कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम माझी सर्वात आवडती गायिका.२५ जानेवारी १९५८ रोजी दिल्लीत जन्मलेली पण अस्सल दक्षिण भारतीय गायिका. तिच्याबद्दल कुणी फार लिहत नाही, पण तिचा आवाज फार भिडतो. एकच वेळेला रुहानी आनंद ते भळभळणारी वेदना असलेला दुर्मिळ आणि तितकाच दुर्लक्षित असलेला आवाज. गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं अस्तिव टिकवून आहे. १६ विविध भाषांमध्ये २५००० पेक्षा जास्त गाणी गाऊन देखील म्हणावी तशी प्रसिद्धी तिच्या वाटेल आली नाही, याच शल्य आहेच.
कविता ८०च्या दशकापासून गातेय. तिला खऱ्या अर्थाने ब्रेक किंवा ओळख मिळाली ती 'मिस्टर इंडिया ' मधलं 'कहते है मुझको हवाहवाई या गाण्यामुळे, यानंतर कविता एकदम पहिल्या रांगेत आली. श्रीदेवी चा पडद्यावरचा आवाज असं जरी तिला म्हटलं तरी चालेल श्री साठी इतकी गाणी ती गायली आहे.
त्यात मिस्टर इंडिया बरोबरच, नगिना, चालबाज, शेरनी, खुदा गवाह यासारख्या श्री च्या अनेक सिनेमात ती तिचा आवाज झालीय.
कविताला १९९५, ९६ आणि ९७ या सलग तीन वर्षात उत्कृष्ठ गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार अनुक्रमे प्यार हुआ चुपके से (१९४२ लव्ह स्टोरी), मेरा पिया घर आया (याराना) आणि आज मे उपर (खामोशी) या गाण्यांसाठी मिळाला. पुढे २००३ मध्ये डोला रे डोला (देवदास) साठी श्रेया घोषाल सोबत विभागून फिल्मफेअर तिला मिळाला. २००५ च्या भारत सरकारच्या "पदमश्री" या नागरी पुरस्काराने तिचा सन्मान झालेला आहे.
इच्छा नसतानाही जर सौंदर्याचे परिमाण लावायचे झालेच तर कविता रूढार्थाने सुंदर नाही पण "खूबसूरत" मधील "मेरा एक सपना है" गाणारी कविता स्क्रीन वरच्या उर्मिला मातोंडकर पेक्षा हि सुंदर दिसते. 'मिस्टर इंडिया ' मधलं 'कहते है मुझको हवाहवाई ' आणि हम मधलं 'जुम्मा चुम्मा दे दे' ही गाणी म्हणजे कविता कुठल्याही मूडच गाणं म्हणू शकते याचा अस्सल पुरावा. संजय लीला भन्साळीच्या 'खामोशी - द म्युझिकल मधलं 'ये दिल सून रहा है ' म्हणजे व्याकुळ झालेली पण हवीहवीशी वाटणारी आठवण आहे. 'झुबेदा ' मधलं 'धीमे धीमे गाऊ ' , 'क्या केहना' मधलं 'ए दिल लाया हे बहार' , 'देवदास' मधलं 'मार डाला ', 'पुकार ' मधलं 'के सेरा सेरा ' अशी किती गाणी सांगायची ज्यातून कविताने निर्भेळ आनंद दिलाय. ९०च्या दशकातील पॉप अल्बम स्टार लकी अली त्याच्या अल्बम मध्ये फक्त सोलो गाणी गायचा पण त्याला देखील कविता सोबत गाण्याचा मोह आवरता आला नाही आणि 'गोरी तेरी आँखे कहे' सारखं अस्सल सोन्यासारखं गाणं त्याने दिलं
मला अत्यंत आवडणारी तिची तीन गाणी जी एकदमच खास आहे. पाहिलं म्हणजे 'बॉम्बे' मधलं 'तू हि रे' हे गाणं जितकं रहमान च्या स्वर्गीय संगीताचं आहे तितकंच कविताच्या दैवी आवाजाचं पण आहे. यात तिचा आवाज जो काही लागला आहे, त्याला शब्दांत नाही सांगू शकत. हे गाणं ऐकताना आपल्या नसांमधून रक्ताऐवजी आनंद वाहत आहे असं वाटत राहत, भोवतालचं सगळं जग सुंदर दिसायला लागत इतकी ताकत या गाण्यात आहे. दुसरं आहे हम दिल दे चुके सनमचं टायटल सॉंग, एका जुन्या चिघळत जाणाऱ्या जखमेची काय वेदना असेल ती वेदना या गाण्यात पुरेपूर भरलीय. एक एक शब्द कविताचा इथं थेट काळीज चिरत जातो. यातील तेरे हो गए हैं हम....हे कविता जेव्हा गाते तेव्हा एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. आणि तिसरं आहे 'रॉकस्टार' मधलं 'तुम को' हे मास्टरपीस गाणं. रहमान ने हा पूर्ण अल्बम मोहित चौहान कडून गाऊन घेतलाय नायिकेसाठी यातील जी दोन गाणी आहे त्यातलं एक रहमान ने खास कविता साठी राखून ठेवलय. इर्शाद कामिलच्या परिसासारख्या शब्दांना कवितांच्या सुरांचा स्पर्श झाला आणि परिसाचाच सोनं झालं.
कविताच वय आता ६० च्या पुढे आहे. पण आवाजाला वय नसतं या न्यायाने तिचा आवाज आजही तितकाच खणखणीत आहे. तिची सध्या सिनेमात गाणी येत नाही अर्थात सध्याच्या ऑटो ट्यून वर गाणाऱ्या गायकांच्या गर्दीत ती गात नाही याच देखील समाधान आहेच. पण नाही सिनेमात तर निदान तिने सोलो अलबम तरी नक्कीच करावा. हीच एक मनापासूनची इच्छा...
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment