हैदराबादमध्ये जन्मलेली आणि मूळचं "तब्बसुम फातिमा हाश्मी" असं आपल्या उंचीप्रमाणे भारदस्त नाव असणारी, पण नंतर मात्र तीने चित्रपट क्षेत्रात आल्यावर अभिनयाच्या बाबतीत हिमालयाची उंची गाठली पण नाव मात्र त्याच्या विपरीत असं छोटंसं "तब्बू" असं धारण केलं. हैदराबाद मध्ये अतुच्च सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी "जहर खूबसूरत" हा शब्द वापरतात. तब्बू ला बघितलं कि बस्स हे दोनचं शब्द आठवतात. आज तिचा ४८ वा वाढदिवस आहे. स्त्रीच्या बाबतीत तिच्या वयाचा उल्लेख करणं हे रीतीला धरून नसतं, पण याला तब्बू अपवाद आहे.
चित्रपट आणि त्यातील तिच्या भूमिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आजवर सर्वच प्रकारच्या भूमिका तिच्या करून झालेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अश्या भूमिका म्हणजे तिचा मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पणातील "विजयपथ" मधली तिची रुकरुक गर्ल, "माचीस" मधली खलिस्तानी दहशतवादी विरंदर कौर मुळे तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, "विरासत" मधली खेड्यातली गरीब मुलगी असो की "चाची ४२०" मधली गर्भश्रीमंत स्त्री दोघी मध्ये तिची कमाल दिसलीय. "हू तू तू" मधली छई छप छई गाणारी पन्ना, "कोहराम" मधली भ्रष्ट इन्स्पेक्टर किरण पाटकर, "हम साथ साथ है" मधली थोरली सून साधना आणि "हेरा फेरी" मधली अनुराधा, या तिच्या कारकिर्दीतला पहिल्या टप्प्यातल्या महत्वपूर्ण भूमिका. पण तब्बू मधली खरी अभिनेत्री समोर आली ती "अस्तित्व" मधून वयाच्या २९ व्या वर्षी एका तरुण मुलाच्या आईची भूमिका करायचं धाडस तिने केलं आणि अर्थातच ते तिने अप्रितमरित्या केलं. हेच धाडस तिच्या कारकिर्दीतला दुसऱ्या टप्प्यात महत्वाचं ठरलं. नंतर आलेला "चांदणी बार" मधली बार गर्ल मुमताज तिला आणखीन एक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेली. "मकबूल" मधील एका म्हाताऱ्या गँगस्टर ची बायको, जी त्याच्याच उजवा हात असलेल्या मकबूल वर जीवापाड प्रेम करते अशी निम्मी तिने जबरदस्त ताकदीने साकारली. "चिनी कम" मध्ये साक्षात महानायकासमोर तिने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. "हैदर" मधली गझला मीर तिने अशी काही उभी केलीय की सिनेमात खुद्द तिचा मुलगा तिच्या प्रेमात पडतो, ही जरी खटकण्यासारखी गोष्ट असली तरी तब्बू ला पाहून खरच वाटतं की बिचार्या त्या मुलाची तरी काय चूक. याच्या पुढच्या वर्षी आलेला "द्रिश्यम" मधली एक खमकी पोलीस अधिकारी ते आपल्या मुलाच्या काळजीने तुटत जाणारी मीरा देशमुख समोर असलेल्या अजय देवगण इतकीच लक्षात राहते. "तलवार" मध्ये इरफान च्या बायकोच्या भूमिकेतला तिचा गेस्ट अँपिअरन्स पण मस्तच आहे. या सर्वांवर कडी म्हणजे तिचा "अंधाधुन" मधली एक पाताळयंत्री, आतल्या गाठीची, जबरदस्त चलाख, अतिशय थंड डोक्याने खून करणारी सिमी तिने अशी काही साकारलीय की आयुष्मान खुराणा खरच तिच्यासमोर बच्चा वाटतो.
तब्बू, अजय देवगण आणि सनी देवल या माझ्या तिघी आवडीच्या कलाकारांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे तिघी अतिशय वाईट डान्सर आहेत. आपल्या खणखणीत अभिनयाच्या बळावर त्यांच्या नृत्य कौशल्याकडे त्यांना लक्ष देण्याची किंवा इतरांचे लक्ष वेधण्याची कधी गरजच नाही पडली. तब्बू अजय देवगण, अमिताभ, नाना, इरफान खान, मनोज बाजपेयी यांच्यासमोर खुलते, या सर्वांचाच अभिनय वरच्या दर्जाचा असल्यामुळे तिला यांना आव्हान द्यायला आवडत असावं. यांच्यासोबतची सिनेमातील तिची जुगलबंदी बघण्यासारखी आहे.
जानलेवा सौंदर्य लाभलेली तब्बू आज वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण करतेय, ४९ हा एक फक्त आकडा आहे तिच्यासाठी. या अस्सल मुरलेल्या ओल्ड वाईन प्रमाणे जसं तीच वय वाढतंय तशी ती आणखीनच मुरत जातेय. तीचं अजूनही सिंगल असणं, यातच मला जास्त सुख वाटतं....
वाढदिवसाच्या शुभेच्छा... तब्बू !
शुभम शांताराम विसपुते

अप्रतिम...
ReplyDelete