Friday, August 23, 2019

रथ चौकातील गणपती...!!!



जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या रथोत्सवातील रथाचे वास्तव्याचे कायम स्वरूपी ठिकाण असलेला चौक म्हणजेच रथ चौक...!!! याच रथ चौकात गणेशोत्सवाची फार मोठी परंपरा आहे. रथ चौकात एक नव्हे तर तीन सार्वजनिक गणपती मंडळांचा गणपती बाप्पा स्थापन होतो. हे तिन्ही मंडळ म्हणजेच जिद्दी मित्र मंडळ, श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ आणि दीपक तरुण मंडळ होय. इतक्या वर्षांची समृद्ध परंपरा या रथ चौकातील गणेशोत्सवाला लाभली आहे. या तिन्ही सार्वजनिक मंडळांनी स्व कर्तृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आपली ओळख आणि वैशीष्ट्य निर्माण केले आहे.

जिद्दी मित्र मंडळ (वर्षे ३८ वे) :- गणेशोत्सवात सजीव आरास सादर करण्याची मोठी परंपरा या मंडळाने आजवर अखंड सुरु ठेवली आहे. किंबहुना, शहरातील गणेशोत्सवात सजीव आरास सादर करण्याची सुरुवात या मंडळाने केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर मंडळाने नेहमीच सजीव देखाव्यांमधून आपली समाजाप्रती आणि कलेप्रती आपली बांधिलकी वेळोवेळी सिद्ध केली आहे. यंदाही मंडळाने ऐतिहासिक असा श्री शिवाजी महाराजांच्या काळातील सजीव देखावा उभा केला आहे. मंडळाच्या सजीव आरास मध्ये मंडळातीलच कार्यकर्ते भाग घेऊन आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतात. यातूनच स्व. दिलीप काका परदेशी (श्री साईबाबा), जगदीश निकम (एकलव्य, हिरण्यकश्यप, रांझ्याच्या पाटील), मयूर बारी (शिवाजी महाराज), शुभम विसपुते (भक्त प्रल्हाद) इ. कलाकार परिसरात नावारूपाला आले आहेत. अशी हि समृद्ध परंपरा मंडळाला लाभली असून यात नेहमीच वेगवेगळे विषयांवर देखावे साजरे करून मंडळाने ती जोपासली आहे.

श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ (वर्षे ५७ वे) :- दर वर्षीच्या गणेशोत्सवात भव्य दिव्य गणरायाची मूर्ती स्थापन करणे हे या मंडळाचे प्रमुख आकर्षण आहे. ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या रथाच्या पुढेच या गणपतीची स्थापना होत असते. गणरायाच्या भव्य मूर्तीला साक्षात रथाची पार्शवभूमी लाभत असल्यामुळे मूर्तीची भव्यता नजरेत भरणारी असते. जणू, गणरायाचं प्रभू श्रीरामाच्या रथाचे सारथ्य करतोय असे वाटावे. हे मंडळ शहरातील सर्वात जुन्या सार्वजनिक गणपती मंडळातील एक मंडळ आहे.

दीपक तरुण मंडळ (वर्षे ४८ वे) :- सुंदर, विलोभनीय गणेशाची मूर्ती स्थापन करणे हे या मंडळाचे प्रमुख वैशिट्य म्हणावे लागेल. या सोबतच धार्मिक, सामाजिक देखावे हे असतातच. यंदाही मंडळाने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी दर्शनाचा सुदर देखावा उभारला आहे. विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्ध लेझीम खेळण्यासाठी मंडळ प्रसिद्ध आहे. मंडळात कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने उस्फुर्तपणे लेझीम खेळण्यांची सोबतच लाठी काठी फिरवणे आणि मैदानी खेळाची परंपरा मंडळाने मोठ्या उत्साहाने जोपासली आहे. मंडळात वय वर्षे ७ पासून ते वय वर्षे ७० पर्यंत कार्यकर्ते उत्कृष्टपणे आणि उत्साहाने लेझीम खेळण्यातील आपली कला सादर करतात.

रथ चौकात तीन प्रमुख सार्वजनिक मंडळे असूनही तिन्ही मंडळांनी आपली स्वतंत्र ओळख कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव शहरात निर्माण केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे तिन्ही मंडळांनी आपली यशस्वी वाटचाल हि परस्परांप्रती असलेल्या आदर, सन्मान आणि सहकार्याच्या भावनेतून केलेली आहे, यात कुठल्याही प्रकारची द्वेषभावना हि मंडळांच्या कार्यकर्त्यांत नाही हे महत्वाचे वैशिट्य आणि संस्कार ठरतात.
लोकमान्य टिळकांनी यासाठीच तर गणेशोत्सव सार्वजनिकरित्या सुरु केला, लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव शहरातील रथ चौकात गेली अनेक वर्षे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि यापुढेही होत राहील, याची एक रथ चौकातील नागरिक आणि या तिन्ही मंडळाचा सदस्य म्हणून मी शहरवासियांना ग्वाही देतो...!!!

शुभम विसपुते
(२०१८)

1 comment:

  1. ही शान कोणाची....
    रथ चौकाच्या राजांची....

    ReplyDelete