Saturday, January 18, 2020

तान्हाजी - झंझावात भगव्याचा



योग्य ती सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन, सर्वाना आवडेल असा ऐतिहासिक सिनेमा कसा करायचा याचा वास्तुपाठच निर्माता अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी "तान्हाजी" या सिनेमातून घालून दिला आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांची कथा माहित नाही, असा माणूस महाराष्ट्रात सापडणे अशक्य आहे.
आपण सर्वांनीच शाळेत असल्यापासून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याविषयी ऐकलं, वाचलं आहे. "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं" आणि "गड आला पण सिंह गेला" ही वाक्ये आपल्याला तोंडपाठ आहेत. सिनेमा बघायला जाण्याआधीच त्याची स्टोरी माहीत असणं हे कोणत्याही सिनेमासाठी चांगलंच असतं… मात्र तान्हाजी याला अपवाद आहे! आपल्याला माहित असणारी गोष्ट इथे थोड्या वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितली जाते. अशी आपल्या हृदयात असणारी कथा जेव्हा मोठ्या पडद्यावर आणि बॉलीवूड सारख्या सशक्त माध्यमातून देशभरच नव्हे तर जगभरात दाखविली जाणार असते, तेव्हा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल केले जातात. शेवटी सिनेमा हे कलेबरोबरच व्यवसाय करण्याचे देखील माध्यम आहेच. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी तहात स्वराज्याचे २३ किल्ले गमावले त्यात कोंढाणा (सिंहगड) किल्ला सुद्धा होता. हा किल्ला परत मिळवण्यासाठी जी थरारक झुंज तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांनी दिली त्याची गाथा यात मांडली आहे. मुघलांची दक्षिणेवर राज्य करण्याची महत्वकांक्षा आणि मातृभूमीसाठी मराठ्यांचा संघर्ष यात नेहमी मराठे बाजी मारत आले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामुळे आणि आई भवानीच्या आशीर्वादामुळे. कोंढाणा किल्ल्यावर औरंगजेबाने उदयभान राठोडला किल्लेदार नेमले. याच किल्ल्यावर महाभयंकर अशी 'नागीन' तोफ राजधानी राजगड कडे निशाण धरून ठेवली गेली. अश्या परिस्थितीत कोंढाणा परत स्वराज्यात आणायची मोहीम ठरवण्यात आली आणि मुलाचे लग्न बाजूला सारून तानाजी मालुसरे यांनी ही मोहीम फत्ते केली. बस्स इतकीच गोष्ट आहे, पण ज्या थरारक पद्धतीने ती मांडण्यात आलीय त्याला तोड नाही.

तान्हाजी पहिल्या सिनपासून आपल्याला जो शिवकाळात नेतो तो प्रभाव थिएटर बाहेर आल्यानंतरही कायम राहतो. अंगावर काटा, डोळ्यात प्राण आणून आणि श्वास रोखून बघावा असा हा सिनेमा. वेगवान कथानक, तुफान संवाद, कलाकारांचा सशक्त अभिनय, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, अव्वल दर्जाचे VFX, अजय-अतुल, सचेत-परंपरा या जोड्यांचं संगीत आणि पूर्ण सिनेमाभर उसळायला लावणारं बेफाम बॅकग्राऊंड म्युझिक असं सगळं तान्हाजी मध्ये उत्तम जमून आलय. आशुतोष गोवारीकरचा "पानिपत" जिथे कास्टिंग मध्ये फसला होता, तिथे ओम राऊतने तान्हाजी मध्ये परफेक्ट कास्टिंग करून अर्ध युद्ध आधीच जिंकलंय. मुख्य कलाकारांबरोबरच इतर कलाकारांची कामे उत्कृष्ट झालीय. करारी जिजाऊ माँसाहेब, अस्सल गावराण असे शेलारमामा, बलदंड सूर्याजी मालुसरे, पाताळयंत्री चंद्राजी पिसाळ, दिलखेच दिसणारी कमल याबरोबरच लक्षात राहतो तो  कैलास वाघमारे ने साकारलेला "चुलत्या", थोडेसे संवाद आणि चेहऱ्यावरील जबरी एक्स्प्रेशन ने त्याने ती भूमिका अफलातून साकारलीय. ल्युक केनी ने ‘औरंगजेब’ झोकात साकारलाय. टोपी विणत कारस्थान रचण्याचं दृश्य असो वा हिंसक बुद्धीबळ खेळतांनाचं दृश्य,त्याची उठण्याबसण्याची ढब, झोपण्याची स्टाईल यात तो औरंगझेब कसा असेल हे आपल्याला पटवून देतो.

काजोल सुभेदारीण बाई म्हणजेच सावित्रीबाईंच्या भूमिकेत चपखल बसते. नखशिकांत अस्सल मराठमोळी वाटते ती. आजवर फक्त ३०-३५ सिनेमे करून त्यात ६ फिल्मफेअर जिकणारी ताकदीची कलाकार आहे ती. त्यामुळे या सिनेमात देखील तिचा स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. ती जितकाही वेळ स्क्रीन वर दिसते तिच्यावरून नजर नाही हटत. तानाजींच्या पाठीवरील जखमेवर मलम लावताना तिने जे संवाद म्हटलेय, निव्वळ अप्रतिम. पतीच्या वचनात आणि मुलाच्या काळजीत अडकलेली सावित्रीबाई तिच्या आजवरच्या सर्वोत्तम भूमिकेतली एक वाटते. शेवटच्या गाण्यात फक्त डोळ्यातून तिने केलेला कमालीचा  संयत अभिनय मनात घर करून जातो.

शरद केळकर नी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे थिएटर मध्ये उभं राहून मुजरा करावा इतके जबरदस्त आहे. मुळात त्याचा भारदस्त आवाज आणि मजबूत शरीरयष्टी पाहून वाटतच कि महाराज हे असेच असतील. महाराजांचा करारीबाणा, आपल्या बालपणीच्या सवंगड्यावर असलेलं प्रेम, त्याच्या आठवणीत त्यांचं विव्हळणं हे सगळं शरद केळकर नी उत्कृष्ट साकारलय. महाराजांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर त्याने नेलंय, जिथे पोहचण्यासाठी आता इतरांना खूप मेहनत घ्यावी लागेल. यापुढे जेव्हाही महाराजांची भूमिका कोणी साकारेल त्याची तुलना आपसूकच या सिनेमातल्या महाराजांच्या भूमिकेसोबत होईलच. शेवटी जेव्हा कोंढाण्यावर लढाई सुरु असते तेव्हा आपल्या लाडक्या "तान्या" च्या आठवणीत हळवे झालेले महाराज, पुढच्याचं क्षणी त्याला दिलेली शपथ मोडून त्याच्या मदतीसाठी निघतात, या सीन मध्ये महादरवाजामधून जेव्हा महाराज चालत येतात, ती चाल बघून अंगावर सरसरून काटा येतो. सिनेमा प्रदर्शित होण्याचा अगोदर फक्त पोस्टर पाहून विश्वास वाटला होता कि शरद केळकर अप्रतिमरित्या महाराज उभे करेल आणि त्याने विश्वास सार्थ ठरवला आहे. मुजरा !

सैफ जेव्हाही खलनायकी भूमिकेत येतो तेव्हा तो त्याच सर्वोत्तम काम देत असतो. एक हसीना थी, ओमकारा हि त्याची ठळक उदाहरण. यातला उदयभान त्याने असाच बेफाम साकारला आहे. महाभयंकर, क्रूर, काहीसा विक्षिप्त, कमालीचा योद्धा, एकनिष्ठ, अयशस्वी प्रेमी अश्या वेगवेगळ्या छटा असलेला उदयभान सैफ टेचात उभा करतो. हत्तीने त्याचावर माती उडविल्यानंतर त्याच हत्तीची सोंड कापून त्याच्यावर माती टाकणारा, चालत्या घोड्यावर झोपणारा, मगरीचे मांस खाणारा, अजस्त्र नागीण तोफेवर उभा राहून नदीतून मार्गक्रमण करणारा, पहारेकरीकडून क्षुल्लक चूक झाली म्हणून  त्याला कड्यावरून फेकून देणारा, शेवटच्या हातघाईच्या लढाईत उलट्या तलवारीने लढणारा बेभान उदयभान सैफ जिवंतपणे उभा करतो.

अजय देवगणचा १०० वा सिनेमा आणि त्यातही टायटल रोल हा योग्य त्याने मस्त साधलाय. अजय जी भूमिका करतो त्यात जान ओततो.  फक्त डोळ्यातून अभिनय करणारा अभिनेता आहे तो. आनंद, दुःख, वेदना, सूड, संताप सगळं त्याच्या डोळ्यात उमटतं. भगवा फेटा बांधून जेव्हा मराठी पोशाखात अजय समोर येतो तेव्हा वाटत कि, अजय शिवाय तानाजीच्या भूमिकेला कुणी न्याय देऊ शकलं नसतं. आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाचं, एक मराठा लाख मराठा, हर मराठा पागल हे स्वराज का-शिवाजी राजे का-भगवे का असे एक से एक खुमासदार संवाद अजय आपल्या शैलीत जबरदस्तपणे म्हणतो. कोंढाण्याची मोहीम मिळाल्यावर जिजाऊ माँसाहेब तानाजी च्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात तेव्हा अजय ज्या पद्धतीने त्यांच्याकडे बघतो ते वर्णन करण्यापलीकडे आहे.   

यासर्वांव्यतिरिक्त या सिनेमात आणखी दोन हिरो आहे. सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक. केको नावाच्या सिनेमॅटोग्राफरच्या कॅमेराने कमाल केलीय. गाण्यांपासून लढाईपर्यँत आणि नदीपासून ते उंच कड्यापर्यंत त्याचा कॅमेरा फिरतो. एक एक फ्रेम कमाल झालीय. अशीच कमाल केलीय ती संदीप शिरोडकर या बॅकग्राऊंड म्युझिक देणाऱ्या अवलियाने पूर्ण सिनेमामध्ये त्याच अस्तिव ठळकपणे जाणवत असतं. तानाजी मालुसरे आणि त्यांचे साथीदार जेव्हा कोंढाण्याकडे कूच करतात तेव्हा पाठीमागे वाजत असलेलं "कोंढाणा-कोंढाणा" हे गाणं तो सीन अधिकच गडद करतं. तसेच रा रा रा ही बेफाम थीम हि जमून आलीय.

नको ती सिनेमॅटिक लिबर्टी हा सिनेमाचा मायनस पॉईंट आहेच. पण चालतंय. कारण आपण मराठे काय होतो आणि आपला धगधगता इतिहास कसा होता हे जगाला अभिमानाने दिसणार असेल तर अश्या लिबर्टी कडे दुर्लक्ष केलेलं बरं. अजूनही जर हा सिनेमा तुम्ही पहिला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सिनेमागृहाकडे कूच करा, कारण असे अभिमान वाटावा असे ऐतिहासिक सिनेमे नेहमी नेहमी नाही येत आणि ते बघण्याची मजा, तो अनुभव हा फक्त आणि फक्त थिएटर मध्येच येतो.... जयोस्तु मराठा !!!

- शुभम शांताराम विसपुते 



Monday, January 6, 2020

ए आर रहमान - संगीतातला सिद्धपुरुष


मुळचा "दिलीप कुमार" आणि आताचा "अल्ला रखाँ रहमान" म्हणजेच आपला लाडका ए आर रहमान चा आज वाढदिवस. आज त्याने दिलेल्या गाण्यांबद्दल काही लिहीणार नाही, कारण तो न संपणारा विषय आहे.

रहमानला त्याच्या संगीतासाठी आतापर्यंत ६ राष्ट्रीय पुरस्कार,  २ ऑस्कर (आशियातला एकमेव संगीतकार), २ गिरामी, १ बाल्टी, १ गोल्डन गोब, १५ फिल्मफेअर हिंदी व १७ फिल्मफेअर साऊथ (एकूण ३२ फिल्मफेअर मिळवणारा भारतातला ऐकमेव कलाकार) या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच त्याच्या संगीतक्षेत्रीतील योगदाना साठी भारत सरकार कडून "पद्म भूषण" देण्यात आले आहे. सर्वाधीक देशभक्तीपर गाणी रहमानने दिलीये. असे कितीतरी विक्रम त्याच्या नावावर आहे, पण या सिद्धपुरुषाला त्याच्याने काही फरक पडला नाही आहे. आजही तो जसा होता तसाच आहे, प्रसिध्दीपासुन कोसो दुर. गेल्या २-३ वर्षांपासून तो हिंदीत काम करत नाहीए किंवा एकदमच जुजबी काम करतोय. खरंतर रहमानला बॉलिवूड ची गरज नाहीये पण बॉलिवूडला सध्या रहमानची नितांत गरज आहे...

रहमान संगीतकार म्हणून महान आहेच पण मला त्याचा आवाज देखील प्रचंड आवडतो. फार आतून गातो. त्याच्या आवाजातला सच्चेपणा सतत जाणीव करुन देत असतो की हे फक्त दैवच असू शकतं. नुकताच पाऊस पडून गेल्यावर ऊन पडत तसं सगळं जग मग नवीन वाटतं, सुंदर वाटतं आणि मग कळतं हा तर फक्त आवाज होता. तो इथं नाहीये. बस्स हीच रहमान नावाची जादू आहे. 

रहमानला काही सांगायची गरज नाही पडली कधी, जेव्हा कुणाशीही बोलायच नसतं तेव्हा तो असतोच. तो आहे-नाही, चूक-बरोबर च्या पलीकडे एका वेगळ्या जगात घेऊन जातो, हात धरून. जिथुन त्याला हे सगळं दिसतं सुचतं कदाचित तिथेच! तिथं फक्त त्याच्याशीच नाही तर स्वता:शीच संवाद सुरु होतो आणि आपण परत येतो स्वत:सोबत कनेक्ट होऊन! हे असं कितीतरी वर्ष सुरुय आणि तसंच राहणार आहे.

मी कधी चैन्नईला गेलोच तर सर्वात आधी "कोडंबकम" भागात असलेल त्याच घर पाहून येईल. त्याच्या घराच्याच एका भागात त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. ज्यात दिग्गज गायकांनी रात्र रात्र जागून (रहमान गाण्याच रेकॉर्डिंग रात्रीच करतो) एकेक मास्टरपीस आपल्याला दिलेय. त्या जागेला फक्त बघणं ही माझ्यासाठी "Fan Moment" राहील. 

तुझ्यामुळे माझ्यासारख्या अनेकांची आयुष्य तुझ्या आवाजाने, तुझ्या संगीताने लख्ख केलीय. तुझ्यामुळे अनेक मन प्रकाशित होत राहतील, अनेक आयुष्य बदलत राहतील. 

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा रहमान...

शुभम शांताराम विसपुते