Saturday, August 15, 2020

खयाली पुलाव - स्वातंत्र्याच इवलसं स्वप्न

लक्ष्मण रेखाएँ खींचने से पहले अपने आप से पूछिए, क्या आप लक्ष्मण है ?
-मनोज मुंतशीर

स्क्रीनवरील या ओळीने फिल्मची सुरुवात होते. या ओळींतून आपल्याला थोडीफार कल्पना आलेली असते कि फिल्म नेमकी कशाबद्दल असणार आहे. हरियाणातल्या एका खेड्यातली मुलींची शाळा. त्यातली अभ्यासात हुशार असणारी मुलगी आशा (प्राजक्ता कोळी) तिची हि गोष्ट आहे. तिच्या घरातलं वातावरण कर्मठ आहे, मुलीला शिकायची परवानगी तर आहे पण जीन्स वैगेरे असे मॉडर्न कपडे घालण्याची परवानगी नाहीये. गावातल्याच तिच्या मैत्रिणीने शहरात जीन्स घालून फिरल्याने उडालेला गहजब तिने बघितला आहे. अश्यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरशालेय हँडबॉलची स्पर्धा असल्याची सूचना देण्यासाठी शाळेच्या टीम मधली एक खेळाडू "शॉर्ट्स" घालून वर्गात येते आणि सांगते की ज्यांना कोणाला स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास त्यांनी मैदानावर यावं, तिच्या बोलण्यापेक्षा आशाच लक्ष तिच्या शॉर्ट्स कडे जास्त असतं स्पर्धेत भाग घेतला तर आपल्यालाही शॉर्ट्स घालायला मिळेल इतकंच तिला समजतं. तिच्यासाठी तेच जास्त महत्त्वाचं असतं. आपल्याकडे मुलींनी शॉर्ट्स घालणं ही  गोष्ट अगदीच सामान्य आहे पण हरियाणातील लहानश्या गावातील आशासाठी ते स्वप्न आहे आणि तीचा या स्वप्नपूर्तीचा प्रवास म्हणजेच हा "खयाली पुलाव"

शाळेच्या संघामध्ये भाग घेण्यासाठी आशा मोठ्या उत्सहाने मैदानावर जाते. पण तिला लवकरच लक्षात येतं कि हँडबॉल खेळणं इतकं सोपं नाहीये आणि तिच्याही आधी हे टीम च्या कोच सरांच्या (यशपाल शर्मा) लक्षात आलेलं असतं. पण येनकेनप्रकारे तिची संघात निवड होते ती कशी होते ते बघितल्यावर कळेलच, अर्थात त्यात सस्पेंस ठेवण्यासारखं काही नाहीये पण तरीही तिचा संघातला प्रवास हा स्क्रीनवर बघण्यासारखा आहे.

खयाली पुलावची गोष्ट तशी खूप काही वेगळी नाहीये, पण खरी मजा ती ज्या प्रकारे मांडण्यात आली आहे त्यात आहे. लक्षात राहतील असे फिल्म मध्ये सीन्स आहेत त्या सीन्सच्या माध्यमातून दिग्दर्शक योग्य तो संदेशही दिला आहे. संवादही उत्तम आहेत. बॅकग्राउंडला वाजणार गाणं हि सुंदर आहे. यातील लक्षात राहिलेले सीन्स बद्दल थोडक्यात सांगतो.

१) अगदी पहिलाच सीन ज्यात शाळेतल्या भिंतीवरच्या कोऱ्या फळ्याकडे बघत आशा उभी असते आणि शेवटी जेव्हा तिचं स्वप्न पूर्ण होत तेव्हाही ती त्या फळ्यासमोर उभी असते फरक इतकाच की तेव्हा फळ्यावर मजकूर लिहिलेला असतो, "हमसे कोई पूछे बच्चो आजादी क्या होती है हम कह देंगे उस दिन सबकी पुरी छुट्टी होती है.

२) फिल्म मध्ये एक कबाडीवला आहे. "किस्मत" त्याच नाव. जो पूर्ण फिल्म मध्ये झोपलेला दाखवलेला आहे. आशा दररोज शाळेत जाताना त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण तो कधीच नाही उठत. तो कबडीवाला म्हणजे तिचं नशीब असतं जे नेहमी झोपलेलं दाखवलेलं आहे. फक्त तो एकाच वेळी उठलेला दाखवलेला आहे आणि तेव्हा खरोरच तिच्या आयुष्यात चमत्कार घडतो. 

३) आशा गावातल्या मित्राची वाट बघत बसलेली असते. तिच्या समोरून एक पूर्ण घुंगट ओढलेली स्त्री जाते, तेव्हा त्या भिंतीवर निळ्या अक्षरात लिहिलेलं दिसतं, लडका-लडकी एक समान...

४) फिल्ममधला प्रजासत्ताक दिनाचा वापर देखील खुप रुपक आहे. ती स्वतंत्र तर असते पण तिला अधिकार प्राप्त झालेले नाहीत. स्वप्न पाहत असताना शिक्षिका भानावर आणतात (स्त्री च तिच्या स्वपनान्ना लगाम घालते)...

असे अनेक सीन्स आहेत कि ज्यातून डायरेक्टर ने काही सांगण्याचा प्रयन्त केलाय. हे सर्व फिल्म मध्ये बघण्यासारखं आहे. अवघ्या २६ मिनिटांची हि शॉर्ट फिल्म आहे. भाषा हरियाणवी हिंदीत असल्याने समजायलाही सोपीच आहे.

आपली मराठमोळी प्रसिद्ध यूटुबर प्राजक्ता कोळी (मोस्टलीसेन) हिने या फिल्मच्या माध्यमातून दमदार पदार्पण केलंय. टिपिकल हरियाणवी भाषेचं बेअरींग तिने उत्तम पकडलं आहे. तिची आश्वासक सुरुवात झाली आहे. यशपाल शर्मा यांचा कडक शिस्तीचा पण आतून दुखावलेला क्रीडाशिक्षक मस्त. इतर लहान भुमिकेत असलेले कलाकारांची कामे ही छान झाली आहे. 

हा "खयाली पुलाव" एकदा आवर्जून खाण्यासारखा आय मीन बघण्यासारखा नक्की आहे.

फिल्मची लिंक : https://youtu.be/8cMDYZUfW-A

शुभम शांताराम विसपुते

Tuesday, August 4, 2020

श्रीराम मंदिर - भारतीयांच्या अस्मितेचा सुवर्णक्षण

             
श्रीराम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात होत आहे. इतका अमूल्य दिवस आपल्याला पहायला मिळतोय म्हणून आपण सगळे नक्कीच खूप भाग्यवान आहोत. अजरामर असणाऱ्या ह्या गोष्टीचे आपण साक्षीदार असणार आहोत. भुमिपूजनाची तारीख घोषीत झाल्यापासून वातावरण भारावून गेलय. मन उल्हासित झालंय.
                          
५०० वर्षांचा कलंक मिटण्याचा शुभ दिवस आलेला आहे. गेल्या पाचशे वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा आद्य पुरुष, आपल्या राष्ट्राची ओळख , आपल्या समाजाचा आदर्श, आपल्या अस्मितेच प्रतिक, कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचा वाद, त्यामुळे झालेला संघर्ष, रक्तपात, अपमान या सर्व घटनांची नोंद मनात साठवून ठेवली होती. या सगळ्या गोष्टींचा बीमोड करुन श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आला आहे.

अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचा  शंखनाद होतो आहे. युगानुयुगे ज्या क्षणांची प्रतीक्षा समस्त हिंदू समाज करत होता तो क्षण जवळ आलेला आहे. जर का कोरोनाचे संकट नसते तर हा सोहळा आणखीन अभूतपूर्व झालेला असता आपल्यापैकी अनेकजण अयोध्येला गेले असते पण  आपण आपल्या घरीच हा सोहळा अनुभवणार आहोत, आयुष्यभरासाठी हृदयात साठवून ठेवणार आहोत.

अर्थात काही विघ्नसंतोषी मंडळींच म्हणणं आहेच की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजनाचा कार्यक्रम करणं हे योग्य आहे का त्यांना एकच सांगणे आहे की, कोरोना आहे म्हणून आपण श्वास घ्यायचा थांबवला नाहीये आणि राममंदिर आमच्यासाठी श्वासापेक्षा कमी नाहीये.

अतीव श्रद्धा आणि आपला अधिकार सिद्ध करावे लागतात. प्रसंगी प्राणाची आहुती देऊन हक्क साबित करावे लागतात. आणि "हिंदू" यात कधी मागे रहात नाही. फक्त "हे आमचं" म्हणायला अजिबात गुणवत्तेची गरज लागत नाही, गरज लागते ती "हे आमचंच" आहे आणि ते डंके की चोट पर सिद्ध करण्याची.

५ ऑगस्ट २०२० ही तारीख एक यादगार बनून राहील येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी आणि शिकवण देत राहील आपले हक्क अबाधित रहावे यासाठी गुणवत्तेच्या जोरावर अखंड संघर्ष करण्याची आणि गेलेल्या हक्कांवर विजय मिळवण्याची. मुळात इथे राममंदिर होते हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे होतेच आणि ते ठासून मांडून सिद्ध करण्याची गुणवत्ताही होती हिंदूंमध्ये आणि सिद्ध केलीही. पाच तारखेला रामलल्लाच्या भव्य मंदिराच्या पायाभरणीचा भव्य समारंभ हिंदुस्थानचे लाडके कर्तव्यदक्ष पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र दामोदरदास मोदीजी यांचे शुभहस्ते होत आहे. करोडो हिंदूंच्या वतीने मोदीजी भूमिपूजन करणार आहे.

भूमिपूजनाच्या या मंगल प्रसंगी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींच्या चरणी साष्टांग नमस्कार.

जय श्रीराम 🚩

शुभम शांताराम विसपुते