पहिल्यांदा बघितला तेव्हाच मला हा सिनेमा खूप आवडला होता. चलो दिल्ली "जर्नी मूवी" आहे. ज्यात परिस्थितीने एकत्र प्रवास करण्याची वेळ दोन अनोळखी व्यक्तींवर येते. त्यांच्या प्रवासातील गमतीजमती, ट्विस्ट अँड टर्न सगळं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दिग्दर्शक शशांक शाह आपल्या समोर मांडतो. निखळ मनोरंजनासाठी हा सिनेमा एक छान चॉईस आहे.
मुंबईत इन्व्हेस्टमेंट बँकर असणारी मिहिका मुखर्जी (लारा दत्ता) तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी विमानाने दिल्लीला जात असते. ट्राफिक सिग्नलला लाराची कार उभी असताना तिच्या कार समोर मनू गुप्ता (विनय पाठक) रिक्षात बसताना त्याची सुटकेस उघडते आणि सगळं सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त होत. त्यामुळे तिला विमानतळावर पोहचण्यास उशीर होतो आणि तिचं विमान निघून जात. नाईलाजाने तिला बजेट फ्लाईट घेऊन दिल्ली साठी निघावं लागत. योगायोगाने विनय पाठक पण त्याच विमानात असतो. त्याच्या नॉनस्टॉप बडबडीने वैतागून ती झोपून जाते, रात्री विमान लँड झाल्यावर तिला कळत की विमान काही तांत्रिक अडचणीमुळे दिल्लीला न उतरता जयपूर ला उतरलं आहे. ती जयपूरहून दिल्लीला जाण्यासाठी टॅक्सी घेते, सोबत रस्त्यात भेटलेला विनय पाठकही असतोच. दुर्दैवाने त्यांची टॅक्सी खराब होते. त्यामुळे एका ढाब्यावर त्यांना रात्रभर राहावं लागत. सकाळी उठून नुआ स्टेशन वरून ते दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत बसतात. मध्ये झुंझुनू गावाला त्यांना टीसी त्यांना उतरवून देतो. झुंझुनू गावातील गुंडांच्या तावडीत सापडून त्यातून सहीसलामत सुटून शेवटी ते एकदाचे दिल्ली ला पोहचतात. अशी सिनेमाची कथा आहे. अर्थात हि स्टोरी मी अगदीच शॉर्ट मध्ये सांगितली. या सर्व प्रवासातील त्यांच्या गमतीजमती, त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग सिनेमात बघण्याची मजा आहे. विमानतळावरील बुक शॉप मधला प्रसंग, झोपाळू टॅक्सी ड्राइवर, रात्रीच ढाब्यावरील जेवण, त्यानंतरच त्यांचं भांडण, सकाळी खूप वर्षांनी तिने अनुभवलेला सूर्योदय, मग उंट गाडीतील सफारी, रेल्वे ची चैन खेचून रेल्वे थांबवणे, टीसी ला घेवर खाऊ घालून तिकीट मिळवणं, झुंझुनू गावातील हॉटेल टोमॅटो, तिथे टोळीयुद्धामुळे उसळलेली दंगल आणि शेवटी इमोशनल करणारा दिल्लीच्या चांदणी चौक मधल्या मनू गुप्ताच्या घरातला प्रसंग. असं सगळं सिनेमात घडतं.
लारा दत्ता स्वतः या सिनेमाची निर्माती आहे. बहुतेक त्यामुळेच ती मुख्य भूमिकेत आहे. पण तिने काम मात्र उत्तम केलंय. मोठ्या कंपनीच्या बॉसचा असलेला ऍटिट्यूड ती बरोबर दाखवते. सामान्य जीवन ती जगलेलीच नसते. त्यामुळे तिला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो ते तिने तिच्या भूमिकेद्वारे छान प्रकारे दाखवलं आहे. आणि विनय पाठक या गुणी अभिनेत्याबद्दल काय बोलणार, भेजा फ्राय पासून मी त्याचा फॅन आहे. जबरदस्त टायमिंग आहे त्याच. पूर्ण सिनेमा त्याने त्याच्या खांद्यावर पेलून धरलाय असं म्हटलं तरी चालेल, इतकं सुरेख काम त्याने केलय. ही भूमिका तशी त्याला अवघड नव्हती, त्याच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये त्याने तुफान बॅटिंग केलीय. मला त्याची भूमिका कायम पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्तींसारखी वाटते, त्याचा प्रसंगानुसार असलेला भोळेपणा, चतुराई, निरागसता, हसतखेळत जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी त्याची शैली हे सगळं पुलं यांच्या लेखणीची आठवण करून देत. व्यक्ती आणि वल्ली मध्ये ज्या प्रकारे नारायण, चितळे मास्तर यांच्या कथेचा शेवट इमोशनल टच देऊन केलाय तसंच इथेही मनू गुप्ता आपल्याला शेवटी भावूक करून जातो.
चलो दिल्ली हा काही खूप ग्रेट सिनेमा नाही. पण एकदा आवर्जून बघण्यासारखा मात्र नक्कीच आहे.
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment