Thursday, May 28, 2020

तात्याराव सावरकर - धगधगता क्रांतिसूर्य

तुम्ही मुसलमान आहात असं म्हटले तर मी हिंदू आहे असे तुम्हाला म्हणेन, नाहीतर मी विश्व मानव आहे असे म्हणणारे सावरकर. विनायक दामोदर सावरकर नाशिक मधील "भगूर" येथे आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला.  आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो.

ह्या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो म्हणणारे सावरकर मला भावतात, जाती प्रथा आणि आंधश्रद्धे ला विरोध करणारे सावरकर मला भावतात.मनु पासून व्यासा पर्यंत सर्वाना बाजूला ठेऊन भारतमातेला देवी आणि शिवाजी महाराजांना समोर ठेऊन हिंदू धर्म मांडणारे सावरकर मला भावतात. वय वाढेल तसे मनुष्य प्रगल्भ होत जातो. एक क्रांतिकारी ते एक समाज आणि धर्म सुधारक हा तात्यारावांचा प्रवास उल्लेखनीय आहे.

वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना ५० वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. शिक्षेचा कालावधी १९११ ते १९६० असा होता. कोर्टात शिक्षा जाहीर झाल्यावर तात्यारावांनी तिथेच इंग्रज सरकारला झोंबेल असा प्रश्न विचारला होता. Are you sure that British will rule India upto 1960? तात्यारावांचं वेगळेपण होत ते असं.

तात्यारावांना काळ्यापाण्याची शिक्षा ही शहीद अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी त्यांचा लंडन इथल्या निवास्थानातील आचारी चतुर्भुज ह्याच्याकरवी भारतात पाठवली होती. ब्रिटिश सरकारला याचा तपास लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. किनाऱ्यावर आल्यावर ते पळत सुटले, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिशांनी त्यांना फ्रांसच्या धर्तीवरून अटक केली. यामुळे फ्रांस सरकार हैराण झालं, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेलाच कसा असा त्यांचा सवाल होता. फ्रांस सरकारने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. तिथल्या निर्णयानुसार सगळ्यांसमोर, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी जाहीररीत्या उभं राहून सावरकरांना फ्रांस मध्ये अटक केली याबद्दल माफी मागितली. अटकेत असताना देखील सावरकर ब्रिटिशांसाठी डोकेदुखी ठरले होते. फ्रांस सरकारचे समाधान झाले नव्हते. तात्यारावांना जेव्हा परत इंग्लड वरून अंदमानला आणले जात होते तेव्हा फ्रांस सरकारने स्वतःची डिफेन्स मधली एक पाणबुडी कैद्याचा बोटीमागून पाठवली होती. कदाचित सावरकरांनी पुन्हा उडी मारली तर त्यांना सुखरूप वाचविण्यासाठी, पण दुर्दैवाने हे घडले नाही. बोट अंदमानात पोहचली आणि सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा सुरु झाली.

तात्याराचा अंदमानातील दिनक्रम रोज नारळाच्या काथ्या कुटायच्या, त्याचे दोर वळायचे. नंतर ८ तास लोखंडाचा "कोलू" फिरवायचा. हे सगळी अंगमेहनत झाल्यावर हा माणूस तिथं संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घ्यायचा. रात्री तुरुंगात परत गेल्यावर भिंतींवर कविता लिहून काढायच्या. सावरकर हे इतकं विलक्षण असं व्यक्तिमत्व होतं. 

तात्याराव अंदमान मध्ये तुरुंगात असताना त्यांनी सरकारला पत्र लिहिलं "मी काही राजकारणात पडणार नाही. मला माफ करा. पण इथून सुटका करा."
सरकारने ह्यावर विश्वास ठेवला. त्यांना भारतात परत पाठवलं, पण स्थानबद्धतेत ठेवलं, रत्नागिरीत. तात्यारावांनी रत्नागिरीत जातीभेद निर्मुलनासारखी राजकीय नसलेली पण समाजोपयोगी कामं विरोध पत्करून केली नंतर स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सक्रीय राजकारणात पडून इंग्रज सरकारचा विश्वासघात केला. आज जे सावरकरांना "माफीवीर" म्हणतात त्यांना एकच सांगतो अंदमानात बंदिस्त जीवन जगण्यापेक्षा बाहेर येऊन समाजोपयोगी कार्य करण्यासाठी सावरकरांनी माफी मागण्याचा डाव खेळला होता. आज सिग्नल ला हवालदाराने पकडल्यावर त्याच्यासमोर हात जोडणार्यानी सावरकरांच्या माफीनाम्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे कमाल आहे. 

तात्यारावांनी रत्नागिरीत जातीभेद कमी करण्यासाठी पतितपावन मंदिर उभारलं, तिथली पहिली पूजा नालेसफाई करणाऱ्याच्या  हातून करवली ती ही थेट गाभा-यात जाऊन, तात्यारावांची जातिभेत निर्मूलनता अशी थेट होती.

स्वातंत्र्य मिळाल्यावर सावरकरांना चांगले दिवस दिसतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचं नशीबच वेगळं होतं. इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात टाकलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा भारतातील कोंग्रेस सरकारने त्यांना गांधी-वधाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं. रत्नागिरीत तुरुंगात ठेवले असताना त्यांना ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या अक्षरशः आपण उचलूही शकत नाही. पुराव्या अभावी तात्याराव निर्दोष सुटले, सुटणारच होते. नथुरामला ह्यांनी कटात मदत करण्याची काय गरज होती? आपण पूर्ण जबाबदारीने गांधींचा वध केला असं स्वतः त्यानेच कोर्टात सांगितलं होत तरीही वैयक्तिक द्वेषापायी सावरकरांना यात गोवण्यात आलं. तर स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यासाठी लढणा-या त्यासाठी आयुष्य वेचणा-या या महापुरुषाला तुरुंगवास भोगावा लागला. याहून दुर्दैव ते काय.

नियती मोठी विचित्र असते. ज्या गांधीजींनी आयुष्यभर अहिंसा जपली त्यांना गोळ्या घालून हिंसकपणे मारण्यात आले आणि जे सावरकर ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला त्यांना आजारामुळे उपोषण स्वीकारून मृत्यू पत्करावा लागला.

असं कुठलंही क्षेत्र नव्हतं जिथं तात्यारावांनी मुक्त संचार केला नाही. लेखन, वक्तृत्व, जातीभेद निर्मूलन, विज्ञानवाद, भाषाशुद्धी चळवळ, कविता, कथा, कादंबरी, पोवाडा, फटका, आरत्या अश्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं अमूल्य असं योगदान दिल. पण, दुर्दैवाने आजही आपल्याला सावरकर पूर्ण कळले आहेत असं आपण म्हणू शकत नाही. केवळ ते ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर आजही जातीवाचक टीका केली जाते हे बघून खरंच वेदना होते.

हे हिंदू नृसिहा प्रभो विनायक राजा, तुम्हाला मनाचा मुजरा....!!!

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment