Monday, May 11, 2020

मर्दानी - राणी इस बॅक विथ अ बूम!


नुकतेच प्राईम वर "मर्दानी" चे दोन्ही भाग पहिले. मुळात हिंदी मेनस्ट्रीम सिनेमानं तुलनेनं स्त्रीप्रधान व्यक्तिरेखांकडं दुर्लक्ष केलं असताना अशा प्रकारे ‘मर्दानी’ नावाची फ्रँचाइझ तयार करणं हे विशेष आहेच. पण पहिल्या चित्रपटात मानवी तस्करीचा विषय मांडल्यावर दुसऱ्या चित्रपटात तितक्याच भेदकपणे लैंगिक अत्याचार हा विषय मांडणं हेही तसं धाडसाचंच. गाणी नसणं, विषयाचा फापटपसारा न मांडणं, व्यक्तिरेखांचा सूक्ष्म अभ्यास आणि उत्तम कलाकार या दोन्ही भागाच्या जमेच्या बाजू आहेत. सर्वानी आवर्जून बघायला हवे असे हे दोन्ही सिनेमे आहेत. खासकरून मुलींनी तर जरूर बघायला हवेत. दोघी भागांबद्दल सविस्तर सांगतो.

मर्दानी - "मर्दानी" हा ह्यूमन आणि ड्रग्स ट्रॅफिकिंग वर आधारित थ्रिलर आहे. खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, मर्दानी च खर यश हेच आहे.

शिवानी शिवाजी रॉय (राणी मुखर्जी) इन्स्पेक्टर, मुंबई क्राईम ब्रांच. पती डॉ. बिक्रम रॉय व लहानग्या भाचीसह राहत असते. अनाथालयात राहणाऱ्या व फुलं विकणाऱ्या कुमारवयीन 'प्यारी'वर तिचा फार जीव असतो. मुलीसारखीच असते. एके दिवशी अचानक 'प्यारी' गायब होते आणि तिचा शोध घेताना शिवानीला अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचाच शोध लागतो. एका मोठ्या रॅकेटला उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यास ज्या किंमती मोजायला लागतात, त्या ती मोजते. धक्के पचवते, पुन्हा उभारी घेते, लढते, भिडते, हार मानत नाही. पुढे तिला मुंबईहून दिल्लीला जावं लागत. खूप संघर्ष करून शेवटी ती खलनायकापर्यन्त कशी पोहचते आणि त्याला धडा कशी शिकवते हे बघायलाच हवं. यातील खलनायक नवोदित 'ताहीर भसीन'. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडच्या भूमिकेतला ताहीर भसीन अत्यंत संयतपणे अंगावर येणारा खलनायक साकार करतो. त्याच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यात तो छाप सोडतो. इतक्या शांतपणे क्वचितच कुणी थरकाप उडवला असेल किंवा संताप आणला असेल. ताहीर ला बघताना "मर्डर २" मधील खलनायक प्रशांत नारायणन ची आठवण येते 

मर्दानी-२ : "मर्दानी - २" हा डार्क, सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. त्यातल्या काही गोष्टी काही वेळा तर्कांना न पटणाऱ्या आहेत, एखाद्या ठिकाणी तो लाऊड झाला आहे, काही ठिकाणी तो अधिक चांगला व्हायच्या शक्यता आहेत, या सगळ्या गोष्टी खऱ्याच; पण तरीसुद्धा पावणेदोन तास गुंतवून ठेवण्यात आणि विषयाचं गांभीर्य नेमकेपणानं, भेदक पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहचवण्यात तो यशस्वी होतो.  राणी मुखर्जीच्या तडफदार, प्रगल्भ अभिनयासमोर विशाल जेठवा या तरुण अभिनेत्यानं साकारलेल्या विकृत खलनायकानंही तितकाच प्रभाव पाडणं हे विशेष आहे. ‘मर्दानी २’ हा काही सस्पेन्स ड्रामा नाही. उलट तो अगदी पहिल्याच प्रसंगात थेट खलनायकच दाखवतो आणि तो खलनायक काय काय करत जाणार हेही सांगतो. त्यामुळं या दोन व्यक्तिरेखांमध्ये साप-मुंगसासारखा खेळ कसा रंगत जातो हे हा चित्रपट दाखवतो. तो अंगावर येतो, धक्का देतो आणि त्याच वेळी स्त्रीसुरक्षा हा विषयही गांभीर्यानं अधोरेखित करतो.

राजस्थानमधल्या कोटा शहरात सनी (विशाल जेठवा) हा एक विकृत तरुण आहे हे तो स्वतःच पहिल्याच प्रसंगात सांगतो. लैंगिक अत्याचार करणारा आणि खून करणारा हा क्रूर तरुण. तो एका तरुणीवर अत्याचार करून तिला बीभत्स पद्धतीनं मारतो आणि त्यानंतर एसीपी शिवानी शिवाजी रॉयकडे (राणी मुखर्जी) हे प्रकरण येतं. त्यातून होत जाणाऱ्या एकेक घडामोडी आणि शिवानी या सनीपर्यंत कशी पोहचते हे थ्रिलर पद्धतीनं हा चित्रपट दाखवतो. एकीकडं दिग्दर्शक गुन्हा होतानाच दाखवतो, एवढंच नव्हे तर तो गुन्हा करताना खलनायकही एक प्रकारे प्रेक्षकांना ‘विश्वासा’त घेतो. त्यामुळं नायिका त्या गोष्टीशी कशी झुंज देणार याबद्दल उत्सुकता वाढते आणि त्यातून तिच्याबद्दलचा आदरही वाढतो. एकीकडं सध्याच्या वेब सिरीजच्या जमान्यात अत्याचारांचे आणि हिंसेचे बीभत्स तपशील दाखवण्याचा ट्रेंड असताना चित्रपटात ते कटाक्षानं टाळले आहेत, मात्र त्याच वेळी त्यांचा परिणाम सखोल राहील याची काळजी घेतली आहे. कथा कुठंही न हलत नाही. विशालचा खलनायक हे बॉलिवूडमधलं मोठं ‘फाइंड’ आहे. त्याचा खलनायक खरंच भीतीदायक वाटतो. इतर कलाकारही त्या त्या व्यक्तिरेखांमध्ये विलक्षण फिट बसल्यानं या चित्रपटाचा परिणाम गहिरा होतो. या चित्रपटात गाणी नाहीत; मात्र पार्श्वसंगीत उत्तम आहे.

राणी मुखर्जीची "शिवानी शिवाजी रॉय" या दोन्ही चित्रपटात संपूर्णपणे व्यापून राहिली आहे. देहबोली, डोळ्यांचा वापर, करारी बोलणं आणि त्याच वेळी संवेदनशील असणं हे सगळं राणीनं कमालीच्या नेमकेपणानं दाखवलं आहे. राणीने दाखवलेली एनर्जी 'मर्दानी'ची जान आहे. खरं तर ह्या भूमिकेला साकार करताना तिची देहयष्टी आड येऊ शकली असती, पण केवळ जबरदस्त एनर्जीच्या जोरावर तिने ही उणीव भरून काढली आहे. आक्रमक देहबोली व अचूक संवादफेक, जोडीला खमकी नजर व जबरदस्त आत्मविश्वास अशी ही 'मर्दानी' राणीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका नक्कीच आहे. तिच्या व्यक्तिरेखेच्या निमित्तानं स्त्रीबद्दलची पुरुषांची मानसिकता हा विषयही समोर येतो. राणीनं सगळ्या गोष्टींना खरोखर न्याय दिला आहे.

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment