Monday, January 6, 2020

ए आर रहमान - संगीतातला सिद्धपुरुष


मुळचा "दिलीप कुमार" आणि आताचा "अल्ला रखाँ रहमान" म्हणजेच आपला लाडका ए आर रहमान चा आज वाढदिवस. आज त्याने दिलेल्या गाण्यांबद्दल काही लिहीणार नाही, कारण तो न संपणारा विषय आहे.

रहमानला त्याच्या संगीतासाठी आतापर्यंत ६ राष्ट्रीय पुरस्कार,  २ ऑस्कर (आशियातला एकमेव संगीतकार), २ गिरामी, १ बाल्टी, १ गोल्डन गोब, १५ फिल्मफेअर हिंदी व १७ फिल्मफेअर साऊथ (एकूण ३२ फिल्मफेअर मिळवणारा भारतातला ऐकमेव कलाकार) या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच त्याच्या संगीतक्षेत्रीतील योगदाना साठी भारत सरकार कडून "पद्म भूषण" देण्यात आले आहे. सर्वाधीक देशभक्तीपर गाणी रहमानने दिलीये. असे कितीतरी विक्रम त्याच्या नावावर आहे, पण या सिद्धपुरुषाला त्याच्याने काही फरक पडला नाही आहे. आजही तो जसा होता तसाच आहे, प्रसिध्दीपासुन कोसो दुर. गेल्या २-३ वर्षांपासून तो हिंदीत काम करत नाहीए किंवा एकदमच जुजबी काम करतोय. खरंतर रहमानला बॉलिवूड ची गरज नाहीये पण बॉलिवूडला सध्या रहमानची नितांत गरज आहे...

रहमान संगीतकार म्हणून महान आहेच पण मला त्याचा आवाज देखील प्रचंड आवडतो. फार आतून गातो. त्याच्या आवाजातला सच्चेपणा सतत जाणीव करुन देत असतो की हे फक्त दैवच असू शकतं. नुकताच पाऊस पडून गेल्यावर ऊन पडत तसं सगळं जग मग नवीन वाटतं, सुंदर वाटतं आणि मग कळतं हा तर फक्त आवाज होता. तो इथं नाहीये. बस्स हीच रहमान नावाची जादू आहे. 

रहमानला काही सांगायची गरज नाही पडली कधी, जेव्हा कुणाशीही बोलायच नसतं तेव्हा तो असतोच. तो आहे-नाही, चूक-बरोबर च्या पलीकडे एका वेगळ्या जगात घेऊन जातो, हात धरून. जिथुन त्याला हे सगळं दिसतं सुचतं कदाचित तिथेच! तिथं फक्त त्याच्याशीच नाही तर स्वता:शीच संवाद सुरु होतो आणि आपण परत येतो स्वत:सोबत कनेक्ट होऊन! हे असं कितीतरी वर्ष सुरुय आणि तसंच राहणार आहे.

मी कधी चैन्नईला गेलोच तर सर्वात आधी "कोडंबकम" भागात असलेल त्याच घर पाहून येईल. त्याच्या घराच्याच एका भागात त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. ज्यात दिग्गज गायकांनी रात्र रात्र जागून (रहमान गाण्याच रेकॉर्डिंग रात्रीच करतो) एकेक मास्टरपीस आपल्याला दिलेय. त्या जागेला फक्त बघणं ही माझ्यासाठी "Fan Moment" राहील. 

तुझ्यामुळे माझ्यासारख्या अनेकांची आयुष्य तुझ्या आवाजाने, तुझ्या संगीताने लख्ख केलीय. तुझ्यामुळे अनेक मन प्रकाशित होत राहतील, अनेक आयुष्य बदलत राहतील. 

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा रहमान...

शुभम शांताराम विसपुते

No comments:

Post a Comment