Friday, August 23, 2019

दामिनी



कधीही बघावा असे काही सिनेमे असतात त्या लिस्टमध्ये 'सनीच्या' एंट्रीनंतरचा 'दामिनी' आहे. मुळात सनीची एन्ट्रीच तब्बल १ तास ४० मिनिटांनी होते, पटकथाकार आणि दिग्दर्शक म्हणुन संतोषी १ तास ४० मिनीटं कथेत आणि आपल्या कॅरेक्टर्समधे प्रेक्षकाना आपल्याला हव्या त्यापध्दतीने गुंतवुन घेतो.
दामिनीचा कमालीचा प्रामाणीकपणा, उर्मीच्या बलात्काऱ्याना शिक्षा मिळवुन देण्याची एकाकी प्राणांतीक धडपड, तिच्या विरुध्द उभी राहिलेली राजकारणी, धनदांडगे कुटुंबीय, वकील, पोलिसयंत्रणेची दुष्ट फौज, तिच्या वाट्याला आलेली अवहेलना, चारित्र्यहनन, मानसिक शारीरीक छळ, तिचे मानसिक संतुलन हरवेपर्यंतचे हाल...यासगळ्यातुन निभावत ती वेड्याच्या हाॅस्पीटल मधुन पळालेली.. मागे गुंड लागलेले.. ती गुंडाच्या हातुन आता मरतेय अशी वेळ... प्रेक्षक समरसुन नायीकेवरच्या या अन्यायाने घायकुतीला आलेले.. नायीकेईतकेच हतबल झालेले.. संतापलेले..आणि प्रकाशाची तिरीप भेदत नेमक्या वेळी सनीची एंट्री.... जवळपास निम्मा सिनेमा झाल्यावर. तरीही सनी देओल ने 'दामिनी' साठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा "राष्ट्रीय पुरस्कार" मिळविला आहे. तथाकथीत सुशिक्षित याला पाहून नाकं मुरडत असली तरी अस्सल भारतीय पब्लिक चा आवडता असा हा रांगडा हिरो आहे. काही सिनेमे असे असतात ज्या सिनेमा मुळे अभिनेत्याला नवी ओळख मिळते. सनीच्या कारकिर्दीत 'दामिनी' या साठीच महत्वाचा आहे. व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारा "अँग्री यंग मॅन" सनीने जबरदस्त साकारला आहे. एरवी त्याच पडद्यावर ओरडणं हे बऱ्याच जणांना अति वाटत, पण 'दामिनी' मध्ये सनी जी सात्विक चीड दाखवतो ते पब्लिकला जास्त भावतं. सनी देओल ज्या त्याच्या "ऐतिहासिक" डायलॉग्ज साठी ओळखला जातो, त्यातील बहुतेक डायलॉग्ज हे याच सिनेमात आहे. (तारीख पे तारीख, ढाई किलो का हात, जज ऑर्डर ऑर्डर करता राहेगा और तू पिटता रहेगा, ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते है, कदम संभाल रख कदम केस बहुत चिकना है...) सनीने आपल्या दमदार आवाजाने ह्या दमदार डायलॉगस ना न्याय दिला आहे. खरंच त्याचा हात पडला तर आदमी उठ जायेगा असं वाटावं इतपत नैसर्गिक मारामारी तो करतो. सनी यामध्ये आपल्या नेहमीच्या निरागसतेने ‘मै’ म्हणताना स्वत: कडे, ‘तुम’ म्हणताना समोरच्याकडे हात करत, प्रामाणीक एनर्जीने संधी मिळाली की थरकाप उडवणारी गर्जना करत नॅशनल अवॉर्ड घेऊन गेला. या सिनेमात अभिनेत्री (मीनाक्षी) मध्यवर्ती भूमिकेत आहे, तर ऋषी कपूर आणि सनी देओल हे सहायक अभिनेत्यांचा भूमिकेत, अमरीश पुरी सारखा बट उडविणारा कसलेला खलनायक आहे. एक चांगला सिनेमा बनविण्यासाठी ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या सर्वच या सिनेमात होत्या. सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय, एपिक डायलॉग्ज, टाळ्या वाजवाव्या असे कोर्टरुम सिन्स आणि अर्थातच राजकुमार संतोषीचं उत्कृष्ट दिग्दर्शन हे सर्वच सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. काही चित्रपटांचं आपल्या मनावर गारुड असतं त्यातलाच एक म्हणजे "दामिनी"!

शुभम शांताराम विसपुते

1 comment: