Monday, June 8, 2020

हरिहरन - ग्रेट गायक


कॉलेजला असताना एका मैत्रिणीने "स्लॅम बुक" दिलं होत भरायला, त्यात जागा खूप कमी होती. आपल्या आवडत्या व्यक्ती, गोष्टी एक-दोन शब्दात लिहायच्या होत्या. मी आवडतं गाणं "तू हि रे" तर आवडता गायक म्हणून "हरिहरन" लिहिल होतं. हरिहरन आवडतो तो यासाठीच कि तो एक परफेक्ट "ऑल राऊंडर" गायक आहे. सगळ्या प्रकारच्या गाण्यात फक्त गायकी नव्हे तर हुकूमत असलेला गायक. मी उदित, सोनू, लकी अली, केके यांचा डाय हार्ड फॅन आहे, पण हरिहरन या लिस्टच्या पलीकडे आहे. हृदयाच्या एका हळव्या कोपऱ्यात खास स्थान असलेला. जशी आदरयुक्त भीती असते तशी या माणसाबद्दल मला आदरयुक्त आवड आहे. केके आणि हरिहरन दोघींमध्ये एक साम्य आहे, दोघांचा आवाज आपल्यातल्याच एखाद्याचा वाटावा इतका साधा सिम्पल आहे, पण त्यामुळेच तो थेट भिडतो.

हरिहरन ला पहिल्यांदा टीव्हीवर कॉलोनिअल कझिन च्या "काय झालं" या गाण्यात बघितलं. तेव्हापासून आजपर्यंत त्याच जेव्हाही दर्शन झालंय तेव्हा प्रत्येक वेळेला तो नवनवीन लुक मध्ये दिसतो. केसांची पोनीटेल घातलेली किंवा मोकळे सोडलेले, कधी कोरून दाढी ठेवलेली तर कधी फक्त मिशी, चष्म्याच्या बदलत्या फ्रेम्स या सर्वानी तो लक्ष वेधून घेतो अर्थात वेगवेगळे लूक्स फक्त तो आवड म्हणून करतो. अतरंगी लुक मध्ये दिसत असला तरी त्याची गायकी खूप महान आहे. माचो पर्सनॅलिटी असलेला गायक.

केरळ मध्ये जन्मलेला मल्याळी माणूस उर्दू अलफाज मधली गज़ल इतकी सफाईदारपणे पेश करतो की ऐकताना जराही वाटत नाही कि हा गायक दक्षिण भारतीय आहे. मला तो गज़ल गायक म्हणून खूप श्रेष्ठ वाटतो. योगायोगाने मला त्याच्या काश, जश्न, गुल्फाम अश्या सगळ्या गज़ल अल्बमच कलेक्शन मिळालंय जे की मौल्यवान खजिन्यापेक्षा कमी नाहीए. त्यात काश ऐसा कोई मंझर होता, मैकदे बंद करे, जब कभी बोलना सारख्या क्लासिक गज़ल्स आहेत. माझी पर्सनल फेव्हरेट दिलनशी अल्बम मधली "आज भी है मेरे कदमो के निशाण आवरा" ही आहे. ही गझल ऐकताना मन लगेच वर्तमानाची साथ सोडून भूतकाळात धाव घेतं.

९० च्या दशकात जेव्हा इंडिपॉप ला सोन्याचे दिवस होते तेव्हा त्या मधेही लेस्ले लुईस बरोबर हरिहरन ने जबरदस्त गाणी दिली. त्यांचा कॉलोनिअल कझिन  अल्बम होता. हरिहरनच इंडियन क्लासिकल आणि लेस्ले लुईसच वेस्टर्न मुसिक यांची अशी काही सुरेख गुंफण केली होती कि त्यामुळे तो परफेक्ट फ्युजन अल्बम झालाय. त्यातील "कृष्णा नी बेगने...बारो" हे याच ठळक उदाहरण. यातील इंग्लिश आणि हिंदी शब्द आजच्या काळातही लागू पडतील असे आहे. जर कधी डाऊन वाटत असेल तर तेव्हा हे गाणं नक्की ऐकावं असं आहे. याच अल्बमच 'सा नी ध प' आणि 'इट्स ऑल राईट' पण खूप मस्त गाणी आहेत. "आत्मा" हा या जोडीचा पुढचा अल्बम त्यातील "ओहो काय झालं, काय पाव्हणं" हे गाणं तेव्हा किती गाजलं हे सांगण्याची गरज नाही. सोबतच "सुंदर बलमा" सारखं नितांत सुंदर गाणं ही त्यात होत. 

हरिहरनच्या नावातच हरी आहे कदाचित त्यामुळे त्याची भक्तीगीत देवाला साद घालणारी आहेत. त्याच्या आवाजातली हनुमान चालीसा लूप वर ऐकण्यासारखी आहे. गुलशन कुमार सोबतचे भगवान शंकरासाठीचे भक्तिगीते पण आहेत. "आयो रे आयो नंदलाल बिरजमा" हे कृष्णाच उत्कृष्ट क्लासिकल भजन आहे. साध्या चालीतलं शिव तांडव स्तोत्रं हि तितकंच खास आहे. अगदीच प्युअर असलेलं "मोहें अपने ही रंग मे रंग दे" हे सुफी गाणं ऐकताना वर बसलेल्याशी कनेक्ट करतं. गुरु मधलं "ऐ हैरते आशिकी" हे ही असच एक छान सुफी आहे.         

