Thursday, September 10, 2020

बंदिश बँडीट्स- संगीताच्या प्रेमात पाडणारी प्रेमकथा

 


सध्याचा जमाना वेब सिरीजचा आहे. सस्पेन्स, क्राईम थ्रिलर या पठडीतल्या सिरीज तर दर महिन्याला प्रदर्शित होत आहे. गेल्या पाच सहा महिन्यांच्या कालावधीत तर वेब सिरीज हे उत्तम प्रतिसाद मिळवलेलं, मनोरंजनाचं माध्यम ठरलंय. वेळ आणि विषय कशाचीही मर्यादा नसल्याने निर्मात्यांच्या दृष्टीनेही संपूर्ण सार्वभौमत्व. पण या सर्वांहून वेगळा विषय घेऊन गेल्या महिन्यात एक नवीन सिरीज प्रदर्शित झाली आहे. अभिजाततेचा दर्जा असलेलं भारतीय शास्त्रीय संगीत याच्या भोवती पूर्ण कथानक असलेली सिरीज आहे "बंदिश बँडिट्स". 

सिरीजच ट्रेलर पहाताना, 'शास्त्रीय संगीतावर आधारित मालिका' असं प्रथमच ऐकण्यात आलं आणि उत्सुकता निर्माण झाली. अर्थात मला शास्त्रीय संगीतातील ज्ञान शून्य पण सर्वप्रकारचे खूप उत्तम संगीत ऐकत असल्याने संगीताबद्दल आवड निर्माण झाली आणि चांगलं संगीत ऐकणारा कानसेन होण्याइतपत समज आलीये.

सिरीजची कथा थोडक्यात अशी आहे, जोधपुरमधील राठोड घराण्याचे संगीत सम्राट पंडित राधे मोहन राठोड (नसीरुद्दीन शाह) यांच्या घराण्यांवर या मालिकेचं कथानक बेतलेलं आहे. त्यांचा मोठा मुलगा राजेंद्र (राजेश तैलंग), सून मोहिनी (शीबा चढ्ढा), धाकटा मुलगा देवेंद्र (अमित मिस्त्री) आणि नातू राधे (ऋत्विक भौमिक) असा त्यांच्या परिवार त्यांच्या पूर्वजांच्या हवेलीत रहात असतात. पंडितजी जोधपूरचे गेल्या पंचवीस वर्षांपासून "स्वर सम्राट" असल्याने त्यांना तिथल्या राजघराण्याकडून राजाश्रय (ग्रांट) मिळत असते. हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत. शिस्तप्रिय आणि कठोर असल्याने इतर कुटुंबीय त्यांच्याच अधिपत्याखाली, दबावाखाली वावरत असतात. आपण पंडितजींचे उत्तराधिकारी व्हावे असं स्वप्न मनीषा राधे बाळगून असतो. परंतु अजूनही तो अपरिपक्व असल्याने पंडितजींनी त्याला गंडा बांधलेला नसतो.

याच दरम्यान 'पॉप संगीत' गाणारी तमन्ना(श्रेया चौधरी) आणि राधे यांची भेट जोधपूरमध्ये तिच्याच कॉन्सर्ट मध्ये होते. जेथे अभिजात संगीताची होणारी चेष्टा सहन झाल्याने राधे शास्त्रीय संगीताची एक झलक पेश करतो. त्याच्या गायकीने तमन्ना प्रभावित होते. एका म्युझिक कंपनीशी झालेल्या करारानुसार, तमन्नाला नवीन गाणं तयार करायचे असते. राधेच्या भेटीमुळे "शास्त्रीय आणि पॉप संगीत फ्युजन" याची कल्पना तिच्या डोक्यात येते. राधेचा परिवारही आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने आणि तमन्नाला देखील आपलं गाणं उत्तम व्हावं म्हणून ते सोबत काम करण्याचं ठरवतात. कामानिमित्त त्यांच्या होणाऱ्या गाठी-भेटी, सांगीतिक चर्चा, गीतलेखन, गाण्यांच्या चाली या साऱ्यामुळे हळूहळू त्यांचं प्रेमही फुलायला लागतं.
 
याच दरम्यान पंडित राधे मोहन राठोड, यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा दिग्विजय (अतुल कुलकर्णी), जो एक प्रसिद्ध गायक आहे, अचानक जोधपुरमधे दाखल होतो आणि आपणच राठोड संगीत घराण्याचे खरे वारसदार असल्याचा दावा करतो. त्याच्या या आगमनाने राठोड घराण्याची अनेक रहस्ये हळूहळू उलगडत जातात. किंबहुना बिकानेर संगीत घराण्याची गायकी चोरून पंडितजींनी राठोड घराण्याची स्थापना केल्याचा आरोपही दिग्विजय करतो.

