Tuesday, June 16, 2020

फस गये रे ओबामा - हटके सिनेमा

अगोदरपासूनच आपल्या भारतीय लोकांना NRI लोकांबद्दल खूप आकर्षण आहे. खासकरून छोट्या शहरात राहणाऱ्यांमध्ये याच प्रमाण जास्त आहे. त्यातही NRI जर अमेरिकन असेल तर विषयच नाही. विदेशात जाणं म्हणजे अमेरिकेत जाणं असं समीकरण आजही येथे बघायला मिळत. दिग्दर्शक सुभाष कपूर ने NRI आणि अमेरिका हाच धागा पकडून त्याला २००८ साली अमेरिकेतून सुरुवात झालेली जागतिक मंदी याची जोड देऊन एक अप्रतिम सिनेमा बनवलाय. उत्तर भारतीय अंडरवर्ल्ड मधली किडनॅपिंगची कथा तो आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीने मांडतो. उत्कृष्ट कथा त्याची चांगली मांडणी सोबत कलाकारांचा उत्तम परफॉर्मन्सने सिनेमा खूप सुंदर झालाय. 

सिनेमाची संपूर्ण कथा NRI ओम शास्त्री (रजत कपूर) याच्या भोवती फिरते. अमेरिकेतील यशस्वी उद्योजक आर्थिक मंदी आल्यामुळे हवालदिल झाला आहे.  त्याचा बिझनेस, गाडी, बँक बॅलन्स सगळंच मंदीमुळे संपलय आता केवळ अमेरिकेतील घर त्याच्याजवळ राहिलय. बँकेच्या कर्जामुळे ते ही विकण्याची वेळ आली आहे. त्यापासून वाचण्यासाठी तो त्याच्या वडिलांची हवेली विकण्यासाठी भारतात येतो. इथून खरा सिनेमा सुरु होतो. इकडे लहानमोठ्या गॅंग कार्यरत असतात. त्यात भाईसाब (संजय मिश्रा) ची गॅंग सगळ्यात अतरंगी असते. मंदी चा परिणाम या गँगवरही पुरेपूर झालेला असतो. इतका की, त्यांच्याकडे बंदुकी असतात पण त्यात गोळ्या नसतात. गाडी मध्ये पेट्रोल नसते. अशी सगळी उपासमार सुरु असते. त्या गॅंग मधला अन्नी (मनू ऋषी) सगळ्यात हुशार आणि भाईसाब चा लाडका असतो. अन्नी ओबामा यांचा फॅन आणि अमेरिकेत जाण्यासाठी उतावळा असतो. अन्नी कडून भाईसाबला ओम शास्त्रीबद्दल समजतं. भाईसाबला वाटत शास्त्री NRI असल्याने मोठी असामी असेल, या एकाच किडनॅपिंग मुळे आपला पैशांचा आणि इज्जतीचा कायमचा प्रश्न मिटेल. भाईसाब शास्त्रीला किडनॅप करतात आणि २ कोटी खंडणी मागतात. शास्त्री जेव्हा त्याची करुण कहाणी त्यांना ऐकवतो तेव्हा त्यांना कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय राहत नाही. 

भाईसाबच्या गॅंगमधला अन्नी मुळातच हुशार असतो तो भाईसाब ला पटवून देतो की शास्त्री कंगाल आहे हे आपल्याला माहिती आहे. इतर गँग्स ना थोडी माहित आहे. आपण शास्त्रीला अली भाई ला ऍडव्हान्स घेऊन विकू आलेल्या पैशातून आपला खर्चही निघेल आणि बंदुकीसाठी गोळ्याही येतील. शस्त्र तयार असले तर अली भाईला आपण धडाही शिकवू शकतो. हि चर्चा ओम शास्त्री ऐकतो तो उलट भाईसाबला ऑफर देतो की अलीकडून जे पैसे येतील त्यातले ५० टक्के माझ्या अकाउंट ला टाकायचे नाहीतर अली ला खरं काय ते सांगून देईन. डील पक्की होते. अली कडे शास्त्रीला सोपवल्यावर अली अट टाकतो की गॅरंटी म्हणून अन्नी पण माझ्याकडे राहील. पुढे अलीला खरं काय ते समजतं. जो खेळ शास्त्रीने अली सोबत खेळला तोच खेळ शास्त्री अलीला मुन्नी मॅडम (नेहा धुपिया) या लेडी गँगस्टर सोबत खेळायला लावतो. अली आणि शास्त्री मध्ये ५० टक्के वाली तीच डील परत फायनल होते. मुन्नी कडे शास्त्रीला सोपवल्यानंतर मुन्नीला देखील शास्त्रींची खरी परिस्थिती कळते. फसवले गेल्याचा राग म्हणून ती भाईसाब, अली यांना धरून आणते आणि त्यांना मारणार तेवढ्यात ओम शास्त्री मुन्नीला परत तीच ऑफर देतो. आता या सगळ्या गँग्स पेक्षा सगळ्यात मोठी गॅंग असते मंत्री धनंजय सिंग (अमोल गुप्ते) ची मुन्नी शास्त्रीला धनंजय सिंग ला विकते. जीवावर बेतलेलं असताना ओम शास्त्री प्रत्येक वेळेला सहीसलामत कसा सुटतो. धनंजय सिंग च्या तावडीतुन पण तो शिताफीने निसटून सिनेमाचा शेवट गोड होतो. फक्त तो कसा निसटतो हे स्पॉइलर इथे देणार नाही ते सिनेमात बघण्यासारखं आहे. 

सिनेमा स्ट्रेस रिलीफ करणारा आहे. हटके स्क्रिप्ट सोबत आपला जॉली LLB चा सुभाष कपूर सारखा गुणी दिग्दर्शक असल्याने सिनेमा मस्त झालाय. खासकरून यातील डायलॉग खूप भारी आहे. अमेरिकेला मारलेले टोमणे असो की भाईसाबच MLA होऊन विधानसभेत खुर्च्या तोडण्याचं स्वप्न असो. हे सगळं खुमासदार डायलॉग मधून समोर येतं. एका इंग्लिश स्पिकींगच्या क्लास मधल्या शिक्षकाचा "English Speaking like a Rice Plate Eating" हा खूप व्हायरल झालेला सिन याच सिनेमातला आहे. ओबामांच्या "Yes We Can" चा संदर्भ घेऊन भाईसाब आणि त्याच्या गॅंगमधला सिन पण असाच अफलातून आहे.  

संजय मिश्रा आणि रजत कपूर सारखे तगडे कलाकार असल्यावर चांगला अभिनय बघायला मिळतोच. संजय मिश्राचा परिस्थितीने हतबल झालेला भाईसाब कमाल आहे. त्याची हतबलता बघताना कीव येते इतकं सुरेख काम संजय मिश्राच आहे. रजत कपूर मुळात दिसतोच NRI सारखा त्यामुळे त्याच असणं हीच सिनेमाची खरी ताकत आहे. या दोघींव्यतिरिक्त लक्षात राहतो मनु ऋषीचा अन्नी. ओबामांचा फॅन असलेला अन्नी त्याने झोकात सादर केलाय. नेहा धुपिया आणि अमोल गुप्ते यांचं काम कमी वेळासाठी आहे पण छान आहे. 

मला खूप आवड आहे असे सिनेमे बघण्याची. चांगले सिनेमे थिएटरला मी आवर्जून बघतो. या पठडीतल्या सिनेमांना थिएटर मध्ये हवा तसा प्रतिसाद मिळत नाही याची खंत आहेच. पण असं असूनही असे सिनेमे तयार होत असतात यासाठी या सिनेमांच्या मागे उभं राहणाऱ्या प्रत्येकाला सलाम.     

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment