Tuesday, September 17, 2019

रोहित शर्मा - भारतीय कसोटी संघाचा नवा सलामीवीर



मॉडर्न क्रिकेटमधला सर्वोत्तम सलामीवीर. इतक्या वर्षांपासूनची त्याला कसोटी मध्ये सलामीला खेळताना पाहण्याची इच्छा आता पुरी होत आहे. येत्या २ ऑक्टोबर पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीत तो नव्या भूमिकेत म्हणजेच सलामीला खेळताना दिसेल. या उशिरा सुचलेल्या शहाणपणासाठी रवी शास्त्री आणि कोहलीचे आभार.

२००७ मध्ये जरी पदार्पण झालेलं असलं तरी रोहितची खरी ईनिंग २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तो पहिल्यांदा सलामीला आला तेव्हा सुरु झाली. त्या अगोदर संघात पदार्पण होऊन तब्बल ६ वर्ष झाली होती पण हवा तसा सूर काही त्याला गवसलेला नव्हता. बरं त्याच्यात गुणवत्ता नव्हती असंही नाही किंबहुना इतरांपेक्षा जरा जास्तच गुणवत्ता त्याच्यात ठासून भरलेली होती. पण त्या गुणवत्तेला न्याय मिळेल अशी कामगिरी काही त्याच्याकडून होत न्हवती. त्याला एक वर्षांनी जुनिअर असलेला कोहली (पदार्पण २००८) भस्म्या झाल्यासाखं धावा खात होता आणि दुसरीकडे याचा संघर्ष सुरूच होता. मला कोहली पेक्षा रोहित आवडतो अगदी तो फॉर्मसाठी झगडत होता त्या काळापासून, याच्यासाठी मित्रांच्या नेहमीच शिव्या खाल्ल्या आहे. लोक चमत्काराला नमस्कार करतात या उक्तीप्रमाणे आमच्या मित्रांमध्ये कोहली चा फॅनबेस जबरदस्त होता. तरी मी एकटा शस्त्र न टाकता त्यांच्याशी रोहितकरता लढलो आहे. आज उशिरा का होईना त्याने आमच्या सारख्या फॅन्स नि त्याच्यासाठी केलेल्या लढाईला जागत तुफान खेळतोय हे पाहून खरंच एक समाधान वाटतं.

त्याच्यात खऱ्या अर्थाने बदल झाला तो म्हणजे २०११ साली भारतात झालेल्या विश्वचषकासाठी त्याची संघात निवड न होणे. याचा जबरदस्त आघात त्याच्यावर झाला. कारण वानखेडे या त्याच्या घरच्या मैदानावर भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि तेव्हा याला तो क्षण मैदानात न साजरा करता घरी टीव्ही वर बघून समाधानी व्हावं लागलं. हिच वेळ होती, स्वतःच नेमकं कुठं चुकतंय याचा प्रतिशोध घेण्याची, स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची याकामी प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला मोलाची मदत केली. यानंतर जबरदस्त मेहनत घेऊन त्याने आपल्या चुका सुधारल्या, खेळपट्ट्टीवर जास्तीत जास्त वेळ तो उभा राहू लागला. सुरुवातीलाच मोठे फटके खेळण्यापेक्षा संथ सुरुवात करून नंतर फटक्यांची आतषबाजी त्याने सुरु केली. याचा परिणाम दिसला तो २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सेहवाग, गंभीर हे नेहमीचे सलामीवीर संघात नसल्यामुळे एक प्रयोग म्हणून नवख्या शिखर धवन बरोबर त्याला सलामीला पाठविण्यात आलं, आणि पुढचा इतिहास तर सर्वांना माहितीच आहे.

अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्यात एकदिवसीय सामन्यातील वैयक्तिक सर्वोच्च धावा २६४ धावा, एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके (२०९ वि ऑस्ट्रेलिया २०१३), (२६४  वि. श्रीलंका २०१४) (२०८ वि श्रीलंका २०१७), आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीत सर्वाधिक धावा, शतके आणि षटकार, २०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक पाच शतकांसह तब्ब्ल ६४८ धावा, या विक्रमांबरोबरच अनेक नवनवीन विक्रम तो पादांक्रांत करतोय.

काही क्षण रोहित ने दिले आहेत जे आयुष्यभर लक्षात राहतील. २००७ च्या टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सलमान बटचा पॉईंटला उभ्या असणाऱ्या रोहितने उलट्या बाजूला झेप घेत पकडलेला निव्वळ अफलातून असा झेल. २६४ धावांच्या खेळीदरम्यान त्याने मिड विकेटला फक्त फ्लिक करून मारलेलाा अप्रतिम षटकार,  २०१५ च्या विश्वचषकात क्वार्टर फायनल ला बांगलादेशविरुद्ध केलेल्या शतकी खेळी दरम्यान रुबेला हुसेन च्या योर्करवर सरळ मारलेला षटकार, २०१९ च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला षटकार २००३ साली पाकिस्तानरुद्धच सचिन ने मारलेल्या षटकाराची आठवण करून गेला. याच विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध च्या सामन्यात रोहितने स्टोक्सला लागोपाठ तीन चौकार मारले होते. त्यातला दुसरा स्क्वेअर ड्राइव्ह ला मारलेला चौकार तर मी जन्मात विसरणार नाही. त्या फटक्याने वेगात बंदुकीच्या गोळीला हरवलं असतं. सीमारेषेवरचा क्षेत्ररक्षक हा फक्त आणि फक्त प्रेक्षक होता.

आता तो कसोटीत सलामीवीराच्या नव्या भूमिकेत येतोय. ज्या प्रकारे कसोटीत एडन गार्डन वर शतक मारून झोकात पदार्पण केलं होत अगदी तीच अपेक्षा त्याच्याकडून आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत असेल. बाकी तो नेहमीच आवडता राहील खेळों अथवा न खेळों.

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment