Thursday, May 28, 2020

तात्याराव सावरकर - धगधगता क्रांतिसूर्य

तुम्ही मुसलमान आहात असं म्हटले तर मी हिंदू आहे असे तुम्हाला म्हणेन, नाहीतर मी विश्व मानव आहे असे म्हणणारे सावरकर. विनायक दामोदर सावरकर नाशिक मधील "भगूर" येथे आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला.  आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो.

ह्या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो म्हणणारे सावरकर मला भावतात, जाती प्रथा आणि आंधश्रद्धे ला विरोध करणारे सावरकर मला भावतात.मनु पासून व्यासा पर्यंत सर्वाना बाजूला ठेऊन भारतमातेला देवी आणि शिवाजी महाराजांना समोर ठेऊन हिंदू धर्म मांडणारे सावरकर मला भावतात. वय वाढेल तसे मनुष्य प्रगल्भ होत जातो. एक क्रांतिकारी ते एक समाज आणि धर्म सुधारक हा तात्यारावांचा प्रवास उल्लेखनीय आहे.

वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना ५० वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. शिक्षेचा कालावधी १९११ ते १९६० असा होता. कोर्टात शिक्षा जाहीर झाल्यावर तात्यारावांनी तिथेच इंग्रज सरकारला झोंबेल असा प्रश्न विचारला होता. Are you sure that British will rule India upto 1960? तात्यारावांचं वेगळेपण होत ते असं.

तात्यारावांना काळ्यापाण्याची शिक्षा ही शहीद अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी त्यांचा लंडन इथल्या निवास्थानातील आचारी चतुर्भुज ह्याच्याकरवी भारतात पाठवली होती. ब्रिटिश सरकारला याचा तपास लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. किनाऱ्यावर आल्यावर ते पळत सुटले, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिशांनी त्यांना फ्रांसच्या धर्तीवरून अटक केली. यामुळे फ्रांस सरकार हैराण झालं, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेलाच कसा असा त्यांचा सवाल होता. फ्रांस सरकारने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. तिथल्या निर्णयानुसार सगळ्यांसमोर, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी जाहीररीत्या उभं राहून सावरकरांना फ्रांस मध्ये अटक केली याबद्दल माफी मागितली. अटकेत असताना देखील सावरकर ब्रिटिशांसाठी डोकेदुखी ठरले होते. फ्रांस सरकारचे समाधान झाले नव्हते. तात्यारावांना जेव्हा परत इंग्लड वरून अंदमानला आणले जात होते तेव्हा फ्रांस सरकारने स्वतःची डिफेन्स मधली एक पाणबुडी कैद्याचा बोटीमागून पाठवली होती. कदाचित सावरकरांनी पुन्हा उडी मारली तर त्यांना सुखरूप वाचविण्यासाठी, पण दुर्दैवाने हे घडले नाही. बोट अंदमानात पोहचली आणि सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा सुरु झाली.

तात्याराचा अंदमानातील दिनक्रम रोज नारळाच्या काथ्या कुटायच्या, त्याचे दोर वळायचे. नंतर ८ तास लोखंडाचा "कोलू" फिरवायचा. हे सगळी अंगमेहनत झाल्यावर हा माणूस तिथं संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घ्यायचा. रात्री तुरुंगात परत गेल्यावर भिंतींवर कविता लिहून काढायच्या. सावरकर हे इतकं विलक्षण असं व्यक्तिमत्व होतं. 

तात्याराव अंदमान मध्ये तुरुंगात असताना त्यांनी सरकारला पत्र लिहिलं "मी काही राजकारणात पडणार नाही. मला माफ करा. पण इथून सुटका करा."
सरकारने ह्यावर विश्वास ठेवला. त्यांना भारतात परत पाठवलं, पण स्थानबद्धतेत ठेवलं, रत्नागिरीत. तात्यारावांनी रत्नागिरीत जातीभेद निर्मुलनासारखी राजकीय नसलेली पण समाजोपयोगी कामं विरोध पत्करून केली नंतर स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सक्रीय राजकारणात पडून इंग्रज सरकारचा विश्वासघात केला. आज जे सावरकरांना "माफीवीर" म्हणतात त्यांना एकच सांगतो अंदमानात बंदिस्त जीवन जगण्यापेक्षा बाहेर येऊन समाजोपयोगी कार्य करण्यासाठी सावरकरांनी माफी मागण्याचा डाव खेळला होता. आज सिग्नल ला हवालदाराने पकडल्यावर त्याच्यासमोर हात जोडणार्यानी सावरकरांच्या माफीनाम्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे कमाल आहे. 

तात्यारावांनी रत्नागिरीत जातीभेद कमी करण्यासाठी पतितपावन मंदिर उभारलं, तिथली पहिली पूजा नालेसफाई करणाऱ्याच्या  हातून करवली ती ही थेट गाभा-यात जाऊन, तात्यारावांची जातिभेत निर्मूलनता अशी थेट होती.

स्वातंत्र्य मिळाल्यावर सावरकरांना चांगले दिवस दिसतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचं नशीबच वेगळं होतं. इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात टाकलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा भारतातील कोंग्रेस सरकारने त्यांना गांधी-वधाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं. रत्नागिरीत तुरुंगात ठेवले असताना त्यांना ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या अक्षरशः आपण उचलूही शकत नाही. पुराव्या अभावी तात्याराव निर्दोष सुटले, सुटणारच होते. नथुरामला ह्यांनी कटात मदत करण्याची काय गरज होती? आपण पूर्ण जबाबदारीने गांधींचा वध केला असं स्वतः त्यानेच कोर्टात सांगितलं होत तरीही वैयक्तिक द्वेषापायी सावरकरांना यात गोवण्यात आलं. तर स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यासाठी लढणा-या त्यासाठी आयुष्य वेचणा-या या महापुरुषाला तुरुंगवास भोगावा लागला. याहून दुर्दैव ते काय.

नियती मोठी विचित्र असते. ज्या गांधीजींनी आयुष्यभर अहिंसा जपली त्यांना गोळ्या घालून हिंसकपणे मारण्यात आले आणि जे सावरकर ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला त्यांना आजारामुळे उपोषण स्वीकारून मृत्यू पत्करावा लागला.

असं कुठलंही क्षेत्र नव्हतं जिथं तात्यारावांनी मुक्त संचार केला नाही. लेखन, वक्तृत्व, जातीभेद निर्मूलन, विज्ञानवाद, भाषाशुद्धी चळवळ, कविता, कथा, कादंबरी, पोवाडा, फटका, आरत्या अश्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं अमूल्य असं योगदान दिल. पण, दुर्दैवाने आजही आपल्याला सावरकर पूर्ण कळले आहेत असं आपण म्हणू शकत नाही. केवळ ते ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर आजही जातीवाचक टीका केली जाते हे बघून खरंच वेदना होते.

हे हिंदू नृसिहा प्रभो विनायक राजा, तुम्हाला मनाचा मुजरा....!!!

शुभम शांताराम विसपुते

Tuesday, May 26, 2020

चलो दिल्ली - जगणं शिकवून जाणारी जर्नी



पहिल्यांदा बघितला तेव्हाच मला हा सिनेमा खूप आवडला होता. चलो दिल्ली "जर्नी मूवी" आहे. ज्यात परिस्थितीने एकत्र प्रवास करण्याची वेळ दोन अनोळखी व्यक्तींवर येते. त्यांच्या प्रवासातील गमतीजमती, ट्विस्ट अँड टर्न सगळं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दिग्दर्शक शशांक शाह आपल्या समोर मांडतो. निखळ मनोरंजनासाठी हा सिनेमा एक छान चॉईस आहे.

मुंबईत इन्व्हेस्टमेंट बँकर असणारी मिहिका मुखर्जी (लारा दत्ता) तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी विमानाने दिल्लीला जात असते. ट्राफिक सिग्नलला लाराची कार उभी असताना तिच्या कार समोर मनू गुप्ता (विनय पाठक) रिक्षात बसताना त्याची सुटकेस उघडते आणि सगळं सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त होत. त्यामुळे तिला विमानतळावर पोहचण्यास उशीर होतो आणि तिचं विमान निघून जात. नाईलाजाने तिला बजेट फ्लाईट घेऊन दिल्ली साठी निघावं लागत. योगायोगाने विनय पाठक पण त्याच विमानात असतो. त्याच्या नॉनस्टॉप बडबडीने वैतागून ती झोपून जाते, रात्री विमान लँड झाल्यावर तिला कळत की विमान काही तांत्रिक अडचणीमुळे दिल्लीला न उतरता जयपूर ला उतरलं आहे. ती जयपूरहून दिल्लीला जाण्यासाठी टॅक्सी घेते, सोबत रस्त्यात भेटलेला विनय पाठकही असतोच. दुर्दैवाने त्यांची टॅक्सी खराब होते. त्यामुळे एका ढाब्यावर त्यांना रात्रभर राहावं लागत. सकाळी उठून नुआ स्टेशन वरून ते दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत बसतात. मध्ये झुंझुनू गावाला त्यांना टीसी त्यांना उतरवून देतो. झुंझुनू गावातील गुंडांच्या तावडीत सापडून त्यातून सहीसलामत सुटून शेवटी ते एकदाचे दिल्ली ला पोहचतात. अशी सिनेमाची कथा आहे. अर्थात हि स्टोरी मी अगदीच शॉर्ट मध्ये सांगितली. या सर्व प्रवासातील त्यांच्या गमतीजमती, त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग सिनेमात बघण्याची मजा आहे. विमानतळावरील बुक शॉप मधला प्रसंग, झोपाळू टॅक्सी ड्राइवर, रात्रीच ढाब्यावरील जेवण, त्यानंतरच त्यांचं भांडण, सकाळी खूप वर्षांनी तिने अनुभवलेला सूर्योदय, मग उंट गाडीतील सफारी, रेल्वे ची चैन खेचून रेल्वे थांबवणे, टीसी ला घेवर खाऊ घालून तिकीट मिळवणं, झुंझुनू गावातील हॉटेल टोमॅटो, तिथे टोळीयुद्धामुळे उसळलेली दंगल आणि शेवटी इमोशनल करणारा दिल्लीच्या चांदणी चौक मधल्या मनू गुप्ताच्या घरातला प्रसंग. असं सगळं सिनेमात घडतं.

लारा दत्ता स्वतः या सिनेमाची निर्माती आहे. बहुतेक त्यामुळेच ती मुख्य भूमिकेत आहे. पण तिने काम मात्र उत्तम केलंय. मोठ्या कंपनीच्या बॉसचा असलेला ऍटिट्यूड ती बरोबर दाखवते. सामान्य जीवन ती जगलेलीच नसते. त्यामुळे तिला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो ते तिने तिच्या भूमिकेद्वारे छान प्रकारे दाखवलं आहे. आणि विनय पाठक या गुणी अभिनेत्याबद्दल काय बोलणार, भेजा फ्राय पासून मी त्याचा फॅन आहे. जबरदस्त टायमिंग आहे त्याच. पूर्ण सिनेमा त्याने त्याच्या खांद्यावर पेलून धरलाय असं म्हटलं तरी चालेल, इतकं सुरेख काम त्याने केलय. ही भूमिका तशी त्याला अवघड नव्हती, त्याच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये त्याने तुफान बॅटिंग केलीय. मला त्याची भूमिका कायम पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्तींसारखी वाटते, त्याचा प्रसंगानुसार असलेला भोळेपणा, चतुराई, निरागसता, हसतखेळत जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी त्याची शैली हे सगळं पुलं यांच्या लेखणीची आठवण करून देत. व्यक्ती आणि वल्ली मध्ये ज्या प्रकारे नारायण, चितळे मास्तर यांच्या कथेचा शेवट इमोशनल टच देऊन केलाय तसंच इथेही मनू गुप्ता आपल्याला शेवटी भावूक करून जातो.

चलो दिल्ली हा काही खूप ग्रेट सिनेमा नाही. पण एकदा आवर्जून बघण्यासारखा मात्र नक्कीच आहे.

शुभम शांताराम विसपुते          

Saturday, May 16, 2020

पाताल लोक - सनसनाटी वेब सिरीज


"सबसे उपर है स्वर्गलोक उसमे भगवान बसते है, उसके नीचे आता है धरतीलोक जहाँ हम इन्सान बसते है और सबसे नीचे आता है पाताल लोक जहाँ किडे रहते है और जब ये पाताल लोक के किडे धरतीलोक पर आते है तब होता है कांड!" याच डायलॉग पासून अमेझॉन प्राईम ची नवी कोरी "पाताल लोक" ह्या सिरीजची सुरुवात होते. कालच ही सिरीज रिलीझ झाली. पहिल्याच दिवशी ती बघूनही झाली. क्राईम थ्रिलर या आवडत्या प्रकारातील एक अत्यंत वेगळा विषय, त्याची नेहमीपेक्षा वेगळी मांडणी असल्याने सिरीज मुळातच खूप एंगेजिंग आहे त्यामुळे सलगपणे बघून काढली. अनुष्का शर्माने आपल्या पहिल्याच वेब सिरीज मध्ये निर्माती म्हणून "NH10" या आपल्या हार्ड हीटिंग सिनेमाप्रमाणे दमदार पदार्पण केलंय. 

एका मोठ्या न्यूज चॅनेल चा फेमस अँकर संजीव मेहरा (नीरज काबी) च्या हत्येसाठी ४ जणांची टोळी (हातोडा त्यागी, कबीर एम., टोप सिंग आणि मेरी)  दिल्लीत येते. हत्या होण्याअगोदरच यमुना नदीच्या पुलावर ते पोलिसांद्वारे पकडले जातात. या सर्व प्रकरणाचा तपास आऊटर जमुना पार्क पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर हाथिराम सिंग (जयदीप अहलावत) कडे येतो. त्याच्या साथीला त्याचा यूपीएससीची तयारी करत असणारा जुनिअर इम्रान अन्सारी (ईश्वाक सिंग) असतो. या मुख्य प्लॉट वर कथा सुरु होते. पुढची कहाणी खूप गुंतागुंतीची आणि खूप वेगळेवेगळे लेयर असलेली आहे. घडणाऱ्या गोष्टींना सामाजिक, राजकीय, वैयक्तिक असे अँगल आहे. चारही आरोपींची थेट बालपणापासून दाखवलेली बॅकग्राऊंड स्टोरी, त्यांची ट्रॅजेडी, त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फायदा घेणारे राजकारणी, पुराण शास्त्रात प्राण्यांप्रती असलेला वेगळा दृष्टिकोनही यात दिसतो याबरोबरच धर्म, जात यावरून देशात माजलेली दुफळी ही प्रभावीपणे दिसते. सोबत हाथिराम सिंगच पारिवारिक जीवन त्याची कहाणीही आहे. त्याची बायको रेणू (गुल पनाग) आणि मुलगा सिद्धार्थ यांसोबतचे त्याचे संबंध, त्यांच्यातील भांडणं सगळं या कहाणीत येत. तपासाची हि कहाणी दिल्ली, चित्रकूट, पंजाब, नेपाळ आणि थेट ISI पाकिस्तान या लेवल पर्यंत फिरते.  अनेक ट्विस्ट अँड टर्न घेऊन ती शेवटाकडे येते.

ही सिरीज संयमाची परीक्षा घेते. काहीवेळा खूप संथ तर काहीठिकाणी खूप वेगवान बनते. एकूण ९ एपिसोड आहे. प्रत्येक एपिसोड जवळपास ४० मिनिटांचा आहे. एकाच बैठकीत सलग बघायची असल्यास साधारणतः ७ तास लागतील. पहिल्या एपिसोड नंतर थोडी स्लो होते पण नंतर जी ग्रीप पकडते ती शेवटपर्यंत कायम राहते. कथेचा शानदार प्लॉट, चाबूक डायलॉग, रिअल लोकेशन्स वरचं शूट, चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्या उत्तम बाजू असल्याने सिरीज उत्तम झालीय. न्यूडिटी, इंटिमेट सीन्स भरपूर आहे आणि शिव्या या प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. इतक्या की आजवरच्या कुठल्याही सीरिजपेक्षा जास्त. पण शिव्यांचा काही अडथळा येत नाही.

सर्वोत्तम जर अशी कुठली गोष्ट यात असेल तर ती म्हणजे यातील कास्टिंग. एकदम परफेक्ट कास्टिंग. कुठलाही नावाजलेला स्टार यात नाही. सर्व अभिनेते अशे कि ज्यांनी आजवर फक्त सहायक रोल केलेत. हाथिराम सिंगच्या मुख्य भूमिकेतील जयदीप अहलावात ने बाप काम केलंय. प्रत्येक इमोशन्स तो जबरदस्त दाखवतो. आजवर त्याला इतका मोठा रोल कधी मिळाला नाही. पण या सिरीजमुळे त्याचे ड्यूज त्याला मिळाले आहे असं म्हणता येईल, इतकं जीव ओतून त्याने काम केलंय. नीरज काबी नेहमीप्रमाणे भाव खाऊन जातो. स्टार अँकर असल्याचा माज तो बरोबर दाखवतो. मुख्य आरोपी असलेला हातोडा त्यागीच्या भूमिकेतील अभिषेक बॅनर्जी जबरदस्त आहे. फार कमी डायलॉग त्याला आहे पण निव्वळ डोळ्यांनी तो आपली दहशत बसवतो. या तिघी मुख्य भूमिकांव्यतिरिक्त सिरीज मध्ये खूप पात्र आहे. पण प्रत्येक पात्राला व्यवस्थित स्क्रीन टाइम आहे. त्या पात्राची स्वतःची अशी कहाणी आहे. यात भूमिका केलेल्या लहानात लहान ऍक्टर ने आपल्या रोल ला पुरेपूर न्याय दिलाय. आवर्जून उल्लेख करावा असा हाथिरामचा असिस्टंट असलेला इम्रान अन्सारी, ईश्वाक सिंग ने कमाल केलीय या रोल मध्ये एकदम शांत, संयत तितकाच हुशार असा पोलीस सब इन्स्पेक्टर त्याने छान रंगविला आहे.

ज्यांना वेब सिरीज मधला क्राईम थ्रिलर हा प्रकार आवडतो, त्यांच्यासाठी ही सिरीज मस्ट वॉच आहे. एकदा आवर्जून बघायलाच हवी अशी "पाताल लोक"

शुभम शांताराम विसपुते 
    

Thursday, May 14, 2020

छत्रपती संभाजी महाराज


वढू तुळापूर गावातील औरंगजेबाच्या सैन्य छावणी मध्ये एका कैद खान्यात खांबाला टेकून बसलेेेेले एक युवराज. अंगावर अशी एकही जागा नाही कि जिथे जखम झालेली नसेल. झालेल्या जखमा डोळ्यांनी दिसायला नको म्हणून निर्दयी पणे त्यांचे डोळेही फोडून टाकलेले आहेत. होणाऱ्या प्रचंड त्रासाचा आवाज होऊ नये म्हणून जीभही हासडून टाकली आहे. पूर्ण शरीराची चामडी सोलवटल्याने ठिकठिकाणाहून रक्त बाहेर पडून, सुकून गेलंय. पण युवराज या सर्व त्रासाच्या पलीकडे गेलेय. त्यांना आता त्याचा काही त्रासही वाटेनासा झालाय. ते फक्त मनातून एकच प्रार्थना करताय की, आता या क्षणी थोरल्या छत्रपतींशी म्हणजेच त्यांच्या  लाडक्या आबासाहेबांशी त्यांना बोलायचंय, त्यांना भेटायचंय. आणि अचानक खोलीच्या कोपऱ्यात तेजस्वी प्रकाश चमकला, हळूहळू तो मानवी आकार घेऊ लागला, आणि त्या तेजस्वी प्रकाशापेक्षाही तेजस्वी अशी मानवी आकृती तिथे प्रकट झाली. साक्षात शिवप्रभुंची. त्यांनी आपल्या लाडक्या युवराजाला बघितलं त्यांच्या काळजात चर्रर्रर्र झालं. हलकेच त्याच्याजवळ गेले आणि त्याला मायेने हाक घातली. शंभूबाळ...!!! या हाकेसरशी युवराजांचं मन एकदम भूतकाळात गेलं. 

किल्ले पुरंदर वर युवराजांचा जन्म झाला. जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या थोरल्या मुलाची आठवण म्हणून त्यांचे नाव "संभाजी" असे ठेवले. पण अवघ्या दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई यांचे आजारपणामुळे निधन झाले. आपल्या आईचा चेहराही त्यांना कधी आठवला नाही. थोरले छत्रपती सतत मोहिमेवर असल्याने त्यांनाही युवराजांना कधी जास्त समय देता आला नाही. युवराज वाढत होते त्यांच्या आजी म्हणजेच जिजाऊ माँसाहेबांच्या छत्रछायेखाली. जिजाऊंचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्या त्यांना रामायण-महाभारतातल्या गोष्टींसोबतच राजकारण आणि धर्मकारणाचे धडे देत होत्या. मातोश्री सई बाई जरी नसल्या तरी युवराजांना सावत्र अश्या सात मातोश्री होत्या. त्यातल्या पुतळाबाई मासाहेबांचा युवराजांवर खास जीव होता. युवराजांचं बालपण अशापद्धतीने सुरु होत.

पण एके दिवशी थोरल्या छत्रपतींनी त्यांच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात जोखमीची आणि लांब पल्ल्याची मोहीम आखली. साक्षात औरंगजेबाला त्याच्याच दरबारात आग्र्याला जाऊन भेटण्याची. त्यांनी युवराजांना पण सोबत घ्यायचं ठरवलं. युवराजांचं वय त्यावेळी केवळ ९ वर्षांचे होते. आग्रा मोहिमेला सुरुवात झाली. जवळपास ७० दिवसांचा प्रवास करून महाराज आग्र्यात पोहचले. बादशाहच्या दरबारात राजांचा झालेला अपमान आणि त्या अपमानाला राजांनी करारीपानाने दिलेले उत्तर हे सर्व युवराजांच्या बालमनावर कोरले गेले. पुढे राजांना कैद झाली आणि कैदेतून निसटताना त्यांनी अजून एक जोखिमीने भरलेला निर्णय घेतला. त्यांनी युवराजांना मथुरेत पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्या मेहुण्याकडे ठेवले. अनोळखी ठिकाणी, अनोळखी प्रदेशात युवराज राहिले. इथेच त्यांनी संस्कृत चे धडे गिरवले. पुढे वर्षभराने अत्यंत थरारक प्रवास करत युवराज स्वराज्यात परत आले. युवराजांच्या आयुष्यावर जर सगळ्यात जास्त कुठल्या मोहिमेचा परिणाम झाला असेल तर ती हीच आग्रा मोहीम. या मोहिमेतून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.

संस्कृत मध्ये गोडी निर्माण झाल्यामुळे युवराजांनी संस्कृत पंडितांकडून संस्कृत शिकून घेतली. पुढे संस्कृत या भाषेवर त्यांनी इतके प्रभुत्व मिळवले की वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी "बुधभुषणम" हा पूर्ण संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. शिकण्याबरोबरच त्यांचं लहानमोठ्या मोहिमेवर जाऊन युद्ध कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरु होते. तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात ते प्रभुत्व मिळवत होते. अशातच काशी वरून आलेला त्यांच्याच वयाचा एक शाक्तपंथीय साधुशी त्यांची भेट झाली. ह्या एका भेटीमुळे दोघींमध्ये जन्मांतरीचे नाते तयार झाले. जे मरेपर्यंत टिकले. अत्यंत जिवलग मित्र त्यांना त्या साधूच्या रूपात मिळाला. त्याच नाव होतं. "कवी कलश"

संभाजीराजे हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे व अभ्यासू व्यक्ती होते. बाहेरून कितीही करारी दिसत असले तरी राजे मुळातच खूप हळव्या मनाचे होते. शंभूराजे हे अत्यंत धार्मिक होते. त्यांचा मित्रवर्ग धर्म उपासक असल्याने धर्मशास्त्रात त्यांना विशेष आवड होती. शिवरायांच्या साठी संभाजीराजे म्हणजे आपल्या प्रिय पत्नीने दिलेला एकमेव अमूल्य ठेवा होते.गृहकलह कुणाला चुकले आहेत, शिवाजी महाराज ही त्याला अपवाद नव्हते. छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत निपुण सेनानी होते आणि आपल्या सैन्यात अत्यंत लोकप्रिय होते.

कवी कलश उपरा असल्याने आणि सतत युवराजांच्या सोबतीला असल्याने त्याच्याबद्दल दरबारात एक अढी होती. त्याचा फटका युवराजांना ही बसत होता. पण यासाऱ्यामुळे त्यांना फरक पडणारा नव्हता. त्यांचं आणि कवी कलश यांचं आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम उत्तम असं बॉण्डिंग होत. शंभूराजांचा स्वभाव हा तापट असल्याने समोर कुणीही असेल तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता ते त्याला सुनवायचे. यामुळे दरबारातील बहुतांश मंडळी त्यांच्या विरोधात होती.

पुढे थोरल्या महाराजांच्या मृत्यू नंतर युवराजांचा छत्रपती म्हणून अभिषेक झाला. आता ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले. शंभू राजेंचा राज्याभिषेक झाला नसता तर हिंदवी स्वराज्य दोनच वर्षात संपले असते. आधी शिवरायांची इच्छा ,नंतर राज्याभिषेकास घेऊन प्रचंड कलह आणि थोरल्या छत्रपतींच्या मरणोपरांत त्यांनी घडवलेले हिंदवी स्वराज्य जपायचे म्हणून राजकर्तव्य म्हणून सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. राज्यभिषेकानंतर ९ वर्षे ते छत्रपती म्हणून राहिले. ही ९ वर्षे त्यांच्या जीवनात वादळासारखी ठरली. एकाच वेळेला अजस्त्र सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाशी लढताना त्यांना घरातच स्वकियांशीदेखील लढावे लागले. यासर्वांमधे त्यांची पत्नी महाराणी येसूबाई यांची त्यांना समर्थ साथ होती. शंभूराजांनी ते गडावर नसताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार येसूबाईंना दिले होते. यासाठी त्यांना स्वराज्याच्या कुलमुखत्यार करून "श्री सखी राज्ञी जयती" हा किताब दिला. स्त्री सक्षमीकरणाचे हे त्याकाळचे सर्वश्रेष्ठ उदाहरण होते. परकीयांशी समर्थपणे लढताना स्वकीयांनीच शेवटी घात केला, आणि स्वराज्याचा हा पोलादी राजा मुघलांच्या कैदेत सापडला. केवळ विचार करूनही अंगावर सरसरून भीतीने काटा येईल अश्या मरणयातना त्यांना कैदेत भोगाव्या लागल्या. कमालीच्या हालअपेष्टा सहन करून त्यांनी आपला देह ठेवला.

इतिहासातील मला जर भुरळ घालणार कुठलं व्यक्तिमत्व असेल तर ते हेच. जगावे कसे तर शिवछत्रपतींच्या सारखे आणि मरणाला सामोरे जावे कसे तर शंभू छत्रपतींच्या सारखे, त्यामुळं शिवराय कसे व कुणासाठी जगले आणि शंभूराजे का व कुणासाठी मरणाला सामोरे गेले ह्याचा अभ्यास नक्की करा. गेल्या जन्मात काही थोर पुण्य केलेलं असल्याने आपल्याला या पवित्र मराठी भूमीत जन्म मिळाला याचा सार्थ अभिमान वाटेल. जयोस्तु मराठा...!!!

छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
हर हर महादेव

शुभम शांताराम विसपुते

Monday, May 11, 2020

मर्दानी - राणी इस बॅक विथ अ बूम!


नुकतेच प्राईम वर "मर्दानी" चे दोन्ही भाग पहिले. मुळात हिंदी मेनस्ट्रीम सिनेमानं तुलनेनं स्त्रीप्रधान व्यक्तिरेखांकडं दुर्लक्ष केलं असताना अशा प्रकारे ‘मर्दानी’ नावाची फ्रँचाइझ तयार करणं हे विशेष आहेच. पण पहिल्या चित्रपटात मानवी तस्करीचा विषय मांडल्यावर दुसऱ्या चित्रपटात तितक्याच भेदकपणे लैंगिक अत्याचार हा विषय मांडणं हेही तसं धाडसाचंच. गाणी नसणं, विषयाचा फापटपसारा न मांडणं, व्यक्तिरेखांचा सूक्ष्म अभ्यास आणि उत्तम कलाकार या दोन्ही भागाच्या जमेच्या बाजू आहेत. सर्वानी आवर्जून बघायला हवे असे हे दोन्ही सिनेमे आहेत. खासकरून मुलींनी तर जरूर बघायला हवेत. दोघी भागांबद्दल सविस्तर सांगतो.

मर्दानी - "मर्दानी" हा ह्यूमन आणि ड्रग्स ट्रॅफिकिंग वर आधारित थ्रिलर आहे. खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, मर्दानी च खर यश हेच आहे.

शिवानी शिवाजी रॉय (राणी मुखर्जी) इन्स्पेक्टर, मुंबई क्राईम ब्रांच. पती डॉ. बिक्रम रॉय व लहानग्या भाचीसह राहत असते. अनाथालयात राहणाऱ्या व फुलं विकणाऱ्या कुमारवयीन 'प्यारी'वर तिचा फार जीव असतो. मुलीसारखीच असते. एके दिवशी अचानक 'प्यारी' गायब होते आणि तिचा शोध घेताना शिवानीला अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचाच शोध लागतो. एका मोठ्या रॅकेटला उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यास ज्या किंमती मोजायला लागतात, त्या ती मोजते. धक्के पचवते, पुन्हा उभारी घेते, लढते, भिडते, हार मानत नाही. पुढे तिला मुंबईहून दिल्लीला जावं लागत. खूप संघर्ष करून शेवटी ती खलनायकापर्यन्त कशी पोहचते आणि त्याला धडा कशी शिकवते हे बघायलाच हवं. यातील खलनायक नवोदित 'ताहीर भसीन'. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडच्या भूमिकेतला ताहीर भसीन अत्यंत संयतपणे अंगावर येणारा खलनायक साकार करतो. त्याच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यात तो छाप सोडतो. इतक्या शांतपणे क्वचितच कुणी थरकाप उडवला असेल किंवा संताप आणला असेल. ताहीर ला बघताना "मर्डर २" मधील खलनायक प्रशांत नारायणन ची आठवण येते 

मर्दानी-२ : "मर्दानी - २" हा डार्क, सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. त्यातल्या काही गोष्टी काही वेळा तर्कांना न पटणाऱ्या आहेत, एखाद्या ठिकाणी तो लाऊड झाला आहे, काही ठिकाणी तो अधिक चांगला व्हायच्या शक्यता आहेत, या सगळ्या गोष्टी खऱ्याच; पण तरीसुद्धा पावणेदोन तास गुंतवून ठेवण्यात आणि विषयाचं गांभीर्य नेमकेपणानं, भेदक पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहचवण्यात तो यशस्वी होतो.  राणी मुखर्जीच्या तडफदार, प्रगल्भ अभिनयासमोर विशाल जेठवा या तरुण अभिनेत्यानं साकारलेल्या विकृत खलनायकानंही तितकाच प्रभाव पाडणं हे विशेष आहे. ‘मर्दानी २’ हा काही सस्पेन्स ड्रामा नाही. उलट तो अगदी पहिल्याच प्रसंगात थेट खलनायकच दाखवतो आणि तो खलनायक काय काय करत जाणार हेही सांगतो. त्यामुळं या दोन व्यक्तिरेखांमध्ये साप-मुंगसासारखा खेळ कसा रंगत जातो हे हा चित्रपट दाखवतो. तो अंगावर येतो, धक्का देतो आणि त्याच वेळी स्त्रीसुरक्षा हा विषयही गांभीर्यानं अधोरेखित करतो.

राजस्थानमधल्या कोटा शहरात सनी (विशाल जेठवा) हा एक विकृत तरुण आहे हे तो स्वतःच पहिल्याच प्रसंगात सांगतो. लैंगिक अत्याचार करणारा आणि खून करणारा हा क्रूर तरुण. तो एका तरुणीवर अत्याचार करून तिला बीभत्स पद्धतीनं मारतो आणि त्यानंतर एसीपी शिवानी शिवाजी रॉयकडे (राणी मुखर्जी) हे प्रकरण येतं. त्यातून होत जाणाऱ्या एकेक घडामोडी आणि शिवानी या सनीपर्यंत कशी पोहचते हे थ्रिलर पद्धतीनं हा चित्रपट दाखवतो. एकीकडं दिग्दर्शक गुन्हा होतानाच दाखवतो, एवढंच नव्हे तर तो गुन्हा करताना खलनायकही एक प्रकारे प्रेक्षकांना ‘विश्वासा’त घेतो. त्यामुळं नायिका त्या गोष्टीशी कशी झुंज देणार याबद्दल उत्सुकता वाढते आणि त्यातून तिच्याबद्दलचा आदरही वाढतो. एकीकडं सध्याच्या वेब सिरीजच्या जमान्यात अत्याचारांचे आणि हिंसेचे बीभत्स तपशील दाखवण्याचा ट्रेंड असताना चित्रपटात ते कटाक्षानं टाळले आहेत, मात्र त्याच वेळी त्यांचा परिणाम सखोल राहील याची काळजी घेतली आहे. कथा कुठंही न हलत नाही. विशालचा खलनायक हे बॉलिवूडमधलं मोठं ‘फाइंड’ आहे. त्याचा खलनायक खरंच भीतीदायक वाटतो. इतर कलाकारही त्या त्या व्यक्तिरेखांमध्ये विलक्षण फिट बसल्यानं या चित्रपटाचा परिणाम गहिरा होतो. या चित्रपटात गाणी नाहीत; मात्र पार्श्वसंगीत उत्तम आहे.

राणी मुखर्जीची "शिवानी शिवाजी रॉय" या दोन्ही चित्रपटात संपूर्णपणे व्यापून राहिली आहे. देहबोली, डोळ्यांचा वापर, करारी बोलणं आणि त्याच वेळी संवेदनशील असणं हे सगळं राणीनं कमालीच्या नेमकेपणानं दाखवलं आहे. राणीने दाखवलेली एनर्जी 'मर्दानी'ची जान आहे. खरं तर ह्या भूमिकेला साकार करताना तिची देहयष्टी आड येऊ शकली असती, पण केवळ जबरदस्त एनर्जीच्या जोरावर तिने ही उणीव भरून काढली आहे. आक्रमक देहबोली व अचूक संवादफेक, जोडीला खमकी नजर व जबरदस्त आत्मविश्वास अशी ही 'मर्दानी' राणीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका नक्कीच आहे. तिच्या व्यक्तिरेखेच्या निमित्तानं स्त्रीबद्दलची पुरुषांची मानसिकता हा विषयही समोर येतो. राणीनं सगळ्या गोष्टींना खरोखर न्याय दिला आहे.

शुभम शांताराम विसपुते