आजच्या नवतरुण पिढीला कदाचित यांचं नाव माहित नसेल पण आमच्या वयाच्या तरुणांसाठी जे आता वय वर्ष २५ च्या पुढे आहे आणि १९९० ते २००५ या दीड दशकातील संगीत हे ज्यांच्यासाठी जीव कि प्राण आहे अश्यांसाठी नदीम-श्रवण हे काळजाच्या जवळच नाव आहे.
नदीम अख्तर सैफीचा जन्म ६ ऑगस्ट १९५४ रोजी मुंबई येथे संपन्न कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच नदीमला संगीताची आवड होती. नदीम ड्रम, बोंगो आणि कॉन्गो अशी परिपूर्ण वाद्य वाजवत असे. शाळेच्या काळात, त्याने मित्रांसह स्वत:चे बॅन्ड बनविले आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपली कला दाखवायला सुरुवात केली.
श्रावणकुमार राठोड यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५४ रोजी सिरोही राजस्थान येथे झाला. त्यांचे वडील चतुर्भुज राठोड हे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्याने आपल्या मुलांना श्रवण, रूपकुमार राठोड आणि विनोद राठोड यांना प्रशिक्षण देणे सुरू केले. श्रावणने सितार, हार्मोनियम आणि तबला वाजवायला सुरुवात केली. इतर दोघी भाऊ गायक झाले पण श्रवणची ओढ संगीतकार बनण्याकडे होती.
नदीम आणि श्रावणची पहिली भेट अपघाती ठरली. श्रवणच्या एका मित्राने त्याला महाविद्यालयीन कार्यक्रमात आमंत्रित केले होते जेथे तो गायला जाणार होता. जेव्हा श्रावण हॉलमध्ये गेला तेव्हा त्याने नदीमला स्टेजवर ड्रम वाजवत पाहिले. मध्यांतर दरम्यान त्यांचा परिचय त्यांचा एका कॉमन मित्राने करून दिला. तो त्यांना म्हणाला, "तुम्हाला दोघीना जर संगीतकार व्हायचे आहे, तर तुम्ही दोघी मिळून संगीतकार का नाही होत". अशा प्रकारे बॉलीवूडच्या पटलावर एक नवीन संगीतकार जोडी उदयास आली. त्यांनी नदीम-श्रावण या नावाने संगीत देणे सुरू केले.
१९७५ सालापासून त्यांनी चित्रपटात संगीत देण्याला सुरुवात केली. सुरुवातीचा काळ मोठा कठीण होता. कारण त्यावेळी बॉलीवूड मध्ये नावाजलेले संगीतकार असल्यामुळे नवख्याना तशी कमीच संधी मिळायची. १९९० साली "आशिकी" आला आणि इतिहास घडला. हा सिनेमा नदीम-श्रवण यांच्याबरोबरच कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि गीतकार समीर यांच्यासाठी त्यांना मिळालेली सर्वात मोठी संधी होती आणि तीच या सर्वानी अक्षरशः सोनं केलं. कारण तोवर हे सर्वच स्ट्रगल करत होते. खरतर आशिकी हा नदीम-श्रवण बनवलेला ऑडिओ कॅसेट अल्बम होता. पण तो रिलीज होण्या अगोदर महेश भट्ट यांनी ऐकला. तो अल्बम त्यांना इतका आवडला की त्यांनी टी-सिरीज चे गुलशन कुमार यांना सांगितले की आपण एक चित्रपट बनवू आणि त्यात ह्या अल्बम ची सर्व गाणी वापरू. महेश भट्ट यांनी कथा लिहिली आणि आशिकीला अनु आगरवाल, राहुल रॉय आणि दीपक तिजोरी हे नवीन कलाकार आले. आशिकीने एक इतिहास रचला आणि तो १९९० चा संगीतमय हिट ठरला. हे सर्व पाचही जण (नदीम-श्रवण, कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि गीतकार समीर) चार्ट बस्टर होते. नदीम श्रावणला आशिकीसाठी पहिली फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आशिकी नंतर नदीम-श्रवण कडे चित्रपट निर्मात्यांची रांगच लागली. इतकी कि कदाचित सिनेमाच्या इतिहासात कोणाकडे नसेल. पण अधिक संख्येने चित्रपट करण्याऐवजी दर्जेदार संगीतावर लक्ष केंद्रित करावे, असा निर्णय दोघांनी घेतला. त्यांनी त्या काळात तब्बल २५० चित्रपट नाकारून एक विक्रमच केला.
पुढची सात वर्षे त्यांनी राज्य केले. या वर्षांत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. आशिकीचा अल्बम ज्या मेलोडी साठी ओळखला गेला तेच लक्षात ठेऊन त्यांनी पुढे संगीत दिले. त्या काळातील साजन, सडक, दिल है की मानता नाही, राजा, दिलवाले, फूल और कांटे, परदेस, राजा हिंदुस्थानी आणि दिवाना ह्या सिनेमांची गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. नदीम-श्रवणच हेच खूप मोठं यश आहे.
