११/११/११ या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला "रॉकस्टार"
हा खऱ्या अर्थाने एक इम्तियाझ अलीचा मास्टरपीस असा सिनेमा. माझ्या ऑल टाइम फेव्हरेट
चित्रपटांपैकी एक आहे. लहानपनापासून रॉकस्टार बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या नायकाचा विलक्षण
प्रवासाची सफर हा चित्रपट आपल्याला घडवतो. रणबीर कपूर आणि इम्तियाझ अली हे "क्लासेस"
चे लाडके होतेच, पण रॉकस्टार मुळे ते "मासेस" चे पण लाडके झाले. कारकिर्दीच्या
सुरुवातीलाच रणबीरने त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिलाय. म्युझिकल सिनेमामध्ये गोष्ट
हि गाण्यांच्या माध्यमातून पुढे सरकते. अश्या सिनेमात गाणी हि एक महत्वाची भूमिका बजावत
असतात. रॉकस्टार या बाबतीत पूर्णपणे यशस्वी झालाय. रहमानच वेड लावणार संगीत, इर्शाद
कामिल चे अफलातून शब्द आणि मोहित चौहानचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे रॉकस्टार
हा अल्बम जबरदस्त जमून आलाय. रॉकस्टार ची गाणी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यासाठीच
हा लेखनप्रपंच...
१) जो भी मै - सिनेमाची सुरुवातच या गाण्याने होते,
जनार्दन जाखड उर्फ जे जे (रणबीर कपूर) च सुरुवातीच्या काळातील व्यक्तिमत्व या गाण्याच्या
माध्यमातून उलगडत जात. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचत नाहीए किंवा योग्य प्रकारे
व्यक्त होता येत नाही आहे. अशा पार्श्वभूमीच हे गाणं. फ्लॅशबॅक च्या माध्यमातून जे
जे ला अनेक ठिकाणी गाताना यात दाखवलं गेलं आहे.
२) टॅंगो फॉर ताज (Instrumental) - सिनेमाची नायिका
हीर (नर्गिस फाखरी) हिच्या एंट्रीला हा मुसिकल पीस वाजतो. कॉलेज क्वीन असलेली हीर चा
कॉलेज मधला हा शेवटचा परफॉर्मन्स असतो, कारण तीच लग्न ठरलेलं असत. याच गाण्यात जे जे
ला कॉलेज कॅन्टीन मधल्या खटाना भाई (कुमुद मिश्रा) ने सांगितलेलं "टुटे हुए दिल से हि संगीत निकलता
है" हा मंत्र डोक्यात असतानाच त्याचा मित्र हीर ला नाचताना बघून म्हणतो
"ये तो दिल तोडणे कि मशीन है" हे एक वाक्य जे जे च्या आयुष्यात हीर ला आणायला
कारणीभूत ठरत.
३) कतिया करूं - मोठे प्रयत्न केल्यानंतर जे जे ची हीर
सोबत मैत्री होते. हीर च्या लग्नाला पण थोडेच दिवस शिल्लक असतात. तोवर मौजमजा करण्यासाठी
हीर जे जे च्या सोबत आपल्या सगळ्या फँटसिस (सी ग्रेड सिनेमे बघणं, देशी दारू पिणं इ.)
पूर्ण करते. ह्या गाण्यात जे जे आणि हीर दोघांमध्येही अगदी निकटची मैत्री होते.जे जे
हीर च्या लग्नाला काश्मीरलाही जातो, तिथे हीर तिच्या मित्रांना जे जे ची ओळख करून देताना
त्याच नाव "जॉर्डन" असं सांगते. हीर जॉर्डन मध्ये गुंतत जात असते पण वेळीच
स्वतःला सावरून लग्न करून, विदेशात निघून जाते.
मूळच पंजाबी लोकगीत असलेल्या गाण्याला रहमानचा मिडास
टच लागल्यामुळे गाणं उत्तम झालं आहे. रहमान ने हे गाणं हर्षदीप कौर आणि सपना अवस्थी
या दोन गुणी गायिकांकडून गाउन घेतलय. गाणं श्रवणीय आहे तसच ते काश्मीरच्या पार्शवभूमीवर
चित्रित झाल्यामुळे प्रेक्षणीय हि झालय.
