Friday, November 15, 2019

तान्हाजी - पोस्टर रिव्ह्यू

अजय देवगण च्या आगामी "तान्हाजी" सिनेमातील एक एक पात्रांचा परिचय देणारे पोस्टर्स प्रदर्शित होताय. तान्हाजी च्या भुमिकेतील अजय देवगण आणि उदयभान च्या भूमिकेतला सैफ अली खान यांची पोस्टर्स प्रदर्शित झाली आहे, आणि आज साक्षात शिवप्रभूंच्या भूमिकेतील शरद केळकर यांचे दर्शन झाले. आजवर मी पाहिलेल्या मराठी किंवा हिंदी सिनेमातील/मालिकेतील शिवाजी महाराजांच्या भुमिकेत इतकं परफेक्ट नाही दिसलं कोणी, 

महाराज म्हणजे धारदार नाक, आणि तेजस्वी डोळे एव्हढेच नाहीय, तर मध्यम उंची, बांधा आणि धारदार आवाज , संवादफेकही खूप महत्त्वाची. एक उंची चा मुद्दा सोडला तर बाकी सर्व बाबींमध्ये शरद केळकर उजवे ठरताय. 

गेल्या ४-५ वर्षांपासून मराठ्यांच्या इतिहासावर बॉलीवुड सोबतच मराठीमध्ये ही उत्तम चित्रपट येत आहेत. बाजीराव मस्तानी पासून सुरू झालेला हा प्रवास फर्जंद, हिरकणी, फत्तेशिकस्त ते आगामी पानिपत, तान्हाजी पर्यंत येऊन ठेपला आहे. आता फक्त एकच मनापासून इच्छा आहे की, शिवरायांवर जागतिक दर्जाचा सिनेमा भारतात तयार व्हावा, आणि तो जगभरात प्रदर्शित केला जावा, बस्स!

तानाजींच्या भूमिकेत अजय, उदयभान च्या भूमिकेत सैफ आणि छत्रपतींच्या भूमिकेत शरद दादा त्यांच्या भूमिकांना न्याय देतील असा मनापासून विश्वास आहे. त्यातल्या त्यात शरद केळकरांना बघणं औत्सुक्याचे ठरेल....

शुभम शांताराम विसपुते

Monday, November 4, 2019

तब्बू - जहर खूबसूरतीची ४८ वर्षे



हैदराबादमध्ये जन्मलेली आणि मूळचं  "तब्बसुम फातिमा हाश्मी" असं आपल्या उंचीप्रमाणे भारदस्त नाव असणारी, पण नंतर मात्र तीने चित्रपट क्षेत्रात आल्यावर अभिनयाच्या बाबतीत हिमालयाची उंची गाठली पण नाव मात्र त्याच्या विपरीत असं छोटंसं "तब्बू" असं धारण केलं. हैदराबाद मध्ये अतुच्च सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी "जहर खूबसूरत" हा शब्द वापरतात. तब्बू ला बघितलं कि बस्स हे दोनचं शब्द आठवतात. आज तिचा ४८ वा वाढदिवस आहे. स्त्रीच्या बाबतीत तिच्या वयाचा उल्लेख करणं हे रीतीला धरून नसतं, पण याला तब्बू अपवाद आहे.

चित्रपट आणि त्यातील तिच्या भूमिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आजवर सर्वच प्रकारच्या भूमिका तिच्या करून झालेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अश्या भूमिका म्हणजे तिचा मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पणातील "विजयपथ" मधली तिची रुकरुक गर्ल, "माचीस" मधली खलिस्तानी दहशतवादी विरंदर कौर मुळे तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, "विरासत" मधली खेड्यातली गरीब मुलगी असो की "चाची ४२०" मधली गर्भश्रीमंत स्त्री दोघी मध्ये तिची कमाल दिसलीय. "हू तू तू" मधली छई छप छई गाणारी पन्ना, "कोहराम" मधली भ्रष्ट इन्स्पेक्टर किरण पाटकर, "हम साथ साथ है" मधली थोरली सून साधना आणि "हेरा फेरी" मधली अनुराधा, या तिच्या कारकिर्दीतला पहिल्या टप्प्यातल्या महत्वपूर्ण भूमिका. पण तब्बू मधली खरी अभिनेत्री समोर आली ती "अस्तित्व" मधून वयाच्या २९ व्या वर्षी एका तरुण मुलाच्या आईची  भूमिका करायचं धाडस तिने केलं आणि अर्थातच ते तिने अप्रितमरित्या केलं. हेच धाडस तिच्या कारकिर्दीतला दुसऱ्या टप्प्यात महत्वाचं ठरलं. नंतर आलेला "चांदणी बार" मधली बार गर्ल मुमताज तिला आणखीन एक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेली. "मकबूल" मधील एका म्हाताऱ्या गँगस्टर ची बायको, जी त्याच्याच उजवा हात असलेल्या मकबूल वर जीवापाड प्रेम करते अशी निम्मी तिने जबरदस्त ताकदीने साकारली. "चिनी कम" मध्ये साक्षात महानायकासमोर तिने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. "हैदर" मधली गझला मीर तिने अशी काही उभी केलीय की सिनेमात खुद्द तिचा मुलगा  तिच्या प्रेमात पडतो, ही जरी खटकण्यासारखी गोष्ट असली तरी तब्बू ला पाहून खरच वाटतं की बिचार्या त्या मुलाची तरी काय चूक. याच्या पुढच्या वर्षी आलेला "द्रिश्यम" मधली एक खमकी पोलीस अधिकारी ते आपल्या मुलाच्या काळजीने तुटत जाणारी मीरा देशमुख समोर असलेल्या अजय देवगण इतकीच लक्षात राहते. "तलवार" मध्ये इरफान च्या बायकोच्या भूमिकेतला तिचा गेस्ट अँपिअरन्स पण मस्तच आहे. या सर्वांवर कडी म्हणजे तिचा "अंधाधुन" मधली एक पाताळयंत्री, आतल्या गाठीची, जबरदस्त चलाख, अतिशय थंड डोक्याने खून करणारी सिमी तिने अशी काही साकारलीय की आयुष्मान खुराणा खरच तिच्यासमोर बच्चा वाटतो.

तब्बू, अजय देवगण आणि सनी देवल या माझ्या तिघी आवडीच्या कलाकारांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे तिघी अतिशय वाईट डान्सर आहेत. आपल्या खणखणीत अभिनयाच्या बळावर त्यांच्या नृत्य कौशल्याकडे त्यांना लक्ष देण्याची किंवा इतरांचे लक्ष वेधण्याची कधी गरजच नाही पडली. तब्बू अजय देवगण, अमिताभ, नाना, इरफान खान, मनोज बाजपेयी यांच्यासमोर खुलते, या सर्वांचाच अभिनय वरच्या दर्जाचा असल्यामुळे तिला यांना आव्हान द्यायला आवडत असावं. यांच्यासोबतची सिनेमातील तिची जुगलबंदी बघण्यासारखी आहे.

जानलेवा सौंदर्य लाभलेली तब्बू आज वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण करतेय, ४९ हा एक फक्त आकडा आहे तिच्यासाठी. या अस्सल मुरलेल्या ओल्ड वाईन प्रमाणे जसं तीच वय वाढतंय तशी ती आणखीनच मुरत जातेय. तीचं अजूनही सिंगल असणं, यातच मला जास्त सुख वाटतं....

वाढदिवसाच्या शुभेच्छा... तब्बू !

शुभम शांताराम विसपुते 

Friday, November 1, 2019

जाने तू या जाने ना... - टिपिकल पण तितकीच फ्रेश लव्हस्टोरी



आमिर खान हा  एक उत्कृष्ट असा निर्माता आहे. आपल्या निर्मिती संस्थेद्वारे आजवर त्याने वेगवेगळ्या विषयावरचे उत्तम असे सिनेमे दिले आहे. "जाने तू या जाने ना... " हा देखील त्याने निर्मित केलेला एक उत्तम सिनेमा. इम्रान खान च्या पदार्पणातला आणि कदाचित त्याने चांगलं काम केलेला एकमेव सिनेमा. 

जय, अदिती (इम्रान खान आणि जेनेलिया डिसूजा) आणि त्यांचे मित्र असा हा सहा जिवलग मित्रांचा कॉलेज गृप. जय आणि अदिती अतिशय घनिष्ठ असे मित्र आहे इतके कि त्यांना पाहून इतरांना वाटावं यांच्यात नक्कीच काहीतरी आहे. याच गैरसमजातून कॉलेज पूर्ण झाल्यावर अदिती चे आईवडील त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवतात. तेव्हा दोघी स्पष्ट शब्दात नकार देत त्यांना सांगतात कि आम्ही फक्त मित्र आहोत. पुढे जय ला मेघना (मंजिरी फडणीस) च्या रूपात प्रेयसी मिळते. तो तिच्यात गुंतत जातो. अदितीला, मित्रांना टाळू लागतो. अदिती देखील वरवर आनंदी असल्याचं दाखवत असते पण क्षणोक्षणी आतून तुटत जात असते. नंतर ती केवळ जय ला दाखवून देण्यासाठी एका नवीन मुलाला सुशांतला (अयाज खान) डेट करते. यानंतर अश्या काही घटना घडतात कि दोघी दूर होण्याऐवजी आणखी जवळ येतात, आणि नेहमीप्रमाणे एका आंनदी क्षणाला चित्रपटाचा शेवट होतो.

टिपिकल कथा असली तरी चित्रपटाला लेखक-दिग्दर्शक अब्बास टायरवाला ने फ्रेश ट्रीटमेंट दिलीय. यातील कास्टिंग हि एखाद्या चित्रपटासाठी परफेक्ट कास्टिंग कशी असावी याचं आदर्श उदाहरण वाटावं इतकी सुंदर जुळून आलीय. मुख्य भूमिकेत इम्रान खान आणि जेनिलिया ने छान काम केलय, पण अगदी थोड्या थोड्या वेळासाठी येणारी सहायक भूमिकेतील पात्रे सिनेमात भाव खाऊन जातात. यात बरीच पात्रं जरी असली तरी प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व जाणवत राहतं. जय अदिती चा गृप, अदिती चे आईवडील, जय चे आईवडील (रत्ना पाठक - नासिरुद्दीन शाह) यात दोघींची कामे सरस झालीय. त्यातही नासिरुद्दीन शाह हे पूर्ण चित्रपटात फोटोफ्रेम मध्ये दाखवले आहे, मोजकेच संवाद आणि चेहऱ्यावरील हावभाव याबळावर त्यांनी आपली भूमिका अप्रतिमरित्या साकारलीय. अगदीच एका सीन पुरता मेघनाच्या वडिलांच्या भूमिकेतील रजत कपूर, एक भ्रष्ट आणि रगेल इन्स्पेक्टर साकारणारा परेश रावल दोघेही ग्रेट आहेतच. सोहेल आणि अरबाज या खान भावंडांचा कॅमिओ हि मस्तच झाला आहे आणि या सर्वात भाव खाऊन जातो तो अदितीच्या भावाच्या भूमिकेतला प्रतीक बब्बर. चित्रपटात प्रतीक बब्बर आणि जेनेलिया या दोघी भावाबहिणींमधला एक सीन ज्यात जेनेलिया त्याला म्हणते कि आपण पण खूप चांगले मित्र होतो पण तू आता दूर निघून गेलास, तेव्हा प्रतीक त्याच्या बहिणीचे लहानपणापासूनचे सर्व मित्रमैत्रिणींचे आठवून सर्व नाव सांगतो आणि तिला विचारतो कि तुला आठवतं का माझ्या एकातरी मित्राचं नाव तिला अर्थातच आठवत नाही तेव्हा तो तिला म्हणतो कि माझी फक्त एकच मैत्रीण होती ती म्हणजे तू, दूर मी नाही गेलो  बाकीचे लोक तुझ्या जास्त जवळ आलेय. सिनेमातला हा क्लासिक सीन आहे.

सिनेमाला साक्षात रहमानचं संगीत आहे. नेहमीप्रमाणे सर्वच गाणी अप्रितम आहे, "पप्पू कान्ट डान्स साला" सकट. मला अत्यंत आवडेल काहीसं अंडररेटेड राहिलेलं स्वतः रहमान च्या आवाजातील "तू बोले, मे बोलू" हे अतिशय वेगळ्या प्रकारचं गाणं. यातल्या गाण्यांचं आणखी एक वैशिट्य म्हणजे सिनेमाचं टायटल हे तीन गाण्यांमध्ये ऐकायला मिळत. एकाच सिनेमाला तीन टायटल सॉंग असल्याचं हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असेल.

बाकी चित्रपट थोडासा संथ असला तरी रटाळवाना अजिबात नाहीये. जय-अदिती आपल्या आजूबाजूला असतातच कदाचित आपणही त्यांच्या भूमिकेतून गेलेलो असू. काही चित्रपट असतात ज्यातल्या पात्रांमध्ये आपण स्वतःला बघत असतो, जोडत असतो. "जाने तू या जाने ना..." हा चित्रपट त्यातलाच एक आहे.

शुभम शांताराम विसपुते