Monday, February 10, 2020

आपली माणसं...


आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते?याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही..

          जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसं.
          
          रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो,पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं. मन जुळलं की आपलेपणाचे नात होते. जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. हे अगदी खरं असलं तरी दोन्हीकडच्या माणसांनी आपलं नातं ज्या विश्वासाच्या मूळावर उभं आहे, त्याला कधीच तडा जाऊ द्यावयाचा नसतो, याची खबरदारी नात्यातल्या दोघींनी घ्यायलाच हवी, केवळ एकाने नेहमी ही खबरदारी घेण्यात काही अर्थ नाही. 

          प्रत्येकवेळेला नात्यामधला एक माणूस स्वतःची चूक असो किंवा नसो जर नमती भूमिका घेत असेल, तर याचा अर्थ त्याला ते नातं टिकवायचं असतं. काळजाच्या जवळची असणारी माणसं सोडून गेल्याचं दुःख त्याने पचवलेलं असतं. त्यामुळे नातं कसं टिकवायचं ते त्याला चांगल्या प्रकारे माहित असतं आणि तो त्याप्रमाणे वागतो ही.

          शेवटी नातं टिकणं आणि टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नात्यात अगोदरपासूनच गोष्टी क्लिअर असल्या तर नंतर स्पष्टीकरण (Clarification) देण्याची आवश्यकता नसते. 


शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment