Monday, March 30, 2020

मोहम्मद कैफ - मैदानावरचा रॉकेट सिंग


१ डिसेंबर १९८०ला उत्तरप्रदेशमधील अलाहबाद येथे एका सर्वसामान्य कुटुंबात मोहम्मद कैफचा जन्म झाला. त्याचे वडील मोहम्मद तारिफ आणि मोठा भाऊ मोहम्मद सैफ हे क्रिकेट खेळायचे. हे दोघेही रणजी ट्रॉफीमध्ये खेळले आहेत. कैफचे वडील क्रिकेटपटू असल्याने त्याला आणि त्याच्या भावाला क्रिकेटचे धडे घरातच लहानपणापासून मिळत होते. त्यामुळे कैफ आणि त्याचे भाऊ लहानपणी क्रिकेटकडे आकर्षित झाले. घरी क्रिकेटला पोषक वातावरण असल्याने तो वडील आणि भावंडांबरोबर क्रिकेट सामनेही टीव्हीवर पहायचा. पुढे त्याची कानपूरमधील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये १२ व्या वर्षी निवड झाली. तिथे त्याचा क्रिकेट सराव सुरु झाला. त्या हॉस्टेलमध्ये स्लाईड ग्राऊंड असल्याने कैफला निडर क्षेत्ररक्षण करण्याची सवय तिथेच लागली. पुढे त्याची १५ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड झाली. तो १९९६ ला १५ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभव करत तो विश्वचषक जिंकला होता.

१५ वर्षांखालील विश्वचषकानंतर कैफने १९ वर्षांखालील विश्वचषकातही स्थान मिळवले. १९९८ ला १९ वर्षांखालील पहिला विश्वचषक खेळला. त्यावेळी संघात विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग हे खेळाडू देखील होते. त्यानंतर कैफने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही उत्तरप्रदेशकडून पदार्पण केले. यानंतर त्याची २००० चा १९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या विश्वचषकात कैफच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते आणि पहिल्यांदाच १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. त्या विश्वचषकात कैफ बरोबरच युवराज सिंग, वेणूगोपाल राव, अजय रात्रा असे खेळाडू होते. विषवचषक जिंकलेला कर्णधार असल्यामुळे कैफ त्यावेळी खूप चर्चेत होता.

२००० साली मार्चमध्ये बंगळुरु येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण या सामन्यात त्याला खास काही करता आले नाही. पुढे त्याला संघातून वगळण्यात आले. या एका सामन्यानंतर तो जवळ जवळ दीडवर्ष भारताकडून खेळला नाही. नंतर २००२ मध्ये कानपूर येथे २८ जानेवारीला कैफचे इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण झाले. खरंतर फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण हीच कैफसाठी त्याची जमेची बाजू होती.

कैफच्या कारकिर्दीत महत्त्वाचा दिवस ठरला तो १३ जूलै २००२ ला झालेला नेटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना. या सामन्यात इंग्लंडने ३२६ धावांचे भलेमोठे आव्हान भारताला दिले होते. तेव्हा भारताने १५० धावा करायच्या आतच ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यात सेहवाग, गांगुली, सचिन, द्रविड आणि मोंगिया यांचा समावेश होता. पण कैफने युवराज सिंगबरोबर ६ व्या विकेटसाठी केलेल्या १२१ धावांची भागिदारी करत या सामन्याला रोमांचक वळण दिले होते. युवी बाद झाल्यावर कैफने हरभजन सिंग आणि झहीर खान यांना हाताशी घेत सामना शेवटपर्यंत नेला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात अखेर कैफ आणि झहीरने विजयी धाव घेत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्या सामन्यात कैफने सर्वाधिक नाबाद ८७ धावांची खेळी केली होती. तसेच युवराजने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यावेळी विजयानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले होते. गांगुलीच हे सेलिब्रेशन जगभर गाजलं होत.

कैफ या विजयानंतर टीम चा रेगुलर मेम्बर झाला.  त्याला कर्णधार गांगुलीकडून मोठा पाठिंबा मिळत होता. गांगुली त्याला म्हणायचा फलंदाजीत तू जरी ३० धावा केल्या आणि क्षेत्ररक्षणात तू जर २० धावा वाचवणार असशील तर तू नक्कीच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कैफही गांगुलीचा हा विश्वास खरा करत अनेकदा भन्नाट झेल घेत कधी चांगला थ्रो करत धावा वाचवत होता. २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये केवळ कैफ ला खेळता यावं म्हणून विकेटकीपर ची जागा द्रविड ने घेतली, त्यामुळे भारताला एक कैफ च्या रूपात एक एक्सट्रा बॅट्समन खेळवता  आला. कैफ चा एक कॅच माझ्या आजन्म लक्षात राहील तो म्हणजे  पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानला शेवटी विजयासाठी ८ चेंडूत १० धावांची गरज असताना समोर शोएब मलिक सारखा बॅट्समन बॅटिंग करतोय, बॉलिंग ला झहीर खान आहे. झहीर च्या फुल्ल लेन्थ चेंडूवर मलिकने समोरच्या बाजूला उंच शॉट मारला. त्यावेळी मिडऑफ वरून बादानी आणि मिडॉन वरून कैफ हे दोघी कॅच घेण्यासाठी पळत आले. दोघांचं लक्ष फक्त बॉलवर होत. आणि दोघांची धाडकन टक्कर झाली, यात बादानी च्या चेहऱ्यावर कैफ चा गुडघा लागला, पण कैफ ने कॅच नाही सोडला. पुढे अर्थातच हा सामना भारताने जिंकला. "कॅचेस विन द मॅचेस" ही महान कैफ ने तेव्हा खरी करून दाखवली होती. नंतर  वनडेत तो शेवटच नोव्हेंबर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याचा खराब फॉर्म आणि नंतर संघात आलेल्या युवा क्रिकेटपटूंमुळे पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणे त्याला कठीण गेले. त्यामुळे त्याला वगळण्यात आले.

कैफने भारतीय संघातून वगळल्यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेणे सुरु ठेवले होते. त्याने आयपीएलमध्ये सुरुवातीचे काही सिझन खेळले. पहिल्या सिझनला तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात महागडा खेळाडू होता. त्यानंतर त्याने किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून खेळला. पण तो आयपीएलमध्ये खूप यशस्वी होऊ शकला नाही.  २०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही तो उभा राहिला होता. पण त्याचा पराभव झाला.

कैफने २०१८ मध्ये १३ जूलैला म्हणजेच २००२ ला झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या विजेतेपदाला १६ वर्ष पूर्ण झाली त्यादिवशी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एकवेळी गांगुली नंतर कर्णधारपदाचा दावेदार समजला जाणारा कैफ खराब फॉर्ममुळे चांगला फिटनेस असतानाही भारतीय संघात टीकू शकला नाही.

जरी कैफ खूप यशस्वी खेळाडू नसला, म्हणजेच त्याच्या कारकिर्दीतील त्याचे एकूण रन्स, शतके मोजायचे तर, पण  त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने त्याने चाहत्यांच्या मनात कायमचे आदराचे स्थान मिळवले. जे आजही कायम आहे.

शुभम शांताराम विसपुते 

No comments:

Post a Comment