४) फिर से उड चला - जॉर्डन हीर च्या लग्नाहून परत येत असताना हे गाणं बॅकग्राऊंडला
वाजत असत. याच गाण्यात फ्लॅशबॅकमधून जे जे आता कॉलेजला होता तसा बावळट न राहता बऱ्यापैकी
मोठा गायक झालेला दाखवला आहे. अजूनही बरीच मोठी गोष्ट आहे जी फ्लॅशबॅकच्या माध्यमातून
उलगडत जाते.
५) कुन फाया कुन - दरम्यानच्या काळात घरी झालेल्या वादामुळे
घरातून हाकलून दिल्याने जवळपास दोन महिन्यांनी भग्न अवस्थेत जॉर्डन खटाना भाई च्या
घरी जातो, तेव्हा खटाना त्याला विचारतो कि दोन महिने कुठे होता तेव्हा जॉर्डन सांगतो
कि तो हजरत निझामुद्दीन च्या दर्ग्यावर होता. खटाना त्याला विचारतो कि दर्ग्यावर दोन
महिने काहीतरी तर केलं असेल, तेव्हाच पार्श्वभागावर हे गाणं सुरु होत. जॉर्डन चा दर्ग्यावरचा
दोन महिन्यातला प्रवास या गाण्यात दाखवला जातो. दर्ग्यात गाणं म्हणणाऱ्या कलावंतांसोबत
आपली गायनाची सेवा तो हजरत निझामुद्दीन ला अर्पण करतो. इथेच शहनाईवादक उस्ताद जमील
खान (शम्मी कपूर) यांची नजर जॉर्डन वर पडते.
रहमान जेव्हा हि सुफी किंवा भजन हे ईश्वराकडे घेऊन जाणाऱ्या
प्रकारातील गाणे बनवतो तेव्हा तो आपल्याला येणार सर्वोत्तम काम त्या गाण्यात देत असतो,
अगदी तल्लीन होऊन ऐकावं असं हे गाणं झालय. मोहित चौहान हा मुख्य गायक आहेच पण त्याला
साथ द्यायला जावेद अली आणि दस्तरखुद्द रहमानही आहे.
६) शेहेर मै - खटाना ने मोठ्या प्रयत्नाने जॉर्डन ला
प्लॅटिनम म्युझिक च्या रेकॉर्डिंगला ला घेऊन जातो, पण काही केल्या जॉर्डन कडून हे रेकॉर्डिंग
पूर्ण होत नाही. रेकॉर्डिंग मधून बाहेर निघताना स्टुडिओ मध्ये उस्ताद जमील खान यांना
जॉर्डन दिसतो. प्लॅटिनम म्युझिक चा मालक धिंग्रा
(पियुष मिश्रा) याच्या ऑफिस मध्ये ते जॉर्डन ला बोलावून घेतात, तिथे आपली ओळख सांगतात
आणि धिंग्रा ला जॉर्डन ला घेऊन अल्बम करायला लावतात. अल्बम हिट होतो, धिंग्रा जॉर्डन
ला युरोप टूर वर घेऊन जातो. हीर सुद्धा "प्राग" येथे राहत असते. हीर आणि
जॉर्डन ची प्राग मध्ये परत एकदा भेट होते.
चित्रपटात शेहेर मै या गाण्याचा अगदीच थोडासा भाग दाखविला
आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गाण्याचा प्रयत्न करणारा पण काहीकेल्या गाणं रेकॉर्ड
करायला न जमणारा जॉर्डन यात दिसतो. दक्षिण भारतातला गायक कार्तिक ने मोहित चौहान सोबत
हे गाणं गायलंय.
७) हवा हवा - प्राग मध्ये जॉर्डन हीर ला भेटतो. लग्नानंतर
हीरच जीवन निरस झालेलं असत. त्यात जॉर्डन आल्यामुळे हीर ला परत आपलं पूर्वायुष्य नव्याने
जगायची संधी मिळते. दोघीही परत मौजमजा करतात. आता जॉर्डन आणि हीर दोंघांमध्येही जवळीक
वाढत जाते. हीर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते. पण जॉर्डन हट्टाला पेटलेला असल्यामुळे
नाही दूर करू शकत, तिलाही त्याचा सहवास आवडू लागलेला असतो.
