Wednesday, September 11, 2019

गर्दीश - एक उत्कृष्ट कलाकृती


प्रियदर्शन या दक्षिण भारतीय दिग्दर्शकाला आपल्याकडे हेरा फेरी, भूलभुलैया यासारख्या विनोदी चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून जास्त ओळखले जाते, पण याच प्रियदर्शनने विरासत, गर्दीश सारखे आशयघन चित्रपट दिले आहे याचीही नोंद घ्यायला हवी. गर्दीश हा निःसंशयपणे भारतीय सिनेमातील बाप मुलाच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

पोलीस खात्यात असणारे पुरुषोत्तम साठे (अमरीश पुरी) हे एक प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ अशे सिनिअर कॉन्स्टेबल आहे. ज्यांची आपल्या मुलाला शिवा  (जॅकी श्रॉफ) ला पोलीस अधिकारी म्हणून बघण्याच स्वप्न आहे. शिवा हि वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तिकडे विद्या (ऐश्वर्या) ला आपल्या स्वप्नातला राजकुमार शिवा च्या रूपात भेटला आहे हे ती तिच्या वडिलांना पृथ्वीराज भल्ला (शम्मी कपूर) यांना सांगते, तिचे वडील शिवाच्या वडिलांशी बोलणी करून दोघींचा विवाह निश्चित करून टाकतात. शिवा पोलीस झाल्यावर धुमधडाक्यात लग्न करण्याचं त्यांचं ठरत. शिवाच्या कुटुंबात त्याची आई वडील यांच्याशिवाय त्याची लग्न झालेली बहीण आणि तिचा रिकामटेकडा नवरा (असरानी) हे आहेत. एक सध्या सरळ मध्यमवर्गीय कुटुंबातला शिवा पोलीस अधिकारी होण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतो. अश्यातच आमदाराच्या मुलाला हटकल्यामुळे पुरुषोत्तम साठे यांची बदली शहरातील कुप्रसिद्ध अश्या काला चौकी पोलीस स्थानकात होते. इथेच एंट्री होते ती सिनेमाच्या खलनायकाची, बिल्ला जलानी (मुकेश ऋषी) हा अत्यंत क्रूर, रांगडा मस्तवाल असा माणूस जो त्याला नडला त्याला चिरडुनच टाकेल अशे भाव ठेवून वावरणारा असतो. एका प्रसंगात पुरुषोत्तम साठे हे बिल्ला च्या माणसांना भर बाजारात ठोकून काढतात,बिल्लाही तिथे हजर असतो तो येऊन त्यांच्यावर हात टाकतो त्याचवेळेला शिवाही तिथे येतो वडिलांना होत असलेली मारहाण बघून संतापात बिल्लाला ठोकून काढतो इतका कि बिल्ला मारायला टेकतो. हे बघून बिल्लाच्या दहशतीखाली असलेले वस्तीतले लोक शिवाला खांद्यावर उचलून जल्लोष करतात. पण याचा शिवाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. शिवाने बिल्लाला मारल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते याचा गैरफायदा वस्तीमधील स्थानिक गुंड काली आणि शिवाच्या बहिणीचा रिकामटेकडा नवरा घेतात. ते लोकांना शिवाच्या नावाने त्यांच्याकडून खंडणी उकळणे, धमक्या देणे अशे काम करतात. पुरुषोत्तम साठे यांच्याकडे बघून वरिष्ठ पोलीस अधिकारी (सुरेश ओबेरॉय) आपल्याकडून शक्य तितकी मदत शिवाला करीत असतात. शिवाच्या वडिलांनी आपल्या प्रामाणिक स्वभावानुसार त्याला आरोपी ठरवून टाकलेलं असत. शिवाला घरातून काढून टाकल्यावर तो शांती (डिम्पल कपाडिया) या वेश्येच्या घरी राहतो. दरम्यानच्या काळात त्याच ठरलेलं लग्न हि मोडते . शिवाही जेव्हा वडिलांशी बोलायला जातो तेव्हा नेमकं सगळं उलट होऊन त्यांचा गैरसमज आणखी वाढेल अश्या घटना घडतात. दुसरीकडे बिल्लाही मरणाच्या दारातून परत आलेला असतो आणि बदला घेण्यासाठी आसुसलेला असतो. शेवटी बिल्ला आणि शिवा मध्ये हाणामारी होऊन शिवा बिल्लाला कायमचा संपवतो.

एक साधी सरळ गोष्ट जरी असली तरी वेगवान पटकथा असल्यामुळे संपूर्ण चित्रपट आपल्याला बांधून ठेवतो. प्रियदर्शन आपली दिग्दर्शकीय पकड संपूर्ण सिनेमावरून अजिबात सैल होऊ देत नाही.  संतोष सिवन यांची जबरदस्त सिनेमॅटोग्राफी सिनेमाला अजून सुंदर बनवते. संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या जबरदस्त जोडीमुळे सिनेमातील गाणी श्रवणीय झाली आहेत. खासकरून एस पी बालसुब्रमनियम ने गायलेले "हम ना समजे थे, बात इतनी सी" हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्ट मध्ये स्थान राखून आहे.

कलाकारांबाबत बोलायचं झालं तर, हा सिनेमा जॅकी श्रॉफ च्या आजवरच्या कारकिर्दीतला त्याचा सर्वोत्तम अभिनयासाठी लक्षात ठेवायला हवा, इतका उत्कुष्ट अभिनय त्याने केलाय. त्याच प्रामाणिक असणं, कुटुंबावर जीवापाड प्रेम करणं, प्रेयसीसोबत भावी आयुष्याची स्वप्न रंगवणं, अन्यायाविरोधात पेटून उठणं, अनावधानाने झालेल्या कृत्याबद्दल मनातल्या मनात झुरणं या सर्व छटा जॅकी ने ताकदीने रंगवल्या आहे. त्याच वर्षी आलेल्या "बाजीगर" मधल्या शाहरुखने आणि यातल्या जॅकी ने मोठ्या फ्रेमच्या चष्म्यातून रसिकांवर जादू केली होती. अमरीश पुरी हा खरोखरच अभिनयातला "बाप" आहे हे त्यांनी या सिनेमातून दाखवून दिलय. मुलावर असलेलं प्रेम, आपल्या नोकरीतील कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, शेवटी मुलाला ठोकलेला कडक सॅल्यूट ही त्यांच्या अभिनयाची परिसीमा होती. इतर कलाकारांच्या भूमिका जरी लांबीने लहान असल्या तरी त्यांच्या चांगल्या कामामुळे लक्षात राहतात. अजून भाव खाऊन जातो तो सिनेमाचा खलनायक मुकेश ऋषी फार कमी संवाद असूनही केवळ त्याच्या नजरेच्या जरबेने त्याने भूमिका जिवंत केलीय.

बाप मुलाच्या नात्यावर फार कमी सिनेमे आलेत. त्यात गर्दीश हा खरोखरच कायमस्वरूपी लक्षात राहील इतका सुंदर सिनेमा आहे.

शुभम शांताराम विसपुते  

No comments:

Post a Comment