वढू तुळापूर गावातील औरंगजेबाच्या सैन्य छावणी मध्ये एका कैद खान्यात खांबाला टेकून बसलेेेेले एक युवराज. अंगावर अशी एकही जागा नाही कि जिथे जखम झालेली नसेल. झालेल्या जखमा डोळ्यांनी दिसायला नको म्हणून निर्दयी पणे त्यांचे डोळेही फोडून टाकलेले आहेत. होणाऱ्या प्रचंड त्रासाचा आवाज होऊ नये म्हणून जीभही हासडून टाकली आहे. पूर्ण शरीराची चामडी सोलवटल्याने ठिकठिकाणाहून रक्त बाहेर पडून, सुकून गेलंय. पण युवराज या सर्व त्रासाच्या पलीकडे गेलेय. त्यांना आता त्याचा काही त्रासही वाटेनासा झालाय. ते फक्त मनातून एकच प्रार्थना करताय की, आता या क्षणी थोरल्या छत्रपतींशी म्हणजेच त्यांच्या लाडक्या आबासाहेबांशी त्यांना बोलायचंय, त्यांना भेटायचंय. आणि अचानक खोलीच्या कोपऱ्यात तेजस्वी प्रकाश चमकला, हळूहळू तो मानवी आकार घेऊ लागला, आणि त्या तेजस्वी प्रकाशापेक्षाही तेजस्वी अशी मानवी आकृती तिथे प्रकट झाली. साक्षात शिवप्रभुंची. त्यांनी आपल्या लाडक्या युवराजाला बघितलं त्यांच्या काळजात चर्रर्रर्र झालं. हलकेच त्याच्याजवळ गेले आणि त्याला मायेने हाक घातली. शंभूबाळ...!!! या हाकेसरशी युवराजांचं मन एकदम भूतकाळात गेलं.
किल्ले पुरंदर वर युवराजांचा जन्म झाला. जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या थोरल्या मुलाची आठवण म्हणून त्यांचे नाव "संभाजी" असे ठेवले. पण अवघ्या दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई यांचे आजारपणामुळे निधन झाले. आपल्या आईचा चेहराही त्यांना कधी आठवला नाही. थोरले छत्रपती सतत मोहिमेवर असल्याने त्यांनाही युवराजांना कधी जास्त समय देता आला नाही. युवराज वाढत होते त्यांच्या आजी म्हणजेच जिजाऊ माँसाहेबांच्या छत्रछायेखाली. जिजाऊंचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्या त्यांना रामायण-महाभारतातल्या गोष्टींसोबतच राजकारण आणि धर्मकारणाचे धडे देत होत्या. मातोश्री सई बाई जरी नसल्या तरी युवराजांना सावत्र अश्या सात मातोश्री होत्या. त्यातल्या पुतळाबाई मासाहेबांचा युवराजांवर खास जीव होता. युवराजांचं बालपण अशापद्धतीने सुरु होत.
पण एके दिवशी थोरल्या छत्रपतींनी त्यांच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात जोखमीची आणि लांब पल्ल्याची मोहीम आखली. साक्षात औरंगजेबाला त्याच्याच दरबारात आग्र्याला जाऊन भेटण्याची. त्यांनी युवराजांना पण सोबत घ्यायचं ठरवलं. युवराजांचं वय त्यावेळी केवळ ९ वर्षांचे होते. आग्रा मोहिमेला सुरुवात झाली. जवळपास ७० दिवसांचा प्रवास करून महाराज आग्र्यात पोहचले. बादशाहच्या दरबारात राजांचा झालेला अपमान आणि त्या अपमानाला राजांनी करारीपानाने दिलेले उत्तर हे सर्व युवराजांच्या बालमनावर कोरले गेले. पुढे राजांना कैद झाली आणि कैदेतून निसटताना त्यांनी अजून एक जोखिमीने भरलेला निर्णय घेतला. त्यांनी युवराजांना मथुरेत पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्या मेहुण्याकडे ठेवले. अनोळखी ठिकाणी, अनोळखी प्रदेशात युवराज राहिले. इथेच त्यांनी संस्कृत चे धडे गिरवले. पुढे वर्षभराने अत्यंत थरारक प्रवास करत युवराज स्वराज्यात परत आले. युवराजांच्या आयुष्यावर जर सगळ्यात जास्त कुठल्या मोहिमेचा परिणाम झाला असेल तर ती हीच आग्रा मोहीम. या मोहिमेतून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.
