Tuesday, August 27, 2019

गली बॉय



        यावर्षीचा बॉलीवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजे "गली बॉय". झोया अख्तर ने दिग्रसहित केलेला हा सिनेमा, या अगोदरच्या तिच्या "जिंदगी ना मिलेगी दोबारा" आणि "दिल धडकने दो" पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. झोयाने या दोघी सिनेमात श्रीमंतीची पार्श्वभूमी आणि विदेशाची सफर घडवून आणलेली आहे तर गली बॉय थेट मुंबई च्या धारावी मध्ये घडविला आहे. संगीताच्या "रॅप" या प्रकारावर बेतलेला हा चित्रपट, प्रामुख्याने "नाझी" आणि "डिव्हाईन" या प्रसिद्ध रॅपर यांच्या जीवनातल्या महत्वाच्या प्रसंगांवर आधारित आहे. 
          सिनेमाचा नायक मुराद (रणवीर सिंग) हा पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याचे वडील आफताब (विजयराज) हे ड्राइवर आहे, त्यांनी अगदी मुरादच्याच वयाची दुसरी बायको करून आणली आहे. घरात अगोदरच मुरादची आई (अमृता सुभाष) असताना, मुरादच्या आजीने (ज्योती सुभाष) त्याच्या वडिलांना दुसरी बायको करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याला लहान भाऊ सुद्धा आहे. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला मुराद आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर काहीतरी लिहीत असतो. त्याच्या आईवडिलांची इतर सर्वसामान्यांप्रमाणे मुरादने त्याच पदवीच शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करावी अशी इच्छा आहे. मुरादची एक बालपनापासूनची प्रेयसी पण आहे सफीना (आलीया भट्ट) जी मेडिकल ची विद्यार्थिनी असून, मुराद वर जीवापाड प्रेम करणारी आहे. एके दिवशी वडिलांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्या जागी बदली म्हणून मुराद जातो. तिथे डिस्को च्या बाहेर उभा असलेल्या मुराद ला केवळ त्याच्या कपड्यांवरून आत प्रवेश मिळत नाही, तेव्हा समाजातील असमानतेवर तो गीत लिहितो. पुढे त्याची ओळख एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) बरोबर होते. एमसी शेर त्याला रॅप मधले बारकावे समजावून सांगतो, फक्त शब्द लिहून उपयोग नाही तर ते एका विशिष्ठ लयीत पण लिहिले जायला हवे ही रॅप मधली प्राथमिक शिकवण त्याला एमसी शेर कडून मिळते. त्यानंतर मुराद अंडरग्राऊंड शो मध्ये आपले गाणे सादर करतो शेवटी youtube ला त्याचा गाण्याचा विडिओ टाकतो आणि त्याला जबरदस्त प्रतिसादही मिळतो. यावेळी सिनेमात एन्ट्री होते ती स्काय (कल्की कोईचीन) ची, बर्कली  कॉलेजची विद्यार्थिनी असलेली स्काय मुराद चा youtube ला विडिओ बघून त्याच्याशी संपर्क साधते. त्याला आणि एमसी शेर ला तिच्या नावेदित संगीतकार आणि गायकांवर आधारित प्रोजेक्ट मध्ये सहभागी करते. स्कायने  त्या दोघींना घेऊन धारावीच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल गाणं कमालीचं लोकप्रिय होत. स्काय मुराद मध्ये गुंतत जात असते, मुरादही काही काळासाठी तिच्यामध्ये गुंततो.  सफीनाशी खोट बोलून स्काय सोबत तो वेळ घालवू लागतो. जेव्हा सफिनाला हे कळते तेव्हा ती स्काय च्या डोक्यात बिअर ची बाटली फोडते, पुढे हे प्रकरण पोलिसात गेल्यावर स्कायने सफिना विरोधात तक्रार दाखल करायला नकार दिल्यामुळे हे प्रकरण मिटते. पण याचा परिणाम मुराद वर होतो. त्याला त्याची चूक उमगते. सफिनाशी माफी मागून तो पुन्हा नव्याने आपले नाते सुरु करतो. रॅपर म्हणून जम बसवत असताना मुरादचे वडिलांशी कडाक्याचे भांडण होते, यामुळे त्याला आईला आणि लहान भावाला घेऊन घर सोडावे लागते. घर चालविण्यासाठी तो त्याचा मामा आतिक (विजय मौर्य) कडे कामही करतो. त्याचवेळी रॅपर्स साठी मुंबईत मोठी कॉन्सर्ट होणार असते, त्याच्या ऑडिशन साठी मुराद एमसी शेर सोबत जातो. आणि अर्थातच त्याची कॉन्सर्ट मध्ये गाण्यासाठी निवड होते. आणि एका आनंदी क्षणावर चित्रपट निरोप घेतो.
         अभिनयाबाबत बोलायचे झाल्यास सर्वानीच उत्तम काम केलय, रणवीर ने मुराद च्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय. केवळ डोळ्यांचा वापर करत खूप जबरदस्त असा मुराद साकारलाय. आलीयाची सफिना हि मस्तच, आपल्या प्रियकराप्रति जरा जास्तच हळवी असलेल्या प्रेयसीच्या भूमिकेत तिने कमाल केलीय. विजयराज आणि अमृता सुभाष ने मुरुडच्या आईवडिलांचा रोल छानच साकारलाय. चित्रपटात खऱ्या अर्थाने लक्षात राहतो तो सिद्धांत चतुर्वेदी चा एमसी शेर आपला पहिल्याच सिनेमात सिद्धांतने तुफान काम केलय. रणवीर आणि त्याच्या एकत्र सीन मध्ये बर्याचवेळेला तो रणवीरला वरचढ ठरलाय. अन्य लहान भूमिकेत ज्योती सुभाष, विजय वर्मा आणि विजय मौर्य यांनी सुंदर काम केलय. रीमा कागती आणि झोया अख्तर यांचा स्क्रीनप्ले आहे. तर संवाद विजय मौर्य यांचे आहेत. दिग्दर्शनात झोया नेहमीप्रमाणे उत्तम आहे, पूर्ण सिनेमावर तिची पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. गाणी हा या सिनेमाचा आत्मा आहे. बहुतांश गाणी हि स्वतः रणवीर सिंग च्या आवाजात असल्यामुळे गली बॉय उत्तम प्रकारे प्रेक्षकांशी कनेक्ट होतो. रॅप च्या माध्यमातून समाजातील असमानता, कष्टकऱ्यांचे जीवन , गरिबी इ. विषय व्यवस्थितरीत्या मांडले जातात. चित्रपटाच्या शेवटचं ट्रेन सॉंग उत्तम जमून आलय.
          एका सध्या सरळ कथेचा उत्कुष्ट दिग्दर्शन, जबरदस्त संवाद आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय यामुळे एक परिपूर्ण सिनेमा तयार झालाय, आवर्जून बघण्यासारखे काही सिनेमे असतात त्या यादीत गली बॉय चे नाव निश्चितच वर असेल.


शुभम शांताराम विसपुते 

No comments:

Post a Comment