग, बॉम्बस्फोट, अटकसत्र, बादशाह खान या आरोपीचं पोलीस विटनेस बनणं असा सिनेमाचा प्रवास उलगडत जातो. पुस्तकात आलेल्या तपशीलानुसार घटना जशा घडल्या तशाच दाखवण्यावर भर दिला आहे. त्याला उगीच बॉलीवूड तडका नाही.
             हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीचा संदर्भ असल्याने संवाद अतिशय टोकदार आणि पकड घेणारे आहेत. काही ठिकाणी शिव्यांचा उल्लेख आहे पण तो केवळ गरज म्हणून. इंडिअन ओशननी दिलेलं पार्श्वसंगीत भन्नाट! बॉम्बस्फोट झाल्यावर आलेली सुन्नता दाखवण्यासाठी केलेला संगीताचा वापर केवळ अप्रतिम. सिनेमातील "बंदे" हे गाणं बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. मुंबईतील विविध ठिकाणे, मुस्लिम बहुल वस्ती, दुबई आणि पाकिस्तानात दाखवलेली ठिकाणे कॅमेरातून जिवंत टिपली आहेत. स्फोटाची घटना पडदयावर बघतांना तर छुपे कॅमेरा लावून खरोखर त्या वेळेची घटना चित्रित केली की काय इतकी वास्तववादी वाटतात. हा सिनेमा पाहिल्यावर अनेक धक्कादायक गोष्टींची माहिती मिळते जसं बॉम्बस्फोट झाल्यावर मंत्रालयात जाऊन बेछूट गोळीबार करण्याचा टाइगरचा प्लॅन होता, BMC उडवणार होते पण प्लँनिंग फसल्याने सुदैवाने हे घडलं नाही. मुंबई पोलीसांनी ज्या तडफेने याचा शोध घेतला तो प्रशंसनीय पण त्याच वेळी आपल्याच कस्टमच्या लोकांना RDX चं लँडिंग कधी आणि कुठे होणार आहे याची विस्तृत माहिती असुनही पैसे खाऊन त्यांनी आपला आत्मा विकला.या घटनेला आज जवळपास २७ वर्ष उलटून गेल्यावरसुद्धा त्याची धग तितक्याच तीव्रतेने जाणवते .
           सिनेमा परिणामकारक होण्यासाठी आयडियल कास्टिंग गरजेची असते. मुख्य भूमिकांबरोबरच सिनेमात अनेक लहान-मोठे पात्र आहेत. पण प्रत्येकाने इतकं सुरेख काम केलय की त्यामुळेच सिनेमा अजून वास्तववादी वाटतो.  किशोर कदम (इन्स्पेक्टर डांगले), विजय मौर्य (दाऊद), गजराज राव (दाऊद फणसे), इम्तियाझ अली (याकूब मेनन) महत्वाच्या भूमिकेत दिसतात.
        सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी पण छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत आहे. टायगर मेनन च्या मॅनेजर ची असगर मुकादमची भूमिका त्याने केलीय, सर्वात अगोदर पकडला जाऊन पोलिसाना इतर आरोपींची नावे आणि हल्ल्याचा नेमका घटनाक्रम तो सांगतो. पोलीस स्थानकातील कबुलीजबाब देत असलेला सिन नवाझ ने तुफान साकारलाय.
आदित्य श्रीवास्तव म्हणजेच आपल्या सी.आय.डी. या मालिकेतला इन्स्पेक्टर अभिजित चा अनुरागने एक अतिशय ताकदवर भूमिका आदित्यला दिली आणि आदित्यने त्याचं सोन केलं . आदित्यच्या पात्राचं नाव बादशहा खान असलं तरी त्या पात्राच्या नशिबी एक केविलवाणी फरफट आहे . एका साधा सरळ माणूस धर्माच्या नावावर भडकावला जातो . तो मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात अडकतो . पण त्याला या कटात सामील करून घेणारा टायगर मेमन  पाकिस्तानात निघून जातो . बादशहा आणि त्याच्यासारख्या कित्येक प्याद्यांना वाऱ्यावर सोडून . सर्वस्व हरवलेला विमनस्क बादशाह खान  दिल्ली पासून जयपूरपर्यंत पोलिसांपासून वाचण्यासाठी फिरत राहतो . एका लॉजमध्ये जाऊन 'एक सस्ता कमरा चाहिये , सस्ता ' असं पिळवटून तो बोलतो तेंव्हा हा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे असं माहित असून पण बादशहा खानसाठी काहीतरी तुटत. बादशहा खान मूर्तिमंत साकारणाऱ्या आदित्य श्रीवास्तवला सलाम .
