Wednesday, April 8, 2020

जळगाव - फूड सफारी (भाग - २)



कालच्या भागात आपण शहरातील मध्यवर्ती एरियात आणि शॉपिंग मार्केट्स च्या परिसरात असलेल्या खाण्यासाठीच्या गाड्यांची माहिती घेतली. आज या भागात  उर्वरित शहरातील वेगवेगळ्या खाण्याच्या स्पॉट्स बद्दल सांगणार आहे. "खवैयेगिरी" हा माणसामध्ये असलेला एक सर्वोच्च गुण आहे आणि तो आत्मसात करण्यासाठी काही खास वयाची, शिक्षणाची अट नाही. फक्त खिशात थोडे पैसे आणि बरोबर बराचसा वेळ असला कि तुम्ही हवी तशी खवैयेगिरी करू शकतात. अर्थातच तुम्हाला खाण्याचा तितका इंटरेस्ट देखील असायला हवा. 

१७ मजली कडून रेल्वे स्टेशनच्या रोड वर दोन महत्वाचे स्पॉट आहे. पहिला भुसावळच्या प्रसिद्ध "घाशीलाल" वडे यांचा. ही जळगाव मध्ये असलेली त्यांची दुसरी शाखा, पहिली शाखा बाजार समिती मध्ये आहे. टोकन घेऊन इथं वडा घ्यावा लागतो. एक गरम वडा सोबत दोन पाव आणि हवी तितकी मिरची कटोरीमधून घेऊन इथं वडापाव खाता येतो. वडा तयार करतानाचा मसाला हि यांची 'सिक्रेट रेसिपी' आहे. त्यामुळे इथला वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. शक्यतो, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या चवीसाठी इतक्या प्रसिद्ध नसतात. कारण इथला ग्राहक हा नेहमी बदलता असतो म्हणून हे दोन्ही स्पॉट याला अपवाद आहे.  स्टेशन परिसरातला दुसरा स्पॉट आहे, "रवी" अंडाभुर्जी ची गाडी. इथे संध्याकाळ पासून ते रात्री पर्यंत कायम गर्दी असते. डबल बॉईल भुर्जी, हिरव्या मिर्चीतलं आम्लेट हे इथलं खास. ऑर्डर दिल्यानंतर डिश समोर यायला वेळ लागतो. पण आपण दिलेला वेळ वसूल मात्र पूर्ण होतो. गोविंदा रिक्षा स्टॉप कडून रेल्वे गेट कडे जाताना "काळूबाई" म्हणून एक भारी नाष्ट्यासाठीच ठिकाण आहे. इथे पोहे, भजी, कचोरी, समोसा सगळंच मिळत. अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांचा हा खास स्पॉट आहे. 

नूतन मराठा कॉलेज च्या परिसरात गेल्यास, खूप लहानमोठे स्टॉल्स आहेत. या भागात बाहेरून येऊन राहणारे विद्यार्थी राहतात. तसेच जिल्हा न्यायालय पण असल्याने गर्दी हि नेहमीच असते. कोर्टच्या समोरच "गोली" वडापाव च आउटलेट होत. आता तिथे बरेच वेगवेगळ्या ब्रँड चे आउटलेट येऊन गेलेत, पण पाहिलं गोली च असल्याने कुठल्याही आउटलेट ला गोली वडापावच म्हटलं जात. तिथेच बाजूला अंडा रोल्स च नवीन आउटलेट आलेलं आहे. अंडा रोल किंवा इतर व्हेज रोल हा प्रकार जळगाव मध्ये तसा नवीनच आहे. पण त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय. नूतन कॉलेज कडून शाहू मार्केटकडे जाताना, राजूभाऊ यांची अंडाभुर्जीची गाडी आहे. विद्यार्थी मंडळींची संख्या जास्त असल्याने इथे "बेंजो" हा प्रकार खूप चालतो. पुढे गणेश कॉलनी कडे जाताना, ट्रॅफिक गार्डन च्या मोकळ्या जागेवर शहरातील दुसरी "खाऊगल्ली" आहे. नॉनव्हेज आणि चायनीज खाण्यासाठीचे विविध स्टॉल इथे आहे. चिकन बिर्याणी, अंडा भुर्जी, कबाब, मन्चुरिअन, सोयाबीन चिल्ली असे सगळेच प्रकार इथं मुबलक उपलब्ध असतात. पण ते फक्त संध्यकाळ नंतर.

कोर्ट चौक ते स्वातंत्र्य चौक या रस्त्यावर खाण्यासाठीचे खूप सारे ऑप्शन आहेत. जीएस ग्राउंड ला लागून संध्याकाळी खूप साऱ्या चायनीजच्या गाड्या असतात. "शेळके" म्हणून एक पावभाजी ची गाडी पण त्या गर्दीत असते. पुढे बेंडाळे कॉलेज च्या समोरच्या "मधुरम" मधला कोकोनट समोसा टेस्ट करावा असा आहे. आम्ही नूतन कॉलेज ला होतो तेव्हा आवर्जून जायचो खाण्यासाठी. बेंडाळे कॉलेज हे मुलींचं असल्याने तिथं पाणीपुरी वाला असणं स्वाभाविकच आहे. कॉलेज च्या बाजूला स्टेडियम जवळ एक छोटी पाणीपुरी ची गाडी लागते. जी नेहमी मुलींनी घेरलेली असते. स्टेडियमच्याच बाजूने बस स्टॅन्ड कडे जाताना पोलीस हॉल च्या बाहेर संध्यकाळी शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी ची एक गाडी लागते. इथली शेवपुरी हा एक जबरी असा प्रकार आहे. याच्या बाजूलाच बर्फ गोळ्याची गाडी आहे. सिजनल नाही तर वर्षभर ती असते. इथून रोड क्रॉस केला कि समोर, महाराष्ट्र बँकेच्या अंगणात महिला मंडळाच "पराठा हाऊस" आहे. पालक पराठा, आलू पराठा यांच्या सोबतच वरण भात, शेवभाजी, पोळी असं पार्सल पण मिळतं. तिथे बसूनही खाऊ शकतो. या परिसरातील अनेकांसाठी दुपारच्या जेवणाचं हे हक्काचं ठिकाण आहे. याच्या बाजूलाच नवीन उघडलेला साऊथ इंडियन पदार्थांचा स्टॉल आहे. पुढे बस स्टॅन्डच्या बाहेर आणि बाजूच्या भजेगल्लीत खूप खाण्याचे स्टॉल्स आहेत. पण चवीच्या बाबतीत ते ओके टाईप चे आहेत. पुढच्या स्वातंत्र्य चौकात गांधी उद्यान असल्याने उद्यानाबाहेर खाण्याच्या गाड्यांची अजिबातच कमी नाहीये. आमचा मित्रांचा ग्रुप गेला कि मी सोडून बाकीचे तिथला ब्रेडवडा आणि पाणीपुरी नेहमी खातात.   

पांडे चौकात पोस्ट ऑफिस च्या बाहेर सकाळी नानांची पोह्याची गाडी लागते. पोहे, त्यावर मटकी च्या रस्सा, झणझणीत तर्री, शेव, कांदा, लिंबू असं सगळं व्यवस्थित एका प्लेट मध्ये दिल जात. अर्थात रस्सा हा अनलिमिटेड असतो. कॉलेज ला असतानाच आमचा मित्रांचा हा फेव्हरेट स्पॉट होता. या गाडीच्या समोरच सिविल हॉस्पिटलच्या रस्त्यावर "गुप्ताजी" म्हणून फक्त चणे मिळणारी गाडी आहे. कदाचित शहरातील एकमेव. एका प्लेट मध्ये चणे, त्यावर बटाटा, चण्याचा रस्सा, खटाई, कांदा लिंबू मारून मस्त खाता येते. सकाळच्या वेळात ही गाडी असते. याच गाडीच्या बाजूला एका लहान गाडीवर "मठ्ठा" मिळतो, उन्हाळ्यात जर मठ्ठा प्यायचा असेल तर हा बेस्ट चॉईस आहे.

बहिणाबाई उद्यानाच्या मागे असणाऱ्या गाड्यांपैकी "गोल्डन" आम्लेट हि अंडा भुर्जीसाठीची मस्त गाडी आहे. "राजा" कोल्ड्रिंक्स ही बर्फ गोळ्याची गाडी आहे. बाकीच्या चायनीज, भेळ, पाणीपुरी च्या गाड्या आहेत. या सगळ्या मध्ये प्रसिद्ध कोणती गाडी असेल तर ती, "फेमस" नावाची गाडी. या गाडीवर त्यांचा स्पेशल फेमस रगडा मिळतो. सोबतच भेळ, शेवपुरी वैगेरे पण मिळतात. पण रगडा सगळ्यात बेस्ट.

सागर पार्कच्या बाहेर च्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या या हायवेला आय टी आय च्या बाहेर शिफ्ट केल्या आहे. हीच जळगाव मधली तिसरी खाऊगल्ली. ज्या चायनीज साठी सागर पार्क प्रसिद्ध होत. ते आता या ठिकाणी मिळत. थोडं आऊटसाईड ला झाल्यामुळे सागर पार्क ला व्हायची तितकी गर्दी आता इथे होत नाही. पण ज्यांना खास चायनीज खायचं असत, ते आवर्जून इथं येत असतात. या सारखंच भुसावळ हायवेला कालिकामाता स्टॉप जवळ पण आता खाऊ गल्ली तयार झालीय, संध्याकाळी इथं तुफान गर्दी होत असते.

या सगळ्या व्यतिरिक ही अनेक ठिकाणं शहरात आहे. त्यात महाबळ स्टॉप जवळ सकाळी मिळणारे रस्सा पोहे, मिसळ आहे. आकाशवाणी चौकात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर झाडाखाली पोहे, खमण, ब्रेडवाडा, रस्सावडा असं सगळंच ए वन क्वालिटीच मिळत. सराफ बाजार मध्ये भवानी मंदिरासमोर अस्सल गावरानी तुपात शिकलेली दाबेली मिळते. मेहरूण भागात अक्सा नगर मध्ये चिकन बिर्याणी साठीची खास गाडी आहे. एम आय डी सी परिसरात बाजार समितीच्या बाहेर अव्वल दर्जाची पाणीपुरी मिळते. गणेश कॉलनी चौकात "हिंदवी स्वराज" कडे उत्कृष्ठ पोहे, मिसळ मिळतात. ख्वाजामिया दर्गा समोर एक लहानसा कॅफे आहे. त्याच्याकडे पिझ्झा, ग्रिल सँडविच, बन मस्का अशे नेहमीपेक्षा वेगळे पण छान क्वालिटी चे पदार्थ मिळतात.

मुळात जळगाव शहरामधील खाण्याचा गाड्या, स्टॉल, हॉटेल्स हा काही दोन ब्लॉग मध्ये पूर्ण होणार विषय नाहीये. पण हे दोन ब्लॉग फक्त स्ट्रीट फूड साठी लिहिलेय. लॉकडाऊन संपल्यावर या सर्व ठिकाणांना आवर्जून भेट द्या. आता पुढच्या ब्लॉग मध्ये शहरातील व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील जेवणाच्या हॉटेल्स बद्दल माहिती देईन.

क्रमश:

शुभम शांताराम विसपुते 

1 comment:

  1. प्रभात चौकात ज्या ठिकाणी फेमस रगडावाला असतो त्याच ठिकाणी सकाळी 7 ते 12 च्या दरम्यान एका राजस्थानीची अन्नपूर्णा मिसळ म्हणून गाडी लागते. मी आजपर्यंत जळगाव मध्ये खाल्लेल्ल्या मिसळपैकी सर्वात टेस्टी मिसळ इथली आहे.

    ReplyDelete