"मला असा सिनेमा बनवायला आवडतो जो संपूर्ण जगात कुणीही बघू शकेल, एखाद्या देश किंवा राज्यापुरता मर्यादित राहणाऱ्या विषयात सिनेमा बनवण्याची मला आवड नाही." तुंबाड बघितल्यावर दिग्दर्शक राही अनिल बर्वेच हे वाक्य अगदी शंभर टक्के पटतं. आज "तुंबाड" प्रदर्शित होऊन बरोबर दोन वर्षे होत आहे. तुंबाड बघितल्यावर खरंच असं वाटत होतं की, हा सिनेमा भारतीय नव्हेच. भारतीय पार्श्वभूमी असलेला एखादा जागतिक दर्जाचा सिनेमा आपण बघतोय हीच भावना तुंबाड बघताना होती. माझ्यासारख्या अनेकांना सिनेमा प्रचंड आवडला होता तर बहुतेकांना फक्त पहिला अर्धा तास भीतीदायक वाटला. अर्थात प्रत्येकाची आवड हि वेगळी असते. मी एकट्याने हा सिनेमा थिएटरला बघितला होता. बघून झाल्यावर अनेकांना सांगितलं होतं की, हा सिनेमा थिएटरला जरूर बघा कारण असे सिनेमे पुन्हा पुन्हा नाही येत. तुंबाड हा अनुभवायचा विषय आहे ते ही मोठ्यात मोठ्या पडद्यावर टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल मध्ये बघण्यासाठीचा हा सिनेमा नव्हे.
कथा आहे साधारणतः १९०० च्या दरम्यानची तुंबाड नावाचं ओसाड गाव. तिथे सतत पडणारा पाऊस. भलामोठा चिरेबंदी वाडा. तिथला पगडी घातलेला घाऱ्या डोळ्यांचा वाड्याचा मालक. गूढ वाड्यामधल्या सोन्याच्या मोहरा. त्याच गावातील एका उंच ओसाड डोंगरावर पडक्या झोपडी सारख्या घरामध्ये राहणारी एक विधवा बाई, तिचा मुलगा विनायक, त्याचा छोटा भाऊ आणि आतल्या खोलीत साखळ्यांनी बांधलेली आणि बिभत्स म्हातारी…!! चित्रपटाची सुरवात ह्या दृश्यांपासून होते.
कथा तीन भागात असल्यामुळे ती थोडी सुटी सुटी वाटते. सुरुवातीला लहानग्या विनायक अन त्याच्या आजीच्या भयानक सीन्स मुळे प्रेक्षकांच्या अंगावर जो काटा येतो तो शेवटपर्यंत उतरत नाही. लहान भावाच्या मृत्यूनंतर विनायक आणि त्याची आई तुंबाड सोडते. विनायकाचा लालची स्वभाव माहिती असल्याने त्याची आई पुन्हा तुंबाड मध्ये परत न येण्याचे त्याच्याकडून वचन घेते. पण विनायक पंधरा वर्षांनी सोन्याच्या लालसेने तुंबाड मध्ये परत येतो. त्या पडक्या घरात जाऊन आजीचा शोध घेतो. तिच्याकडून तो वाड्यातल्या खजिन्याची, देवीची अन तिच्या गर्भात लपलेला मुलगा हस्तरची माहिती मिळवतो आणि शोध सुरू होतो वाड्यातल्या खजिन्याचा. त्याला तिथे सोन्याच्या मोहरा मिळतात. तो तुंबाडला येत जातो अन खजिना मिळवत जातो आणि त्याच राहणीमान सुधारत जातं. त्याची बायको, त्याचा मुलगा पांडुरंग यांच्यासोबत कथा पुढे सरकते. हस्तर कडून सोनं लुटण्याची "कला" विनायक त्याच्या मुलाला पण शिकवतो. बाप से बेटा सवाई या उक्तीप्रमाणे त्याचा मुलगा हा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे असतो. सोन्याचा हव्यासाची कथा अनेक वळणं घेत दोघी बापलेकांना कुठवर घेऊन जाते हे सिनेमातच बघण्यासारखे आहे.
