इसपू काळात एका राज्यात राजाच्या घरी एका राजपुत्राचा जन्म होतो. अतिशय सुंदर, लोभस असं ते बाळ बघून पूर्ण नगरीला आनंद होतो. राजपुत्र कमालीचा हळवा असल्याने, बाहेरच्या जगातील दुःख पाहून त्याने स्वतःला त्रास करून घेऊ नये म्हणून राजा त्याला राजमहालातील बाहेरच्या जगाशी संपर्क करू न देणाऱ्या भिंतीच्या आत वाढवतो. तिथेच त्याच शिक्षण, बालपण वैगेरे सगळं होत. हा मुलगा मोठा होऊन जग जिंकेल असं भविष्य त्या राजपुत्राबद्दल ज्योतिषाने वर्तवलं असत. राजा साठी ज्योतिषाचे बोल हे दिलासा देणारे असतात. पुढे वयात आल्यावर राजा आपल्या लाडक्या पुत्राचं एका सुंदर राजकन्येशी लग्न लावून देतो. राजकुमारलाही सुंदर अपत्य होते. सगळं व्यवस्थित चाललेलं असत. एके दिवशी राजवाड्यातील सेवक रथाची काही दुरुस्ती करत असतो. त्यानंतर रथाची चाचणी घेण्यासाठी तो सेवक जाणार असतो, तिथं नेमका आपला राजपुत्र उभा असतो आणि योगायोगाने राजा सुद्धा तेव्हा नगरीत नसतो. राजपुत्र त्या सेवकासोबत नगरीत फेरफटका मारण्यासाठी निघतो.
जन्मापासूनच जवळपास २० वर्षे राजवाड्यात घालविल्यानंतर राजपुत्र आज पहिल्यांदा मोकळ्या हवेत आलेला असतो. सेवक रथ चालवतोय आणि राजपुत्र मागे बसून नागरी न्याहाळतोय. असं एकंदरीत चित्र असत. पुढे राजपुत्राला एक अतिशय जख्ख म्हातारी दिसते. तिला तिच्या वाढलेल्या वयामुळे नीट उभं देखील राहता येत नव्हतं. राजपुत्र सेवकाला विचारतो कि हि कोण आहे, सेवक सांगतो कि हि एक गरीब म्हातारी आहे, वय वाढल्यामुळे तिला हा त्रास होतोय. राजपुत्र सेवकाला विचारतो कि मी देखील असाच म्हातारा होईल का, सेवक हसून उत्तर देतो कि म्हातारपण कोणालाच चुकलं नाहीय. राजपुत्राच्या मनात चलबिचल होते. पण ते पुढे निघतात तेव्हा राजपुत्राला एक तरुण रक्ताची उलटी करताना दिसतो. राजपुत्र सेवकाला विचारतो याला काय झालय. सेवक सांगतो कि हा खूप आजारी दिसतोय आणि कदाचित थोड्या दिवसात त्याचा मृत्यू देखील होईल. राजपुत्र परत विचारतो, मी पण असा आजारी पडू शकतो का, सेवक लगेचच सांगतो म्हातारपण तसे आजारपण दोघीही येतातच. हे पाहून राजपुत्र सुन्न होतो. ते परत येतात.
परत आल्यावर राजपुत्र अक्षरशः तळमळतो. तो खूप विचार करतो की, राजवाड्यात अतिशय चांगलं विलासी जीवन जगून देखील जर या वेदना आपल्याला होणारच असतील, त्या कोणालाच टाळल्या नाहीत. तर मग आपलं हे ऐषोरामाचं जीवन जगून उपयोग काय आहे. नंतर मनाशी निश्चय करून एका रात्री तो आपली पत्नी, अवघ दीड वर्षाचं बाळ, आपला परिवार, आपला महाल हे सगळं सोडून नगरीबाहेर निघतो. नक्की कुठे जायचं हे ठाऊक नसताना देखील तो निघतो, त्याच ध्येय निश्चित झालेलं असत. त्याला ज्ञान प्राप्ती करून या जगण्याचं कोड सोडवायचं असत. जगण्यातील अडचणीचं मूळ त्याला जाणून घ्यायचं असत. धर्माचे, प्रार्थना करणारे विविध गट तेव्हा होते, या सगळयांची भेट घेत, त्यांच्याकडून जमेल तस ज्ञान घेत राजपुत्र आपल्या मार्गावर निघालेला असतो. एक कुशाग्र असा तरुण योगी ला पाहून अनेक लोक त्याच्यासोबत जोडले जात असतात. ज्ञानसाधनेचे काही प्रकार हि त्याने शोधलेले असतात. पण तरीही त्याच अजून समाधान झालेलं नसत. वर्षांमागून वर्षे निघून जात असल्याने त्याचे सहकारी हि आता कमी होत गेलेले असतात. आता केवळ पाच अनुयायी त्याचा सोबत मार्गक्रमण करीत असतात.
केवळ ध्यान आणि साधना यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि प्रवासात खाण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते सगळे खूप अशक्त झालेले असतात. पुढे प्रवासात "निरंजना" नदी ओलांडत असताना तोल जाऊन राजपुत्र नदीत पडतो प्रवाहासोबत वाहून जात असलेला राजपुत्राला एका ओंडक्याचा सहारा मिळतो. इतर अनुयायांच्या मदतीने तो किनाऱ्यावर येतो. तेव्हा तो आपल्या ज्ञानसिद्धीच्या त्याने निवडलेल्या मार्गाबद्दल परत विचार करतो, त्याला या निवडलेल्या मार्गात कष्ट फार दिसतात शिवाय मरणाची त्याची गाठ झालेलीच असते. तेव्हा तो ठरवतो कि बस्स आता फक्त "ध्यान" करायचं. कारण शरीराकडे दुर्लक्ष झालेले चालणार नव्हते. तो रोज थोडे-थोडे अन्न सेवन करून ध्यान करीत असे. त्याच्या अनुयायांना वाटलं की राजपुत्र आपल्या मार्गातून भरकटलाय, म्हून त्याचे पाच ही अनुयायी त्याला सोडून निघून जातात.
आता अनुयायी जरी नसले तरी त्याचा मात्र निर्धार पक्का झालेला असतो. तो मजल दरमजल करत प्रवास करत असतो. एके दिवशी अचानक त्याला पिंपळाचे झाड दिसते. आता त्या झाडाखालीच बसून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळाल्याशिवाय न उठण्याचा निश्चय करून तो ध्यानाला बसतो. तब्बल ४९ दिवसांच्या अविरत ध्यान साधनेनंतर त्याला वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी ज्ञानप्राप्ती होते. ज्या झाडाखाली बसून राजपुत्राला ज्ञानप्राप्ती होते ते झाड म्हणजे "बोधिवृक्ष", बोधिवृक्ष ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे "बोधगया".
आपला राजपुत्र पण साधासुधा नव्हता तो म्हणजे "राजा शुद्धोधन" व "महाराणी महामाया" यांच्या पोटी जन्माला आलेला "राजपुत्र सिद्धार्थ गौतम" होता. पुढे त्याने ज्ञानप्राप्तीनंतर आपली बुद्धी आपल्या नियंत्रणात आणून स्वतःला "बुद्ध" बनवले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे, तर ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य.
आज आपल्याच देशातील काही बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी शिवाजी महाराज,आंबेडकर, सावरकर, टिळक ह्यांच्या प्रमाणे बुद्धा ना ही केवळ एका जाती, पंथापुरते संकुचित बनवले आहे, आणि सगळ्यात दुःखद जर काही असेल तर ते हेच आहे.
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment