आजच अरुण जेटली गेल्याची बातमी आली. गेल्यावर्षी अटलजी गेल्यानंतर वर्षभरातच भाजपचे अनंत कुमार, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज आणि आज अरुण जेटली गेले. देशभरात आज भाजपला सोन्याचे दिवस आलेत, त्यात या सर्वलोकांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वासोबतच आज प्रकर्षाने आठवण होतेय ती ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची, कारण हे सर्व त्यांचे राजकारणातील सोबती होते. अटलजी हे त्यांना समवयस्क असल्याने त्यांचे सहकारी होते. तर प्रमोद महाजन, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज हे सर्व त्यांना जुनिअर होते. किंबहुना या सर्व जुनिअर मंडळींना राजकारणाचे बाळकडू याच भीष्मपितामहाने दिले. ज्यांना राजकारणात उभं केलं, मार्गदर्शन केलं आज तेच त्यांचे जुनिअर सहकारी त्यांच्या अगोदर जगातून कायमचे निघून गेले. उतारवयात हा धक्का त्यांना मोठ्या कष्टाने पचवावा लागणार आहे. अटलजींसोबत आधी जनसंघ आणि नंतर भाजप ची स्थापना करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांचे दुसरे राजकीय सहकारी बाळासाहेब हि काही वर्षांपूर्वीच गेले. रामजन्मभूमी आंदोलनावेळी या दोन्ही नेत्यांनी संपूर्ण देश ढवळून काढला होता. राजकीज जीवनातला बहुतांश काळ हा विरोधी पक्षात गेला, विरोधी पक्षात राहूनही देशाच्या राजकारणात त्यांनी आपले अढळस्थान स्वकर्तृत्वावर निर्माण केलय. उतारवयात माणूस लवकर भावुक होतो असे म्हणतात. म्हणूनच केंद्रात आपल्या पक्षाचं पहिल्यांदा स्वबळावर सरकार आल्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये अडवाणी कमालीचे भावुक झाले होते. प्राणप्रिय असा सहकारी अटलजी आणि जी साक्षात त्यांची मानसकन्या होती अश्या सुषमाजी गेल्यानंतर ते आपले अश्रू लपवू शकले नाहीत. गेल्या सात दशकांपासून भारतीय राजकारणात तळपत असलेला हा नेता आपल्या एक एक करून निघून जाणाऱ्या सहकाऱ्यांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शांतपणे बघतो आहे.
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment