Friday, August 23, 2019

जळगावातील ढोलपथक...!!!



मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात गणपती विसर्जन तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ढोलपथकांचे लोण हे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. जळगाव मध्येही उत्कृष्ट दर्जाचे ढोल पथक नावारूपाला आले आहेत, येत आहेत. जळगावात याअगोदर विसर्जन मिरवणुकीत मुंबई-पुण्याचे ढोल पथक आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करून गेलेले आहेत. त्यावरूनच प्रेरणा घेऊन आपल्या गावातही मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड असे ढोलपथकं तयार झाले आहेत हे मान्य करावेच लागेल. गेल्या ३-४ वर्षात तरुण मंडळींनी मोठ्या मेहनतीने आणि कौशल्याने पथकं निर्माण करून जळगावातील विसर्जन मिरवणुकीला देखणे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. याचे श्रेय जितके पथकांना आहे तितकेच या पथकांना मिरवणुकीत आपले वादन कौशल्य दाखविण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या गणेश मंडळांचे देखील आहे. जळगावातील पथकांनी शहरात, तालुक्यात तर आपल्या वादनाने भुरळ घातली आहेच परंतु काही पथकांनी तर सीमोल्लंघन करीत थेट परराज्यात (बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) जाऊन पथकाचा तसेच जळगावचा मान वाढवला आहे.

एक पथक उभं करण्यामागे किती परिश्रम घ्यावे लागतात, हे मी स्वतः जवळून अनुभवले आहे. कुठलेही पथक हे एका रात्रीत नावारूपाला येत नाही, त्यासाठी कित्येक दिवस-रात्र ओवाळून टाकून काम करावं लागत. मिरवणुकीत पथकातील मुला-मुलींना पाहून अनेक लोकांना वाटत की यांची तर काय मज्जा आहे, यांना छान-छान कपडे घालून तोऱ्यात मिरवता येतं, यांचे झकास फोटो काढले जातात पण ढोल वादकांचे ढोल वर गोंद थापताना चिकट आणि काळे झालेले हात, १५-१६ किलोचा ढोल कमरेला बांधल्यावर त्याचा शरीरावर पडणार ताण, दोरीचे उमटणारे वळ, ताशा वादकांचे ताशा वाजविताना बोटांवर होणारे आघात, हवेच्या झोताचा अंदाज घेत त्याबरोबरच सुरु असलेल्या वादनाशी मेळ घालत आसमंतात भगवा ध्वज नाचवणारे ध्वजधारी, वादकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून घरच्या माणसांसारखी त्यांची काळजी घेणारे स्वयंसेवक आणि व्यवस्थापक. या सर्वानी मिरवणुकीत मिरवण्यामागे घेतलेली ही मेहनत अनेकांना दिसत नाही. हातातील पाच बोटे हे एकसारखे नसतात पण ते एकत्र आल्यावर तयार होणाऱ्या वज्रमुठीप्रमाणेच पथकातील ढोलवादक, ताशावादक, ध्वजधारी, स्वयंसेवक आणि व्यवस्थापक रुपी पाच बोटं एकत्र आल्यावर उत्कृष्ठ पथक तयार होतं.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणं लागतो हि उदात्त भावना मनात ठेवून ही पथकं आपली सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहेत पथकाला मिळणाऱ्या मानधनामधून काही रक्कम हि पथकं गरजुंना तसेच इतर सामाजिक उपक्रमांना देतात हि निश्चितच गौरवास्पद गोष्ट आहे. यासाठी पथकांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन हि होत असते. पथकांमध्ये फक्त शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच नव्हे तर गृहिणी, व्यावसायिक, नोकरी करणारे हि मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत असतात. आपल्या मागचा कामाचा व्याप सांभाळून हे सर्व कला, संस्कृती जपण्यासाठी झटत असतात. ढोल पथक हा एक उत्सव आहे, एक आनंद आहे या उत्सवाची मजा ही पथकात गेल्यावरच कळते. पथकातील मंडळी हे या उत्सवाच्या माध्यमातून निखळ आनंदाची उधळण करून मिरवणुकीतील आनंद द्विगुणित करण्याचे मोलाचे काम करीत आहे.

सर्व पथकांनी आपसात मैत्रीपूर्ण स्पर्धा ठेवून सतत नाविन्याचा ध्यास मनात ठेवून नेहमीच आपली वेगळी छाप रसिकांच्या मनावर सोडली आहे. तसेच प्रस्थापित पथकांनी सहकार्याच्या भावनेतून ज्यांना आपले स्वतंत्र पथक उभे करायचे आहे त्यांना पथक उभारिणीतील बारकावे समजावून त्यांना मदत करावी, जेणेकरून ढोलपथकाच्या बाबतीत मुंबई-पुण्याच्या बरोबरीने जळगावचंही नाव घेतलं जाईल ही सदीच्छा व्यक्त करतो. सर्व पथकातील माझ्या मित्र-मैत्रिणींना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

शुभम शांताराम विसपुते 

No comments:

Post a Comment