मी अगदी लहानपणापासूनच याचा फॅन आहे. मधाचं बोट चाटून गाणं म्हणतोय असं वाटावं इतक्या गोड गळ्याचा हा गायक. कॉलेजला असताना तर तो जास्तच आवडायला लागला. कॉलेजला माझा मित्र राकेश कट्टर कुमार सानू समर्थक तर मी उदित नारायण क्लब चा मेम्बर. त्यामुळे कुमार सानू आणि उदित नारायण मध्ये जशी मैत्रीपूर्ण स्पर्धा होती, तशी आमच्यातही होतीच. सानू जरी उदित च्या तुलनेत लोकप्रिय असला तरी माझा ऑल टाईम फेव्हरेट हा उदीतच...
मूळचा नेपाळ चा असलेला "उदित नारायण झा" साधारणतः ८० च्या दशकात मुंबईत आला. गाण्याची आवड त्याला लहानपणापासूनच होती, हीच आवड त्याला मुंबईत घेऊन आली. आपलं पाहिलंच गाणं त्याने साक्षात मोहंमद रफी यांच्याबरोबर केलं, पण तरीही हवी तशी ओळख आणि काम काही त्याला मिळत नव्हतं. स्थिरस्थावर होण्यासाठीचा संघर्ष सुरूच होता. त्यासाठी उजाडावं लागलं १९८८ साल, या साली एक चित्रपट आला ज्याने दोन सुपरस्टार्स ला जन्म दिला एक आमिर खान तर दुसरा उदित नारायण आणि तो सिनेमा होता "कयामत से कयामत तक". या सिनेमानंतर उदीतच्या यशाचा आलेख वाढतच गेला. त्याचे समकालीन प्रतिस्पर्धी असलेल्या कुमार सानू, अभिजीत वर किशोर कुमार चा असलेला प्रभाव जाणवायचा त्या तुलनेत उदितच्या आवाजावर कुणाचा प्रभाव कधी जाणवला नाही इतका तो अस्सल आहे. भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या "पदमभूषण" ने उदीत नारायणाचा गौरव झालेला आहे. मूळचा नेपाळचा असलेल्या गायकाला भारताचा नागरी पुरस्कार मिळणे हि खरच सन्मानाची गोष्ट आहे. तसेच गाण्यासाठीच्या ३ राष्ट्रीय पुरस्कारांचा मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात आहे. त्याने केलेला अजून एक विक्रम म्हणजे तीन वेगवेगळ्या दशकात (८०,९० आणि २०००) तीन फिल्मफेअर अवॉर्ड मिळवलेला तो एकमेव गायक आहे.
उदीतने जवळपास सर्व भाषांत, सर्व प्रकारची गाणी गायली. गझल हा गायला कठीण असलेल्या प्रकारातही त्याने उत्तम गझल्स गायल्या. त्यात घर से निकलते हि (पापा केहते है), जादू भारी आँखो वाली सुनो (दस्तक), एक चांद सी लडकी (देवदास) या त्याच्या प्रमुख गझल्स. उदीतला जरी आमिरचा पडद्यावरचा आवाज मानलं जात असलं तरी मला वैयक्तिक त्याच शाहरुख आणि ह्रितिक सोबत असलेल कॉम्बिनेशन फार आवडत. या दोघांसाठी खूप सुंदर अशी गाणी त्याने गायली आहे. तीच गोष्ट रहमानच्या बाबतीत उदीतने अनेक संगीतकारांबरोबर खूप चांगलं काम केलं असलं तरी रहमान सोबत असलेलं त्याच ट्युनिंग जबरदस्त आहे. रहमान ने त्याच्या आवाजाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून अनेक उत्तमोत्तम गाणी दिली आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अशी क्या करे या ना करे (रंगीला), ए अजनबी (दिल से), ओ मितवा (लगान), ताल से (ताल), ये तारा वो तारा (स्वदेस). स्वदेस मधीलच एक गाणं आहे "आहिस्ता आहिस्ता" रहमान आणि उदित या जोडीचं मास्टरपीस असलेलं हे गाणं, अंगाई गीत या प्रकारातलं आहे. ऐकताना सहज सोपं वाटत पण म्हणताना अतिशय कठीण असलेल्या गाण्यात उदितने कमालीचा सूर आळवला आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान या गायिकांसोबतची त्याची डुएट्स गाणी कमालीची लोकप्रिय आहेत. उदितचा आवाज फक्त रोमँटिक गाण्यांना सूट होतो, "दर्दभरे" गाण्यांना नाही हाही एक आरोप होत असतो, पण त्याने गायलेली विरह गीते हर पल याद तेरी (राजा हिंदुस्थानी), क्यू किसी को (तेरे नाम) ही दोन गाणी या आक्षेपाच खंडन करायला पुरेशी आहे.
आज उदित वयाच्या ६३ व्या वर्षातही तितक्याच प्रेमाने गातोय. वाढत्या वयाचा त्याच्या आवाजाला स्पर्शही झालेला नाहीये. याच उदाहरण म्हणजे नुकत्याच आलेल्या ह्रितिक च्या सुपर ३० सिनेमातील "जुग्राफिया" हे गाणं. गाणं ऐकताना असं वाटतं की अजूनही तोच ९० च्या दशकातला उदित गातोय. सध्या नवीन संगीतकारांना नवे गायक हवे असतात. उदित आजही रणबीर, आयुष्मान, रणवीर यांना आवाज देऊ शकतो इतका त्याचा आवाज फ्रेश आहे. नेटफ्लिक्स च्या लव्ह पर स्क्वेअर फीट या सिनेमात विकी कौशल साठी तो ऑलरेडी गायलाय. बहुतांशी ऑटो ट्यून वाल्या गायकांच्या तुलनेत अस्सल खणखणीत आवाज असलेल्या उदीतला संगीतकार जास्त संधी का देत नसतील काय माहित. स्वतःच्या आवाजाच्या बळावर सिनेमाच्या अलबम मधील सर्व गाणी गाणाऱ्या उदीतचं आज एखाद्या सिनेमातील एखाद गाणं ऐकायला त्याच्या चाहत्यांनाही आवडणार नाही हेही तितकंच खरंय.
गेल्या तीन दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा गायक, यापुढेही असाच उत्तम गात राहो. हीच मनोमन इच्छा...!!!
शुभम शांताराम विसपुते