या गाण्यात
एका राजा राणी ची गोष्ट सांगितली आहे. त्यातली राणी ही बंदिवाणासारखं आयुष्य जगतेय.
हि गोष्ट तंतोतंत हीर च्या जीवनाशी प्रेरित आहे. प्राग शहरात चित्रित झालेल्या जा गाण्यात
तिथल निसर्गसौंदर्य, बार, स्थानिक नृत्य यांची झलक बघायला मिळते.
८) और हो - सिनेमातील हे एकमेव विरह गीत. हीर ला जॉर्डन
पासून दूर जायचं नसत, पण स्वतःच्या वैवाहिक जीवनात अडचणी यायला नको म्हणून स्वतः हीर
इच्छा नसताना जॉर्डन पासून दूर होते. जॉर्डन हि भारतात परत यायला निघतो. पण विमानतळावरून
शेवटचं हीर ला भेटावं म्हणून विनापरवानगी तिच्या घरात प्रवेश करतो आणि सायरन वाजल्यामुळे
घरातल्या सगळ्यांना कळत आणि ते जॉर्डन ला पोलिसांच्या ताब्यात देतात. प्राग मध्ये जॉर्डन
ला तुरुंगवास भोगावा लागतो. पण भारतात त्याच प्रत्यार्पण झाल्यामुळे त्याला भारतात
आल्याबरोबर अटक केली जाते.
ह्या गाण्यात इर्शाद कामिल ने अफलातून शब्द लिहले आहे.
काळजात खोलवर काही तुटले आहे अशी भावना हे गाणं ऐकताना होते. रहमान ने या गाण्याला
ऑपेरा स्टाईल टच दिला असल्यामुळे ते वेगळ्याच उंचीवर पोहचलं आहे. अल्मा फेव्हरिक या
गायिकेने मोहित चौहान ला कमालीची साथ या गाण्यात दिली आहे.
९) सडा हक - भारतात अटकेत असलेला जे जे. त्याची नकारात्मक
पब्लिसिटी सगळीकडे होते आहे. मीडिया, धिंग्रा सर्व आपापला स्वार्थ साधत आहे. फक्त खटाना भाई प्रामाणिकपणे त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय.
मुळातच बंडखोरीला प्रोत्साहन देणार हे गाणं, जॉर्डन भारतात जे जे विविध स्टेज शो करतो त्यावर चित्रित केलंय. समाजाला, व्यवस्थेला प्रश्न विचारणारा नायक आपल्याला यात दिसतो. रॉक तालावर असलेलं
हे गाणं थिरकायला लावतंच पण गाण्यातील शब्द आपल्याला विचार करायलाही भाग पाडतात.
१०) द डिक्टोमी ऑफ फेम (Instrumental) - पैसा, प्रसिद्धी
सर्व काही त्याला मिळत असत. जॉर्डन किती प्रचंड लोकप्रिय आहे हे आपल्याला त्याला पाहून
बेशुद्ध होणाऱ्या मुलींना बघून कळतं. कॉलेजचे जुने मित्र आता तो लोकप्रिय झाल्यामुळे
त्याला भेटायला येतात, तिथे सर्वजण फोटोस काढतात पण त्याचाही त्याला राग येतो. अश्यातच
धिंग्रा सोबतच नवीन काँट्रॅक्टचे पेपर तो फाडून धिंग्रांच्याच अंगावर फेकतो. जॉर्डनच
विक्षिप्त वागणं हे सुरूच असत. त्याची मुलाखत घेणारी पत्रकार (अदिती राव हैदरी) शी
जवळीक साधताना हि तो हीर ला विसरू शकत नाही. खटाना भाई ने कॉलेजच्या वेळेला सांगीतलेल
"दिल टूटना जरूरी होता है" हे त्याला तेव्हा लक्षात येत कारण हीर साठी त्याच
दिल खरंच खूप आतून तुटलेलं असत.
हे गाणं रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये चित्रित झालेलं आहे.
शहनाईवादक उस्ताद जमील खान यांची शहनाई आणि जॉर्डनची गिटार यांची अप्रतिम अशी जुगलबंदी
यात बघायला मिळते. यात स्व. शम्मी कपूर यांनी केवळ डोळ्यांमधून जे भाव दाखवले आहे ते
वर्णन करण्या पलीकडे आहे. आजोबा आणि नातू याना एकच फ्रेम मध्ये बघायला खूप छान वाटत.
११) नादान परिंदे - दरम्यानच्या काळात हीर ला कॅन्सर
असल्याचे निदान झाल्यामुळे ती तिच्या आई-वडिलांकडे भारतात परत येते. एका शो दरम्यान
हीर ची लहान बहीण जॉर्डन ला हे सांगते. जॉर्डन परत येऊन हीर ला भेटतो. हीर ची हालत
अत्यंत नाजूक असते. पण जॉर्डन आल्यामुळे ती हिरुफिरू लागते. तिचे पालकही तिची सुधारलेली
परिस्थिती बघून सुखावतात. अश्यातच जॉर्डन तिला हवापालटासाठी बाहेर घेऊन जातो. परत आल्यावर
तिची तब्येत बिघडते, तपासणीमध्ये ती गरोदर असल्याचे लक्षात येते. त्याच परिस्थितीत
तिचा मृत्यू होतो. या सगळ्यांसाठी अर्थातच जॉर्डनला जबाबदार धरले जाते.
रॉक संगीतात असलेलं हे गाणं. जबरदस्त ऊर्जा घेऊन येत.
पण गाण्यातले बोल हे आर्त भावना दर्शवितात. प्रेयसी गेल्याच्या दुःखात असलेला प्रियकर
ह्रिदयाच्या आतून सार दुःख पचवून गातोय, बघायलाच विलक्षण वाटत. बाकी रहमान ने नेहमीप्रमाणे
यात आपली पाहुणा गायक म्हणून हजेरी लावलीय. त्याची नुसती हजेरीच गाण्याला कडक बनवायला
पुरेशी असते. मोहित चौहानने नेहमीप्रमाणे चाबूक गायलंय.
१२) तुम हो आणि तुम को - चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावली
मध्ये हे दोघी गाणी फ्लॅशबॅक सोबत एकत्र करून दाखविली आहे. मुळात चित्रपटाच्या ऑडिओ
अलबम मध्ये हि दोघी गाणी वेगवेगळी आहे.
तुम हो - सिनेमातील प्युअर रोमँटिक असं गाणं, मोहित
ने अप्रतिमरीत्या गायलंय. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी या गाण्यात दिसतात.
मोहित चौहान ला परद्यावरचा रणबीर कपूर चा आवाज करून रहमान ने अजरामर केलय. साक्षात
रणबीरचा गातोय अस वाटावं इतकी दोघांची केमिस्ट्री जुळून आलीय. सिनेमातील रणबीरची सर्व
गाणी मोहित चौहानकडून गाउन घेतल्याने रणबीर च्या सिनेमातील व्यक्तिमत्वाशी आपल्याला
सांगड घालता येते.
तुम को - तुम हो सारख्याच चालीचं हे गाणं नायिकेच्या
दृष्टिकोनातून बघायला मिळत. कविता कृष्णमूर्ती चा स्वर्गीय आवाज आणि तिचे स्पष्ट उच्चार
यामुळे हे गाणं थेट काळजाला हात घालतं.
बॉलीवूड मध्ये मुळातच प्युअर म्युझिकल सिनेमे फार कमी
तयार झालेले आहे. पण माझ्यासाठी जे पण आहेत त्यात रॉकस्टार हा कायमस्वरूपी आढळपदावर
नक्कीच विराजमान झालेला असेल. इम्तियाझ अली, रणबीर कपूर, मोहित चौहान, इर्शाद कामिल
आणि ए आर रहमान या पाचही जणांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम या सिनेमात केलय
हे मात्र तितकंच खरं आहे.
शुभम शांताराम विसपुते