या घराणेशाहीचा खरा वारसदार निवडीसाठी जोधपुर राजघराण्याच्या राजांच्या उपस्थितीत "संगीत सम्राट" चे आयोजन केले जाते. प्रकृतीच्या कारणामुळे  या स्पर्धेत पंडितजी स्वत: भाग घेता, आपला नातू राधेला प्रतिनिधित्व करायला सांगतात आणि त्यानुसार त्याच्या तयारीलाही लागतात. या स्पर्धेत राधेला, आपला काका दिग्विजयशी मुकाबला करायचा असतो. पुढे तयारी करताना काय अडचणी येतात? राठोड घराण्यातील कुठले राज बाहेर येतात? राधे आणि तमन्ना च्या प्रेमाचं काय होत? संगीत सम्राट कोण जिंकत? यासोबतच अनेक ट्विस्ट आणि टर्न घेऊन सिरीज पुढच्या सिझनची हिंट देऊन निरोप घेते.


सिरीजमध्ये  तब्बल ११ गाणी असून सुरुवातीच्या थीम सॉन्ग पासून शेवटच्या जुगलबंदी पर्यंतची ही एकाहून एक सरस अशीच आहेत. शंकर-एहसान-लॉय या गुणी संगीतकार त्रिकुटाचं संगीत आहे. जावेद अलीने गायलेली ठुमरी 'लब पार आयी', शंकर महादेवनच्या आवाजातील 'पधारो म्हारे देस' आणि 'धारा होगी' ही गाणी विशेष लक्षात रहातात. क्लायमॅक्सला पंडित अजय चक्रवर्ती आणि जावेद अली यांनी गायलेली 'गरज गरज' जुगलबंदी. फ्युजन मधलं 'सजन बिन आये ना' हे गाणं पण छान झालंय. शंकर महादेवनच्या आवाजातील विरहगीत 'एरी सखी' तर केवळ अप्रतिम आहे.


कथेपेक्षाही यातील कलाकारांची निवड हि या सिरीजचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. राधे आणि तमन्नाच्या मुख्य भूमिकेत असलेले ऋत्विक आणि श्रेया नावेदित असून दिग्गज कलाकारांपुढे समर्थपणे उभे राहिले आहे. राधेचं गाण्यांवरील लीप सिंक अप्रतिम असं आहे. श्रेयाचा परफॉर्मन्स पण उत्तम आहे. राधेच्या आईच्या भूमिकेतील शीबा चढ्ढा भाव खाऊन गेलीय सुरुवातीला साइड कॅरॅक्टर वाटणारी ती पुढे मेन ट्रॅकमध्ये येते. तिचं शांतपणे बोलणं, टिपिकल खानदानी राजस्थानी स्त्री प्रमाणे तीच वागणं सगळंच सुरेख आहे. राधेचा मित्र आणि श्रेयाचा मित्र पण मस्त दाखवला आहे. त्याच्या वडिलांच्या भूमिकेतील राजेश तेलंग यांचंही काम चॅन झालंय. मला राधेचा काका हे जास्त बोलणारं पात्र खूप आवडलं. त्याची तळमळ, असहाय्य असणं, आपल्या कलेचा जड काळजाने सौदा करणे, पंडितजींसोबतचा खीर खातानाचा सिन अमित मिस्त्री या कलाकाराने शानदार केलाय. अतुल कुलकर्णीची एंट्री जरी उशिरा असली तरी तो आल्यानंतरची सिरीजवरची त्याची पकड बघण्यासारखी आहे. अतुल गायकाच्या भूमिकेत खूप देखणा दिसला आहे आणि नासिरुद्दीन शाह यांच्याबद्दल काय बोलणार, या वयातही इतका कमालीचा अभिनय करणं खायचं काम नाहीये. साक्षात अभिनयाचं विद्यापीठ असलेला हा कलाकार, कमी डायलॉग असताना  निव्वळ एक्सप्रेशन्सच्या जोरावर आपल्या श्रेष्ठ अभिनयाचं प्रदर्शन करतो.


सिरीज नक्कीच उत्तम आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर आहे. काही त्रुटी पण नक्कीच आहे. पण केवळ संगीतावर असलेल्या प्रेमापोटी बघितली आणि आवडली सुद्धा, त्यामुळे हा संगीताचा आस्वाद किमान एकदा तरी आवर्जून घेण्यासारखा नक्कीच आहे.

शुभम शांताराम विसपुते