१ ऑगस्ट १९९७ मध्ये नदीम-श्रवणला मोठा धक्का बसला. त्यावर्षी गुलशन कुमारचा खून झाला. त्यावेळी देशात नसतानाही नदीम वर या गुन्ह्याबद्दल संशय घेतला गेला. नदीम-श्रवणच्या कारकिर्दीला हा मोठा धक्का होता. ते काही काळ व्यवसायाबाहेर गेले होते. नंतर नदीमने लंडनमध्ये दीर्घ कायदेशीर लढा दिला आणि शेवटी तो निर्दोष मुक्त झाला. नदीमने ब्रिटिश नागरिकत्व घेतले होते. लंडनमध्ये बसून तो श्रवणबरोबर संगीत देत राहिला. २००० साली आलेल्या ‘धडकन’ या चित्रपटाबरोबर नदीम-श्रवणने मोठ्या ब्रेक नंतर जोरदार पदार्पण केले. धडकन ने इतिहास रचला आणि पुन्हा एकदा आशिकी प्रमाणे सर्व गाणी चार्टबस्टर बनली. त्यांनी दोघांनी मिळून २००५ पर्यंत एकत्र संगीत दिले. नदीम श्रावण हे चार वेळा फिल्म फेअर अवॉर्ड्सचे विजेते होते. त्यांनी आशिकी (1991), साजन (1992) आणि दिवाना (1993) साठी सलग पुरस्कार जिंकले. त्यांनी राजा हिंदुस्थानी बद्दल रसिकांची मने ही जिंकली. संगीत उद्योगात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी दोनदा स्टार स्क्रीन पुरस्कार आणि एकदा झी सिने पुरस्कार जिंकला. त्यांनी संगीत दिलेला शेवटचा सिनेमा "दोस्ती" हा होता.
१९७५ साली सुरुवात केल्यानंतर त्यांनी पंधरा वर्षे खूप कठीण संघर्ष केला. आशिकी नंतरच्या म्हणजेच १९९० ते २००५ या पुढच्या १५ वर्षांत त्यांनी ७५ चित्रपटांमध्ये संगीत दिले आणि त्यातले ५० हिट चित्रपट बनले.९० चे दशक हे नदीम-श्रावणचे होते. १९९६ साली आलेला "राजा हिंदुस्थानी" ने एक वेगळाच इतिहास घडवला. त्याकाळी १ कोटी पेक्षा जास्त ऑडिओ कॅसेट या अल्बम च्या विकल्या गेल्या. त्या दशकातील सर्वात लोकप्रिय अल्बम मध्ये "आशिकी" आणि "दिल तो पागल है" नंतर राजा हिंदुस्थानी चा नंबर होता. नंतर आलेला "परदेस" मध्ये त्यांच संगीत हे अव्वल दर्जाचं होत. ये दिल दीवाना (सोनू निगम), ये मेरा इंडिया (कविता कृष्णमूर्ती / हरिहरन / आदित्य नारायण / शंकर महादेवन) आणि दो दिल मिले हैं (कुमार सानू). "धडकन" मध्ये त्यांनी तुम दिल की धडकन में रहते हो (अभिजीत / अलका याज्ञिक) च्या दोन आवृत्त्या तयार केल्या त्यातील एक कुमार सानूच्या आवाजातल एक सॅड व्हर्जन होत. दिल ने ये कहा है दिल से से (उदित नारायण / अलका याज्ञिक / कुमार सानू) आणि अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांची एक दुसरी आवृत्ती, आणि ना ना कारते प्यार (अलका / उदित नारायण). नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या 'दुल्हे का सेहरा' हे धडकनचे मुख्य आकर्षण होते.
नदीम-श्रवण जोडीचा माझा सर्वात आवडता सिनेमा म्हणजे २००२ मध्ये आलेला "राज" हा सिनेमा. नदीम-श्रवणचा हा म्युझिकल मास्टरपीस होता. नदीम-श्रवण आणि गीतकार समीर या तिघांनी मिळून एक वेगळीच दुनिया उभी केली होती. आपके प्यार में (अलका याज्ञीक), जो भी कस्मे (उदित आणि अलका), मे अगर सामने (अभिजीत आणि अलका) इतना मी चाहु तुझें आणि मुझे तेरे जेसी लडकी (उदित-अलका) हि सर्वच गाणी म्हणजे त्याकाळातला अमूल्य असा ठेवा आहे. त्याकाळी वॉकमन मध्ये ए साईड आणि बी साईड मध्ये सर्वात जास्त मी राजचीच गाणी ऐकलीय.
अश्या या ९० च्या दशकावर आपल्या संगीताच्या जोरावर निःसंशय पणे राज्य करण्याऱ्या माझ्या आवडत्या संगीतकार जोडी पैकी एक असलेल्या नदीम-श्रवणला माझा मनापासून सलाम...!!!
शुभम शांताराम विसपुते.

No comments:
Post a Comment