हिंदी सिनेमातील किती गाण्यांबद्दल लिहिणार. प्रत्येक गाण्यातुन ठळकपणे दिसलेलं त्याच वेगळेपण, त्यातून त्याने दिलेला निर्भेळ आनंद याच तरी किती वर्णन करायच. हरिहरन चा उपयोग दोन संगीतकारांनी योग्य प्रकारे केला. एक रहमान आणि दुसरा विशाल भारद्वाज. दोघीनी खूप सुंदर आणि त्याला परफेक्ट सूट होतील अशी गाणी दिली. रहमानसोबतचा त्याची जोडी रोझा पासून जमली आहे. "रोजा जानेमन" हे रहमानच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं गाणं रहमानने हरिहरनला दिलं. हिंदी बरोबर साऊथ मध्ये खूप गाणी दोघांनी दिलीय. विशाल भारद्वाजने संगीत दिलेल्या बहुसंख्य गाण्यांचे शब्द हे गुलझार यांचे असतात. गीतकार-संगीतकारच्या क्लासिक जोडीला हरिहरन सारख्या अव्वल दर्जाच्या गायकाची जोड लागली तर गाणं कमाल होणारच.

लताजींबरोबरचे लम्हेच "कभी मै कहू", डर मधलं "लिखा है इन हवाओ ने", दिल तो पागल है च "एक दुजे के वास्ते", सत्या मधलं "तू मेरे पास भी हे" आणि हू तू तू मधलं "छाई छाप छाई" हि पाच ही गाणी अप्रतिम आहे. सुरेश वाडकर यांच्या सोबतच माचीस मधलं "चप्प्पा चप्पा चरखा चले" सारखं अजरामर गाणं. माझं अगदी लहानपणापासूनच आवडतं आहे. याच सिनेमातलं "छोड आये हम वो गलिया" हे अजून एक हिडन जेम. काजोल च्या सपने मधलं "चंदा रे" या गाण्यातील त्याची चंदा या शब्दावरची तान, अजूबा गाण्यातील ऐश्वर्याचा सौंदर्याचं वर्णन करायला हरिहरनचाच आवाज पाहिजे. हरिहरन किती मोठा गायक आहे हे दिसलं ते रंगीलाच्या "हाय रामा" या गाण्यातून. प्युअर क्लासिकल टच असलेलं गाणं, सोबत स्वर्णलथा आणि पडद्यावरची मादक उर्मिला परफेक्ट मॉकटेल ज्याला म्हणतात ते असं असत. १९४७ - अर्थ यातलं "धीमी धीमी" हे रोमांचित करणारं गाणं. बॉर्डर सिनेमातलं "संदेसे आते है" हे जास्त लक्षात राहतं, पण हरिहरन ने गायलेलं "मेरे दुश्मन मेरे भाई" हे गाणं  त्याला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेलं. हरिहरन ने पूर्ण इमोशन्स ने गायलेलं ताल या म्युझिकल सिनेमातलं काहीस अंडररेटेड राहिलेलं "नही सामने तू" हे गाणं. लकीर मधलं उदित सोबतच "सदिया" हे पूर्ण सिनेमापेक्षा चांगल गाणं आहे. 

हम दिल दे चुके सनम मधलं "झोका हवा का आज भी" मेहबूब चे शब्द आणि त्यावर कडी करणारा हरिहरन चा आवाज. बस्स. यासारखंच आणखी एक गाणं आहे ते लक्ष्य मधलं "कितनी बाते" हे गाणं, न बोलता "दोनो के दिलो मे सवाल हे फीर भी है खामोशी" अश्या शब्दातून व्यक्त होणारी त्यांची वेदना हरिहरनच्या आवाजात आणखी तीव्रतेने जाणवते.  यादे चा टायटल ट्रॅक, दहेक मधलं पावसातील "सावन बरसे तरसे दिल", "कुछ मेरे दिल ने कहा" हे तेरे मेरे सपने मधलं गाणं. अनुरागच्या पांच मधलं अतिशय वेगळं असं "पका मत" हे गाणं. त्यातलं हरिहरनचं एक्सप्रेशन ऐकताना देखील जाणवतं. आणखी एक आवडतं गाणं म्हणजे भूतनाथ मधलं "समय का पहिया चलता है" हरिहरनच्या सोबतच गाण्यात येणारे अमिताभजींचे डायलॉग खूप काही सांगून जातात.

दिल विल प्यार वार हा या सिनेमात आर डी बर्मन यांची गाणी रिक्रिएट केली होती. त्यात सर्वात जास्त गाणी हरिहरनने गायली आहेत. गुम है किसी के प्यार में, ओ हंसिली, तुम बिन जाऊ कहा, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा, ये जो मोहब्बत है अशी सगळी ओल्ड क्लासिक्स मस्त रिक्रिएट केली आहेत. हरिहरनच्या आवाजाने त्याला चार चांद लागलेत.

"तू हि रे" ते "जीव रंगला" हा प्रवास समृद्ध करणारा आहे. या दोन्ही गाण्यांमुळे रहमान आणि अजय-अतुल ला देशभरात ओळख मिळाली. कविता आणि श्रेयाचा तो तरल आवाज. पाऊस पडून गेल्यावर ऊन पडतं तेव्हा सभोवतालचं सगळं नवीन वाटायला लागतं, सुंदर दिसायला लागतं. हि गाणी म्हणजे ते पाउसानंतर पडणारं ऊन आहे.  दोन्ही गाणी मला सारखीच वाटतात. त्यांचं आऊटडोअर पिक्चरायझेशन, त्यात वाजणारी बासरी, गाण्यातील आर्तता, ओढ सगळंच एकरूप झाल्यासारखं वाटतं. आणि या दोन्हीं गाण्यांना जोडणारा महत्वाचा धागा अर्थातच हरिहरन आहे.   

मौत और जिंदगी तेरे हाथों में दे दिया रे...खूण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण...

शुभम शांताराम विसपुते


No comments:

Post a Comment