कृष्णकुमार कुन्नथ हा मूळचा मल्याळी पण दिल्लीत जन्मलेला
गायक. कमालीची प्रतिभा असलेला पण त्या प्रतिभेला न्याय मिळेल इतकी संधी आणि प्रसिद्धी
न मिळालेला हा गायक. माझा मित्र अजय इंगळेचा खास आवडता आहे, तसा तो माझाही आवडता आहेच
पण अजयचा जरा जास्तच. माझं तुलनेनं थोडं जास्त प्रेम लकी अली वर आहे तर अजयच के के वर.
के के वर लिहायला कारणीभूत अजयच आहे.
सुरुवातीच्या काळात तब्बल ३५०० जिंगल्स त्याने टीव्हीवरच्या
जाहिरातींसाठी गायल्या आहेत. जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारची गाणी त्याने
गायली आहे. त्याची खासियत म्हणजे काळीज चिरत जाणारी विरह गीते तो नेहमीच कमाल गातो.
त्याच वैयक्तिक आयुष्य इतकं उत्तम असताना, म्हणजे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी बालपणापासूनची
प्रेयसी असलेल्या मुलीसोबत त्याच लग्न झालय. दोन मुलंही त्याला आहे. इतकं सगळं व्यवस्थित
असताना तो विरह गीते इतके अप्रतिम कशी काय गातो हे खरंच न सुटणार कोड आहे. के के च्या
गायकीच आणखी एक वैशिट्य आहे, त्याची मूळ भाषा हिंदी नसताना देखील इतकं स्पष्ट आणि खणखणीत
उच्चारासहित हिंदी मध्ये त्याला गाताना बघून आजच्या काळातील अरिजित, मिका यांची दया
येते.
सलमानच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असलेला "हम दिल दे चुके सनम" मधे त्याने एकच
गाणं गायलं होत. पण आजही तेच सगळ्यांच्या मनात आहे. ते म्हणजे "तडप तडप के इस
दिल से" या एका गाण्याने के के च बॉलीवूड मध्ये झोकात पदार्पण झालं. के के ने
यात काळीज पिळवटून टाकणारा जो आर्त स्वर यात लावलाय त्याला शब्दांच्या कोंदणात नाही
बसवू शकत. खासकरून दुसऱ्या कडव्यात "अगर मिले खुदा तो" मध्ये जो काही सूर
त्याने लावलाय त्यामुळे ऐश्वर्या सलमानला सोडून न जाता यालाच सोडून जातेय असं वाटावं
इतका सच्चेपणा त्याने गाण्यात दाखवलाय. इम्रान हाश्मी त्याच्यावर चित्रित झालेल्या
उत्कृष्ट गाण्यांसाठी ओळखला जातो किंबहुना
इम्रानच्या यशस्वी कारकिर्दीत त्याच्यावर चित्रित झालेली गाणी यांचा मोठा वाटा आहे.
के के हाच इम्रानच्या बहुतांशी सिनेमात (गँगस्टर, अक्सर, जन्नत १ आणि २, आशिक बनाया
आपने, द किलर इ.) त्याचा पडद्यावरचा आवाज झालाय. दोघांनी एकमेकांना पूरक राहून आपली
कारकीर्द यशस्वी बनवली आहे. गँगस्टर मधलं "तू हि मेरी शब हे" मधलं दुसऱ्या
कडव्यात आँखे 'तेरी शबनमी' हे रिपीट गाताना त्याने हलकीशी हरकत घेतली आहे. त्या हरकतीच
वर्णन कुठल्या शब्दात करणार ? "ओम शांती ओम" मधलं 'आँखो मे 'तेरी' गाताना
तो साक्षात स्वर्ग उभा करतो. इथे थोडे पॉईंट्स फराह खान ला ही द्यायला हवे तिने या
गाण्याचं खूप सुंदर असं चित्रीकरण केलंय. "लाईफ इन मेट्रो" मधली के के ने
गायलेली 'ओ मेरी जान' आणि 'अलविदा' हि दोघी गाणी त्या अलबम ची हायलाईट गाणी होती.
"काईट्स" मध्ये 'दिल क्यो ये मेरा' आणि 'जिंदगी दो पल की' मध्ये ह्रितिक
आणि के के कॉम्बो अफलातून जमून आलाय. पुढे ह्रितिकसोबतच आलेलं बसल्या जागी घायाळ करणार "गुझारीश" मधलं 'बस इतनी सी तुमसे गुझारिश हे' हे संथ लयीतील अप्रतिम गाणं. "दिल चाहता है" मध्ये 'कोई कहे केहता
रहे' या गाण्यात शान आणि शंकर महादेवन असतानाही के के लक्षात राहतो.
के के आजही प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहतो. वर्षभरात
चित्रपटात एखाददुसरं गाणं गाऊन, देशविदेशात शो करतो. उरलेल्या वेळात पार्ट्या किंवा
रिऍलिटी शो मध्ये जज बनण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो. आज के के ने
वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केलय पण ५० हा त्याच्यासाठी फक्त एक आकडा आहे . आयुष्यात
ज्या गायकांचा शो लाईव्ह बघण्याची मनापासून इच्छा आहे त्यात के के आणि लकी अली ही दोनचं
नाव आहे.
के के च्या नवीन येणाऱ्या गाण्याची वाट बघणं किंवा मग
त्याची जुनी गाणी एकूण कुणाच्या तरी आठवणीत रमून जावं... बस्स आपल्या हातात याहून जास्त
तरी काय आहे...
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment