"सबसे उपर है स्वर्गलोक उसमे भगवान बसते है, उसके नीचे आता है धरतीलोक जहाँ हम इन्सान बसते है और सबसे नीचे आता है पाताल लोक जहाँ किडे रहते है और जब ये पाताल लोक के किडे धरतीलोक पर आते है तब होता है कांड!" याच डायलॉग पासून अमेझॉन प्राईम ची नवी कोरी "पाताल लोक" ह्या सिरीजची सुरुवात होते. कालच ही सिरीज रिलीझ झाली. पहिल्याच दिवशी ती बघूनही झाली. क्राईम थ्रिलर या आवडत्या प्रकारातील एक अत्यंत वेगळा विषय, त्याची नेहमीपेक्षा वेगळी मांडणी असल्याने सिरीज मुळातच खूप एंगेजिंग आहे त्यामुळे सलगपणे बघून काढली. अनुष्का शर्माने आपल्या पहिल्याच वेब सिरीज मध्ये निर्माती म्हणून "NH10" या आपल्या हार्ड हीटिंग सिनेमाप्रमाणे दमदार पदार्पण केलंय.
एका मोठ्या न्यूज चॅनेल चा फेमस अँकर संजीव मेहरा (नीरज काबी) च्या हत्येसाठी ४ जणांची टोळी (हातोडा त्यागी, कबीर एम., टोप सिंग आणि मेरी) दिल्लीत येते. हत्या होण्याअगोदरच यमुना नदीच्या पुलावर ते पोलिसांद्वारे पकडले जातात. या सर्व प्रकरणाचा तपास आऊटर जमुना पार्क पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर हाथिराम सिंग (जयदीप अहलावत) कडे येतो. त्याच्या साथीला त्याचा यूपीएससीची तयारी करत असणारा जुनिअर इम्रान अन्सारी (ईश्वाक सिंग) असतो. या मुख्य प्लॉट वर कथा सुरु होते. पुढची कहाणी खूप गुंतागुंतीची आणि खूप वेगळेवेगळे लेयर असलेली आहे. घडणाऱ्या गोष्टींना सामाजिक, राजकीय, वैयक्तिक असे अँगल आहे. चारही आरोपींची थेट बालपणापासून दाखवलेली बॅकग्राऊंड स्टोरी, त्यांची ट्रॅजेडी, त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फायदा घेणारे राजकारणी, पुराण शास्त्रात प्राण्यांप्रती असलेला वेगळा दृष्टिकोनही यात दिसतो याबरोबरच धर्म, जात यावरून देशात माजलेली दुफळी ही प्रभावीपणे दिसते. सोबत हाथिराम सिंगच पारिवारिक जीवन त्याची कहाणीही आहे. त्याची बायको रेणू (गुल पनाग) आणि मुलगा सिद्धार्थ यांसोबतचे त्याचे संबंध, त्यांच्यातील भांडणं सगळं या कहाणीत येत. तपासाची हि कहाणी दिल्ली, चित्रकूट, पंजाब, नेपाळ आणि थेट ISI पाकिस्तान या लेवल पर्यंत फिरते. अनेक ट्विस्ट अँड टर्न घेऊन ती शेवटाकडे येते.
ही सिरीज संयमाची परीक्षा घेते. काहीवेळा खूप संथ तर काहीठिकाणी खूप वेगवान बनते. एकूण ९ एपिसोड आहे. प्रत्येक एपिसोड जवळपास ४० मिनिटांचा आहे. एकाच बैठकीत सलग बघायची असल्यास साधारणतः ७ तास लागतील. पहिल्या एपिसोड नंतर थोडी स्लो होते पण नंतर जी ग्रीप पकडते ती शेवटपर्यंत कायम राहते. कथेचा शानदार प्लॉट, चाबूक डायलॉग, रिअल लोकेशन्स वरचं शूट, चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्या उत्तम बाजू असल्याने सिरीज उत्तम झालीय. न्यूडिटी, इंटिमेट सीन्स भरपूर आहे आणि शिव्या या प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. इतक्या की आजवरच्या कुठल्याही सीरिजपेक्षा जास्त. पण शिव्यांचा काही अडथळा येत नाही.
सर्वोत्तम जर अशी कुठली गोष्ट यात असेल तर ती म्हणजे यातील कास्टिंग. एकदम परफेक्ट कास्टिंग. कुठलाही नावाजलेला स्टार यात नाही. सर्व अभिनेते अशे कि ज्यांनी आजवर फक्त सहायक रोल केलेत. हाथिराम सिंगच्या मुख्य भूमिकेतील जयदीप अहलावात ने बाप काम केलंय. प्रत्येक इमोशन्स तो जबरदस्त दाखवतो. आजवर त्याला इतका मोठा रोल कधी मिळाला नाही. पण या सिरीजमुळे त्याचे ड्यूज त्याला मिळाले आहे असं म्हणता येईल, इतकं जीव ओतून त्याने काम केलंय. नीरज काबी नेहमीप्रमाणे भाव खाऊन जातो. स्टार अँकर असल्याचा माज तो बरोबर दाखवतो. मुख्य आरोपी असलेला हातोडा त्यागीच्या भूमिकेतील अभिषेक बॅनर्जी जबरदस्त आहे. फार कमी डायलॉग त्याला आहे पण निव्वळ डोळ्यांनी तो आपली दहशत बसवतो. या तिघी मुख्य भूमिकांव्यतिरिक्त सिरीज मध्ये खूप पात्र आहे. पण प्रत्येक पात्राला व्यवस्थित स्क्रीन टाइम आहे. त्या पात्राची स्वतःची अशी कहाणी आहे. यात भूमिका केलेल्या लहानात लहान ऍक्टर ने आपल्या रोल ला पुरेपूर न्याय दिलाय. आवर्जून उल्लेख करावा असा हाथिरामचा असिस्टंट असलेला इम्रान अन्सारी, ईश्वाक सिंग ने कमाल केलीय या रोल मध्ये एकदम शांत, संयत तितकाच हुशार असा पोलीस सब इन्स्पेक्टर त्याने छान रंगविला आहे.
ज्यांना वेब सिरीज मधला क्राईम थ्रिलर हा प्रकार आवडतो, त्यांच्यासाठी ही सिरीज मस्ट वॉच आहे. एकदा आवर्जून बघायलाच हवी अशी "पाताल लोक"
शुभम शांताराम विसपुते

A good one 📝
ReplyDelete