संस्कृत मध्ये गोडी निर्माण झाल्यामुळे युवराजांनी संस्कृत पंडितांकडून संस्कृत शिकून घेतली. पुढे संस्कृत या भाषेवर त्यांनी इतके प्रभुत्व मिळवले की वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी "बुधभुषणम" हा पूर्ण संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. शिकण्याबरोबरच त्यांचं लहानमोठ्या मोहिमेवर जाऊन युद्ध कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरु होते. तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात ते प्रभुत्व मिळवत होते. अशातच काशी वरून आलेला त्यांच्याच वयाचा एक शाक्तपंथीय साधुशी त्यांची भेट झाली. ह्या एका भेटीमुळे दोघींमध्ये जन्मांतरीचे नाते तयार झाले. जे मरेपर्यंत टिकले. अत्यंत जिवलग मित्र त्यांना त्या साधूच्या रूपात मिळाला. त्याच नाव होतं. "कवी कलश"
संभाजीराजे हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे व अभ्यासू व्यक्ती होते. बाहेरून कितीही करारी दिसत असले तरी राजे मुळातच खूप हळव्या मनाचे होते. शंभूराजे हे अत्यंत धार्मिक होते. त्यांचा मित्रवर्ग धर्म उपासक असल्याने धर्मशास्त्रात त्यांना विशेष आवड होती. शिवरायांच्या साठी संभाजीराजे म्हणजे आपल्या प्रिय पत्नीने दिलेला एकमेव अमूल्य ठेवा होते.गृहकलह कुणाला चुकले आहेत, शिवाजी महाराज ही त्याला अपवाद नव्हते. छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत निपुण सेनानी होते आणि आपल्या सैन्यात अत्यंत लोकप्रिय होते.
कवी कलश उपरा असल्याने आणि सतत युवराजांच्या सोबतीला असल्याने त्याच्याबद्दल दरबारात एक अढी होती. त्याचा फटका युवराजांना ही बसत होता. पण यासाऱ्यामुळे त्यांना फरक पडणारा नव्हता. त्यांचं आणि कवी कलश यांचं आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम उत्तम असं बॉण्डिंग होत. शंभूराजांचा स्वभाव हा तापट असल्याने समोर कुणीही असेल तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता ते त्याला सुनवायचे. यामुळे दरबारातील बहुतांश मंडळी त्यांच्या विरोधात होती.
पुढे थोरल्या महाराजांच्या मृत्यू नंतर युवराजांचा छत्रपती म्हणून अभिषेक झाला. आता ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले. शंभू राजेंचा राज्याभिषेक झाला नसता तर हिंदवी स्वराज्य दोनच वर्षात संपले असते. आधी शिवरायांची इच्छा ,नंतर राज्याभिषेकास घेऊन प्रचंड कलह आणि थोरल्या छत्रपतींच्या मरणोपरांत त्यांनी घडवलेले हिंदवी स्वराज्य जपायचे म्हणून राजकर्तव्य म्हणून सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. राज्यभिषेकानंतर ९ वर्षे ते छत्रपती म्हणून राहिले. ही ९ वर्षे त्यांच्या जीवनात वादळासारखी ठरली. एकाच वेळेला अजस्त्र सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाशी लढताना त्यांना घरातच स्वकियांशीदेखील लढावे लागले. यासर्वांमधे त्यांची पत्नी महाराणी येसूबाई यांची त्यांना समर्थ साथ होती. शंभूराजांनी ते गडावर नसताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार येसूबाईंना दिले होते. यासाठी त्यांना स्वराज्याच्या कुलमुखत्यार करून "श्री सखी राज्ञी जयती" हा किताब दिला. स्त्री सक्षमीकरणाचे हे त्याकाळचे सर्वश्रेष्ठ उदाहरण होते. परकीयांशी समर्थपणे लढताना स्वकीयांनीच शेवटी घात केला, आणि स्वराज्याचा हा पोलादी राजा मुघलांच्या कैदेत सापडला. केवळ विचार करूनही अंगावर सरसरून भीतीने काटा येईल अश्या मरणयातना त्यांना कैदेत भोगाव्या लागल्या. कमालीच्या हालअपेष्टा सहन करून त्यांनी आपला देह ठेवला.
इतिहासातील मला जर भुरळ घालणार कुठलं व्यक्तिमत्व असेल तर ते हेच. जगावे कसे तर शिवछत्रपतींच्या सारखे आणि मरणाला सामोरे जावे कसे तर शंभू छत्रपतींच्या सारखे, त्यामुळं शिवराय कसे व कुणासाठी जगले आणि शंभूराजे का व कुणासाठी मरणाला सामोरे गेले ह्याचा अभ्यास नक्की करा. गेल्या जन्मात काही थोर पुण्य केलेलं असल्याने आपल्याला या पवित्र मराठी भूमीत जन्म मिळाला याचा सार्थ अभिमान वाटेल. जयोस्तु मराठा...!!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
हर हर महादेव
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment