Monday, June 22, 2020

सुशांत - जो परिस्थिती नुसार बदलायला शिकेल तोच विपरित परिस्थितीतही टीकेल

अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन ची गोष्ट आठवली. अभिताभ उतार वयात खुप कठीण प्रसंगातून गेला होता. ABC (Amitabh Bachchan Corporation) बुडाली. वाढलेल्या वयामुळे चित्रपटात हिरोचं काम कोणी देत नव्हतं. अमिताभ पुरता कंगाल झाला होता. आजवर कधीही टीव्ही वर न आलेल्या अमिताभला टीव्ही वर जाण्याची संधी स्टारकडून चालून आली. अमिताभने ती स्विकारली, कारण दुसरा पर्याय ही नव्हता. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली, सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अमिताभ छोट्या पडद्यावर आला आणि KBC च्या रूपाने त्याने इतिहास घडवला. अगोदर आर्थिक परिस्थिती अगदी व्यवस्थित केली. पुढे चित्रपटात परत संधी चालून आल्या. त्याने कभी खुशी कभी गम, बागबान, पा, सरकार, निशब्ध, चीनी कम, पिकू असे अनेक हिट सिनेमे  दिले. भरगोस अश्या जाहिराती केल्या आणि उतारवयात परत तोच बादशाहाचा स्टेटस मिळवला.

अमिताभची गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अचानक आत्महत्या करून देवाघरी गेलेला सुशांतसिंग राजपूत. सुशांतसिंग लाखो फॅन्सच्या जीवाला चटका लावून गेला. सगळे पर्याय संपले की लोक शेवटचा आत्महत्येचा पर्याय निवडतात. इंडस्ट्रीतील लोक आणि त्याच्या जवळचे सांगतात की सुशांत सिंगला सध्या बिग बॅनरचे चित्रपट मिळत नव्हते म्हणून तो डिप्रेशनमध्ये होता. सर्व लोकांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटते आहे. त्याला चित्रपट मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर टिका होते आहे. मी काही सुशांतचा फॅन वैगेरे नव्हतो, पण त्याचा पदार्पणाचा "काई पो छे" सिनेमा थिएटर ला बघितला होता. अर्थात त्याच कारण सिनेमा चेतन भगतच्या पुस्तकावरून घेतलेला असल्याने हे होत. पण सुशांत लक्षात राहिला. शुद्ध देसी रोमान्स परिणीती साठी बघितला तर तिथेही हा भाव खाऊन गेला. PK मधेही तो असाच लक्षात राहिला. MS DHONI तर त्याच्या कारकिर्दीतला माईलस्टोन सिनेमा, त्याने फक्त धोनी हा एकमेव सिनेमा केला असता तरी तो कायमचा लक्षात राहिला असता. इतकं अप्रतिम काम त्याने या सिनेमात केलंय. सुशांत गेल्यानंतर व्योमकेश बक्षी, सोनचिरिया आणि छीचोरे बघितला. बरेच लोक म्हणत होते कि त्याने छीचोरे सारखा आत्महत्येच्या विरोधात मत मांडणाऱ्या सिनेमात काम करूनही आत्महत्या का केली. हे जरी खर असलं तरी छीचोरे पेक्षाही मोटिव्हेशनल काम त्याने धोनीच्या रोल मध्ये केलंय. जग जिकणाऱ्या धोनीचा रोल करणारा सुशांत स्वतः सोबत मात्र जिंकू शकला नाही.     
सुशांत गेला. तो नेमकं कश्यामुळे गेला याच कारण कदाचित कधीच बाहेर येणार नाही. अशी हाय प्रोफाइल पेज थ्री प्रकरणं दाबली जातात. आठवा या अगोदरची दिव्या भारती, जिया खान प्रकरणं. डिप्रेशन, नेपोटिझम अशी अनेक वेगवेगळी कारण ऐकायला मिळताय. सिनेइंडस्ट्री किंवा कुठलेही क्षेत्र घेतले कि तिथे थोड्यमोठ्या प्रमाणात या गोष्टी घडतच असतात. पण यामुळे आपला अमूल्य जीव द्यावा हे मला तरी नाही पटत. प्रॅक्टिकली विचार केला नेपोटीझम हे स्वाभाविकपणे येणारी गोष्ट आहे. दुकानाचा मालक गल्ल्यावर मुलालाच बसवतो ना की दुकानातल्या नोकराला, तसेच राजकीय पुढारी त्याचा उत्तराधिकारीसाठी त्याच्या मुलाला किंवा मुलीलाच निवडतो कार्यकर्त्याला नाही. असंही ऐकण्यात आलं कि त्याला मोठ्या बॅनर्स चे सिनेमे देत नव्हते. पण मोठ्या बॅनर्सचे सिनेमे हवेतच कशाला, आयुष्मान खुराणा, विकी कौशल, राजकुमार राव, कंगना राणावत हे सुशांत सारखेच "आऊटसाईडर्स" ते देखील लो बजेट सिनेमे करून पुढे आले. किंबहुना ते अजूनही अश्याच सिनेमात काम करताय. सुशांत सारख्या अभिनेत्यांना आता उलट इंडस्ट्रीत "अच्छे दिन" आले आहे. कारण आता पब्लिक केवळ हिरो ला बघून सिनेमाला येत नाही त्यांना चांगल्या अभिनयासोबत चांगली स्टोरी पण बघायची असते. यामुळेच आयुष्मान सारखा अभिनेता स्क्रीनवर ऍक्शन न करता केवळ अभिनयाच्या बळावर सलग सात सिनेमे हिट देतो. निदान ह्या गोष्टीचा सुशांतने आवर्जून विचार करायला हवा होता.

एकवेळ आपण मान्यही केलं कि त्याला अजिबात कोणी काम देत नव्हतं तरी तो साउथ इंडियन वा इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट सहज करू शकला असता. तो आधीसारखा छोट्या पडद्यावर परत आला असता तर सुपरडुपर हिट सिरिअल करू शकला असता. उत्तम डान्सर असल्याने डान्स रिऍलिटी शो करू शकला असता. शाॅर्ट फिल्म करू शकला असता. Netflix/Amazon prime वर काम करू शकला असता. OTT प्लॅटफॉर्मला तर आता सोन्याचे दिवस आले आहेत. रंगभूमीवर नाटक करू शकला असता. डान्स अकादमी सुरु करू शकला असता. साठ कोटींचा मालक असल्याने चांगल्या सिनेमांचा निर्माता बनून त्यात स्वतःही काम करू शकला असता. पण आता जा सर्व जर-तर च्या गोष्टी आहेत. तो निघून गेल्याने या गोष्टींना आता किंमत राहिली नाही. 

सुशांत गेला हे वाईटच झालं. पण त्याने स्वतःच्या मुक्तीसाठी जो मार्ग निवडला तो पटला नाही. सिनेमात काम करणारा अभिनेता म्हणून लाखो लोकांवर तुमचा प्रभाव पडत असतो. लोकं तुम्ही दाखवलेलं खरं मानत असतात. तुम्हाला फॉलो करत असतात. त्यामुळे तुम्हीच असा मार्ग निवडाल तर त्याचा लोकांवर निगेटिव्ह प्रभाव निश्चितच पडणार. सुशांत गेल्यानंतर जर आठवड्याभरातील वर्तमान पत्रातील बातम्या बघितल्या असतील तर एक लक्षात लक्षात येईल की कोरोनामुळे हातात काम नसल्यामुळे नैराश्य आलेल्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली दिसून आली आहे. वाईट प्रभाव पडतो तो असा. आपल्याकडे पब्लिक चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी लवकर घेते हे त्याचंच एक उदाहरण आहे. मग छीचोरे सारख्या सिनेमाचा उपयोग काय हाच प्रश्न पडतो. 

डिप्रेशन अनेक प्रकारचं असतं आणि त्याची कारणही असंख्य असतात, व्यक्तिसापेक्ष. ती प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी गाठतातच आणि सांगतात लढण्यापेक्षा तू मरून का जात नाहीस? हि भावना वारंवार मनात येते. अश्यावेळी या भावनेला फाट्यावर मारून जगण्यावर विजय मिळवायचा असतो, ना की त्या भावनेच्या आहारी जाऊन स्वतःला संपवायचं असतं. इरफान गेल्यावर जितकं दुःख झालं तितकं सुशांत गेल्यावर नाही याला हेच कारण आहे.

सुशांत, तू फक्त एक चांगला अभिनेता म्हणून आठवणीत राहशील. कारण जीव देण्याची कारणं कितीही पटणारी असली तरीही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची किंमत माझ्या नजरेत शून्य आहे. जिथं कुठं असंशील तिथं सुखी राहा. भावा....!!! 

शुभम शांताराम विसपुते


Tuesday, June 16, 2020

फस गये रे ओबामा - हटके सिनेमा

अगोदरपासूनच आपल्या भारतीय लोकांना NRI लोकांबद्दल खूप आकर्षण आहे. खासकरून छोट्या शहरात राहणाऱ्यांमध्ये याच प्रमाण जास्त आहे. त्यातही NRI जर अमेरिकन असेल तर विषयच नाही. विदेशात जाणं म्हणजे अमेरिकेत जाणं असं समीकरण आजही येथे बघायला मिळत. दिग्दर्शक सुभाष कपूर ने NRI आणि अमेरिका हाच धागा पकडून त्याला २००८ साली अमेरिकेतून सुरुवात झालेली जागतिक मंदी याची जोड देऊन एक अप्रतिम सिनेमा बनवलाय. उत्तर भारतीय अंडरवर्ल्ड मधली किडनॅपिंगची कथा तो आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीने मांडतो. उत्कृष्ट कथा त्याची चांगली मांडणी सोबत कलाकारांचा उत्तम परफॉर्मन्सने सिनेमा खूप सुंदर झालाय. 

सिनेमाची संपूर्ण कथा NRI ओम शास्त्री (रजत कपूर) याच्या भोवती फिरते. अमेरिकेतील यशस्वी उद्योजक आर्थिक मंदी आल्यामुळे हवालदिल झाला आहे.  त्याचा बिझनेस, गाडी, बँक बॅलन्स सगळंच मंदीमुळे संपलय आता केवळ अमेरिकेतील घर त्याच्याजवळ राहिलय. बँकेच्या कर्जामुळे ते ही विकण्याची वेळ आली आहे. त्यापासून वाचण्यासाठी तो त्याच्या वडिलांची हवेली विकण्यासाठी भारतात येतो. इथून खरा सिनेमा सुरु होतो. इकडे लहानमोठ्या गॅंग कार्यरत असतात. त्यात भाईसाब (संजय मिश्रा) ची गॅंग सगळ्यात अतरंगी असते. मंदी चा परिणाम या गँगवरही पुरेपूर झालेला असतो. इतका की, त्यांच्याकडे बंदुकी असतात पण त्यात गोळ्या नसतात. गाडी मध्ये पेट्रोल नसते. अशी सगळी उपासमार सुरु असते. त्या गॅंग मधला अन्नी (मनू ऋषी) सगळ्यात हुशार आणि भाईसाब चा लाडका असतो. अन्नी ओबामा यांचा फॅन आणि अमेरिकेत जाण्यासाठी उतावळा असतो. अन्नी कडून भाईसाबला ओम शास्त्रीबद्दल समजतं. भाईसाबला वाटत शास्त्री NRI असल्याने मोठी असामी असेल, या एकाच किडनॅपिंग मुळे आपला पैशांचा आणि इज्जतीचा कायमचा प्रश्न मिटेल. भाईसाब शास्त्रीला किडनॅप करतात आणि २ कोटी खंडणी मागतात. शास्त्री जेव्हा त्याची करुण कहाणी त्यांना ऐकवतो तेव्हा त्यांना कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय राहत नाही. 

भाईसाबच्या गॅंगमधला अन्नी मुळातच हुशार असतो तो भाईसाब ला पटवून देतो की शास्त्री कंगाल आहे हे आपल्याला माहिती आहे. इतर गँग्स ना थोडी माहित आहे. आपण शास्त्रीला अली भाई ला ऍडव्हान्स घेऊन विकू आलेल्या पैशातून आपला खर्चही निघेल आणि बंदुकीसाठी गोळ्याही येतील. शस्त्र तयार असले तर अली भाईला आपण धडाही शिकवू शकतो. हि चर्चा ओम शास्त्री ऐकतो तो उलट भाईसाबला ऑफर देतो की अलीकडून जे पैसे येतील त्यातले ५० टक्के माझ्या अकाउंट ला टाकायचे नाहीतर अली ला खरं काय ते सांगून देईन. डील पक्की होते. अली कडे शास्त्रीला सोपवल्यावर अली अट टाकतो की गॅरंटी म्हणून अन्नी पण माझ्याकडे राहील. पुढे अलीला खरं काय ते समजतं. जो खेळ शास्त्रीने अली सोबत खेळला तोच खेळ शास्त्री अलीला मुन्नी मॅडम (नेहा धुपिया) या लेडी गँगस्टर सोबत खेळायला लावतो. अली आणि शास्त्री मध्ये ५० टक्के वाली तीच डील परत फायनल होते. मुन्नी कडे शास्त्रीला सोपवल्यानंतर मुन्नीला देखील शास्त्रींची खरी परिस्थिती कळते. फसवले गेल्याचा राग म्हणून ती भाईसाब, अली यांना धरून आणते आणि त्यांना मारणार तेवढ्यात ओम शास्त्री मुन्नीला परत तीच ऑफर देतो. आता या सगळ्या गँग्स पेक्षा सगळ्यात मोठी गॅंग असते मंत्री धनंजय सिंग (अमोल गुप्ते) ची मुन्नी शास्त्रीला धनंजय सिंग ला विकते. जीवावर बेतलेलं असताना ओम शास्त्री प्रत्येक वेळेला सहीसलामत कसा सुटतो. धनंजय सिंग च्या तावडीतुन पण तो शिताफीने निसटून सिनेमाचा शेवट गोड होतो. फक्त तो कसा निसटतो हे स्पॉइलर इथे देणार नाही ते सिनेमात बघण्यासारखं आहे. 

सिनेमा स्ट्रेस रिलीफ करणारा आहे. हटके स्क्रिप्ट सोबत आपला जॉली LLB चा सुभाष कपूर सारखा गुणी दिग्दर्शक असल्याने सिनेमा मस्त झालाय. खासकरून यातील डायलॉग खूप भारी आहे. अमेरिकेला मारलेले टोमणे असो की भाईसाबच MLA होऊन विधानसभेत खुर्च्या तोडण्याचं स्वप्न असो. हे सगळं खुमासदार डायलॉग मधून समोर येतं. एका इंग्लिश स्पिकींगच्या क्लास मधल्या शिक्षकाचा "English Speaking like a Rice Plate Eating" हा खूप व्हायरल झालेला सिन याच सिनेमातला आहे. ओबामांच्या "Yes We Can" चा संदर्भ घेऊन भाईसाब आणि त्याच्या गॅंगमधला सिन पण असाच अफलातून आहे.  

संजय मिश्रा आणि रजत कपूर सारखे तगडे कलाकार असल्यावर चांगला अभिनय बघायला मिळतोच. संजय मिश्राचा परिस्थितीने हतबल झालेला भाईसाब कमाल आहे. त्याची हतबलता बघताना कीव येते इतकं सुरेख काम संजय मिश्राच आहे. रजत कपूर मुळात दिसतोच NRI सारखा त्यामुळे त्याच असणं हीच सिनेमाची खरी ताकत आहे. या दोघींव्यतिरिक्त लक्षात राहतो मनु ऋषीचा अन्नी. ओबामांचा फॅन असलेला अन्नी त्याने झोकात सादर केलाय. नेहा धुपिया आणि अमोल गुप्ते यांचं काम कमी वेळासाठी आहे पण छान आहे. 

मला खूप आवड आहे असे सिनेमे बघण्याची. चांगले सिनेमे थिएटरला मी आवर्जून बघतो. या पठडीतल्या सिनेमांना थिएटर मध्ये हवा तसा प्रतिसाद मिळत नाही याची खंत आहेच. पण असं असूनही असे सिनेमे तयार होत असतात यासाठी या सिनेमांच्या मागे उभं राहणाऱ्या प्रत्येकाला सलाम.     

शुभम शांताराम विसपुते

Monday, June 8, 2020

हरिहरन - ग्रेट गायक


कॉलेजला असताना एका मैत्रिणीने "स्लॅम बुक" दिलं होत भरायला, त्यात जागा खूप कमी होती. आपल्या आवडत्या व्यक्ती, गोष्टी एक-दोन शब्दात लिहायच्या होत्या. मी आवडतं गाणं "तू हि रे" तर आवडता गायक म्हणून "हरिहरन" लिहिल होतं. हरिहरन आवडतो तो यासाठीच कि तो एक परफेक्ट "ऑल राऊंडर" गायक आहे. सगळ्या प्रकारच्या गाण्यात फक्त गायकी नव्हे तर हुकूमत असलेला गायक. मी उदित, सोनू, लकी अली, केके यांचा डाय हार्ड फॅन आहे, पण हरिहरन या लिस्टच्या पलीकडे आहे. हृदयाच्या एका हळव्या कोपऱ्यात खास स्थान असलेला. जशी आदरयुक्त भीती असते तशी या माणसाबद्दल मला आदरयुक्त आवड आहे. केके आणि हरिहरन दोघींमध्ये एक साम्य आहे, दोघांचा आवाज आपल्यातल्याच एखाद्याचा वाटावा इतका साधा सिम्पल आहे, पण त्यामुळेच तो थेट भिडतो.

हरिहरन ला पहिल्यांदा टीव्हीवर कॉलोनिअल कझिन च्या "काय झालं" या गाण्यात बघितलं. तेव्हापासून आजपर्यंत त्याच जेव्हाही दर्शन झालंय तेव्हा प्रत्येक वेळेला तो नवनवीन लुक मध्ये दिसतो. केसांची पोनीटेल घातलेली किंवा मोकळे सोडलेले, कधी कोरून दाढी ठेवलेली तर कधी फक्त मिशी, चष्म्याच्या बदलत्या फ्रेम्स या सर्वानी तो लक्ष वेधून घेतो अर्थात वेगवेगळे लूक्स फक्त तो आवड म्हणून करतो. अतरंगी लुक मध्ये दिसत असला तरी त्याची गायकी खूप महान आहे. माचो पर्सनॅलिटी असलेला गायक.

केरळ मध्ये जन्मलेला मल्याळी माणूस उर्दू अलफाज मधली गज़ल इतकी सफाईदारपणे पेश करतो की ऐकताना जराही वाटत नाही कि हा गायक दक्षिण भारतीय आहे. मला तो गज़ल गायक म्हणून खूप श्रेष्ठ वाटतो. योगायोगाने मला त्याच्या काश, जश्न, गुल्फाम अश्या सगळ्या गज़ल अल्बमच कलेक्शन मिळालंय जे की मौल्यवान खजिन्यापेक्षा कमी नाहीए. त्यात काश ऐसा कोई मंझर होता, मैकदे बंद करे, जब कभी बोलना सारख्या क्लासिक गज़ल्स आहेत. माझी पर्सनल फेव्हरेट दिलनशी अल्बम मधली "आज भी है मेरे कदमो के निशाण आवरा" ही आहे. ही गझल ऐकताना मन लगेच वर्तमानाची साथ सोडून भूतकाळात धाव घेतं.

९० च्या दशकात जेव्हा इंडिपॉप ला सोन्याचे दिवस होते तेव्हा त्या मधेही लेस्ले लुईस बरोबर हरिहरन ने जबरदस्त गाणी दिली. त्यांचा कॉलोनिअल कझिन  अल्बम होता. हरिहरनच इंडियन क्लासिकल आणि लेस्ले लुईसच वेस्टर्न मुसिक यांची अशी काही सुरेख गुंफण केली होती कि त्यामुळे तो परफेक्ट फ्युजन अल्बम झालाय. त्यातील "कृष्णा नी बेगने...बारो" हे याच ठळक उदाहरण. यातील इंग्लिश आणि हिंदी शब्द आजच्या काळातही लागू पडतील असे आहे. जर कधी डाऊन वाटत असेल तर तेव्हा हे गाणं नक्की ऐकावं असं आहे. याच अल्बमच 'सा नी ध प' आणि 'इट्स ऑल राईट' पण खूप मस्त गाणी आहेत. "आत्मा" हा या जोडीचा पुढचा अल्बम त्यातील "ओहो काय झालं, काय पाव्हणं" हे गाणं तेव्हा किती गाजलं हे सांगण्याची गरज नाही. सोबतच "सुंदर बलमा" सारखं नितांत सुंदर गाणं ही त्यात होत. 

हरिहरनच्या नावातच हरी आहे कदाचित त्यामुळे त्याची भक्तीगीत देवाला साद घालणारी आहेत. त्याच्या आवाजातली हनुमान चालीसा लूप वर ऐकण्यासारखी आहे. गुलशन कुमार सोबतचे भगवान शंकरासाठीचे भक्तिगीते पण आहेत. "आयो रे आयो नंदलाल बिरजमा" हे कृष्णाच उत्कृष्ट क्लासिकल भजन आहे. साध्या चालीतलं शिव तांडव स्तोत्रं हि तितकंच खास आहे. अगदीच प्युअर असलेलं "मोहें अपने ही रंग मे रंग दे" हे सुफी गाणं ऐकताना वर बसलेल्याशी कनेक्ट करतं. गुरु मधलं "ऐ हैरते आशिकी" हे ही असच एक छान सुफी आहे.         

हिंदी सिनेमातील किती गाण्यांबद्दल लिहिणार. प्रत्येक गाण्यातुन ठळकपणे दिसलेलं त्याच वेगळेपण, त्यातून त्याने दिलेला निर्भेळ आनंद याच तरी किती वर्णन करायच. हरिहरन चा उपयोग दोन संगीतकारांनी योग्य प्रकारे केला. एक रहमान आणि दुसरा विशाल भारद्वाज. दोघीनी खूप सुंदर आणि त्याला परफेक्ट सूट होतील अशी गाणी दिली. रहमानसोबतचा त्याची जोडी रोझा पासून जमली आहे. "रोजा जानेमन" हे रहमानच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं गाणं रहमानने हरिहरनला दिलं. हिंदी बरोबर साऊथ मध्ये खूप गाणी दोघांनी दिलीय. विशाल भारद्वाजने संगीत दिलेल्या बहुसंख्य गाण्यांचे शब्द हे गुलझार यांचे असतात. गीतकार-संगीतकारच्या क्लासिक जोडीला हरिहरन सारख्या अव्वल दर्जाच्या गायकाची जोड लागली तर गाणं कमाल होणारच.

लताजींबरोबरचे लम्हेच "कभी मै कहू", डर मधलं "लिखा है इन हवाओ ने", दिल तो पागल है च "एक दुजे के वास्ते", सत्या मधलं "तू मेरे पास भी हे" आणि हू तू तू मधलं "छाई छाप छाई" हि पाच ही गाणी अप्रतिम आहे. सुरेश वाडकर यांच्या सोबतच माचीस मधलं "चप्प्पा चप्पा चरखा चले" सारखं अजरामर गाणं. माझं अगदी लहानपणापासूनच आवडतं आहे. याच सिनेमातलं "छोड आये हम वो गलिया" हे अजून एक हिडन जेम. काजोल च्या सपने मधलं "चंदा रे" या गाण्यातील त्याची चंदा या शब्दावरची तान, अजूबा गाण्यातील ऐश्वर्याचा सौंदर्याचं वर्णन करायला हरिहरनचाच आवाज पाहिजे. हरिहरन किती मोठा गायक आहे हे दिसलं ते रंगीलाच्या "हाय रामा" या गाण्यातून. प्युअर क्लासिकल टच असलेलं गाणं, सोबत स्वर्णलथा आणि पडद्यावरची मादक उर्मिला परफेक्ट मॉकटेल ज्याला म्हणतात ते असं असत. १९४७ - अर्थ यातलं "धीमी धीमी" हे रोमांचित करणारं गाणं. बॉर्डर सिनेमातलं "संदेसे आते है" हे जास्त लक्षात राहतं, पण हरिहरन ने गायलेलं "मेरे दुश्मन मेरे भाई" हे गाणं  त्याला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेलं. हरिहरन ने पूर्ण इमोशन्स ने गायलेलं ताल या म्युझिकल सिनेमातलं काहीस अंडररेटेड राहिलेलं "नही सामने तू" हे गाणं. लकीर मधलं उदित सोबतच "सदिया" हे पूर्ण सिनेमापेक्षा चांगल गाणं आहे. 

हम दिल दे चुके सनम मधलं "झोका हवा का आज भी" मेहबूब चे शब्द आणि त्यावर कडी करणारा हरिहरन चा आवाज. बस्स. यासारखंच आणखी एक गाणं आहे ते लक्ष्य मधलं "कितनी बाते" हे गाणं, न बोलता "दोनो के दिलो मे सवाल हे फीर भी है खामोशी" अश्या शब्दातून व्यक्त होणारी त्यांची वेदना हरिहरनच्या आवाजात आणखी तीव्रतेने जाणवते.  यादे चा टायटल ट्रॅक, दहेक मधलं पावसातील "सावन बरसे तरसे दिल", "कुछ मेरे दिल ने कहा" हे तेरे मेरे सपने मधलं गाणं. अनुरागच्या पांच मधलं अतिशय वेगळं असं "पका मत" हे गाणं. त्यातलं हरिहरनचं एक्सप्रेशन ऐकताना देखील जाणवतं. आणखी एक आवडतं गाणं म्हणजे भूतनाथ मधलं "समय का पहिया चलता है" हरिहरनच्या सोबतच गाण्यात येणारे अमिताभजींचे डायलॉग खूप काही सांगून जातात.

दिल विल प्यार वार हा या सिनेमात आर डी बर्मन यांची गाणी रिक्रिएट केली होती. त्यात सर्वात जास्त गाणी हरिहरनने गायली आहेत. गुम है किसी के प्यार में, ओ हंसिली, तुम बिन जाऊ कहा, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा, ये जो मोहब्बत है अशी सगळी ओल्ड क्लासिक्स मस्त रिक्रिएट केली आहेत. हरिहरनच्या आवाजाने त्याला चार चांद लागलेत.

"तू हि रे" ते "जीव रंगला" हा प्रवास समृद्ध करणारा आहे. या दोन्ही गाण्यांमुळे रहमान आणि अजय-अतुल ला देशभरात ओळख मिळाली. कविता आणि श्रेयाचा तो तरल आवाज. पाऊस पडून गेल्यावर ऊन पडतं तेव्हा सभोवतालचं सगळं नवीन वाटायला लागतं, सुंदर दिसायला लागतं. हि गाणी म्हणजे ते पाउसानंतर पडणारं ऊन आहे.  दोन्ही गाणी मला सारखीच वाटतात. त्यांचं आऊटडोअर पिक्चरायझेशन, त्यात वाजणारी बासरी, गाण्यातील आर्तता, ओढ सगळंच एकरूप झाल्यासारखं वाटतं. आणि या दोन्हीं गाण्यांना जोडणारा महत्वाचा धागा अर्थातच हरिहरन आहे.   

मौत और जिंदगी तेरे हाथों में दे दिया रे...खूण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण...

शुभम शांताराम विसपुते