       ब्लॅक फ्रायडे म्हणजे पवन मल्होत्राच्या अभिनयाचा सोहळा आहे. त्यात एक प्रसंग आहे . बॉम्बस्फोट करण्याच्या कटात सामील असणाऱ्यांची एक मिटिंग टायगर मेमन  घेतो . त्यात तो सगळ्यांना एक गर्भित धमकी देतो . "जे लोक तोंड उघडतील त्याला तर मी मारेलच . पण त्याच्या अगोदर त्याच्या अख्ख्या खानदानाला मारेल ."ती धमकी ऐकून पिक्चर पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या अंगावर सरसरून काटा येतो.  दुसऱ्या एका प्रसंगात बादशहा खान ला रूममध्ये बोलवून ,"किधर का बादशाह तू ? " असं गुर्मीत विचारतो आणि त्याला लंबचौड भाषण देऊन,  त्याच ब्रेन वॉश करून त्याला कटात सामील करून घेतो .  दंगलीमध्ये त्याचं दुकान जाळल्यावर "अक्खा माहीम जला देगा मैं, टायगर का ऑफिस जलाता है??" अशी धमकी ओरडून देतो . पवन मल्होत्रा शिवाय ब्लॅक फ्रायडेची कल्पनाच करता येत नाही.
        माझा अत्यंत आवडता अभिनेता के के मेनन ने साकारलेली ऐसीपी राकेश मारिया यांची भूमिका हि त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम भूमिकांतील एक भूमिका आहे. अगदी शांत आणि संयत पोलीस ऑफिसर त्याने उभा केलाय, जो कि टिपिकल बॉलीवूड सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. के के हा गतप्राण व्हायचा विषय आहे. तो भूमिकेचं जे बेअरिंग घेतो आणि सोबत त्याची जबरदस्त डायलॉग डिलेव्हरी म्हणजे हॅट्स ऑफ आहे. या सिनेमात देखील आपल्या जुनिअर्स ऑफिसर्स ला सूचना देणे असो कि पत्रकारांच्या तिरकस प्रश्नांना उत्तरे देणे असो. स्क्रीन वर अगदी खराखुरा पोलीस उभा आहे असं वाटावं इतपत त्याने भूमिकेत जान ओतलीय. 
       या सिनेमात दोन प्रसंग माझ्या अत्यंत आवडीचे आहेत त्यातला पहिला इम्तियाझ गवांदे नावाच्या आरोपीला पकडण्यासाठीचा चेस सीन आहे. आजवरच्या हिंदी सिनेमात इतका खराखुरा चेस सीन मी अजून पर्यंत नाही बघितलाय. याच सिन मध्ये एका झोपडीजवळून पाठलाग सुरु असताना तिथे टीव्हीवर अमर अकबर ऍंथोनी सिनेमातील डायलॉग बॅकग्राऊंड ला ऐकू येतो. "ऐसा तो आदमी लाईफ मी दोइच टाइम भगत हें, ऑलिम्पिक का रेस हो या पुलिस का केस हो" जबरदस्त टायमिंग ला हा डायलॉग ऐकू येतो.  
      दुसरा प्रसंग के के मेनन आणि आदित्य समोरासमोर येतात तो प्रसंग चित्रपटाचा हायलाईट आहे .देशातल्या मुसलमानांवर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर कसे अत्याचार झाले याचं थोडं खर आणि बरचस अतिरंजित (टायगरने डोक्यात भरवलेलं ) वर्णन बादशहा खान करतो . वर 'अल्ला हमारे साथ था , इसलिये हम ये जंग जीत गये ' अशी मखलाशी करून स्वतःची केविलवाणी समजूत घालून घेतो . मग के के 'इस बार अल्ला हमारे साथ था ' अशी सुरुवात करून मग त्याच्या युक्तिवादाच्या चिंधड्या करतो . अतिशय प्रभावी आणि अंगावर काटा आणणारा सीन . हा सीन जितका केकेचा आहे तितकाच आदित्यचा आहे . कुठल्याही धार्मिक संघटनेच्या / पक्षाच्या  प्रपोगंडाला बळी पडून आयुष्याची होळी झालेल्या प्रत्येक माणसाचं प्रतीकात्मक मूर्त स्वरूप म्हणजे बादशहा खान . धार्मिक ध्रुवीकरणाच्या या काळात देशात कानाकोपऱ्यात सर्वधर्मीय बादशहा खान तयार होत असताना खरं तर 'ब्लॅक फ्रायडे '  पुन्हा प्रदर्शित करायला पाहिजे . लोकांना भडकवणारे नेते एशोआरामी आयुष्य जगत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होत असते ते या चित्रपटातली बादशहा खानची शोकांतिका बघून किमान काही लोकांना तरी कळेल . 

शुभम शांताराम विसपुते