तुंबाड जरी "भयपट" (हॉरर) वाटत असला तरी तो भयपटापेक्षा "गूढपट" जास्त आहे. आपल्याकडच्या भयपटाचा जो प्रकार आहे त्या प्रकारात बसणारा हा सिनेमा नाही. सिनेमातल्या म्हातारी किंवा हस्तर पेक्षा विनायक, पांडुरंग यांच्या डोळ्यातील हाव, त्यांची लालसा हि जास्त भीतीदायक आहे. परिस्थिती बदलली तरी माणसाच्या हावरेपणाची प्रवृत्ती तशीच पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाते. चित्रपटात खरंतर ज्याची जास्त भीती वाटायला हवी त्या सीन्स ला प्रेक्षकांकडून "लाफ्टर" येत होता. कारण पडद्यावर दिसणारा हवस, लालसेचा नंगानाच हा कुणाला खुपत नव्हता, हे जास्त भीतीदायक होतं.
एकाच सिन बद्दल सांगतो, विनायकाचा लहानगा मुलगा पांडुरंग आपली पहिली मुद्रा बापाने घरात "ठेवलेल्या" बाईला दाखवत तिला मस्का लावत असतो. 'बाबा ने तो सिर्फ तुम्हें रखा है, मैं तो तुमसे शादी करूँगा' अशी लालच दाखवतो. तिच्या 'उमर क्या है तुम्हारी' ह्या प्रश्नावर हा पट्ठ्या सोन्याची मुद्रा हातात देतो. 'अब से मैं रहूंगा और कुछ साल बाद तो सिर्फ मैं ही रहूंगा' हे तो जेव्हा तिला म्हणतो तेव्हा ती हवस, लालच याची परिसीमा होती आणि प्रेक्षकांचा त्या सिन ला असणारा लाफ्टर हा खरा "हॉरर" होता.
दिग्दर्शक राही बर्वे यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. त्याच्या धाडसामुळेच प्रेक्षकांना तुंबाड सारखा अद्भुत सिनेमा पाहायला मिळाला आणि सोबतच सिनेमात विनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोहम शहा सारख्या निर्मात्याला देखील सलाम, त्याचा अभिनय तगडा आहेच यात वादच नाही, पण ह्या अशा सिनेमावर पैसे लावायला आणि तेवढयाच आत्मविश्वासाने लोकांसमोर आणायला देखील धाडस लागतं. त्यांना उत्तम साथ दिलीये पांडुरंगाच्या भूमिकेतील मोहम्मद समद या बालकलाकाराने त्याचा अभिनय सुद्धा अप्रतिम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमातील जी जख्ख म्हातारी आहे तिची भूमिकाही मोहम्मद समदनेच साकारली आहे. हॅट्स ऑफ. इतर कलाकारांची कामेही उत्तम झाली आहे.
तुंबाड मध्ये दाखवलेले लोकेशन्स ही चित्रपटाची सर्वोत्तम बाजू आहे. त्यातील वाडे, अंधाऱ्या खोल्या, विहीर, दरवाजे, कुलुपं, देवीचा शाप असल्याने सतत पडणारा पाऊस या सर्वांचा एकत्रित परिणाम बघताना आपल्यावर होतो. पंकज कुमारच्या कॅमेराची कमाल पूर्ण चित्रपटात दिसते. निव्वळ अफलातून सिनेमॅटोग्राफी आहे. VFX, स्पेशल इफेक्ट्स दर्जेदार झाले आहे. जॅस्पर कीड ने अफलातून असा बॅकग्राऊंड स्कोर दिलाय. सिनेमाच्या गूढतेमध्ये त्याचा बॅकग्राऊंड स्कोर मोलाची भर घालणारा आहे. द अजय-अतुल यांचं केवळ एक गाणं आहे. त्यातही त्यांनी आपलं नाणं चोख वाजवलं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे गाण्याला पहिल्यांदाच अतुल ने आवाज दिला आहे.
ज्या दिग्दर्शकांच्या सिनेमांची आवर्जून वाट बघावी अश्या दिग्दर्शकांच्या यादीत राही बर्वे ने स्थान मिळवलं आहे. त्याच्या आगामी "रक्तब्रह्मांड" आणि "मयसभा" या दोघी सिनेमांबद्दल उत्सुकता आहे, त्यासाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा. तुंबाड बघितल्यानंतर थेटरमधून बाहेर पडताना अंगावर काटा होता. पुढचे अनेक दिवस चित्रपट डोक्यात होता. एवढा त्या सिनेमाचा माझ्यावर आणि अल्मोस्ट सगळ्यांवर परिणाम झाला. खरच ज्यांना असे वेगळे सिनेमे पाहायला आवडतात त्यांनी आणि प्रत्येक सिनेप्रेमींनी हा तुंबाड बघावाच.
शुभम शांताराम विसपुते