Friday, November 1, 2019

जाने तू या जाने ना... - टिपिकल पण तितकीच फ्रेश लव्हस्टोरी



आमिर खान हा  एक उत्कृष्ट असा निर्माता आहे. आपल्या निर्मिती संस्थेद्वारे आजवर त्याने वेगवेगळ्या विषयावरचे उत्तम असे सिनेमे दिले आहे. "जाने तू या जाने ना... " हा देखील त्याने निर्मित केलेला एक उत्तम सिनेमा. इम्रान खान च्या पदार्पणातला आणि कदाचित त्याने चांगलं काम केलेला एकमेव सिनेमा. 

जय, अदिती (इम्रान खान आणि जेनेलिया डिसूजा) आणि त्यांचे मित्र असा हा सहा जिवलग मित्रांचा कॉलेज गृप. जय आणि अदिती अतिशय घनिष्ठ असे मित्र आहे इतके कि त्यांना पाहून इतरांना वाटावं यांच्यात नक्कीच काहीतरी आहे. याच गैरसमजातून कॉलेज पूर्ण झाल्यावर अदिती चे आईवडील त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवतात. तेव्हा दोघी स्पष्ट शब्दात नकार देत त्यांना सांगतात कि आम्ही फक्त मित्र आहोत. पुढे जय ला मेघना (मंजिरी फडणीस) च्या रूपात प्रेयसी मिळते. तो तिच्यात गुंतत जातो. अदितीला, मित्रांना टाळू लागतो. अदिती देखील वरवर आनंदी असल्याचं दाखवत असते पण क्षणोक्षणी आतून तुटत जात असते. नंतर ती केवळ जय ला दाखवून देण्यासाठी एका नवीन मुलाला सुशांतला (अयाज खान) डेट करते. यानंतर अश्या काही घटना घडतात कि दोघी दूर होण्याऐवजी आणखी जवळ येतात, आणि नेहमीप्रमाणे एका आंनदी क्षणाला चित्रपटाचा शेवट होतो.

टिपिकल कथा असली तरी चित्रपटाला लेखक-दिग्दर्शक अब्बास टायरवाला ने फ्रेश ट्रीटमेंट दिलीय. यातील कास्टिंग हि एखाद्या चित्रपटासाठी परफेक्ट कास्टिंग कशी असावी याचं आदर्श उदाहरण वाटावं इतकी सुंदर जुळून आलीय. मुख्य भूमिकेत इम्रान खान आणि जेनिलिया ने छान काम केलय, पण अगदी थोड्या थोड्या वेळासाठी येणारी सहायक भूमिकेतील पात्रे सिनेमात भाव खाऊन जातात. यात बरीच पात्रं जरी असली तरी प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व जाणवत राहतं. जय अदिती चा गृप, अदिती चे आईवडील, जय चे आईवडील (रत्ना पाठक - नासिरुद्दीन शाह) यात दोघींची कामे सरस झालीय. त्यातही नासिरुद्दीन शाह हे पूर्ण चित्रपटात फोटोफ्रेम मध्ये दाखवले आहे, मोजकेच संवाद आणि चेहऱ्यावरील हावभाव याबळावर त्यांनी आपली भूमिका अप्रतिमरित्या साकारलीय. अगदीच एका सीन पुरता मेघनाच्या वडिलांच्या भूमिकेतील रजत कपूर, एक भ्रष्ट आणि रगेल इन्स्पेक्टर साकारणारा परेश रावल दोघेही ग्रेट आहेतच. सोहेल आणि अरबाज या खान भावंडांचा कॅमिओ हि मस्तच झाला आहे आणि या सर्वात भाव खाऊन जातो तो अदितीच्या भावाच्या भूमिकेतला प्रतीक बब्बर. चित्रपटात प्रतीक बब्बर आणि जेनेलिया या दोघी भावाबहिणींमधला एक सीन ज्यात जेनेलिया त्याला म्हणते कि आपण पण खूप चांगले मित्र होतो पण तू आता दूर निघून गेलास, तेव्हा प्रतीक त्याच्या बहिणीचे लहानपणापासूनचे सर्व मित्रमैत्रिणींचे आठवून सर्व नाव सांगतो आणि तिला विचारतो कि तुला आठवतं का माझ्या एकातरी मित्राचं नाव तिला अर्थातच आठवत नाही तेव्हा तो तिला म्हणतो कि माझी फक्त एकच मैत्रीण होती ती म्हणजे तू, दूर मी नाही गेलो  बाकीचे लोक तुझ्या जास्त जवळ आलेय. सिनेमातला हा क्लासिक सीन आहे.

सिनेमाला साक्षात रहमानचं संगीत आहे. नेहमीप्रमाणे सर्वच गाणी अप्रितम आहे, "पप्पू कान्ट डान्स साला" सकट. मला अत्यंत आवडेल काहीसं अंडररेटेड राहिलेलं स्वतः रहमान च्या आवाजातील "तू बोले, मे बोलू" हे अतिशय वेगळ्या प्रकारचं गाणं. यातल्या गाण्यांचं आणखी एक वैशिट्य म्हणजे सिनेमाचं टायटल हे तीन गाण्यांमध्ये ऐकायला मिळत. एकाच सिनेमाला तीन टायटल सॉंग असल्याचं हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असेल.

बाकी चित्रपट थोडासा संथ असला तरी रटाळवाना अजिबात नाहीये. जय-अदिती आपल्या आजूबाजूला असतातच कदाचित आपणही त्यांच्या भूमिकेतून गेलेलो असू. काही चित्रपट असतात ज्यातल्या पात्रांमध्ये आपण स्वतःला बघत असतो, जोडत असतो. "जाने तू या जाने ना..." हा चित्रपट त्यातलाच एक आहे.

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment