Thursday, September 19, 2019

लकी अली - ओरिजिनल पॉपस्टार


 

आज आवडता गायक लकी अली चा ६१ वा वाढदिवस. अतिशय वेगळ्या प्रकारचा आवाज लाभलेला असा हा गायक, आपल्या विरस आवाजात गाणी गात नव्वदच्या दशकातल्या अख्ख्या पिढीला त्याने मंत्रमुग्ध केलं आहे. इतर समवयस्क गायकांच्या तुलनेत त्याने मोजकच काम केलं आहे, पण जे काम केलंय ते अव्वल दर्जाचं आहे.

नव्वदच्या दशकात भारतात पॉप संगीताला सोन्याचे दिवस होते त्यात लकी अली हे एक नावाजलेले असं नाव होतं. त्याचा पहिला पॉप अल्बम सुनोह मधलं "ओ सनम" हे गाणं आजही भारताच्या पॉप संगीताच्या इतिहासात टॉप ला असलेल्या गाण्यांपैकी एक आहे. देखा है ऐसे भी, एक पल मे है जिंदगी, कभी ऐसा लगता है, कितनी हसीन है जिंदगी ही ही त्याची पॉप अल्बम मधली गाणी आजही फ्रेश आहेत. चित्रपटात त्याने त्यामानाने कमीच गाणी गायली आहेत, त्याची खरी आवड पॉप संगीतात स्वतःच्या संगीत दिग्दर्शनाखाली तयार झालेली गाणी गाण्याकडेच राहिली आहे. कविता कृष्णमूर्ती सोबत त्याने गायलेलं "गोरी तेरी आखे" आजही तितकच क्लासीक आहे. ७०च्या दशकातील 'एक बाप छे बेटे' या सिनेमात "Walking All Alone" हे पूर्ण इंग्रजी मध्ये असलेलं गाणं गाऊन त्याने पदार्पण केलं. ऋतिकच्या पदार्पणात म्हणजेच 'कहो ना प्यार है' मध्ये त्यानी दोन गाणी गायली "एक पल का जीना" आणि "ना तुम जानो ना हम", या सिनेमासाठी त्या वर्षांचं उत्कृष्ट गायकाचं फिल्मफेअर त्याला मिळालं होतं. त्याच्या वडिलांची (मेहमूद) इच्छा होती की त्याने अभिनय करावा, म्हणून "काटे" "कसक" आणि "सुर" या सिनेमांमधून त्याने अभिनय करून वडिलांची इच्छा पूर्ण केली. पुढे त्याच्या स्वतःच्या अल्बम सोबतच "युवा", "पाठशाला", "बचना ऐ हसीनो", "अंजना अंजनी" या सिनेमातली त्याची गाणी गाजली. हिंदी चित्रपटात त्याचं शेवटचं गाणं २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' मधलं "सफरनामा" हे होतं.

आज लकी अली चित्रपटात गाण्याचे ऐवजी बंगलोर पासून जवळच असलेल्या गावी पोल्ट्री फार्म तसेच कार्पेट चा कारखाना चालवतो आहे. त्याने मागे मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधल्या सध्याच्या गाण्यांचा दर्जा पाहून त्यानेच स्वतःहून चित्रपटात गाणी जायचं कमी केलं आहे. पण आजही तो लाईव्ह कॉन्सर्ट करतो, आणि अर्थातच त्या हाऊसफुल असतातच. 

अशा या आपल्या ओरीजनल पॉपस्टार ला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment